दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
स्टार्सचे बंगले इतिहासजमा होतायेत…
एकाच प्रकारच्या बातम्या अधूनमधून येत राहिल्याने आश्चर्याच्या अथवा कसल्याच धक्काचे काहीच वाटेनासे होते. अशीच ही बातमी. देव आनंद याचा जुहू येथील आयरीश पार्क येथील पन्नासच्या दशकापासून असलेला बंगला पाडून त्या जागी बावीस मजली टाॅवर उभा राहतोय. देव आनंदचा मुलगा सुनील व मुलगी देविना यांना त्याची चारशे कोटी अशी भरभक्कम किंमत मिळालीय. देव आनंदची पनवेल येथेही बरीच जागा होती आणि त्याचा यापूर्वीच व्यवहार झाल्याचे वृत्त आहे. (Bungalows of stars)
देव आनंदने आपल्या चलतीच्या काळात ( त्याची एकूणच जीवनशैली पाहता त्याचे फार जुने चित्रपट, त्याची कार्यशैली, त्याचा रोमान्स, त्याचा उत्साह आणि त्याने पडद्यावर खुलवलेली गाणी यातून त्याची चलती आजही कायम आहे. या देवाबद्दल काहीही शक्य आहे. ) मुंबईत सांताक्रूझ येथील खिरा नगरमध्ये कार्यालय होते आणि दररोज सकाळी नऊ ते दहा या वेळेत तो असणार हे ठरलेलेच. वांद्र्याच्या पाली हिलवर आनंद रेकाॅर्डिंग स्टुडिओ होता. ऐंशीच्या दशकात यातीलच देव आनंदच्या स्टाईलीश ऑफिसमध्ये चक्क दोनदा नवशक्तीसाठी त्याच्या सविस्तर पानभर मुलाखतीचे सुखद योग आले. आज त्याजागी भव्य दिमाखदार इमारती उभ्या आहेत. खार येथील आनंद बंधुंचे केतनव डबिंग थिएटरही पाडले गेलेय. (Bungalows of stars)
देव आनंदची गुंतवणूक फार मोठी होती असे अधोरेखित होत आहे आणि त्याचं यशस्वी करियर पाहता आपल्या मिळकतीची त्याने अतिशय उत्तम गुंतवणूक केलीय. देव आनंदचा हा गुण विशेष कौतुकाचा. (तरीही काहीसा दुर्लक्षित.) सध्या जुन्या पिढीतील एकेक स्टार्सचे बंगले असे ‘काळाच्या पडद्याआड’ जात आहेत. त्याच्या खाणाखुणा पुसल्या जात आहेत. चित्रपटसृष्टीच्या चौफेर इतिहासात ‘स्टार्सच्या बंगल्याच्या गोष्टी’लाही फार महत्वाचे स्थान होते हो. वांद्र्याच्या समुद्र किनाऱ्यालगतच्या कार्टर रोडवरुन जाताना राजेश खन्नाच्या आशीर्वाद बंगल्यावर नजर जाते तेव्हा तेथे उंच इमारत दिसते आणि एकेकाळी येथेच अनेक क्रेझी राजेश खन्नाची इम्पाला गाडी कधी एकदा या बंगल्याबाहेर पडतेय आणि गाडीच्या काचेच्या आतील राजेश खन्नाची झलक पाहतोय असं त्याच्या फॅन्सना व्हायचं, असं चित्र पटकन डोळ्यासमोर येतेच. कधी काळी त्या फॅन्समध्ये मी देखील होतो. राजेश खन्नाच्या क्रेझमधील हा हुकमी फंडा. (Bungalows of stars)
खरं तर हे बंगले म्हणजे फक्त खरेदी विक्री व्यवहार नाहीत. राजेंद्रकुमारचा ‘डिंपल बंगला’ विकत घेण्यासाठी आवश्यक असलेले भरभक्कम पैसे चिन्नाप्पा देवरचा ‘हाथी मेरे साथी’ साईन केल्यावर राजेश खन्नाला मिळाले आणि आपल्या आईच्या सांगण्यावरुन त्याने बंगल्याचे नाव आशीर्वाद ठेवले अशा किश्श्यांपुरत्या या गोष्टी नाहीत. त्यात त्या स्टार व चाहत्यांचीही भावनिक ओढ, गुंतवणूक आहे. त्या प्रत्येक बंगल्याला आपलं एक व्यक्तीमत्व आहे. राजेश खन्नाच्या अखेरच्या आजारपणाच्या काळात अक्षयकुमारने एकदा मिडियाला आशीर्वाद बंगल्याबाहेर बोलावले आणि राजेश खन्नाला त्याच्या चलतीच्या दिवसांचा फिल दिला. एकाद्या बंगल्याची अशीही एक आठवण. दिलीपकुमारचा पाली हिलवरील बंगला ऐतिहासिक व