टॅलेंट आणि ग्लॅमरच समीकरण म्हणजे सोनाली बेंद्रे…
स्टारची उंची हा चर्चेचा/बातमीचा (ब्रेकिंग न्यूजचा तर नाहीच नाही हो) विषय होऊ शकतो का??? जॉन मॅथ्यू दिग्दर्शित “सरफरोश” (१९९९) चे शूटिंग सुरु असतानाची गोष्ट…! चित्रपटसृष्टी आणि मिडियातील काही जणांना एका गोष्टीचे विशेष कुतूहल वाटत होते, आमिर खान व सोनाली बेंद्रे ही जोडी पडद्यावर कशी दिसेल??? सोनाली बेंद्रेची उंची पाहता तर आमिर काहीसा बुटका तर वाटणार नाही??? यावर कुजबुज, चुळबुळ सुरूच होती. सिनेमा रिलीज झाल्यावर या दोघांच्या उंचीत फारसा काही फरक जाणवला नाही. (त्यासाठीच सिनेमा पाहायचा असतो का?)
खरं तर, या चित्रपटाची थीमच अशी वेगळी आणि पॉवरफुल आहे की, अशा शारीरिक उंचीची मोजदाद ही गोष्ट अगदीच गौण होती. पण एखाद्या स्टारची उंची, वजन, बारीक अथवा जाड होणं अशा गोष्टींना त्यांच्या अभिनयापेक्षा अनेक तरी उगाच महत्व येते. (फिल्मी मिडियाला चमचमीत खाद्य हवे असते.) “सरफरोश” ला आम्हा समिक्षकांच्या शोपासूनच असा आणि इतका जबरदस्त रिस्पॉन्स दिला की प्रेक्षकांचीही या चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आणि पूर्ण देखील झाली.
सरफरोश या सिनेमामध्ये रोल मिळाल्यानंतर…
या चित्रपटाच्या यशाच्या निमित्ताने सोनालीच्या घरीच तिची मी मुलाखत घेत असताना गप्पांच्या ओघात ही ‘उंची गोष्ट’ येताच ती छान हसली आणि म्हणाली, “सरफरोश” चे शूटिंग सुरु होण्यापूर्वीही हा प्रश्न पडला होता. मग काय करायचं??? जॉनच्या घरीच एका फ्रेन्डली पार्टीत मी आणि आमिर जवळ जवळ उभे राहिलो आणि तपासून पाहिले, तेव्हा लक्षात आले की, आमची उंची जवळपास सारखीच आहे आणि पडद्यावर तसे काही जाणवणार नाही, याची कॅमेरा काळजी घेणार होताच…. “सरफरोश” च्या यशाने सोनालीच्या करियरला एस्टॅब्लिशमेंट मिळाली असे दिसते. तो आणि सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित “हम साथ साथ है” हे सोनालीच्या करियरचे छान टर्निंग पॉईंट. सोनाली मूळची मॉडेल. ते देखील ती हौस म्हणूनच करत होती. (त्यापेक्षा तिला उच्च शिक्षणाची आवड) ग्लॅमर व गॉसिप्स यांची ग्लॉसी पेपर्सवर खमंग केमिस्ट्री असलेल्या “स्टारडस्” या मॅगझिनच्या ‘न्यू टॅलेंट स्पर्धे’ त तिची निवड झाली आणि मग तिने चित्रपटात भूमिका स्वीकारायची का??? असा प्रश्न बेंद्रे कुटुंबात निर्माण झाला. सोनालीने आजीचा सल्ला योग्य मानला आणि होकार मिळताच चित्रपटात भूमिका स्वीकारु लागली.
