….आणि Lata Mangeshkar आणि सचिन देव बर्मन यांच्यातील मतभेद मिटले!

गायक भूपिंदर सिंग यांना हिरो बनण्याची संधी आली होती !
रफी, किशोर, मुकेश या सदाबहार तीन गायकांच्या गायन शैली पेक्षा वेगळी ओळख असलेला गायक म्हणजे भूपिंदर सिंग. त्यांनी सत्तर आणि ऐंशीच्या दशकामध्ये अतिशय अप्रतिम अशी गाणी गायली आणि आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांचा स्वर काहीसा वेगळा असल्यामुळे ढिश्युम ढिश्युम करणाऱ्या नायकांना त्यांचा आवाज काही सूट झाला नाही आणि नेमकी त्यांची कारकीर्द ही मारधाड पट यशस्वी होत होते त्यालाच समांतर होती. पण तरीही काही गाण्यासाठी आपल्याला भूपिंदर सिंग (Bhupinder Singh) यांना आठवावे.
करोगे याद तो हर बात याद आयेगी, एक अकेला इस शहर में, नाम गुम जायेगा, दिल ढूंढता है फुरसत के रात दिन, बीती ना बिताई रैना, किसी नजर को तेरा इंतजार आज भी है… ही गाणी त्यांच्या शिवाय कोण गाऊ शकेल ? गेल्यावर्षी त्यांचे निधन झालं. तत्पूर्वी काही वर्षांपूर्वी त्यांनी रेडिओवर एका कार्यक्रमात एक सुंदर आठवण सांगितली होती आणि आपल्याकडून नकळतपणे झालेल्या एका चुकीची कबुली देखील दिली होती. ही चूक जर आपण टाळली असती तर कदाचित चित्र वेगळे निर्माण झाले असते असं ते त्यावेळी म्हणाले होते. कोणती होती त्यांची चूक ? आणि काय होता हा किस्सा ? भूपिंदर सिंग (Bhupinder Singh) हे मूळचे दिल्लीचे. तिथे ते गायन आणि गिटार वादन हे कार्यक्रम करत असत. त्यांचे वडील हे त्यांचे पहिले संगीतातील गुरु होते. तरुणपणीस त्यांना आकाशवाणीवर संगीतकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
एकदा एका पार्टीमध्ये भूपिंदर गिटार वाजवत होते आणि गात देखील होते. या पार्टीला ख्यातनाम संगीतकार मदन मोहन देखील उपस्थित होते. त्यांना पाहता क्षणी भूपिंदर सिंग याचा स्वर आणि त्याचे गिटार वादन आवडलं. पार्टी नंतर ते त्याला भेटले आणि त्याला मुंबईला यायचे निमंत्रण दिलं. मुंबईला भूपिंदर आले; तेव्हा मदन मोहन चेतन आनंद यांच्या ‘हकीकत’ या चित्रपटाला संगीत देत होते. चेतन आनंद आणि भूपिंदर यांची जेव्हा पहिल्यांदा भेट झाली तेव्हा चेतन आनंद भूपिंदर यांचे पर्सनॅलिटी पाहून खूपच इम्प्रेस झाले आणि ते म्हणाले,” खरंतर तुम्ही चित्रपटात अभिनय करायला पाहिजे एवढे देखणं रूप तुमच्याकडे आहे !” परंतु भूपिंदर यांनी हसत हसत नम्रपणे नकार दिला ” मला माझं करिअर संगीताच्या क्षेत्रातच करायचे आहे !” असे सांगितले.

