मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
नव्या वर्षात स्पृहा रमणार पुस्तकांच्या राज्यात
नवीन वर्षात प्रत्येकाचे पदार्पण झाले आहे. गेल्या वर्षीच्या सगळ्या नकारात्मक आठवणी विसरून नव्या वर्षाचे स्वागत प्रत्येकाने दणक्यात केले. शिवाय एकमेकांना शुभेच्छाही दिल्या आहेत. आता नवीन वर्ष म्हटलं की संकल्पही आलेच. प्रत्येक जण काही ना काही तरी संकल्प करत असतोच आणि तो पूर्ण करण्यासाठी जीवापाड मेहनत घेत असतो. आता काहीजणांचे संकल्प काही कारणाने पूर्ण होत नाहीत पण पुढच्या वर्षी नव्या दमाने ते नवे संकल्प करत असतात.
अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha Joshi) हिने देखील यंदाच्या नव्या वर्षी संकल्प केला आहे तो म्हणजे दर महिन्याला एक पुस्तक वाचण्याचा. हा संकल्प तडीस नेण्यासाठी स्पृहाने सुरुवातही नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात केली आहे. एका वर्षात बारा पुस्तक वाचणार असा तिचा संकल्प असून दर महिन्याला एका पुस्तकांचा फडशा पाडायला ती सज्ज झाली आहे.
हे वाचलंत का: मराठी भाषेने चिन्मयी राघवन ला काय दिले पहा
स्पृहा जोशी ही तिच्या चाहत्यांना आणि एकूणच मराठी सिनेमा इंडस्ट्रीतील प्रेक्षकांना अभिनेत्री म्हणून परिचित आहे. पण त्याहीपलीकडे स्पृहाची कवयित्री, लेखिका हीदेखील ओळख आहे. स्पृहावर लहानपणापासूनच वाचनाचे संस्कार तिच्या कुटुंबामध्ये झालेले आहेत. तिला वाचनाची गोडी शालेय वयात असतानाच लागली. वाचता-वाचता तिला लिहिण्याची देखील आवड निर्माण झाली आणि कॉलेजमध्ये असताना स्पृहाने कविता करायला सुरुवात केली.
स्पृहा खूप संवेदनशील कवयित्री आहे. स्पृहाचा लेखसंग्रह असलेले चांदणचुरा हे तिचे पहिले पुस्तक प्रकाशित झाले. लोपामुद्रा नावाचा काव्यसंग्रह देखील प्रकाशित झाला असून लोपामुद्रा काव्यसंग्रहातून ती अनेक कविता तिच्या सोशल मीडिया पेज वर शेअर करत असते. केवळ मनोरंजनच नव्हे तर अंतर्मुख करायला लावणाऱ्या कवितांचे लेखन हा स्पृहाच्या काव्य लेखनाचा महत्त्वाचा गाभा आहे.
स्पृहा सांगते, मी चांगली लेखिका आहे असे अनेकजण म्हणतात. त्यामागे खरच माझ्यामधील वाचक हा नेहमी काहीतरी नव शोधण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणूनच मला चांगले लिहायला आवडते. कविता हे माध्यम मला यासाठी भावते की कमीत कमी शब्दांमध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त होता येते. त्याचबरोबर अनेक वर्तमानपत्रात काही कॉलम लिहिले तेव्हा मला समाजातल्या ज्या घडामोडी त्यावर भाष्य करण्याची संधी मिळाली आणि यामुळे माझ्यातली लेखिका घडत गेली असं मला वाटतं. पण लेखकापेक्षा सुद्धा मला माझ्यातला वाचक हा सतत सजग असावा असं वाटत आणि म्हणून पुस्तक वाचनाला मी जास्त महत्त्व देते. नव्या वर्षांमध्ये मी संकल्प केला आहे आणि त्यादृष्टीने माझी तयारी देखील सुरू केली आहे. अनेक नवीन नवीन पुस्तक मला या वर्षभरात वाचायची आहेत. त्यासाठी दर महिन्याला एक पुस्तक मी वाचणार असे ठरवले आहे. त्यासाठी पुस्तकांची खरेदी केली आहे.
विविध मालिका सिनेमा नाटक वेब सिरीज अशा प्रत्येक माध्यमांमध्ये स्पृहाने तिच्या अभिनयाची जादू दाखवली आहे. एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेतील तिचा उमेश कामत सोबतचा अभिनय खूप गाजला होता. त्या पूर्वी एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत कवयित्रीचीच भूमिका केली होती. समुद्र या नाटकातील स्पृहा जोशीचा अभिनय हा विशेष दाद देण्यासारखा होता. माय बाप या सिनेमामधून तिने बालकलाकार म्हणून रुपेरी पडद्यावर एंट्री केली तर मोरया हा तिचा पहिला सिनेमा होता.
हे नक्की वाचा: कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचा प्रवास
येत्या वर्षात बारा पुस्तके वाचण्याचा तिचा संकल्प पूर्ण व्हावा आणि नव्या वर्षात वेगळं साहित्य तिच्याकडून वाचलं जावं अशा शुभेच्छा तिच्या चाहत्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत. इतकेच नव्हे तर स्पृहाचा हा संकल्प ऐकून तिच्या इंडस्ट्रीमधल्या मित्रमंडळीही तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
– अनुराधा कदम