‘नाईन रसा’… थिएटरसाठीचा पहिला प्लॅटफॉर्म!
मराठी सोबतच हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवणारा अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) ‘नाइन रसा’ नावाचा एक नवाकोरा ओटीटी प्लॅटफॉर्म (OTT Platform) ९ एप्रिलपासून घेऊन येतोय. थिएटर संबंधित असणार्या सगळ्या कलांचा समावेश यामध्ये असून यामागची संकल्पना, आलेल्या अडचणी, मनोरंजन सृष्टीतील लोकांच्या प्रतिक्रिया, कुटुंबाचा पाठिंबा याविषयी त्याच्याशी मारलेल्या गप्पा.
१. ‘नाइन रसा’ ही संकल्पना नेमकी कशी सुचली ? या नव्या थिएटर संदर्भातील ओटीटी प्लॅटफॉर्म विषयी सांग.
‘नाइन रसा'(Nine Rasa) ची संकल्पना मागच्यावर्षी लॉकडाउनमध्ये जेव्हा नाट्यगृहं बंद झाली तेव्हा सुचली. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे नाटक आणि नाटकाशी संबंधित लोकांकडे कामच नव्हतं. त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं मनात आलं. आणि त्यातून ही संकल्पना पुढे आली. यामध्ये केवळ नाटकं नसून रंगमंचावर सादर होणार्या ज्या कुठल्या कला आहेत त्या सगळ्यांचा समावेश आहे. माझा हेतू यामागे हाच होता की सगळ्या गोष्टी ऑनलाइन होतायत तर नाटकाने का मागे रहावं? नाट्यसृष्टीतील कलावंतांना मदतीची गरज होती. आणि जगभरातील रसिकांना नाटकांची गरज होती. त्यामुळे हा उपक्रम करण्याचं ठरवलं. ९ एप्रिलपासून ‘नाइन रसा’ अॅप्लिकेशन तुम्ही तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून बघू शकता. ‘नाइन रसा’ हे खूप डेमोक्रॅटिक मॉडेल आहे. आम्ही फक्त रेकॉर्डेड कंटेटवर हक्क सांगितले आहेत. बाकी कुणाला ते नंतर कधी बाहेर कुठे सादर करायचे असतील तर ते करु शकतात. त्याचबरोबर ‘नाइन रसा’च्या माध्यमातून कलाकार, तंत्रज्ञ यांच्यासाठी सततचे उत्पन्नाचे साधन निर्माण होईल असा आमचा प्रयत्न आहे.
२. या प्लॅटफॉर्मवर कोणकोणत्या गोष्टी पाहायला मिळणार ? कोणत्या प्रकारची आणि कोणती नाटकं यात पहायला मिळणार?
जुनी आणि नवी नाटकं असणारच आहेत. त्याचबरोबर एकांकिका, नृत्य, मायमिंग, स्कीट्स, कविता वाचन, अभिवाचन, स्टॅण्डअप असे सगळे रंगमंचीय कलाप्रकार ‘नाइन रसा’वर उपलब्ध असणार आहेत. मराठी, हिंदी, इंग्लिश, गुजराती अशा विविध भाषांमधील कला यावर पहायला मिळणार आहेत. प्रत्यक्ष नाट्यगृहात जाऊन बघण्याच्या अनुभवाजवळ जाणारा अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न असल्याने आम्ही या सगळ्या सादरीकरणांचं चित्रीकरण नाट्यगृहातच केलं आहे.
३. ‘नाइन रसा’ या नावाविषयी…
आम्ही अनेक नावांचा विचार केला. विविध भाषांमधली नावं पडताळून बघितली. हा थिएटरसाठीचा जगातला पहिला प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे नाटक किंवा कुठल्याही रंगमंचीय कला शिकतानाची सुरूवात आपण नऊ रस आत्मसात करून करतो. आमचं हे ठरलं होतं की आपलं नावं भारतीय असावं पण त्यात एक जागतिक अपील असावं. त्या दृष्टीने विचार करताना मग ‘नाइन रसा’ हे नाव ठरवलं. फक्त भारतीयांपर्यंत सीमित न राहता जगभरातील रसिकांपर्यंत भारतीय कला पोहचवणं हा हेतू यामागे होता.
