‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
हॉटेल मॅनेजमेंट ते अभिनय
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका एका वेगळ्या वळणावर आली आहे. या मालिकेत आदित्य इनामदार ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता म्हणजे अंबर गणपुले. अंबर मुळात पुण्याचा आहे आणि त्याने हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण देखील पूर्ण केले आहे. ‘तू तिथं मी’ या चित्रपटात त्याने बालकलाकार म्हणून काम केलं आहे. अंबर जेव्हा अकरावीत होता, तेव्हा एका एकांकिका स्पर्धेमध्ये ‘नदीकाठचा प्रकार’ नावाच्या एकांकिकेत त्याने काम केलं होतं. त्यात त्याला बक्षीस मिळालं आणि मग तो पुण्यातील ‘समन्वय’ या संस्थेशी जोडला गेला. त्याने अनेक वर्षे पुण्यातील प्रायोगिक नाटकातून भूमिका देखील केल्या. त्याची पहिली मालिका ‘ती फुलराणी’ .त्यात त्याने ‘कुमार ‘ नावाची व्यक्तिरेखा देखील केली होती. ‘ती फुलराणी’ मालिका संपत होती, तेव्हा पौर्णिमा मनोहर यांनी अंबरला विचारले की पुढे तुला आणखी काही मालिका करायला आवडतील का? अंबरला पौर्णिमा कडून कळले की त्यांची बहीण अपर्णा केतकर या एका नवीन मालिकेच्या निर्मितीत व्यस्त आहेत आणि त्याकरिता ऑडिशन्स सुरु आहेत. अंबरने फोटो पाठवले, ऑडिशन दिली आणि ‘रंग माझा वेगळा’ मधील ‘आदित्य इनामदार’ या भूमिकेसाठी त्याची निवड झाली.
अंबर म्हणतो, ‘ही आदित्यची व्यक्तिरेखा खूप आव्हानात्मक आहे. आई जे सांगेल ते करणारा, आईवर पूर्ण विश्वास असणारा, श्रीमंतीत वाढलेला असा हा ‘ममाज बॉय’ आहे. आपली आई जे करते ते बरोबरच करते, असा या ‘आदित्य’ चा विश्वास आहे. सुरुवातीला हर्षदा खानविलकर यांच्या मुलाची भूमिका करायची आहे, हे कळल्यावर दडपण आलं होतं. पण जसजसे शूटिंग चालू झाले, तसतसे हर्षदा खानविलकर या किती मनमिळावू आहेत, हे जाणवले. या क्षेत्रात इतकी वर्षे कार्यरत असून स्वभावाने अतिशय प्रेमळ, स्पॉटदादांपासून सर्वांची प्रेमाने विचारपूस करणाऱ्या, सहकलाकारांना सांभाळून घेणाऱ्या हर्षदा खानविलकर आहेत., हे लक्षात आले. या मालिकेमुळे खरोखरच आमचे एक कुटुंबच झाले आहे. “अंबरने मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये इंटर्नशिप सुद्धा केली आहे. त्यांच्या कुटुंबाचा पुण्यात केटरिंगचा व्यवसाय देखील आहे. त्याला स्वतःला उत्तम स्वयंपाक करता येत असल्याने कधीकधी तो सुद्धा सेटवर एखादा
पदार्थ तयार करून आणतो. तर कधी मुंबईतल्या रूममेट्स साठी जेवणही करतो. ‘रंग माझा वेगळा’ च्या सर्व कलाकारांशी त्याचे मैत्रीचे नाते आहे. तो म्हणतो की या मालिकेत बरेचसे कलाकार हे मुळात मुंबईचे आहेत आणि तो पुण्याचा आहे. अनेकदा आशुतोष त्याला सेटवर आपल्या कारने घेऊन जातो, तर कधीकधी इतर कलाकार देखील त्याच्यासाठी डबा आणतात.
‘रंग माझा वेगळा ‘ या मालिकेने अंबरला एक नवीन ओळख दिली, हे नक्की.