सुबोध भावे – चोवीस तासही त्याला अपुरे
काही स्टार खूप कमी चित्रपटातून आपल्यासमोर येतात, पण जाहिराती, इव्हेन्टस, एखादी कॉन्ट्रोव्हर्सी, एखादी बातमी यातून ते कायमच आपल्या समोर असतात (उदा. शाहरूख खान), तर काही स्टार हे सगळे अधिकाधिक प्रमाणात करतात, ते सतत कोणत्या ना कोणत्या चित्रपटात भूमिका साकारत असतात, जाहिरातीत असतातच, मिडियाशी सतत संवाद करत असतात, बातमीत असतात, एखादी कॉन्ट्रोव्हर्सी येते आणि जाते (त्यात ते अडकून पडत नाहीत, त्याना आपल्या कामावरचा फोकस कायम ठेवायचा असतो), छोट्या पडद्यावरुन ते घराघरात पोहचतात, म्हणजे ते सतत आपल्या अगदी आसपास असतात आणि तरीही त्यांची लोकप्रियता कायम असते, त्यांच्या अतिकामाचा त्यांना आणि प्रेक्षकांना कंटाळा येत नाही (उदा. अमिताभ बच्चन). सुबोध भावे या दुसरा प्रकारचा अभिनेता आहे.
त्याला ‘चोवीस तास’ ही अपुरे पडतील असा त्याचा कामाचा झपाटा आहे आणि तेवढाच तो आपले आई बाबा, पत्नी आणि दोन मुलांसह कुटुंबात रमतो. आपल्या आवडीनिवडीकडे लक्ष देतो. आजूबाजूच्या व्यक्तींचे, कलाकारांचे निरीक्षण करतो, त्यातील जे जे चांगले ते स्वीकारण्याचा प्रयत्न करतो. पण तो ‘एकाच जागी’ थांबणारा नाही. चांगल्या अर्थाने तो असमाधानी आहे. हीदेखील एक गरज असते. रंगभूमी, मालिका, चित्रपट, टीव्ही शोचे सूत्रसंचालन, लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन शो (आता वेबसिरिजमध्येही तो येईलच) असे करता करता एखाद्या चित्रपटाच्या निर्मितीत सहभाग, चित्रपटाचे दिग्दर्शन, वाचन, चरित्रपट साकारताना त्या व्यक्तींच्या चरित्राचे वाचन, शूटिंगचे दौरे हे सगळे तो एका दिवसात करायला शिकला नाही. ते यायला त्याला बराच काळ लागला.
मूळात तो आयटी क्षेत्रातील सेल्समन, नाट्यसंस्कार अकादमीच्या नाटकात नाकारला गेला म्हणून बॅकस्टेजला कामाला सुरुवात केली, ‘त्याला अभिनय येत नाही’ असे चक्क एक प्रकारचे अलिखित प्रमाणपत्र दिले गेले होते. अशी व्यक्ती कालांतराने त्याच माध्यम आणि व्यवसायात झपाटल्यासारखं काम करताना दिसते, एका माध्यमातून दुसरा माध्यमात तेथून पुढे आणि मग आलटून पालटून काम करते हे एक वेगळे रसायन आहे. ते स्थिर राहूनच करता येते. ती स्थिरता दिसत नाही. एक्पोजर दिसत राहतो.
मंदार देवस्थळी दिग्दर्शित ‘क्षण’ (२००६) या चित्रपटात मी त्याला पहिल्यांदा पाहीला. रवींद्र नाट्यमंदिरमध्ये त्याचा उशिरापर्यंत प्रीमियर चालल्याचे आठवतेय. अनेक युवा कलाकार सिनेमाच्या जगात येतात तसाच तो एक अशी माझी सर्वसाधारण भावना झाली. तो मराठी चित्रपटात अशा वेळी आला की ‘श्वास’ (२००३) नंतर मराठी चित्रपटाला आपली मधली काही वर्षे गोंधळात सापडलेली विश्वासार्हता पुन्हा मिळाली होती. ‘मराठीतही दर्जेदार आशयपूर्ण चित्रपट बनतात (ते पूर्वीही बनत) आणि ते भारताची ऑस्करसाठीची प्रवेशिका म्हणून निवडले जातात’ असा सकारात्मक दृष्टिकोन आणि सूर होता. (अन्यथा, ह्यॅ मराठी चित्रपट कसला हो ऑस्करला जातोय अशी परिसंवादात टवाळी केली जाई). सुबोध भावेचे मी सत्तेसाठी काहीही, सखी, सनई चौघेडे, त्या रात्री पाऊस होता असे काही चित्रपट पाहिले. तसे तर मी जवळपास सगळेच मराठी चित्रपट पाहतोय (का बरे याचा विचार तूर्त नको).
