संगीतकार बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) काळाच्या पडद्याआड!
संगीतकार आणि गायक बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) यांचे काल रात्री ११ वाजता मुंबईमधील क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झाले. गेले काही दिवस ते प्रकृती अस्वस्थतेमुळे हॉस्पिटलमध्येच उपचार घेत होते. सोमवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. परंतु, मंगळवारी प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. गेले काही दिवस ते ओएसए (ऑब्स्ट्रक्टिव स्लीप एपनिया) नावाच्या आजारामुळे त्रस्त होते.
कलकत्ता येथे २७ नोव्हेंबर १९५२ रोजी जन्मलेल्या बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) यांच्या डिस्को गाण्यांनी रसिकांना वेड लावले होते. बॉलिवूडमध्ये ८० आणि ९० हे दोन्ही दशके बप्पी लाहिरी यांच्या गाण्यांमुळे संगीतमय झाली होती. आपल्या वेगळ्या शैलीमुळे चित्रपटसृष्टीत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.
गाण्यांप्रमाणेच गळ्यात सोन्याच्या साखळ्या घालण्याची त्यांची ‘स्टाईल’ ही त्यांची ओळख बनली होती. ‘गोल्ड इज माय गॉड’ हे त्यांचे आवडते वाक्य होते.
बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) यांचे मूळ नाव ‘आलोकेश लाहिरी’. बॉलिवूडमध्ये ‘डिस्को’ संगीतप्रकार लोकप्रिय करण्याचे श्रेय बप्पीदांचंच! अमर संगी, आशा ओ भालोबाशा, अमर तुमी, अमर प्रेम, मंदिरा, बदनाम, रक्तलेखा, प्रिया यासारख्या बंगाली चित्रपटांच्या यशानंतर त्यांनी आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवला. वारदात, डिस्को डान्सर, नमक हलाल, शराबी, डान्स डान्स, कमांडो, साहेब, गँग लीडर, सैलाब यासारख्या अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं आहे.
बप्पीदांनी २०१४ साली ‘भाजप’मध्ये प्रवेश करून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. २०१४ सालच्या निवडणुकीत त्यांनी पश्चिम बंगालमधील श्रीरामपूर या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. परंतु, यामध्ये त्यांचा पराभव झाला होता.
बप्पीदांच्या घरात लहानपणापासूनच संपूर्णपणे संगीतमय वातावरण होतं. त्याचे आई-वडील, अपरेश लाहिरी आणि बन्सुरी लाहिरी, दोघेही बंगाली गायक होते. तसंच बॉलिवूडमधील दिग्गज गायक किशोर कुमारही त्यांचे जवळचे नातेवाईक होते. वयाच्या ३ व्या वर्षी बप्पीदांनी तबला शिकण्यास सुरुवात केली होती.
बप्पीदा ओळखले जातात ते डिस्को-शैलीतील गाण्यांसाठी! पण त्यांची काही मेलडीअस गाणीही लोकप्रिय झाली आहेत. ‘चलते चलते’ आणि ‘जख्मी’ चित्रपटातील गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत.
बप्पीदांच्या “थोडा रेशम लगता है” या गाण्याचे काही भाग २००२ साली अमेरिकन R&B सिंगर ट्रुथ हर्ट्सच्या “Addictive” गाण्यात समाविष्ट केल्याप्रकरणी ‘सारेगामा’ म्युझिक कंपनीने कॉपीराईट क्लेम करून दावा दाखल केला होता. त्यांनतर लॉस एजेल्समधील न्यायालयाने या गाण्याच्या म्युझिक सीडी वरील श्रेयनामावलीमध्ये बप्पीदांचे नाव लिहिण्याच्या सूचना दिल्या होत्या.
फिल्फेअर अवॉर्ड, मिर्ची म्युझिक अवॉर्ड अशा अनेक पुरस्कारांसह संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल २०१८ साली त्यांना “लाईफटाइम अचिवमेंट अवार्ड” देण्यात आले होते. त्यांच्या निधनानंतर सिनेक्षेत्रातील मान्यवरांसह कला, क्रिकेट, राजकारण आणि समाजकारणातील व्यक्तींनी त्यांना ट्विटरवर श्रद्धांजली दिली आहे.