प्रशांतच्या लेखणीनं सर्वांच्या ‘अंगात आलंया…’
कित्येक तास लोटले होते. डॉक्टरची वाट बघून प्रशांत कंटाळला होता. मनात घालमेल सुरू होती. आणखी किती दिवस करायचं हे? सकाळी निघायचं, डॉक्टरांचे दवाखाने फिरायचे. त्यांनी वेळ दिली तर भेटायचं, अन्यथा बाहेर नुसती प्रतीक्षा करत राहायचं. हेलपाटे नुसते. यावेळी मात्र त्यानं निर्धार केला होता, “खूप झाली ही वैद्यकीय प्रतिनिधीची (एम.आर.) नोकरी अन् मनातील घुसमट. आता काहीही होवो, आपल्या आवडत्या क्षेत्रात शिरायचंच, प्रसंगी रिस्क घेऊन नोकरी सोडावी लागली तरी…” प्रशांत बॅग घेऊन उठला अन् झपझप चालायला लागला. त्याची पावलं स्वप्नपूर्तीच्याच दिशेनं चालत होती जणू! (Success story of Prashant Madpuwar)
प्रशांत मडपुवार… वेड लावलं या पोरानं महाराष्ट्रासह अख्ख्या देशाला अन् विदेशातही. कसं? ‘झोंबिवली’तल्या त्याच्या ‘अंगात आलं, अंगात आलं, अंगात आलंया…’ या गाण्यावर आज मोठेच नाही तर छोटेही बेभान होऊन थिरकत आहेत. येस्स… हे झोंबीगीत देणारा प्रशांतच. सिनेमांसाठी त्यानं आजवर जवळपास दीडशे गाणी लिहिली आहेत. मात्र, ‘अंगात आलंया…’नं जबरदस्त धूम केलीय. जिकडे-तिकडे पार्ट्यांत, डीजेवर सध्या याच गाण्याचा माहोल आहे. मात्र, प्रशांतचा गीतकार, कॉपीरायटर म्हणून प्रवास म्हणावा तेवढा सोपा नव्हताच.
प्रशांत मूळचा चंद्रपूरचा. वडील दत्तात्रय मडपुवार वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडमधून निवृत्त, तर आई वनिता गृहिणी. वनिता लिहितात. त्या छंद म्हणून बालवाडीला शिकवायच्या. त्यांच्या घरातच लहान मुलांची नाटकं बसविली जायची. घरात बऱ्यापैकी सांस्कृतिक वातावरण होतं. समजायला लागलं तेव्हापासूनच प्रशांतमध्ये लिखाणाची आवड निर्माण झाली. तो कविता करायला लागला. मावसभाऊ जयंत बन्लावार हाही लिहितो. त्यामुळे जयंतसोबत त्याची मस्त गट्टी जमू लागली.
एकदा प्रशांत नागपूरला आला अन् जयंतसोबत संस्कार भारतीतर्फे आयोजित कार्यक्रमाला गेला. तिथं गजलनवाज भीमराव पांचाळे यांचा गजलगायनाचा कार्यक्रम होता. पांचाळ यांच्या गजल सादरीकरणानं तो एवढा भारावला की, गजल हा प्रकार काहीही करून शिकायचाच, असं त्यानं ठरवलं. कित्येक कविता करून झाल्या होत्या. वृत्तात गजल लिहिण्यास सुरुवात केली. त्यामुळे कवितेत लय आली. म्हणूनच गाणी लिहिणं सोपं गेलं, असं प्रशांत सांगतो. (Success story of Prashant Madpuwar)
प्रशांतचं डी.फार्म., बीएसस्सी बायोटेक्नॉलॉजी असं शिक्षण झालं आहे. मात्र, शिक्षण सुरू असताना हा प्रात्याक्षिकांना कमी अन् नाटकांमध्येच जास्त दिसायचा. भरपूर एकांकिका केल्या त्यादरम्यान त्यानं. प्रशांत कक्कड यांनी एका नाटकात प्रॉम्प्टर म्हणून उभं केलं. त्यादरम्यान ते नाटक त्याला पूर्ण पाठ झालं होतं. पाचच दिवसांत त्याच नाटकात तो अभिनेता म्हणून उभा राहिला अन् राज्य नाट्यस्पर्धेत चमकला. नाटकांत बरीच बक्षिसं मिळाली. कवितालेखन सुरू होतंच. यादरम्यान २००७ला त्याचा ‘चार ओळी तुझ्यासाठी’ हा चारोळीसंग्रह प्रकाशित झाला. नंतर २०१०ला ‘इंद्रधनू’ हा काव्यसंग्रह आला. तेव्हा तो एका औषध कंपनीसाठी वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून नोकरी करत होता.