टॉप फाईव्ह अभिनेत्री असताना सोनालीचा जम कसा बसला…
सोनालीने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले तेव्हा माधुरी दीक्षित, मनिषा कोईराला, जुही चावला, करिष्मा कपूर, रविना टंडन या टॉप फाईव्ह अभिनेत्री म्हणून फोकसमध्ये होत्या. काजोल, उर्मिला मातोंडकर, पूजा भट्ट, शिल्पा शेट्टी, तब्बू, शिल्पा शिरोडकर, सोनम यांचीही घौडदौड सुरु होतीच. श्रीदेवी, जयाप्रदा, डिंपल कपाडिया यांचा भर ओसरत होता तरी अस्तित्व कायम होते. सोनालीसाठी आव्हानात्मक परिस्थिती होती. सोहेल खानने तिला “राम” या चित्रपटासाठी साईन केले, पण तो चित्रपटच बनला नाही. अशा वेळी दोन नायिकांचे चित्रपट अथवा एखादा मध्यम चित्रपट हाच पर्याय समोर होता. के. रविशंकर दिग्दर्शित “आग” (गोविंदा व शिल्पा शेट्टी), महेश भट्ट दिग्दर्शित “नाराज” (मिथुन चक्रवर्ती व पूजा भट्ट) या चित्रपटात सोनालीने दुसऱ्या नायिकेची भूमिका स्वीकारली.
फिर भी दिल है मराठी…
या बातम्या ट्रेड पेपर्समध्ये आल्या, त्या दिवसातील एक आठवण…. त्या काळात मी नेहमी आठ दहा दिवसांनी जुहूच्या ‘शूटिंगवाल्या बंगल्या’ त कोणाकोणाचे शूटिंग चाललेय, त्याचे शूटिंग रिपोर्टीग, जमल्यास दिग्दर्शकाची मुलाखत असे काही करीत असे. अशातच अरुणोदय बंगल्यात भरत रंगाचारी दिग्दर्शित “टक्कर” च्या सेटवर पोहोचलो. नसिरुद्दीन शहासोबत दृश्य देत असलेल्या युवतीला आपण अनेक जाहिरातीत पाहतो हे लक्षात आले. काही टेक रिटेकने दृश्य ओके होताच पुढे होत, त्या युवतीला भेटत मी हिंदीत म्हणालो, मै मराठी मिडिया मे लिखता हू….. तेवढ्यात ती म्हणाली, तुम्ही महाराष्ट्रीय आहात ना??? मग आपण मराठीत बोलू या. माझे नाव सोनाली बेंद्रे. आज माझा हिंदी चित्रपटसृष्टीतला शूटिंगचा अगदी पहिलाच दिवस आहे आणि मी आणखीन दोन हिंदी चित्रपट साईन केले आहेत….
नृत्याची आवड तिच्या पथ्यावर पडली…
सोनाली बेंद्रेची ही पहिली भेट अशी इंटरेस्टिंग ठरली एखाद्या सिनेमासारखी. सोनालीचे एकेक करत अनेक हिंदी चित्रपट रिलीज होत राहिले, पण हिंदीत वावरतानाही ती मराठी विसरली नाही. आपल्या घरी मराठी वृत्तपत्र, साप्ताहिक येत असते हे मराठीत सांगण्याचा तिचा उत्साह कौतुकाचा असे. सोनालीला पहिले यश लाभले ते, मणी रत्नम दिग्दर्शित “बॉम्बे” (१९९५) मधील ‘हो गये हम और तुम’…. या डान्सने…! तिची ही पाहुणी भूमिका. हा चित्रपट मुंबईतील १९९२९३ च्या जातीय दंगलीच्या पाश्वभूमीवरील संगीतमय अशी आंतरधर्मिय प्रेमकथा. त्यात रिलीफ म्हणजे हे गाणे होते. सोनाली खरं तर नृत्य शिकली नव्हती. पण प्रवीण निश्चल निर्मित “इंग्लिश बाबू देसी मेम” मधील नृत्यासाठी तिने कसून प्रशिक्षण घेतले, सराव केला. जुहूच्या एका नृत्य शाळेत ती रोजच सकाळी येई. तिची ही नृत्याची आवड आणि ओढ तिच्या पत्थावर पडणे अगदी स्वाभाविक होतेच. “हम साथ साथ है”, “लज्जा” इत्यादीत तिचा नृत्यातील आत्मविश्वास दिसतो.(“लज्जा” मधील ‘साजन के घर जाना है’ तिचे सर्वोत्कृष्ट नृत्य ) तिच्या ग्लॅमरस इमेजमुळे तिच्या या गुणांवर म्हणावा तसा ‘फोकस’ पडला नाही.
हे ही वाचा: सिंगल स्क्रीन वा मल्टीप्लेक्स, लोकांना थेटर्सकडे खेचून आणणारा बॉक्स ऑफिस किंग – सलमान खान!