पण ‘कथा तिच्या लग्नाची’ या चित्रपटासाठी पुण्यात तो आपल्या मित्रांना घेऊन मल्टीप्लेक्समध्ये गेला आणि प्रेक्षकांअभावी तो शोच रद्द झाला यावर तो ज्या पध्दतीने एका मुलाखतीत व्यक्त झाला, तेव्हा तो मला ‘आपलासा’ वाटू लागला. खरं तर फस्ट डे फर्स्ट शोला आपलाच सिनेमा असा सपशेल नाकारला जाणे (तोही न पाहता) हे पचवणे सोपे नसते. तसाच त्याचा कांचन नायक दिग्दर्शित ‘माझी आई’ हा चित्रपट पडद्यावर आला तोच जाण्यासाठी! (फार पूर्वी मोठ्या चित्रपटाच्या रिलीजच्या शुक्रवारी मी नाझ थिएटरमधील अगदी कॅन्टीनमध्ये अथवा परिचीत वितरकाच्या ऑफिसमध्ये बसलो तरी सिनेमाचा पब्लिक रिपोर्ट काय येतोय याची उत्सुकता आणि अप्रत्यक्ष तणाव अनुभवलाय.)
मला वाटतं, सुबोधच्या मनावर तो अनुभव कोरला गेला असावा. त्याला खुद्द ही आठवण नकोशी असेल. चित्रपट नेमका किती प्रेक्षकांपर्यंत पोहचेल न पोहचेल हे सांगता येत नाही, नाटकाचे प्रयोग प्रामुख्याने मुंबई/पुण्यात होतात, पण चॅनलवरुन आपण अगणित प्रेक्षकांसमोर पोहचतो असे त्याच्या मनात घट्ट झालेले व्यावसायिक तत्वज्ञान हे अशा अनेक लहान मोठ्या चांगल्या वाईट अनुभवातून आले असावे असे माझे निरीक्षण आहे. म्हणूनच तर त्याचे सतत चित्रपट येत असतानाच तो पुन्हा मालिकेतही येतो आणि स्वीकारला जातो हे महत्वाचे आहे. ही तीनही माध्यमे पूर्ण भिन्न आहेत. त्यांची कामाची पध्दत वेगळी आहे आणि ती आत्मसात करावी लागतात.
महात्मा बसवेश्वर (हा चरित्रपट कधी आला होता? २००७ साली), बालगंधर्व, लोकमान्य टिळक …. आणि काशिनाथ घाणेकर या चरित्रपटाने त्याला आत्मिक समाधान नक्कीच दिले आहे, पण त्यातच तो अडकून पडत नाही. चरित्रपट साकारताना सेटवर गेलो, चेहरा रंगवला, शूटिंग संपले, घरी आलो असे होत नाही. ती व्यक्तिरेखा कलाकारात हळूहळू भिनत जाते. इकडे तिकडे दिसत राहते. सर्वप्रथम शरीरयष्टी महत्वाची असते, मग एकीकडे मानसिक तयारी करताना मेकअपमन आपले कौशल्य दाखवतो, इतके करुनही पडद्यावर काय येतेय याची धाकधूक कळत नकळतपणे असते, त्यासाठी दिग्दर्शक आहे ना असे ‘छापील उत्तर’ देता येत नाही. खरं तर दिग्दर्शकाने सर्वप्रथम विश्वास दाखवला/वाढवला, आपल्या पद्धतीने ते चरित्र सांगितले की मग कलाकार आपण मूळात कोण आहोत हे विसरून त्या चरित्राचा होत जातो. खूप अवघड असते हे. आणि मग असे चरित्रपट लोकप्रिय ठरले की तशाच आणखीन ऑफर येतात. चित्रपटसृष्टीचा तो अलिखित नियम आहे, ज्या पध्दतीचे चित्रपट आणि भूमिका सुपर हिट अथवा लोकप्रिय होतात, तशाच ऑफर करायच्या. त्या नाकारता याव्या लागतात. सुबोध भावे अशातच माझा अगडबंब, फुगे, आप्पा आणि बाप्पा, एबी आणि सीडी, विजेता असे चित्रपट करतो आणि ‘एकसुरी’ होत नाही. ‘तसा मी होणार नाही’ अशी जणू त्याला ‘सुरसुरी’ आहे. हे एक प्रकारचे स्वतःलाच चॅलेंज करण्यासारखे असते. ती स्टेज त्याने गाठलीय. अथवा असेही म्हणता येईल की, तो ‘पुन्हा पुन्हा मागे जातो आणि पुन्हा पुन्हा नव्याने सुरुवात करतोय’. हे म्हणजे ‘सुरक्षा कवच’ बाजूला ठेवून आव्हान स्वीकारण्यासारखे आहे आणि त्यातही प्रत्येक नाटक/चित्रपट/मालिका चांगलीच असेल आणि प्रेक्षकांना आवडेल असे अजिबात नसते.
