ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
अभिनयातला कर्मठ ‘अधिकारी’ मिलिंद शिंदे
आपलं काम आटोपून मिलिंद आराम करीत बसले होते. तेवढ्यात फोनची रिंग वाजली. पलीकडे अभिनेत्री अमृता सुभाष, ती म्हणाली, “मिलिंद, कुणीतरी तुझ्याशी बोलण्यास खूप इच्छूक आहे.” मिलिंद यांना वाटलं, असेल कदाचित कुणी एखादा चाहता. त्यांनी अनुत्साहानंच बोलण्याची तयारी दर्शविली. तिकडून आवाज आला, “नमस्कार, मी विजय तेंडुलकर बोलतोय. खूप दिवसांपासून बोलण्याची इच्छा होती. तुम्ही खूप छान काम करता. ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’मधलं काम आवडलं मला…”
मिलिंद क्षणभर स्तब्धच झाले. खुद्द विजय तेंडुलकर आपली तारीफ करताहेत म्हटल्यावर आसमानच ठेंगणं झालं होतं त्यांना. गप्पा रंगत गेल्या. मिलिंद म्हणाले, “सर, तुमची नाटकं वाचूनच मोठा झालोय. कधीतरी भेटायची इच्छा आहे.” एरवी कधी कुणाला फारसे न भेटणारे तेंडुलकर थेट म्हणाले, “नक्की घरी या. ज्यादिवशी तुम्ही याल, त्यादिवशी मी आराम नाही करणार.” काहीच दिवसांनंतर मिलिंद आणि विजय तेंडुलकर खूप वेळपर्यंत समोरासमोर बसले होते.
मिलिंद शिंदे, चित्रपटसृष्टीला मिळालेला एक भारदस्त कलावंत. भूमिकेचा आकार कितीही असो, पूर्ण पडदा व्यापून टाकण्याची ताकद या कलावंतात आहे. म्हणूनच रसिकांचं त्यांच्यावर प्रेम आहे. म्हणतात ना, प्रत्येकाच्या जीवनाची कथा वेगळी असते. मिलिंद यांचंही तसंच. यूपीएससीचा अभ्यास केलेला मिलिंद अभिनेता नसते, तर कदाचित भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) मोठे अधिकारी असते. मात्र, नियतीला आपल्याला एक गुणी अभिनेता द्यायचा होता. नाटक ते सिनेमा असा त्यांचा प्रवास मोठा रोचक आहे. (Success Story of Milind Shinde)
शिंदे कुटुंबीय मूळचं मराठवाड्यातील बीडचं. मिलिंद यांचं चौथीपर्यंतचं शिक्षण बीडमध्ये झालं. वडील रामदास मोठ्या पदावरचे शासकीय अधिकारी. त्यामुळे बदल्या ठरलेल्याच. शेवटी हे कुटुंब अहमदनगर इथं स्थायिक झालं. मिलिंद अभ्यासात हुशार. अगदी लहान वयापासून ते रंगमंचावर दाखल झाले. कित्येक नाटकांतून कामं केली. बक्षिसंही मिळविली. अभिनयक्षेत्रातच जायचं, हे त्यांनी ठरवलं होतं.
आजोबा जानोजी शिंदे लोककलावंत होते. त्यांचेच कलागुण कदाचित मिलिंद यांच्यात उतरले होते. मात्र, वडिलांनी सांगितलं, “आधी शिक्षण पूर्ण कर.” मिलिंद यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. बऱ्यापैकी यशही मिळवलं होतं. मात्र, कलागुण स्वस्थ बसू देत नव्हते. शिक्षण, यूपीएससीची तयारी हे सारं सुरू असताना रंगमंच गाजवणं सुरू होतं. राष्ट्रीय नाट्य विद्यालयात (एनएसडी) प्रवेश मिळाला. तिथं नाटकाचे शास्त्रशुद्ध धडे गिरविले. यादरम्यान नसीरुद्दिन शाह यांच्याकडून अभिनयातील बारकावे शिकता आले. (Success Story of Milind Shinde)
एनएसडीतून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मिलिंद मुंबईत दाखल झाले. यूपीएससीची तयारी सुरूच होती. तरीही अभिनयक्षेत्रात येण्यासाठी संघर्ष सुरू झाला. चरितार्थासाठी अर्थार्जन गरजेचं होतं. तेव्हाच्या उषाकिरण टेलिव्हिजनमध्ये नोकरीसाठी अर्ज केला. ती प्रक्रिया सुरू असतानाच अमृता सुभाषचा फोन आला. वामन केंद्रे यांनी बोलवल्याचा निरोप तिनं दिला.