एकीने नाकारलं आणि सोनालीच्या पदरात पडलं…
‘इंग्लिश बाबू देसी मेम’ मध्ये खरं तर पूजा भट्ट नायिका होती, पण तिने अभिनय क्षेत्रातून मागे व्हायचे ठरवले आणि सोनालीला शाहरूख खानची नायिका होण्याची संधी मिळाली. अशा पध्दतीने ‘कोणी तरी सिनेमा सोडला म्हणून आपल्याकडे आला’ हे सोनालीने व्यावसायिक दृष्टिकोनातून स्वीकारले. या क्षेत्रात असे होत असते असेच मानले. ही तिची खूप महत्वाची व्यावसायिक मॅच्युरिटी. महेश भट्ट दिग्दर्शित “ड्युप्लीकेट” तून ‘रमय्या बाहेर पडली’ आणि शाहरूख व जुही चावलाच्या जोडीला सोनाली आली. गंमत म्हणजे, मेहबूब स्टुडिओत महेश भट्ट एकाच वेळेस दोन सेटवर “अंगारे” (अक्षयकुमार, पूजा भट्ट आणि सोनाली बेंद्रे) व “ड्युप्लीकेट” चे शूटिंग करण्यात यश मिळवले. (तरी बरं तोपर्यंत मोबाईल आला नव्हता.)
मराठी चित्रपटात पडलं पहिलं पाऊल…
सोनालीने “अगं बाई अरेच्च्या” या मराठी चित्रपटात साकारलेल्या ‘छम छम करता है यह नशिला बदन’… या आयटम सॉन्गची लोकप्रियता आजही कायम आहे. सोनालीला चांगली पटकथा असेल तर मराठी चित्रपटात भूमिका करायची होती, ते मात्र योगायोगाने घडले. अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांना “अनाहत” साठी सोनालीच परफेक्ट नायिका वाटली. सोनालीने त्यांना आपल्या भेटीसाठी कमालीस्थान स्टुडिओमध्ये “तेरा मेरा साथ रहे” च्या सेटवर बोलावले. मेकअप रुममधील सिटींगमध्ये सोनालीला “अनाहत” ची थीम आवडली, अमोल पालेकर यांचे नॅरैशन आवडले. आणि तिने होकार दिला (ही बातमी लोकसत्तात छोटीशी का होईना पण पान तीनवर आली. तेव्हा आजच्यासारख्या अगदी रोजच ‘फिल्मी बातम्या’ देण्याची पध्दत नव्हती.) हो, पण तेव्हा “अनाहत” हिंदी भाषेत निर्माण होणार होता. एक वेगळीच भूमिका म्हणून सोनालीचा ‘होकार’ होता. पण काही दिवसांनी अमोल पालेकर यांना हा चित्रपट हिंदीत नव्हे तर मराठीत निर्माण करण्याचा निर्णय घ्यावा लागला. आता, सोनाली मराठीसाठी तयार होईल का??? अशी पालेकराना शंका असली तरी सोनालीला विषय आणि व्यक्तिरेखा दोन्ही आवडल्याने तिने आपला होकार कायम ठेवला आणि या चित्रपटाच्या हम्पी (कर्नाटक) मधील शूटिंगचा आनंद घेतला.
इतर भाषांमध्ये सोनालीचे चित्रपट…
सोनालीने तमिळ, तेलुगू, कन्नड या भाषेतील चित्रपटातही छान सातत्य ठेवले. तिने भूमिका साकारलेला ‘Preethse’ हा कन्नड चित्रपट यश चोप्रा दिग्दर्शित “डर” ची रिमेक. विविध भाषांमधील चित्रपटात भूमिका साकारत सोनालीने आपली करिअर प्रवाही ठेवली. (दरम्यान, महिमा चौधरी, ऐश्वर्या रॉय, सुश्मिता सेन, अमिषा पटेल, बिपाशा बासू, करिना कपूर यांचे फिल्म इंडस्ट्रीत आगमन झाले, आपली करिअर सुरु असताना आपल्या आजूबाजूची परिस्थिती बदललेली असते), सोनालीने “क्या मस्ती क्या धूम” (फिल्मीस्थान स्टुडिओत यासाठी सेट लागला होता), इंडिया गॉट टॅलेंट इत्यादी रिऍलिटी शोचे सूत्रसंचालन करताना शालेय वयातील सहभागी स्पर्धक, त्यांचे पालक, यांच्या सुख दुःख, तणाव, निराशा, आनंद यांचा अनुभव घेतला. अशा गोष्टी स्टारपणापलिकडच्या असतात, व्यक्ती म्हणून बरेच काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शिकवत असतात. माणूस म्हणून गरजेच्या असतात.