नोकरीत आर्थिक स्थैर्य चांगलं होतं. मात्र, गीतकार होण्याची महत्त्वाकांक्षा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. नोकरी सतत फिरती असल्यामुळे आवडत्या क्षेत्रासाठी वेळही देता येत नव्हता. त्यामुळे मनात वादळं घोंघावत होती. याचदरम्यान, ‘मन बावरे’ हा गीतांचा अल्बम त्यानं केला. मित्रांच्याच मनोवेध संस्थेनं त्याची निर्मिती केली होती. त्यात शंकर महादेवन, बेला शेंडे यांनी प्रशांतची गाणी गायली. एवढ्या मोठ्या गायकांच्या गळ्यातून आपले शब्द सूर होऊन निघावेत, हे प्रशांतसाठी मोठं बळ होतं. चंद्रपुरात असतानाच ‘इपितर’ नावाचा चित्रपट त्यानं केला होता. त्यातील गाण्यासाठी त्याला मिर्ची अवॉर्डचं नामांकनही मिळालं होतं. (Success story of Prashant Madpuwar)
आता काहीही करून स्वप्नपूर्तीच्या दिशेनं वाटचाल करायचीच, असा पक्का इरादा त्यानं केला. तोवर लग्न झालं होतं. छोटा मुलगाही होता. तरी त्यानं एका झटक्यात नोकरी सोडली अन् सुरुवातीला एकट्यानंच पुणे गाठलं. कुटुंब असल्यानं जबाबदारी होती. म्हणून तिथं हाताशी एखादी नोकरी आवश्यक होती. एका कंपनीत नोकरी मिळाली. सोबत संघर्ष सुरू होता.
संगीतकारांकडे, स्टुडिओंमध्ये जाऊन गाणी ऐकवायची वगैरे सुरू होतं. त्याचदरम्यान रोहित नागभिडे या मित्रानं त्याला एक काम मिळवून दिलं. नाटक आणि कविता या दोन्ही माध्यमांवर त्याचं प्रेम. मात्र, त्यानं कविता निवडली. कारण, नाटकांच्या तालमीसाठी वेळ देणं आता शक्य नव्हतं. कारण, कुटुंबाची जबाबदारी होती. काही चित्रपटांसाठी त्यानं गाणी लिहिली. दोन-तीन वर्षांत सुमारे १५ चित्रपट केले. त्यापैकी प्रदर्शित झालेला मोठा चित्रपट म्हणजे ‘झोंबिवली’. (Success story of Prashant Madpuwar)
‘इपितर’साठी नामांकन मिळालं तेव्हा त्या पुरस्कार वितरण सोहळ्याला जाणं झालं. तिथंच रोहन गोखले, रोहन प्रधान या रोहन-रोहन संगीतकार जोडीची भेट झाली. रोहन गोखलेला प्रशांतचं लिखाण आवडलं होतं. त्यानं ट्युन पाठविली अन् त्यावर एक गाणं लिहून घेतलं. त्यानंतर बरीच गाणी लिहून झाली. त्यावेळी ‘झोंबिवली’ची घोषणा झाली होती. त्याचे टिझर येऊ लागले होते.
रोहननं दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांना फोन करून ‘प्रमोशनल साँग आम्ही करतो’, असं सांगितलं. आदित्य यांनी परवानगी दिली. प्रशांतच्या लेखणीतून ‘अंगात आलंया’ उतरलं अन् धूम झाली. हे गाणं लिहिणं तेवढं सोपं नव्हतं. मराठीतला हा पहिलाच झोंबीपट. गाण्यात झोंबी आणणं म्हणजे मोठं आव्हान. ते प्रशांतनं पेललं. “झोंब्यानं मारली उडी…” सारख्या ओळी सर्वांनाच आवडल्या. सध्या जमाना रिल्सचा आहे. आपल्या गाण्याचा रिल्समध्ये वापर झाला पाहिजे, याची काळजीही रोहन-रोहन, प्रशांत यांनी घेतली. आज रिल्समध्येही हे गाणं टॉपवर आहे. (Success story of Prashant Madpuwar)
कविता वेगळी अन् गाणं वेगळं…
“कविता आणि गाणं या दोन्ही वेगवेगळ्या बाबी आहेत. कविता बरेचदा स्वत:साठी लिहिल्या जातात. त्यात बरेचदा भारी भारी शब्द असतात. गाण्याचं तसं नाही. ते सुरांच्या रूपात रसिकांच्या तोंडी रुळलं पाहिजे, असं प्रशांत सांगतो. शिवाय, रसिकांची अभिरुची वेळोवेळी बदलत असते. अशावेळी स्वत:ला अपग्रेड करत राहावं लागतं. आजही जुनी गाणी आपल्या ओठांवर आहेत. कारण, ती शब्दांची ताकद आहे. त्यात गोडवा आहे. हाच गोडवा रसिकांना देत राहिलं पाहिजे”, असं तो सांगतो.
प्रशांतनं लावणी, सवाल-जवाब, रॅप हेही प्रकार हाताळले आहेत. अजय-अतुल जोडीतील अजय गोगावले यांच्यासोबत ‘सुटले धागे…’ त्याला करायला मिळालं, यशराज स्टुडिओत त्याचं रेकॉर्डिंग झालं, हा प्रसंग त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा होता.