“मुंबईत येऊन राहू कुठं? तिथं टिकाव लागायला हवा”, अशी अट मिलिंद यांनी केंद्रे यांच्याकडे घातली. अखेर ते मायानगरीत दाखल झाले. आमदार निवासात राहू लागले. तोवर मुंबई म्हणजे दाऊद, अरुण गवळी… असाच समज होता. काहीच कळत नव्हतं. मात्र, आता अहमदनगरला परतायचं नाही, हा ठाम निश्चय त्यांनी केला होता. व्यावसायिक नाटकांतून कामं मिळू लागली. ‘ती फुलराणी’, ‘सखाराम बाइंडर’, ‘झुलवा’, ‘कथा अरुणाची’, ‘ऑलबेल’ या नाटकांचे प्रयोग सुरू झाले. (Success Story of Milind Shinde)
एकदा ‘ती फुलराणी’चा प्रयोग सुरू होता. मिलिंद यांच्या एन्ट्रीवर एका कोपऱ्यातून सतत शिट्ट्या ऐकू येत होत्या. प्रयोग संपल्यानंतर मिलिंद यांनी अविनाश नारकर यांना विचारलं, “शिट्ट्या कोण मारत होतं रे?” तेव्हा अविनाश यांनी सांगितलं, ‘गजेंद्र अहिरे.’ काहीच वेळात अहिरे तिथं दाखल झाले अन् शब्द दिला, “माझ्या पुढच्या चित्रपटात तू असशील.”
निर्माते, दिग्दर्शक असा शब्द कलावंताला देतच असतात. नंतर त्यांच्या लक्षात काही राहात नसतं, असा अनुभव मिलिंद यांना आजपर्यंतच्या संघर्षात आला होता. मात्र, अहिरेंनी आपला शब्द पाळला होता. ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’मध्ये मिलिंद यांना भूमिका मिळाली. एवढंच नाही, तर पुरस्कारही मिळाला. मिलिंद शिंदे यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला होता. मग काय, ‘नटरंग’, ‘बाबू बॅण्ड बाजा’ असे कित्येक चित्रपट त्यांनी गाजवले. कित्येक पुरस्कार मिळवले. नेटफ्लिक्सवरच्या ‘अरण्यक’ वेबसीरिजमधीलही त्यांची भूमिका कमालीची गाजली. आज ऐंशीवर चित्रपटांतून त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. कुठलीही भूमिका घ्या, मिलिंद शिंदे यांची ‘अमिट छाप’ आहे. त्यांना चाहत्यांचं अमाप प्रेम मिळतंय. (Success Story of Milind Shinde)
मिलिंद यांच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वात जमेची बाजू कुठली असेल, तर तो त्यांचा आवाज. यासाठी काही विशेष मेहनत घेतली का, असं विचारलं असता ते सांगतात, “काही बाबी अंगभूत असतात. मात्र, त्या टिकवून ठेवायच्या असतील, तर मेहनत गरजेचीच असते. एखादा वादक, गायक रोज रियाज करतोच ना. तसंच अभिनेत्याचंही आहे. आवाज, अभिनयाचाही रियाज करावाच लागतो.” (Success Story of Milind Shinde)
सगळी माध्यमं उत्तम
सध्या मनोरंजनाची माध्यमं वाढलेली आहेत. नाटकं, सिनेमे, टीव्ही मालिका, शॉर्टफिल्म्स आणि आता वेबसीरिज असा मनोरंजनक्षेत्राचा प्रवास सुरु आहे. यामुळे मोठ्या पडद्याला धोका आहे का, असं विचारलं असता मिलिंद सांगतात, “प्रत्येक माध्यमाचं वैशिष्ट्य अन् ताकद वेगवेगळी आहे. कुठल्याही माध्यमाला धोका नाही. सिनेमाचं म्हणाल तर, तो अधिक चकचकीत झाला आहे. सिंगल थिएटरमधून तो मल्टिप्लेक्समध्ये आलाय. तांत्रिकदृष्ट्या अधिक समृद्ध झालाय. मोठ्या पडद्याची मजा काही और आहे. विस्तारानं कथा सांगणारं ‘वेबसीरिज’ हे माध्यम वेगळं आहे. कित्येक कलावंतांना या माध्यमानं ओळख दिलीय.”