बहुचर्चित होता. नव्वदच्या दशकात सायरा बानूने राष्ट्रीय दूरदर्शन वाहिनीसाठी चित्रपट संगीतावर आधारित एका मालिकेची निर्मिती केली तेव्हा याच बंगल्यात आम्हा मिडियाला झक्कास पार्टी दिली असता या बंगल्यातील या दाम्पत्याच्या देखण्या भव्य तसबिरी जणू आपल्याशी बोलताहेत असं मला वाटलं. याही बंगल्याची विक्री झाली आणि त्याची निशाणीही इतिहासजमा झाली. हा बंगला जुन्या मुंबईची ओळख होती. चित्रपटसृष्टीचे वैभव होते. (Bungalows of stars)
राज कपूरच्या चेंबूर येथील कपूर काॅटेजच्या जागी आज नवीन चकाचक वास्तू उभी राहिलीय. हे आर. के. काॅटेज राज कपूरच्या व्यक्तिमत्वाचा भाग झाले होते. आपण सगळेच आपल्या वास्तूसह जगत असतो. फरक इतकाच की, राज कपूरसारख्याच्या वास्तूची बरीच चर्चा होते. माला सिन्हाचा वांद्र्यातीलच टर्नर रोडवरील बंगल्याच्या विक्रीची गोष्टही लक्षवेधक ठरली. फार पूर्वीचे एक गाॅसिप्स सांगायलाच हवे, आयकर खात्याची याच बंगल्यावर धाड पडली असता, माला सिन्हाच्या बाथरुमच्या भिंतीत म्हणे, असंख्य नोटा सापडल्या. आपल्या चलतीच्या काळात ‘आपला बंगला असावा’ असं वाटणं स्वाभाविक होतेच. ते स्टेटस सिम्बल होते. प्रत्येक क्षेत्राची आपली जीवनशैली असते. चित्रपट ताऱ्यांना उंची जीवनशैली जपावी लागते. फाॅर्मात असतानाच ती गरज वाटते. राजेंद्रकुमारने पाली हिलवर डिंपल बंगला बांधताना त्याच्या मागील बाजूस प्रिव्ह्यू थिएटरही बांधले. आम्हा चित्रपट समीक्षकांसाठी तेथे अनेक चित्रपटांचे शो आयोजित केले जात. सीटस ऐसपैस होत्या. चपला बाहेर काढून आत जावे लागे. राजेंद्रकुमारने निर्माण केलेल्या संगीतम श्रीनिवास राव दिग्दर्शित ‘फूल’ची आम्हा मिडियासाठीची झक्कास पार्टी याच बंगल्यात दिली तेव्हा आपल्या आई-वडीलांसोबत डार्क गुलाबी रंगाच्या साडीत आलेली माधुरी दीक्षित फार वेळ न थांबताच निघाल्याची लागलेली हुरहूर लागली हे आजही आठवतय, काही आठवणी अशाही. पाली हिललाच सुनील दत्तने पोटमाळ्यात मिनी थिएटर आणि त्यावर अजंठा बंगला बांधला. त्यात एडिटींग रुमही होते. या मिनी थिएटरमध्ये चित्रपट पाहणे एक वेगळाच अनुभव असे. आज हे दोन्ही बंगले पाडून त्याजागी देखण्या इमारती आल्या आहेत. बंगला मेन्टेन करण्यापेक्षा अशा भव्य टाॅवर्समध्ये बरेच फायदे असावेत. (Bungalows of stars)
वरळी सी फेसवरील राजकुमारचा बंगला असा काही इतिहासजमा झाला आहे की तो नेमका कुठे होता हे सांगताना गोंधळ उडावा. राजकुमारच्या सनकी इमेजसारखंच हे आहे म्हणूया का? राजकुमार येथूनच उघड्या जीपमधून अतिशय ऐटीत व रुबाबात शूटिंगसाठी असो अथवा कुलाब्याला क्लबला जात असे. जुन्या पिढीतील चित्रपट दीवाने ‘स्टार असावा तर असा’ असं कायमच कौतुकाने म्हणतात.
जुन्या पिढीतील कलाकारांनी आपल्या यशाचे सर्वोच्च बिंदू म्हणून स्वतःचा बंगला बांधला. सुजीतकुमारचा बंगला इतिहासजमा झाला. तर राकेश रोशन व ह्रतिक रोशन यांचा बंगला उभा राहिला. अमिताभ बच्चनचे जुहू भागात प्रतिक्षा, जनक, जलसा असे चक्क तीन बंगले आहेत, तेवढी त्याची व्यावसायिक उंची आहेच आणि तब्बल चाळीस वर्षे मुंबईत असल्यास रविवारी बीग बी आपल्या चाहत्यांना दर्शन घडवताहेत. कधी बाहेर पडून चाहत्यांच्या सदिच्छा, भेटीगाठी स्वीकारताहेत.