कुटुंबीय, मित्रांची साथ मोलाची…
लग्न झालेलं, अशावेळी नोकरी सोडून स्वप्नपूर्तीसाठी पुणे-मुंबईकडे प्रशांत झेपावला तेव्हा सर्वांनी त्याला मूर्खात काढलं होतं. मात्र, तो आपल्या निश्चयावर ठाम होता. अशावेळी आई-बाबा, पत्नी युगंधरा यांनी मोलाची साथ दिली, असं प्रशांत गहिवरून सांगतो.
कित्येकदा पत्नी युगंधराला घेऊन तो कामाच्या शोधात निघायचा. तिनं कधी कुरबूर केली नाही की वाटेत अडथळे आणले नाहीत. प्रशांतनं त्याचं स्वप्न पूर्ण करावं, याकडेच तिचाही कटाक्ष होता. बहीण पूर्णा अंबरनाथला राहते. तिच्या घरून कामाच्या शोधात निघायचं, रात्रीच परत यायचं, असं सुरू होतं. संघर्षाला बऱ्यापैकी यश आलं. आता पुण्यातील नोकरीही त्यानं सोडलीय. गाणी लिहिणं आणि कॉपीरायटिंग यात आता तो गुंतला आहे. (Success story of Prashant Madpuwar)
सध्या कमालीच्या लोकप्रिय ‘चिंगारी’ या ॲपसाठी तो कंटेंट लिहितोय. या प्रवासात चांगली माणसं मिळाली. म्हणून कधी वाईट अनुभव आले नाहीत, असं तो आवर्जून सांगतो. रोहन-रोहन, दिग्दर्शक प्रसाद नामजोशी, संगीतकार विजय गवंडे यांच्यासह अभिषेक काटे, रोहित नागभिडे, रवी सेलोटे, अजय वाघे, विशाल आवारी यांचे तो आवर्जून आभार मानतो. आणि हो, प्रशांतचा मुलगा राघव सात वर्षांचा आहे. तोही लिहिण्याचा प्रयत्न करतोय, याचं त्याला समाधान आहे. “अंगात आलंया’ हे गाणं माझ्या बाबांनी लिहिलंय..”, हे तो मोठ्या अभिमानानं इतरांना सांगतो, तेव्हा प्रशांतमधील बाप अधिकच सुखावतो. आपल्या प्रवासाचं चीज होतंय, असं त्याला वाटतं.
=====
हे देखील वाचा – ‘झॉलिवूड’ कागदावर उतरविणारी मनस्वी कलावंत: आसावरी नायडू
=====
पेशन्स ठेवा, मेहनत करा…
“मुंबई-पुणे ही शहरं बाहेरच्या छोट्या शहरातील लोकांना जवळ करत नाहीत, हा गैरसमज आहे. मी कोण, कुठला, तरी तिथं मला सामावून घेण्यात आलं. सगळीकडे लोकं चांगली मिळतात. मात्र, आपणही आपल्यातील चुणूक दाखविली पाहिजे. मेहनतीची तयारी ठेवली पाहिजे. जिथं आपण जातो, तिथलं बनून राहायला हवं. जेणेकरून प्रवास सोपा जातो, असं प्रशांतचं म्हणणं आहे.
प्रशांतचा लिखाणाचा प्रवास सुरू आहे. ‘पल्याड’सह कित्येक चित्रपटांसाठी तो गाणी लिहितोय, कॉपीरायटिंगही सुरू आहे. मुळात नाटकातला असल्यानं आलीच तर भूमिका करायलाही आवडेल, असं तो सांगतो. सुरेश भट, गुलजार, गुरू ठाकूर, अमिताभ भट्टाचार्य, वरुण ग्रोव्हर हे त्याचे आवडते गीतकार. भविष्यात उत्तम गीतनिर्मिती करण्याचा, उत्तमोत्तम लिहिण्याचा त्याचा ध्यास आहे. अतिशय नम्र, गुणी प्रशांत लेखणीवर स्वार होऊन रसिकांची मनं जिंकण्यासाठी झेपावला आहे.
2 Comments
प्रशांतराव खरच गुणी आणि जिद्दी व्यक्तिमत्व आहे आणि त्याला कुटुंबाची साथ आहेच. देव त्यांना नेहमी साथ देवो आणि अशीच जीवनात भरभराट होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
आमच्या प्रशांतला अगदी अचूक मांडलं आपण…. प्रशांतच्या बाबतीत आपण लिहिलेला प्रत्येक शब्द खरा आहे… शालेय दिवसापासून कविता-गाणी लिहणयसाठी असलेली प्रशांतची ओळी आणि आजपर्यंतचा त्याचा संघर्षमय प्रवास आम्ही बघितला आहे… पण प्रशांतच आजच यश बघून आम्हाला प्रशांतचा खूब अभिमान आहे… प्रशांत अधिकाअधिक यश गाठो हीच ईश्वर-चरणी प्रार्थना… अतिशय सुंदर लेख लिहिला आहे सर आपण….