‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
फिल्म फेअरच्या खास आठवणी…
ग्लॅमरस पुरस्कारात ‘फिल्म फेअर’चा रंग ( इस्टमनकलर) काही वेगळाच. त्याची चौफेर परंपरा, त्याबाबतच्या गोष्टी, किस्से, कथा, दंतकथा इतकेच नव्हे तर वैशिष्ट्यपूर्ण फोटोही अनेक. काही फोटोच बोलतात. फिल्म फेअरला आपली एक ओळख आहे, इमेज आहे, प्रतिष्ठा आहे, वलय आहे, चित्रपटसृष्टी मिडियात त्याबाबत कायमच कुतूहल आहे.अशाच काही वेगळ्या आठवणी.
सत्तरच्या दशकात मला आठवतय, व्यंगचित्र साप्ताहिक मार्मिकमध्ये अशीच एक ठळक चौकट वाचण्यात आली, मराठी चित्रपटांनाही फिल्म फेअर पुरस्काराने गौरविण्यात यावे अन्यथा आयोजकांना शिवसेनेचा हिसका. या इशाऱ्याची जरब अशी आणि इतकी भारी होती की, लगोलग मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेता व अभिनेत्री असे मानाचे पुरस्कार जाहीर करुन त्या विजेत्यांना माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहातील शानदार सोहळ्याचे आमंत्रण देत त्यांना पुरस्कारही देण्यात आला. याच षण्मुखानंद सभागृहात अनेक वर्ष फिल्म फेअर सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असे आणि यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक बहुत बडे स्टार येणार म्हणून षण्मुखानंद बाहेर फिल्म दीवाने प्रचंड गर्दी करत. स्टार्सची भारी क्रेझ क्रेझ क्रेझ म्हणतात ती हीच. ती पूर्वी नवीन चित्रपटाच्या प्रीमियरपासून पुरस्कार सोहळ्यापर्यंत दिसे. या बघ्याना पलिकडच्या फूटपाथवर उभे राहून स्टारचं होणारं दर्शन टाॅनिक ठरे. त्या काळातील फिल्म फेअरचे ते फिल्म दीवान्यांना खूपच मोठे देणे आहे. अगदी सुरुवातीच्या काळात दक्षिण मुंबईतील रिगलसारख्या आलिशान चित्रपटगृहात हा सोहळा आयोजितकेला जाई. (कालांतराने हाच इव्हेन्टस, आता त्याला पुरस्कार सोहळा नव्हे तर इव्हेन्टस म्हटले जाऊ लागले. आता पंचतारांकित हॉटेल, त्यानंतर मोठ्या मैदानात होऊ लागला. एव्हाना फिल्म इंडस्ट्री, त्यातील स्टार आणि पुरस्कारही वाढले. मराठी व हिंदी असे दोन स्वतंत्र इव्हेन्टस होऊ लागले.)
याच आपल्या गौरवशाली आणि ग्लॅमरस परंपरेच्या फूटेजचा वापर करीत फिल्म फेअरने १९८५ साली ‘झिलमिल सितारों की’ हा अडीच तासाचा चित्रपट पडद्यावर आणला. मला आठवतय, दक्षिण मध्य मुंबईतील जमुना या चित्रपटगृहात तो प्रदर्शित झाला असता आम्हा चित्रपट समीक्षकांना या चित्रपटाची फर्स्ट डे फर्स्ट शोची तिकीटे दिली होती. ही कल्पना खरंच छान होती. हा एक प्रकारचा फ्लॅशबॅक होता. माहिती आणि मनोरंजनाचा खजिना होता. अमिन सयानी यांची संपूर्ण चित्रपटभर झक्कास काॅमेन्ट्री होती. प्रत्येक वर्षी अनेक स्टार या सोहळ्याला येतात, एकमेकांना गळे लागतात (फिल्मी स्टाईल), पुरस्कार स्वीकारताना रोमांचित होतात ( हा अभिनय नसावा जर असेल तर अगदी उत्तम म्हणता येईल), जोडीला एकादा मनोरंजनाचा कार्यक्रम असा एकूण मामला असे.
काही असो, अशा पध्दतीचे चित्रपट म्हणजे एक प्रकारचा संदर्भ खजिनाच. तो पर्यंत जुन्या काळातील कॅमेर्याने हे सगळेच चित्रीत करण्यात येत होते. म्हणजेच एक प्रकारच्या तांत्रिक मर्यादाच होत्या. पण इच्छा मोठी होती. ती मूळात असावी लागते.
फिल्म फेअरच्या याच यशस्वी वाटचालीत १९९४ सालच्या चित्रपटाच्या पुरस्काराबाबत एक विशेष गोष्ट खूपच गाजली. विधु विनोद चोप्रा दिग्दर्शित ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ मधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अनिल कपूरला नक्कीच मिळणार अशा विश्वासाने बोनी कपूरने इव्हेन्टसनंतरच्या जोरदार पार्टीचे आयोजन अगोदरच केले. असं केल्याने काहींना वाटले बहुतेक अवाॅर्ड मॅनेज केला असावा. चित्रपटाचे जग आणि शंका याचे साटेलोटे जुनेच. पण पुरस्कार नाना पाटेकरला मिळाला. मेहुलकुमार दिग्दर्शित ‘क्रांतिवीर ‘मधील त्याची सडेतोड, रोखठोक व्यक्तिरेखा सरस ठरली. बोनी कपूर व अनिल कपूरसाठी हा अनपेक्षित धक्काच. पण म्हणून त्यांनी पार्टी रद्द केली असे अजिबात नाही. त्यांनी पक्की व्यावसायिकता दाखवत म्हटले, सर्वच फिल्म फेअर पुरस्कार विजेत्यांना चिअर्स करण्यासाठी आम्ही पार्टीचे आयोजन केले होते. नक्की काय हेतू होता हे फिल्मवाले जाणोत.
=======
हे देखील वाचा : ‘तारीख पे तारीख’ हा कायमच गुंतागुंतीचा प्रकार
=======
यावर्षी माधुरी दीक्षितला सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित ‘हम आपके है कौन’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला आणि फिल्म फेअरच्या चकचकीत कागदावरच्या मुखपृष्ठावर नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षित असे दोन मराठी चेहरे फिल्म फेअर ट्राॅफीसह झळकले. मराठी मन भारी आनंदले हो या गोष्टीने. या काही आठवणी आल्या कारण वांद्र्याच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मराठी फिल्म फेअर संदर्भात एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सोनाली कुलकर्णी ब्रॅण्ड ॲम्बेसेडर आहे. आपण पूर्वी याच सोहळ्यातील शाहरुख खान, काजोल यांचे डान्स परफॉर्मन्स पाहून इम्प्रेस व्हायचो. आपणासही याच फिल्म फेअरचा एक भाग व्हायची संधी मिळावी असे मनोमन वाटत होते. मी अभिनेत्री म्हणून करियर केली आणि मला हा योग जुळून आला असे सोनाली म्हणाली.
असो, काळ बराच बदललाय, तो बदलत असतोच. पुरस्कार फारच वाढलेत, त्यातले काही इव्हेन्टस टी. व्ही. शो असतात (आमिर खान अशा पुरस्कारांपासून फारच लांब गेला आहे.) आता पुरस्कारांची संख्याही वाढलीय. (शक्यतो कोणी पुरस्कारांशिवाय राहत नाहीत) अशात फिल्म फेअर आपला रुबाब कायम ठेवून आहे, तर मग आणखीन काय हवे?