४. करोना काळात हे सगळं काम करत असतांना नेमक्या काय समस्या आल्या? त्यावर तुम्ही मात कशी केलीत?
समस्या आत्ताही आहेत. वाढत्या करोनामुळे आमचं आत्ताचं चित्रीकरण पुढे ढकलायला लागलंय. महत्त्वाची समस्या म्हणजे कमीत कमी माणसांमध्ये काम करणं. सेटवरती आरोग्याच्या दृष्टीने सगळ्या सोयी करून ठेवणं आणि नियम नीट पाळले जातायत की नाही हे बघणं. एखाद्याला बरं वाटत नसेल तर आम्ही त्या दिवशी चित्रीकरण करत नाही. आम्हा सगळ्यांसाठी प्रत्येकाचं आरोग्य महत्त्वाचं आहे त्यामुळे एकमेकांना समजून घेऊन काम करतोय. करोना किंवा लॉकडाऊनमुळे सगळ्यांचं होणारं नुकसान तर आहेच पण त्याचमुळे आम्ही हा एक नवा विचार करू शकलो. या परिस्थितीमुळेच आम्हाला काहीतरी असामान्य विचार करण्यास प्रवृत्त केले.
५. तू एक नट आणि कलाकार म्हणून आम्हाला नाइन रसामध्ये दिसणार आहेस का ?
नक्कीच दिसणार आहे. पण त्यासाठी थोडी वाट बघावी लागेल. सध्या मी ‘नाइन रसा’च्या बॅकस्टेजचं काम सांभाळण्यात व्यस्त होतो. प्रत्येक नाटकाच्या टीमबरोबर आम्ही गप्पा मारल्या आहेत. त्या गप्पांमध्ये मी संवादक म्हणून काम केलं आहे. पण लवकरच नट म्हणूनही या प्लॅटफॉर्मवर मी दिसेन.
हे देखील वाचा: बॉलिवूडमध्ये स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारा श्रेयस तळपदे
६. मराठी – हिंदी मनोरंजन सृष्टीमधून तुझ्या या ओटीटी प्लॅटफॉर्म विषयी काय प्रतिक्रिया आल्या ?
खूप चांगल्या आणि सकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत. कारण लोकांना हे कळतंय की नाटकाचा जो आत्मा आहे, पवित्रता आहे त्याला आम्ही कुठेही धक्का लावत नाही आहोत. नाटकामध्ये काही गिमिक आणायचा प्रयत्न आम्ही केलेला नाही. नाटकाची संहिता आहे तशी फक्त चांगल्या स्वरूपात लोकांपर्यंत आणतोय त्यामुळे लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. मनोरंजन सृष्टीतील अनेक नामवंत कलाकार या उपक्रमाचा भाग आहेत त्यामुळे सगळ्यांनाच उत्सुकता आहे.
७. ज्या वेळेला थिएटर आणि कामं बंद होती अशा वेळेला तू लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलास त्याबद्दल सांग.
मी फार काही मोठं काम केलं असं मला वाटत नाही. माझ्याकडे एक संधी होती आणि मला असं वाटलं की त्या संधीचा उपयोग सगळ्यांसाठी व्हावा. यामुळे मला आणि नाटकासंबंधित लोकांना आनंद नक्कीच मिळाला आहे. ‘नाइन रसा’मुळे आम्ही दिवाळी साजरी करू शकलो किंवा मुलांचे वाढदिवस साजरे करू शकलो, अशा प्रतिक्रिया आल्यानंतर मानसिक समाधान मिळतं. आज जर कुणी मला अशा गोष्टीसाठी लक्षात ठेवत असेल तर मला आनंद आहे.
८. नाइन रसाबद्दल तुझ्या घरच्यांचा कसा पाठिंबा आहे?
त्यांच्या पाठिंब्याशिवाय मला काहीच करणं शक्य नाही. विशेषतः माझी पत्नी दिप्ती, कुठल्याही निर्णयामध्ये माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी असते. कुटुंब जर तुमच्याबरोबर नसेल तर काहीच करणं शक्य नसतं. त्यामुळे त्यांच्याचमुळे मी आज हा पल्ला गाठू शकलोय.
मुलाखत आणि शब्दांकन : गौरी भिडे