अमिताभ हे सगळेच एन्जाॅय करतोय. सोशल मिडियात या क्षणाचे फोटो पोस्ट करतोय. देशभरातून अनेक चाहत्यांसाठी हा जणू एक प्रकारचा पिकनिक स्पॉट आहे. शाहरुख खानच्या वांद्र्यातील बॅण्ड स्टॅन्डवरील मन्नत बंगल्यावर त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांची उसळणारी गर्दी अभूतपूर्व असते. बरं या परिसरात कधीही जावे शाहरुख खानचे चाहते या बंगल्याबाहेर फोटो अथवा सेल्फी काढत असतात. धर्मेंद्र, डॅनी डेन्झोपा, रणजीत, संजय खान, अनिल कपूर, हेमा मालिनी, गुलजार, अशा अनेकांचे बंगले आजही ऐटीत आहेत. तर संगीतकार लक्ष्मीकांत ( प्यारेलाल यांचे सहकारी) वगैरेंच्या बंगल्यांच्या जागी नवीन इमारती आल्या. बी. आर. चोप्रा, चेतन आनंद, नौशाद, जाॅनी वाॅकर, बासू भट्टाचार्य, यश चोप्रा, निर्माता सुधाकर बोकाडे इत्यादींचेही बंगले होते. लक्ष्मीकांत यांच्या बंगल्याचे नाव ‘पारसमणी होते’. तो त्यांचा पहिला चित्रपट. म्हणून हे नाव त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख होते. (Bungalows of stars)
या बंगल्यावर लक्ष्मीकांत यांच्या दीर्घ मुलाखतीचा छान योग आला. बप्पी लाहिरी आपल्या लाहिरी हाऊस बंगल्यात आम्हा मिडियाला दरवर्षी पार्टी देई. अनेक हिंदी फिल्मवाल्याने स्वतःच्या आनंदाच्या जगण्यात असे इतरांनी सामिल करुन घेतात. मनोजकुमारने बंगला पाडून मोठी इमारत उभी केली. जुहू विलेपार्ले स्कीम परिसरात जीतेंद्रचा कृष्णा नावाचा बंगला आहे. त्याने तुषार कपूरचा पहिला चित्रपट ‘मुझे कुछ कहना है’च्या वेळेस आम्हा सिनेपत्रकारांना टाॅप फ्लोअरवरील प्रशस्त गच्चीवजा हाॅलमध्ये चित्रपटाची गाणी दाखवून दिलेली शानदार पार्टी म्हणजे उत्तम पाहुणचाराचा अनुभव होता. कालांतराने जवळच त्याने कृष्णा वन या नावाचाही बंगला उभारला. अनिल कपूरचा प्रशस्त बंगला असणे अजिबात आश्चर्याचे नाही. त्याने आपला फिटनेस, करियर व जीवनशैली उत्तम राखलीय. अमोल पालेकर यांनी सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात रजनीगंधा, छोटी सी बात, चितचोर, बातो बातो मे, अपने पराये इत्यादी चित्रपटांच्या यशानंतर हिंदीत मागणी आणि मानधन वाढताच जुहूच्या दहाव्या रस्त्यावर चिरेबंदी बंगला बांधला तेव्हा मराठी वृत्तपत्रांनी बातमी देताना अमिताभ बच्चनच्या शेजारी अमोल पालेकर राहायला गेले अशी बातमी दिली. दोघांचेही बंगले जवळपास असल्याने तसे म्हटले. ‘चिरेबंदी’ची विक्री झाल्याचीही बातमी आली.(Bungalows of stars)
============
हे देखील वाचा : मुंबईतील डबल डेकर बस आणि सिनेमा
============
बंगले ही एका कलाकार पिढीची ओळख होती. त्यात प्रतिष्ठा होती. ती कायम असली तरी त्यातील काही बंगले इतिहासजमाही होताहेत. चित्रपटसृष्टीचा इतिहास मांडताना, फ्लॅशबॅकमध्ये जाताना ‘स्टार्सच्या बंगल्याची गोष्ट माहितीपूर्ण व रंजक’. किशोरकुमारच्या जुहूच्या गौरी कुंज या बंगल्यात एका बाजूला विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या सेलिब्रिटीज दाम्पत्याने अतिशय स्टाईलीश आणि म्हणूनच महागडे असलेले चकाचक हाॅटेल सुरु केले आहे. गंमत माहित्येय का, आपल्याला भूक लागली म्हणून या हाॅटेलमध्ये जाऊन ऑर्डर दिली असं नि इतकं सोपे नाही. काही दिवस अगोदर ऑनलाईन बुकिंग करुन मगच येथे प्रवेश देण्यात येतोय अशी वदंता आहे. किशोरकुमारच्याच जीवनशैलीनुसारच हे आहे काय हो? स्टार्सच्या बंगल्याच्या गोष्टी या अशा नि कशाही. काही बंगले इतिहासजमा होताहेत तरी काही बंगले आजही लक्षवेधक आहेत. हे जे आहेत त्याकडे जास्त लक्ष देऊयात का?