गुलजार यांचा पडद्यावर न आलेला ‘देवदास’!
ख्यातनाम बंगाली साहित्यकार शरच्चंद्र चटर्जी यांच्या साहित्याने केवळ बंगालीच नाही तर भारतीय साहित्य रसरशीत बनले आहे. शरच्चंद्र यांच्या अनेक कादंबऱ्यांवर भारतामध्ये चित्रपट बनले. त्यांच्या ‘देवदास’ या कादंबरीने तमाम रसिकांना झपाटून टाकले होते. या देवदासचे अनेक अवतार भारतीय चित्रपटातून दिसले यात प्रामुख्याने कुंदनलाल सहगल यांचा देवदास १९३५ सालीच प्रदर्शित झाला होता. या ‘देवदास’ चे गारुड भारतीय चित्रपट रसिकांवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर पसरले होते. ‘सहगल म्हणजे देवदास आणि देवदास म्हणजे सहगल’ असे समीकरण झाले होते. न्यू थिएटर या चित्र संस्थेचा हा सिनेमा पी सी तथा प्रथमेश बारुआ यांनी दिग्दर्शित केला होता. या ‘देवदास’ मध्ये कुंदनलाल सहगल सोबत जमुना आणि राजकुमारी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. तिमिर बरन यांचे संगीत होते. सहगलच्या देवदासला प्रचंड लोकप्रियता मिळाली. सहगल हा देवदास तमिळमध्ये देखील करणार होता; त्याचे एक गाणे रेकॉर्ड पण झाले होते. पण सिनेमा पूर्ण झालाच नाही.
वीस वर्षानंतर बिमल रॉय यांनी पुन्हा एकदा देवदास बनवला होता. यात देवदास च्या भूमिकेत दिलीपकुमार, पारोच्या भूमिकेमध्ये सुचित्रा सेन तर चंद्रमुखीच्या भूमिकेत वैजयंतीमाला होती. सचिन देव बर्मन यांनी या चित्रपटाला संगीत दिले होते. दिलीपच्या अभिनयाचे गहिरे रंग या चित्रपटातून पाहता आले. पण गंमत अशी की त्या काळी प्रेक्षक असलेल्या मोठ्या समूहावर सहगल यांच्या देवदासची जादू उतरली नव्हती त्यामुळे त्यांनी दिलीपकुमारच्या देवदासला नावे ठेवतच अपमानित केले. खरंतर दिलीपचा देवदास हा सर्वार्थाने उजवा होता. यातील चंद्रमुखीच्या भूमिकेसाठी वैजंतीमालाला फिल्मफेयरचा सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला होता. परंतु ही भूमिका सहाय्यक अभिनेत्रीची नाहीच असे म्हणत तिने फिल्मफेयरचा हा पुरस्कार चक्क नाकारला होता! दिलीप कुमार देखील देवदासच्या अनपेक्षित अपयशाने चक्रावून गेला होता आणि त्याने देखील गंभीर भूमिकांचा त्याग करत ‘आजाद’, ‘कोहिनूर’, ‘नया दौर’ सारखे लाइट मूडचे चित्रपट स्वीकारायला सुरुवात केली होती. कदाचित याच कारणामुळे दिलीप कुमारने गुरुदत्त यांचा ‘प्यासा’ हा चित्रपट नाकारला कारण ‘प्यासा’ मध्ये त्याला जी भूमिका साकारायची होती ती विजयची भूमिका कुठे तरी पुन्हा देवदासच्या भूमिकेसारखीच होती.
यानंतर सत्तरच्या दशकाच्या अखेरीस गुलजार यांनी पुन्हा एकदा ‘देवदास’ बनविण्याचा प्रयत्न केला यावेळी ‘देवदास’ बनला होता धर्मेंद्र तर हेमामालिनी आणि शर्मिला टागोर पारो आणि चंद्रमुखीच्या भूमिकेत होत्या. सिनेमाची मोठी जाहिरात त्याकाळच्या स्क्रीन या चित्रपट साप्ताहिकात प्रसिद्ध झाली होती. संगीत आर डी बर्मन यांचे होते. लता मंगेशकर यांच्या स्वरात एक गाणे रेकॉर्ड देखील झाले होते. पण कुठे माशी शिंकली कळाले नाही आणि अवघ्या दोन रिळानंतर हा चित्रपट बंद पडला. खरंतर सत्तरच्या दशकामध्ये धर्मेंद्रला ‘देवदास’च्या रूपात पाहणे हे तसे प्रेक्षकांकरीता आव्हानात्मकच झालं असतं पण साठच्या दशकात धर्मेंद्रने अतिशय भावोत्कट अशा भूमिकादेखील केल्या होत्या त्यामुळे कदाचित धर्मेंद्रचा हा देवदास रसिकांना आवडून गेला असता!
मुख्य म्हणजे या देवदासला गुलजार टच असणार होता. गंमत पाहा प्रथमेश बारुआ यांच्यासोबत बिमल रॉय सहायक होते त्यांनी वीस वर्षानंतर दिलीप कुमारला घेऊन देवदास काढला. बिमल रॉय सोबत सुरुवातीला गुलजार होते त्यांनी वीस-पंचवीस वर्षांनंतर देवदास काढण्याचा प्रयत्न केला! अमिताभ बच्चन यांचा ‘मुकद्दर का सिकंदर’ (दि. प्रकाश मेहरा) हा देखील ‘देवदास’ च्या कथानकाचा प्लॉट डोक्यात ठेवून बनला होता. देवदासचे झपाटलेपण काही केल्या कमी होत नाही. २००२ साली संजय लीला भन्साळी यांनी ‘देवदास’ हा चित्रपट शाहरुख खानला घेऊन काढला यात ऐश्वर्या रॉय आणि माधुरी दीक्षित यांनी अनुक्रमे पारो आणि चंद्रमुखीच्या भूमिका केल्या होत्या. या बिग बजेट झगमगत्या देवदासने देखील मोठे यश प्राप्त केले. मल्टीप्लेक्स मध्ये यशस्वी होणारा हा पहिला सिनेमा होता. याच देवदासला आधुनिक रूप देत अनुराग कश्यप यांनी २००९ साली ‘देव डी’ हा सिनेमा रसिकांपुढे आणला होता.
विसाव्या शतकाच्या प्रारंभी (१९१७ साली) आलेल्या शरच्चंद्र चटर्जी यांच्या देवदास कादंबरीने भारतात सर्वांना भुरळ पाडली. आसामी, तेलगु, तमिळ, मल्याळम, हिंदी भाषेत या चित्रपटाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. पाकिस्तानात यावर दोन चित्रपट तयार झाले तर बांगला देशात देखील यावरचा सिनेमा हिट ठरला. मराठीत मात्र यावर कुणी चित्रपट का बनविला नाही याचे कोडेच आहे! खैर आज देवदासच्या निमित्ताने गुलजार यांच्या पडद्यावर न आलेल्या देवदासचे एक गाणे ऐकूयात. लताच्या स्वरातील हे गीत खूप कर्णमधुर आहे.