‘हकीकत’ या चित्रपटात मदन मोहन यांनी भूपिंदरला एका गाण्यांमध्ये गायची संधी दिली. हे गाणं होतं ‘होके मजबूर मुझे उसने बुलाया होगा…’ या गाण्यात त्यांच्यासोबत मोहम्मद रफी, मन्नाडे तलत मेहमूद हे दिग्गज गायक होते. पण अस असतानाही भूपिंदरने आपल्या स्वराला एक वेगळी आयडेंटिटी या गाण्यातून दिली. चेतन आनंद तर हे गाणे ऐकून इतके प्रभावित झाले की, त्यांनी या चित्रपटात भूपिंदर यांना एक भूमिका देखील दिली एका भारतीय सैनिकाची. हे गाणं यातील एक कडवं (जे भूपिंदर ने गायलं होतं) ते त्यांच्यावरच चित्रित केलं. (Bhupinder Singh)
‘हकीकत’ हा चित्रपट चांगला यशस्वी झाला आणि भूपिंदर यांच्याकडे अनेक संगीतकारांचे लक्ष गेले. या चित्रपटानंतर चेतन आनंद आपल्या नव्या चित्रपटातील जुळवा जुळवा करत होते. तेव्हा परत त्यांना भूपिंदरची आठवण झाली आणि त्यांनी या सिनेमांमध्ये मुख्य नायकाची भूमिका भूपिंदर यांना ऑफर केली! परंतु पुन्हा भूपिंदर यांनी त्यांना नम्र नकार दिला. परंतु चेतन आनंद त्यांना रोज फोन करून या सिनेमाचा नायक तूच आहेस असं त्याला सांगत होते. पण भूपिंदर ला अभिनयात अजिबात इंटरेस्ट नव्हता आणि चेतन आनंद यांचा खूप आग्रह होऊ लागला तेंव्हा ते चक्क दिल्लीला निघून गेले. तिथे गेल्यानंतर सुद्धा चेतन आनंद त्यांना निरोप पाठवून पुन्हा पुन्हा बोलवून घेत होते आणि भूपिंदर (Bhupinder Singh) त्यांना तितक्याच नम्रपणे आपला नकार त्याना कळवत होते.
शेवटी कंटाळून चेतन आनंद यांनी या सिनेमासाठी नवीन नायक घ्यायचे ठरवले आणि त्यांनी राजेश खन्ना या नवोदित अभिनेत्याला या सिनेमांमध्ये नायकाची भूमिका दिली! या सिनेमाचा एक वेगळा नायक ठरला असे कळल्यानंतर भूपिंदर पुन्हा मुंबईमध्ये आले. चेतन आनंद यांनी त्यांना पुन्हा गाठले आणि त्यांनी सांगितले,” ठीक आहे तू सिनेमाचा नायक नाही पण या सिनेमात एक गाणं तुझ्यावर चित्रित मला हवं आहे!” असं म्हणून त्यांनी या सिनेमात एक गाणं त्याच्यासाठी खास निर्माण केलं. खय्याम यांनी संगीत दिलेलं हे गाणं होतं ‘रूत जवां रात मेहरबान है…’ हे गाणं चित्रपटांमध्ये भूपिंदर यांच्यावर चित्रित केलं होतं आणि या गाण्यातील गिटार भूपिंदर यांनीच स्वत: वाजवली होती! यानंतर पुढे मात्र चेतन आनंद यांनी त्यांना आग्रह करणे सोडून दिले.
===========
हे देखील वाचा : संजीव कुमारच्या ‘फिल्मी बारशा’ चा वळणदार प्रवास
===========
नंतर सत्तर आणि ऐंशीच्या दशकामध्ये भूपिंदर सिंग (Bhupinder Singh) गायक म्हणून खूप लोकप्रिय झाले नंतर त्यांना चांगले यश मिळाले. पण आयुष्याच्या उत्तरार्धात भूपिंदर यांना एक खंत वाटत होती. आपण एक चूक केली असे वाटत होते. “ चेतन आनंद सारखा एवढा मोठा निर्माता दिग्दर्शक आपल्याला सिनेमांमध्ये नायकाची भूमिका ऑफर करत होता म्हणजे नक्कीच त्याने आपल्या मध्ये काहीतरी पाहिले होते आणि आपण त्याला वारंवार नकार देत होतो जर आपण तेव्हा नायकाची भूमिका स्वीकारली असती तर कदाचित आज चित्र वेगळे झाले असते असे मला वाटते.” असे त्यांनी त्या कार्यक्रमात सांगितले होते. त्यांनी पुढे असेही सांगितले “ मला नकार देण्याचे आणखी एक कारण होते कारण तलत मेहमूद, मुकेश यांनी देखील गाता गाता नायक व्हायचा प्रयत्न केला होता पण तो यशस्वी ठरला नाही कदाचित तेव्हा माझ्याकडून या कारणामुळे देखील नकार दिला गेला असेल पण माझ्याकडून ही चूकच झाली असं मला आता वारंवार वाटते.”