दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
…तर असा आहे राकेश रोशन यांचा फिल्मी प्रवास
आप के दीवाने (दिग्दर्शक सुरेन्द्र मोहन), कामचोर आणि जाग उठा इन्सान ( दोन्हीचे दिग्दर्शन के. विश्वनाथ) आणि भगवानदादा (दिग्दर्शक जे. ओम प्रकाश) या चारपैकी पहिले दोन चित्रपट लोकप्रिय ठरले, उर्वरित दोन रसिंकांनी नाकारले असता अभिनयाकडून चित्रपट निर्मिती पाऊल टाकलेला राकेश रोशन (Rakesh Roshan)आता चित्रपट दिग्दर्शनात उतरण्याची तयारी करत असतानाची गोष्ट.
आपल्या फिल्म क्राफ्ट या चित्रपट निर्मिती बॅनरखालील दिग्दर्शनातील पहिल्याच चित्रपटाची थीम, नाव, कलाकार, चित्रीकरण सत्र याबाबत नियोजन करीत असतानाच राकेश रोशनच्या (Rakesh Roshan) वाचण्यात आपल्या एका चाहत्याचे पत्र आले ( त्या काळातील स्टार्सना येणारी फॅन्स लेटर्स हा बराच रंजक विषय. अनेक कलाकार ती वाचण्यासाठी वेगळा वेळ काढत. एक विशेष उल्लेखनीय गोष्ट, त्या काळातील चाहते आपल्या आवडत्या कलाकारावर भरभरुन प्रेम करत. आज प्रेमापेक्षा ट्रोल करण्यात कसला आनंद मिळतोय काय माहित?) त्या पत्रात राकेश रोशनना एक छान सल्ला दिला होता, आत्तापर्यंत त्याने निर्माण केलेल्या चित्रपटातील सर्वाधिक हिट ‘कामचोर’, तात्पर्य ‘के’ शब्दाने सुरु होणारे नाव ‘लकी’ आहे.
राकेश रोशनने (Rakesh Roshan) आपल्या फॅनचा सल्ला मानला आणि आपल्या दिग्दर्शनातील पहिल्या चित्रपटाचे नाव ठेवले ‘खुदगर्ज ‘ (१९८७). रवि कपूर व मोहन कौल यांची बंदिस्त पटकथा, चित्रपटात जितेंद्र, शत्रुघ्न सिन्हा, भानूप्रिया, गोविंदा, नीलम, पाहुणा कलाकार ॠषि कपूर आणि किरणकुमार प्रथमच व्हीलन. मुंबईत मेट्रो थिएटरमधील ग्लॅमरस प्रीमियर आणि मग कुलाब्यातील एका पंचतारांकित हॉटेलमधील दणदणीत पार्टी आजही आठवतेय. राकेश रोशनच्या एकूणच देहबोलीत पिक्चर हिटचा आत्मविश्वास होता आणि तसेच झाले. मेट्रोत पिक्चरने रौप्यमहोत्सवी आठवड्यापर्यंत मुक्काम केला आणि राकेश रोशनने ‘के’च्या बाराखडीतील पिक्चर निर्मित व दिग्दर्शित करण्यात रमला. कधी यशस्वी ठरला (खून भरी मांग, किशन कन्हय्या, करण अर्जुन) काही फ्लाॅप (किंग अंकल, कोयला) अशी मिलीजुली वाटचाल सुरु राहिली. ‘किंग अंकल ‘ची भूमिका अमिताभ बच्चन साकारणार याची एवढी व अशी चर्चा रंगली की पिक्चर पडद्यावर आल्यावर जॅकी श्राॅफमध्ये पब्लिक अमिताभ बघू लागले. याचा परिणाम पिक्चर फ्लाॅप.
हे सगळं होत असतानाच ऋतिक वयात येत होता, ‘कारोबार ‘च्या वेळी पित्याकडेच चार क्रमांकाचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून उमेदवारी सुरु केली. ‘कोयला’साठी तो युनिटसोबत अरुणाचल प्रदेशातील इटा नगरला गेला. त्यांच्यासोबत राहिला, यातून ऋतिकला ‘सेटवरच्या वातावरणा’ची सवय झाली आणि राकेश रोशनने ‘कहो ना प्यार है या चित्रपटामध्ये त्याला हीरो केला आणि रोशन कुटुंबातील तिसरी पिढी चित्रपटसृष्टीत आली. या दिग्दर्शक पिता आणि निवडक चित्रपटात भूमिका साकारत असलेला पिता यांनी कोई मिल गया इत्यादी चित्रपट दिले.
