Suraj Chavan : ‘झापुक झुपूक’ चित्रपटात सूर्यासह कलाकारांची मांदियाळी!

साऊथची शिस्त, मुंबईत बिघडते…
खुद्द जयाप्रदाने कपिल शर्मा शोमध्ये सांगितलेली मजेशीर गोष्ट. कपिल शर्माने तिला विचारले, जब आप बाॅलीवूड मे आयी तब शूटिंग के वक्त कौन जाता इंतजार करवाता था? प्रश्नाची खोच लक्षात येताच जयाप्रदा पटकन म्हणाली, राजेश खन्ना (Untold Story). ती पुढे म्हणाली, साऊथ इंडियन चित्रपटसृष्टीतून हिंदीत मी आले तेव्हा येथील कामाची पद्धत मला नवीन होती. मी दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटसृष्टीनुसार सकाळी नऊच्या शिफ्टला अगदी ठीक नऊ वाजता सेटवर यायची आणि मग राजेश खन्ना कधी येईल याची वाट पाहत बसायची. राजेश खन्ना संध्याकाळी येत, आल्यावर सर्वप्रथम वडापाव खाणार आणि मग एका दृश्याचे शूटिंग होताच पॅकअप होई, जयाप्रदा हसत हसत सांगते. जयाप्रदाच्या बोलण्यातील तथ्य त्या काळात चित्रपटसृष्टीत फिल्डवर्कवर वावरत असलेल्या आम्हा काही सिनेपत्रकारांना माहित होते आणि ते स्वीकारुन आमची भटकंती सुरु होती.(Untold Story)

राजेश खन्नाच्या कामाची ही पध्दत त्या काळातील काही दिग्दर्शकांनीही स्वीकारली होती आणि त्यानुसार ते आपल्या शूटिंगचे आयोजन करत. एक अनुभव सांगतो(Untold Story). दिग्दर्शक रवि टंडन यांनी मानखुर्दच्या एस्सेल स्टुडिओतील कोर्टाच्या सेटवर ‘नजराना’ या चित्रपटातील नाट्यमय अशा कोर्ट रुम दृश्याच्या शूटिंगचे आयोजन केले होते. त्यात राजेश खन्ना, श्रीदेवी आणि स्मिता पाटील यांच्यासह अनेक ज्युनियर आर्टिस्ट यांच्यावर बरीच दृश्ये चित्रीत होत असतानाच या चित्रपटाचे पीआरओ बनी रुबेन यांनी आम्हा काही निवडक सिनेपत्रकारांना या चित्रपटाच्या सेटवर शूटिंग रिपोर्टींगसाठी आवर्जून आमंत्रित केले. असे वेगळे योग सुखद आठवणींचा भाग ठरतात याची कल्पना असल्याने एस्सेल स्टुडिओत पोहचलो तेव्हा सेटवर राजेश खन्ना वगळून सगळेच होते आणि शूटिंग अतिशय व्यवस्थित सुरु होते. राजेश खन्ना लंच ब्रेकच्या वेळी आला तोच त्याच्या घरच्या डब्यातून आलेले जेवण सेटबाहेर मोठ्या टेबलावर लावण्यात आले. लगेचच खमंग वास दरवळला. राजेश खन्नाच्या घरचं जेवण होत होते.(Untold Story)
लंच ब्रेकनंतर रवि टंडन यांनी राजेश खन्नाची दृश्ये चित्रीत करण्याचा सपाटा लावला. तात्पर्य, त्यांनी शूटिंगचे नियोजनच असे केले की लंचपर्यंत स्मिता पाटील व श्रीदेवीच्या दृश्यांचे शूटिंग होईल आणि मग राजेश खन्नासोबत तीच दृश्ये चित्रीत करताना संकलनात ते सगळेच व्यवस्थित जोडले जाईल. चित्रपट माध्यमात संकलनाचा सदुपयोग असा होतो. श्रीदेवीला तेलगू तमिळ भाषेतील चित्रपटात भूमिका साकारताना ‘वेळेचे महत्व ‘सवयीचे झाल्याने अशा अनुभवाचा नक्कीच फायदा झाला असणार. यात आणखीन एक विशेष गोष्ट आहे, तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, ऐंशीच्या दशकात जितेंद्रने साऊथच्या अनेक चित्रपटांच्या हिंदीतील रिमेकमध्ये भूमिका साकारताना हैदराबादला आपला मुक्काम ठेवला होता. याला अस्सल व्यावसायिकताही म्हणता येईल. (अनेक सेलिब्रिटीजच्या मोठं होण्यात असे पटकन न दिसणारे अनेक घटक असतात.) शनिवारी संध्याकाळी तो स्थानिक ट्रेड पेपर्समधील साऊथ इंडियन चित्रपटाच्या कलेक्शन्सचे आकडे पाहतानाच ठरवून टाके, यातील कोणत्या तमिळ अथवा तेलगू भाषेतील चित्रपटाची रिमेक करायची. आणि तुम्हालाही माहित्येय ऐंशीच्या दशकात जयाप्रदा व श्रीदेवी त्याची नायिका असत. असे सगळेच जमवून आणताना अनेक बाबतीत ‘वेळेचे गणित’ जमवून आणले म्हणून तर जितेंद्रच्या चित्रपटांची संख्या वाढत राहिली आणि त्याबरोबरच जयाप्रदा व श्रीदेवी त्याच्या चित्रपटात जास्त खुलल्या. कधी त्यातील एक असे, कधी त्या दोघीही असत. स्क्रिप्टच तशी लिहिली जाई हो.