निर्माता गोल्डी बहेलशी लग्न…
सोनाली कायमच नवीन गोष्टी जाणून घेण्यास/शिकण्यास कायमच उत्सूक हे मला कायमच लक्षात आले. सोनालीचा एक महत्त्वाचा गुण म्हणजे, भरपूर वाचन. जवळपास रोजच हाती पुस्तक घेणारी सोनाली मग किंडलवर इंग्रजी साहित्याचे वाचन करु लागली. नवीन माध्यमासह ती अशी बदलली. अशातच तिने “रोझ” मुव्हीजचा निर्माता गोल्डी बहेलशी लग्न केल्यावर तिने चित्रपटात भूमिका स्वीकारणे खूपच कमी केले. ती तद्दन फिल्मी नसल्याने तिला हा निर्णय उत्तमरितीने व शांतपणे घेता आला. रणवीरचा जन्म मग त्याची आई म्हणून जबाबदारी याला तिने विशेष प्राधान्य दिले (ग्लॅमरस स्टार म्हटलं की तिचे छान छान दिसणे, फोटो सेशन, पेज थ्री पार्ट्या, गॉसिप्स इतकेच काही नसते याचे हे उत्तम उदाहरण आहे आणि म्हणूनच सोनालीबद्दल भलतेसलते किस्से/कथा/दंतकथा नाहीत. मिडियाला नेमके हेच चमचमीत हवे असते. पण सोनाली तसे काही मुद्दाम करणारी कधीच नव्हती.)
वाचनाची आवड ते लेखिकेपर्यंतचा प्रवास…
सोनाली चांगली वाचक असल्याने ती लेखनही करु लागली आणि तिच्या ‘Modern Gurukul – My Experiments’ या पुस्तकाचे तात्कालिक मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झाले तेव्हा सोनालीने आपल्या कुटुंबाला, नातेवाईकांना बोलावले होते. या क्षणी सोनालीला झालेला आनंद आजही मला चांगलाच आठवतोय. सोनालीचे यापुढचे पाऊल, इंग्रजी पुस्तकांच्या लेखकांच्या मुलाखती. तिचे एक पूर्णपणे नवीन रुप. एक चांगली वाचक, अतिशय चांगली मुलाखत घेते हे मी मेहबूब स्टुडिओतील एका बुक फेअरमध्ये अनुभवले. खरं तर एव्हाना ती सिनेमापासून दूर आली होती (अधूनमधून ती पारितोषिक विजेत्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात भूमिका साकारणार अशी बातमी येई.) तर २०१८ साली कॅन्सरचे निदान झाल्यावर उपचारासाठी ती अमेरिकेत गेली आणि अतिशय निर्धाराने, हिकमतीने तिने त्यावर मात केली याचे कौतुक आहेच.
स्टारपेक्षा ही समंजस व्यक्ती होणं केव्हाही चांगलं…
लॉकडाऊनच्या दिवसात तिला कधी बरे एकदा सवलत मिळतेय आणि आपल्या आईबाबांना भेटतोय असे झाले होते. त्याची पूर्तता झाल्यावर ती मनोमन आनंदली. दरम्यान, व्हीडीओ कॉलवरून तिने त्यांच्याशी संवाद साधला. स्टारपेक्षाही एक समंजस व्यक्ती म्हणून सोनाली बेंद्रेची छान जडणघडण होत गेली, पण फिल्मी मिडियाला मात्र तिच्या फिटनेस आणि फॅशनमध्ये रस असतो, त्यातही काही ‘तिरकस’ अथवा तिखट मिळालेच तर त्याची बातमी करायला मोकळे. अशा काही सवंग प्रसिद्धीच्या मागे ती अगदी पहिल्या दिवसापासून नाहीच तर मग तशी अपेक्षाच कशाला???