आजची डिजिटल पिढी राकेश रोशनला ऋतिक रोशनचे दिग्दर्शक डॅडी म्हणून ओळखते. याउलट राकेश रोशनने एकेकाळी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले तेव्हा संगीतकार रोशन यांचा मुलगा अशी त्याची ओळख होती. रोशन हे साठच्या दशकातील एक आघाडीचे संगीतकार. ताजमहाल, ममता इत्यादी चित्रपटातील त्यांची गाणी आजही लोकप्रिय आहेत. त्यांचा एक मुलगा राकेश याने सुरुवात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली. तर दुसरा मुलगा राकेश रोशन याने संगीत क्षेत्रात पाऊल टाकले.
राकेश रोशनने राजेंद्रकुमार व बबिता यांच्या भूमिका असलेल्या ‘अंजाना’ ( १९७०) च्या वेळेस दिग्दर्शक मोहनकुमार यांच्याकडे उमेदवारी सुरु केली. तेव्हा राजेंद्र कुमारनेच दिग्दर्शक सुदेशकुमार यांना ‘मनमंदिर ‘ ( संजीवकुमार व माला सिन्हा) साठी सहाय्यक म्हणून राकेश रोशनचे नाव सुचवले. त्या चित्रपटात त्याने छोटीशी भूमिकाही साकारलीय. ‘सीमा ‘ चित्रपटातही तशीच छोटीशी भूमिका साकारली. अशातच घर घर की कहानी, पराया धन, ऑखो ऑखो मे या चित्रपटात नायकाची भूमिका मिळाली. ते चित्रपट पडद्यावर येईपर्यंत ‘ऑख मिचौली ‘ मिळाला. ते दिवस राजेश खन्नाच्या जबरदस्त क्रेझचे होते, दुसरीकडे पुण्यातील एफटीआयमधून ( दूरदर्शन आणि चित्रपट अभिनय संस्था) अभिनय प्रशिक्षण घेऊन नवीन निश्चल, विजय अरोरा, सुभाष घई, डॅनी डेन्झोपा असे बरेच जण चित्रपटसृष्टीत आले.
राकेश रोशनला (Rakesh Roshan) वाट काढणे सोपे नव्हते, अशातच अमिताभ बच्चनच्या ॲन्ग्री यंग मॅनचे वादळ घोंघावू लागले. राकेश रोशनने कधी सोलो हीरो (खट्टा मिठ्ठा, इकरार, आंगन की कली… यात बासू चटर्जींचा ‘खट्टा मिठ्ठा ‘ महत्वाचा. खुमासदार मनोरंजन ) तर कधी दोन वा तीन हीरोंचे चित्रपट (जखमी, खेल खेल मे, झूठा कही का, मदहोश, त्रिमूर्ती, नियत,आक्रमण, प्रियतमा, धनवान, हत्यारा, बुलेट, आखिर क्यू इत्यादी अनेक) असे करत करत मार्गक्रमण केले. आपल्या मर्यांदांची जणू जाणीव ठेवून त्याने प्रवास केलाय याचाच अर्थ तो फोकस्ड आहे, त्याच्याकडे कमालीचा संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन असल्याचे ओशिवरा येथील त्याच्या कार्यालयात ‘काईटस ‘च्या वेळेस मुलाखत घेताना लक्षात आले. ‘काईटस ‘चे दिग्दर्शन अनुराग बासूचे होते, ते राकेश रोशनने केले असते तर असा त्याला अनपेक्षित असलेला प्रश्न मी करताच तो थोडा बॅकफूटवर गेला.
========
हे देखील वाचा : पिक्चरच्या पीचवरचे क्रिकेट
========
‘कहो ना प्यार है’ तुफान गर्दीत सुरु असतानाच सांताक्रूझ येथील फिल्म क्राफ्टच्या बाहेर त्याच्यावर झालेल्या हल्ल्यात तो सुदैवाने बचावला. पण त्या धक्कातून लवकर बाहेरही पडला. राकेश रोशनच्या खासियती अनेक. दिग्दर्शक म्हणून त्याने कायमच आजची आणि उद्याची पिढी कशाला प्राधान्य देतेय, त्यांच्या आवडीनिवडी काय असा विचार करुनच ‘क्रिश’ (२००६) पासून सुपर हिरोची चित्रपट मालिका जणू सुरु केलीय. थीम असो, त्याच्यावरची पटकथा असो, त्यानुसार कलाकार असो (अर्थात हीरो ह्यतिकच), मग शूटिंग स्पाॅट, रितसर शूटिंग यासाठी भरपूर वेळ घेणारा असा सिनेमावाला एकादाच. अशा राकेश रोशनला (Rakesh Roshan) वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. त्याचा फिटनेस पाहता त्याने वयाच्या पंचाहत्तरीत प्रवेश केल्याचे जाणवत नाही हो.