वेळ ही चित्रपट निर्मितीमधील एक महत्वाची गोष्ट. पण मुंबईतील चित्रपटसृष्टीत ती पाळली जाताना दिसत नाही. ( एकादा अमिताभ बच्चन अपवाद. ) आणि याच कारणास्तव कमल हसन हिंदी चित्रपटसृष्टीत फार रमला नाही. एल. व्ही. प्रसाद निर्मित व के. बालचंदर दिग्दर्शित ‘एक दुजे के लिए ‘ ( १९७९) च्या जबरा क्रेझनंतर कमल हसन व रति अग्निहोत्री यांना स्वतंत्रपणे मुंबईतील चित्रपट निर्मात्यांकडून मोठ्याच प्रमाणावर साईन केले जाणे स्वाभाविक होतेच. यश हेच सर्वात मोठे चलनी नाणे असल्याने असे होतच असते. कमल हसनला रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘सागर ‘मध्ये ऋषि कपूर व डिंपल कापडिया यांच्यासोबत संधी मिळाली. डिंपलने राज कपूर दिग्दर्शित ‘बाॅबी ‘ ( १९७३) नंतर पुनरागमन केल्याने ‘सागर ‘ घोषणेपासूनच चर्चेत. मग गाण्यांचे रेकाॅर्डिंग, मढच्या अक्सा बीचवरचा वस्तीचा भला मोठा सेट आणि शूटिंगच्या बातम्या येत राहिल्या. असे बरेच दिवस होत राहिले. जुहूच्या बंगल्यात शूटिंग झाले. पण चित्रपट पूर्ण होत नव्हता. हळूहळू कुजबूज होत गेली, रमेश सिप्पी बरेच रिशूटींग करतोय. आणि अशातच कमल हसन नाराज झाला. का? तर त्याला या एका चित्रपटासाठी अधिकाधिक तारखा द्याव्या लागताहेत. त्यात त्याचा वेळ जातोय. गंमत म्हणजे, त्याच वेळेस त्याने स्वीकारलेल्या अनेक हिंदी चित्रपटाचे शूटिंग हे असेच वेळेचा विनाकारण अपव्यय होत चाललंय. म्हणजे, एकाद्या चित्रपटाचा सेट लावण्यात उशीर, कधी अख्खे शूटिंग सत्रच रद्द. कमल हसनला कामाची ही पध्दत रुचली नाही आणि त्याने हिंदी चित्रपटातून भूमिका साकारणे थांबवले असे गाॅसिप्स मॅगझिनमधून रंगवून खुलवून लिहीले गेले. (मुंबईतील चित्रपटसृष्टीत अशा गोष्टी जणू प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कामाचा एक भागच असतात हो. त्या स्वीकारायला हव्यात.)
======
हे देखील वाचा : ‘तारीख पे तारीख’ हा कायमच गुंतागुंतीचा प्रकार
======
रजनीकांतने त्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीचे वर्क कल्चर व्यवस्थित अंगिकारले. हीदेखील एक व्यावसायिकता हो. एकदा मात्र गंमत पाह्यला मिळाली. के. सी. बोकाडिया निर्मित व सुदर्शन नाग दिग्दर्शित ‘असली नकली ‘ या चित्रपटाचा अंधेरीतील नटराज स्टुडिओत मुहूर्त होता. बोकाडिया मिडिया फ्रेन्डली असल्याने आम्ही मिडियावले या मुहूर्ताला पोहचलो तेव्हा आम्हाला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. आमंत्रणावर मुहूर्ताची वेळ अकरा वाजता होती आणि शत्रुघ्न सिन्हा ठीक वेळेवर आला.( तो कायमच ‘लेट लतिफ ‘ म्हणून ओळखला गेला. या सुखद धक्क्याची बातमी झालीच म्हणा.) आणि काही वेळाने रजनीकांत आला आणि त्यालाही या गोष्टीचा आश्चर्याचा धक्काच बसला. बहुतेक, रजनीकांत दक्षिणेकडील शिस्तीनुसार वेळेवर येईल असे शत्रुघ्न सिन्हाला वाटले होते की काय? दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपट निर्मितीमधील शिस्तीचे कायमच अनेक कलाकार, तंत्रज्ञ तेथे जाऊन आल्यावर कौतुक करतात, पण त्याची मुंबईतील चित्रपटसृष्टीत अंमलबजावणी अवघड.
काही पिकांसाठी लागणारी सुपीक जमीन ही सगळीकडे मिळत नाही, ती पीके त्याच मातीत येतात. प्रत्येक ठिकाणचे हवामानही वेगळे असू शकते. हा नियम कळत नकळतपणे चित्रपटसृष्टीलाही लागू आहे म्हणायचं. सगळ्याच गोष्टी सगळीकडे ‘सूट’ होतीलच असे अजिबात नसते. दक्षिणेकडील ‘वेळेचे गणित’ मुंबईतील फिल्मी वातावरणात जमणारे नाही. तुम्हाला तरी वाटते काय जमेलसे?