पण ‘सुबोध भावे आहे, म्हणजे काय आहे ते बघूया तर’ असे प्रेक्षकांना वाटते हा विश्वास त्याने कमावलाय ही त्याची मोठी मिळकत आहे. पण तरीही ती कलाकृती आवडायला हवी असते. माझ्या मते ‘बालगंधर्व’नंतरचा सुबोध भावे अधिकाधिक फोकस्ड आहे आणि ‘तुला पाहते रे’ ही मालिका त्याची मोठी कसोटी होती. तोपर्यंत त्याचे अस्तित्व एस्टॅब्लिज झाले होते, आणि अशातच या मालिकेचे प्रोमो सुरु होताना ‘तो केवढा ती (अर्थात गायत्री दातार) केवढी’ अशी पहिली प्रतिक्रिया होती तरी, तो आहे म्हणजे नक्कीच काहीतरी बघायला मिळणार हा विश्वासही होता. तोच मिळवावा लागतो. या मालिकेच्या यशावर आणि गुणदोषांवर बरीच चर्चा झाली.
सुबोध भावेची आणि माझी अशा त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशन अथवा नामांकनाच्या पार्टीत भेट होते तोच संपते. (होय) आणि हीच सद्यस्थिती आहे हे मी स्वीकारलय. पूर्वी स्टारच्या दीर्घ मुलाखती होत आणि त्यातील महत्वाच्या मुद्यानुसार चक्क पानभर मांडत असू. आता ‘झटपट प्रश्न आणि त्याहूनही अधिक गतीने उत्तर’ हा ट्रेण्ड सुरु आहे. काळासोबत बदलणं भाग आहे. आणि आता प्रमोशनच्या मुलाखती कराव्या लागतात. त्यात सुबोध भावे वरवरचा समजतो. तरी तेवढ्याश्या भेटीतही ‘तुम्हाला माझा हा चित्रपट नक्की आवडेल’ असे तो आवर्जून सांगतो. म्हणजेच तो मला ओळखू लागलाय असाही होतो. त्याने दिग्दर्शित केलेला ‘कट्यार काळजात घुसली’ खूप आवडला. एकीकडे त्याने अनेक प्रकारच्या दिग्दर्शकांकडे भूमिका साकारत असतानाच दृश्य माध्यमाची भाषा शिकून घेतली आणि दुसरीकडे त्याने चित्रपटासाठी खूपच अवघड असलेल्या नाटकाचे खूप कसोशीने माध्यमांतर केले हे जाणवले.
आजच्या त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने किती नाटकात/चित्रपटात/मालिकेत भूमिका साकारल्या याचे वेगळे कोष्टक देण्याची गरज नाही. त्या पलीकडे त्याची कामगिरी आहे आणि कामाची भूक आहे. लॉकडाऊनच्या दिवसात तो अजिबात गप्प राहिला नाही (कोरोनावर त्याने कुटुंबासह मातही केली). त्याला स्वस्थ बसवत नाही हे चॅनलीय चर्चेतील त्याची देहबोली सांगत होती. ‘कोरोना आज आहे, उद्या जाईल’ असे म्हणताना ‘कधी पुन्हा कामाला सुरुवात करतोय असे त्याला झालेय असे जाणवत होते. ती त्याची अस्वस्थता त्याची कलाकार आणि माणूस अशा दोन्ही पातळ्यांवर वाढ करणारी आहे. ‘अय्या’ या हिंदी चित्रपटात तर ‘पेन्मेयम’ या मल्याळम चित्रपटात त्याने भूमिका साकारलीय याची फक्त नोंद झाली. कारकिर्दीच्या ओघात तीही असावी लागते. एका बंगाली चित्रपटातही तो होता आणि त्याच्या फस्ट लूकच्या वेळी मी आवर्जून गेलो असता सुबोध रिलॅक्स वाटला. याचीही गरज असतेच. गंमत म्हणजे त्याने सुरुवातीला ‘घाणेकर’ साकारणे चक्क नाकारले होते आणि काही महिन्यांनी अभिजित देशपांडेने आपण या चित्रपटात कसे मुरलोय हे ‘स्टोरी’ सांगताना (हा फिल्मी शब्द आहे) अशा पध्दतीने सांगितले की सुबोधला ही भूमिका हळूहळू दिसू लागली. तात्पर्य, चांगला कलाकार चांगला श्रोताही असावा.
तूर्तास इतकेच पुरे. आज मराठी चित्रपटसृष्टी, फॅन्स आणि फॉलोअर्स आणि अगदी मिडिया यांचे सुबोध भावेच्या वाटचालीवर लक्ष आहे, पण यशाचा दबाव न घेणारा या गोष्टीतही नॉर्मल राहिलच. महत्वाचे म्हणजे, नको त्या गोष्टीत वेळ आणि शक्ती खर्च न करण्याची त्याला सवय लागली आहे. सोशल मिडियापासून दूर राहून अधिक चांगले आयुष्य जगता येते याची कल्पना त्याला आली आहे. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.