
सोनालीच्या लग्नाच्या व्हिडीओ स्ट्रीमिंगमुळे मराठी चित्रपटसृष्टीत सेट होतोय नवा ट्रेंड…
“खरंतर कलाकार नेहमीच आपल्या वैयक्तिक गोष्टी खासगी ठेवतात, मात्र मला माझा आयुष्यातला आनंदाचा क्षण चाहत्यांसोबत शेअर करायचा आहे, म्हणूनच मी या सोहळ्याचं प्रसारण करण्याचं ठरवलं…”, असं म्हणत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिने तिच्या लग्नाच्या व्हिडिओचा टीझर शेअर केला आणि मराठी चाहत्यांना विशेषतः सोशल मीडियावर चर्चेसाठी नवा विषय मिळाला. बॉलिवूडचा हा ट्रेंड मराठी सेलिब्रेटींमध्येही येणार का इथपासून, काय गरज आहे असं करण्याची पर्यंत, संमिश्र प्रतिक्रियांनी सोशल मीडियावर भलताच बझ तयार झाला.
सोनालीनं वर्षभरापूर्वीच लंडनस्थित कुणालशी रजिस्टर पद्धतीनं लग्न केलं, मात्र लॉकडाउन आणि त्या अनुषंगाने आलेल्या विविध अडचणींमुळे अगदी तिच्या घरचेही लग्नाला येऊ शकले नाहीत. वर्षभरानंतर सगळं आलबेल झाल्यावर त्या दोघांनी परत एकदा मराठमोळ्या पद्धतीनं लग्न केलं, मात्र सोनालीनं या लग्नाचे फोटो शेअर न केल्यामुळे चाहते संभ्रमात पडले होते, अखेर काही दिवसांपूर्वी सोनालीचं लग्न ‘प्लॅनेट मराठी’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तीन भागांत पाहता येणार असल्याचं जाहीर झालं आणि एकच चर्चा सुरू झाली. (Sonalee Kulkarni -Kunal Wedding Video)

काय हरकत आहे?
बॉलिवूडमध्ये आतापर्यंत विराट-अनुष्का, दीपिका- रणवीर, प्रियांका- निक, आलिया- रणबीर आणि विकी- कतरिना असे विवाह सोहळे त्यांच्या भव्यपणामुळे प्रचंड गाजले. लग्नातला त्यांचा लूक, कपडे, दागिने, त्यातून सेट केले गेलेले नवे ट्रेंड, लग्नासाठी आलेले सेलिब्रेटी वऱ्हाडी यांची कित्येक दिवस चर्चा होत राहिली. या जोडप्यांपैकी विकी- कतरिनानं त्यांच्या लग्नाच्या फोटोचे हक्क मीडियाला विकल्याचं जाहीर झाल्यावर त्यावरही बरीच उलटसुलट चर्चा झाली.
एकीकडे विकी- कतरिनानं आपल्या अतिशय खासगी बाबीची अशा पद्धतीने विक्री का करावी असा चाहत्यांचा प्रश्न होता, तर दुसरीकडे सेलिब्रेटींच्या आयुष्यातला जनतेचा रस प्रचंड वाढला असताना आणि आपल्याभोवती असलेल्या वलयामुळे लग्नाचे फोटो किंवा व्हिडिओसाठी प्रचंड मोठी किंमत मिळत असेल, तर व्यावहारिकपणा का दाखवू नये, असं म्हटलं गेलं.
सोनालीच्या निमित्ताने हा ट्रेंड मराठी सेलिब्रेटींमध्ये पहिल्यांदाच दिसत असल्याचं कौतुक केलं जातंय. हिंदी सेलिब्रेटींमध्ये मराठी सेलिब्रेटींना जर असं वलय अनुभवायला मिळत असेल, तर काय हरकत आहे असा या चर्चेचा सूर आहे. (Sonalee Kulkarni -Kunal Wedding Video)

फक्त सेलिब्रेटीज नव्हे
केवळ सेलिब्रेटीज किंवा मराठी सिनेमा क्षेत्रच नव्हे, तर आज सामान्य मराठी माणसाच्या आयुष्यातही बॉलिवूड घट्ट रूजलं आहे. मराठी लग्नांकडे नजर टाकली, तर हा पगडा ठळकपणे दिसून येतो. हळदीचा सोहळा, संगीत, नवरदेवाचे जुते लपवणे किंवा नववधूला मांडवाखालून मंडपात आणणं, अशा मराठी नसलेल्या पद्धती आज आपल्या लग्नसोहळ्यांचा महत्त्वाचा भाग झाल्या आहेत. त्यामुळे बॉलिवूडच्या सेलिब्रेटींच्या लग्नात हमखास दिसणारे ट्रेंड, त्याबद्दलची उत्सुकता, मुख्य मीडियापासून सोशल मीडियापर्यंत दिसणारी त्याबद्दलची उत्सुकता मराठी क्षेत्रातही दिसू शकते. मराठी सिनेमा व एकंदर उद्योग गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या पैलूंसह बहरत आहे. राष्ट्रपती पुरस्कारांमध्येही मराठीचं वर्चस्व असतं. मराठीतले कलाकार आता केवळ नगण्य भूमिकांपुरते उरलेले नाहीत, तर हिंदी मालिका, रिअलिटी शो, हिंदी सिनेमे यांत त्यांना आता मानाचं स्थान मिळतंय.
ट्रेंड रूळणार?
गेल्या काही काळात सुयश टिळक- अक्षया, सिद्धार्थ चांदेकर- मिताली मयेकर, रसिका सुनील- आदित्य बिलागी, आस्ताद- काळे- स्वप्नाली यांच्या डेटिंगपासून डेस्टिनेशन वेडिंगमधल्या प्रत्येक विधीचे फोटो प्रचंड गाजले आणि व्हायरल झाले. मराठी प्रेक्षकांमध्ये दीपिका- रणवीरइतक्याच त्यांच्या लग्नाच्या फोटोंची उत्सुकता पाहायला मिळाली. (Sonalee Kulkarni -Kunal Wedding Video)
======
हे देखील वाचा – वडील गेल्याच्या दुःखात असतानाही केला विनोदी सीन चित्रित… कुठला होता हा सीन?
======
आता सोनाली- कुणाल आपलं लग्न ओटीटीच्या माध्यमातून जगभरात प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत. एरवीही या सेलिब्रेटीजचं राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावरचं फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे आणि त्यांना अर्थातच आपल्या लाडक्या सेलिब्रेटीच्या कामाबरोबर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यात रस आहे. अशापरिस्थितीत बॉलिवूड सेलिब्रेटींचा वैयक्तिक आयुष्य जगासमोर जाहीरपणे आणण्याचा हा ट्रेंड मराठीतही रूळला तर नवल वाटायला नको.
– कीर्ती परचुरे