‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
यासाठी स्मिता पाटील यांनी उंबरठा ओलांडला…
संगमवाडीच्या अनाथ महिलाश्रमात अधिक्षिकेचं काम करणारी पुरोगामी विचारसरणीची ध्येयवादी सुलभा महाजन…! डॉ. जब्बार पटॆलांच्या “उंबरठा” (१९८१) चित्रपटातील ही नायिका रंगवली होती स्मिता पाटीलने. शांता निसळ यांच्या ’बेघर’ या कथेवर आधारीत या चित्रपटातील तिच्या अदाकारीला तिने जीव ओतून रंग दिल होता. सुलभा महाजनची घरातील घुसमट, सो कॉल्ड वेल कल्चर्ड अँड हाय एज्युकेटेड घरात होणारी तिच्या मनाची तगमग, एकत्र कुटुंबात आलेलं एकाकीपण यातून ती भांबावली जाते. समाजशास्त्राची पदवी हाताशी अन मनात काहीतरी वेगळं करण्याची उर्मी तिला अस्वस्थ करीत असते. तिचा हा मानसिक कोंडमारा एक दिवस संपतो आणि ती संगमवाडीच्या अनाथ महिलाश्रमात नोकरी करू लागते.
मोठ्या हिरीरीने,उत्साहाने घरापासून दूर राहून तळमळीने ती काम करू लागते; पण काही दिवसातच तिचा भ्रमनिरास होतो. आश्रमातील अनाचार,स्वैराचार आणि भ्रष्टाचार तिला अस्वस्थ करतो. मोठ्या उदात्त हेतूने स्थापन झालेल्या या आश्रमात इतक्या गलिच्छ पध्दतीने काम चालते??? ती परिस्थिती बदलायची ठरवते; पण तिचा सुधारणावादी दृष्टीकोन व्यवस्थापनाला अडचणीचा वाटू लागतो. तिच्यावर थातूर मातूर आरोप करून तिला ‘वन मॅन कमीशन’ पुढे उभे केले जाते. इथं तिच्या मनाचा बांध फुटतो. महिलांच्या प्रश्नाकडे समाज एवढ्या कोणत्या नजरेनं कसा बघतो? स्त्रियांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणार्या फुले-शाहू-आंबेडकर-कर्वे यांचा उठता बसता जप करणार्या पुरूषसत्ताक व्यवस्थेतील पुरूषी दृष्टीकोन इतका ‘आदीम’ का??? हा प्रश्न तिला सलू लागतो. प्राप्त परिस्थिती बदलण्याची तिची अजोड हिंमत ‘मी पराभव स्विकारणार नाही. इथं नाही तर दुसरीकडे; पण मी खचणार नाही.’ हा तिचा दुर्दम्य आशावाद असतो.
संगमवाडीतून ती घरी परतते, पण घरात आता तिची कुणालाच गरज नसते.तिची मुलगी काकूंसोबत खुषीत असते तर नवर्याने पती म्हणून असलेले नैतिक पावित्र्यही लाथाडलेले असते. समाज आणि घर दोन्हीकडे तिला मूल्यांचा धडधडीत पराभव झालेला दिसतो. या सगळ्याची कमालीची घृणा वाटून त्या क्षणी ती पुन्हा घराचा उंबरठा ओलांडते; पण आता ती अधिक प्रगल्भ अधिक मॅच्युअर्ड झालेली असते…!
सिनेमा इथे संपत असला, तरी प्रश्न संपत नाहीत. स्मिताच्या अभिनयाचा लखलखता नजारा इथे पहायला मिळाला. कुठेही आक्रस्ताळपणा,आरडाओरडा असा ‘टिपीकल मेलोड्रामा’ न करता आपला संवेदनशील चेहरा आणि भावस्पर्शी डोळ्यांनी तिने सुलभा महाजन रंगवली.तिच्या संपूर्ण कालखंडातील कलात्मक अभिनयाला आणखी उंचावर नेणारी ही भूमिका होती. त्याचबरोबर मराठी चित्रपटासाठी वैचारीक प्रगल्भतेचा ‘उंबरठा’ ओलांडणारी निश्चित होती…! आज हे सर्व आठवायचे कारण म्हणजे १३ डिसेंबर हा तिचा स्मृतीदिन..! तिच्या जाण्याला पस्तीस वर्षे पुरी होतायत,पण तिची उणीव आजही कायम आहे…!