सध्या डिजिटल माध्यमात अश्लीलता, शिव्या यांचा भडिमार पाहायला मिळतो. त्याविषयी छेडले असता मिलिंद म्हणतात, “माध्यमं बदलत आहे. गरजेनुसार, कथेनुसार वा प्रेक्षकांच्या आवडीनुसार काही दृश्यांचा समावेश होतही असेल. मात्र, रिमोट शेवटी तुमच्या हातात आहे. काय पाहायचं, काय नाही, हे तुम्हालाच ठरवायचं आहे.”
वेगळ्या वळणाचे सिनेमे आता यायला लागले आहेत. आधी हिरोंचे सिनेमे होते, आता माणसांचे सिनेमे येताहेत. माणसांचं जगणं, अस्तित्व, माणूसपण हरविण्याच्या गोष्टी यातून सांगितल्या जात आहेत. त्या कथांत सहभागी होता आलं, याचं समाधान असल्याचं ते सांगतात.
सतत अपग्रेड राहा…
“या क्षेत्रात संघर्ष अटळ असतो. आधी काम मिळविण्यासाठी, मग टिकून राहण्यासाठी, मग पुन्हा टिकून राहण्यासाठी… संघर्ष संपतच नाही. तुमची जागा घेण्यासाठी कुणीतरी सतत टपलेलं असतं. त्यामुळे मेहनतीची तयारी असणाऱ्यांनीच या क्षेत्रात यावं. शिवाय, अभ्यास करूनच इथं प्रवेश करावा, स्वत:ला सतत अपग्रेड करण्याची तयारी ठेवावी”, असा सल्ला ते नवोदितांना देतात. “मी संघर्ष करत होतो, तेव्हा बरेचदा नकार पचवावे लागले. माझा चेहरा अन् अंगकाठी पाहून कोण मला काम देईल, असं वाटायचं. मात्र, चांगले लोक मिळत गेले. कलेची कदर झाली, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे”, असंही ते नमूद करतात. (Success Story of Milind Shinde)
==========
हे देखील वाचा – प्रशांतच्या लेखणीनं सर्वांच्या ‘अंगात आलंया…’
==========
मिलिंद मुंबईत आई संपत्ती यांच्यासोबत राहतात. त्यांचे बरेच चित्रपट सध्या येऊ घातले आहेत. ‘येरे येरे पावसा’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. भविष्यात अभिनयासोबत लिखाण आणि दिग्दर्शन करायचं आहे. प्रवास तर दमदारच आहे, तरी काहीतरी राहून गेलं असं वाटतं का, असं विचारल्यावर ते चटकन उत्तरतात, “ऑस्कर मिळावा अशी महत्त्वाकांक्षा आहेच!” खरंतर या पुरस्काराचे ते दावेदार आहेतच. मात्र, त्यांनी आपल्या कलेतून आजपर्यंत जे दिलंय, त्याची मोजदाद निश्चितच शक्य नाही. रसिकप्रेमाचा ‘ऑस्कर’ त्यांनी आधीच मिळवलाय, यात शंकाच नाही.