महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
छोट्याशा खेड्यातून ‘आंतरराष्ट्रीय’ झेप घेणारी रावी किशोर
“रावी, तू या सिनेमात लीड करणार आहेस”, दिग्दर्शकानं थेटच सांगितल्यावर रावी बुचकळ्यात पडली. दोनेक दिवसांचं शूट झालं होतं. शिवाय, तिची निवड सेकंड लीडसाठी झाली होती. मग अचानक आपल्या वाट्याला नायिकेची भूमिका कशी काय आली, असा प्रश्न तिला पडला. तेव्हा कळलं, मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीनं काही कारणास्तव हा प्रोजेक्ट सोडला होता. त्या भूमिकेसाठी तातडीनं नायिकेचा शोध घेण्याचं ठरलं. मात्र, रावी युनिटच्या नजरेत फिट बसत होती. म्हणून तिचीच या भूमिकेसाठी निवड करण्यावर एकमत झालं. रावीला खऱ्या अर्थानं तिथंच स्वत:ची वाट सापडली होती. (Success Story of Raavi Kishor)
रावी किशोर! खेडेगावात राहून कुछ कर दिखाने के सपने पाहणारी अन् ते तेवढ्याच धडाडीनं साकार करणारी मुलगी. मराठी आणि कोंकणीसह मल्याळम, तेलुगू, हिंदी, इंग्रजी आणि तमिळ या भाषांतील चित्रपटांतून ती कामं करते आहे. एवढंच नाही तर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया अर्थात ‘इफ्फी’मध्ये तिची प्रमुख भूमिका असलेले वेगवेगळ्या भाषांतील सिनेमे निवडले गेले. तिला पुरस्कारही मिळाले. स्वप्नांना मर्यादा नसतात अन् ते साकार करण्यासाठी कठोर मेहनतीला पर्याय नसतो, याचंच प्रेरणादायी उदाहरण म्हणजे रावी.
कोल्हापूर जिल्ह्यातील एका लहानशा खेड्यातील रावीचं कुटुंब. वडील पांडुरंग देसाई शेतकरी, तर आई सुवर्णा गृहिणी. रावी छोटी असताना सांस्कृतिक कार्यक्रमांची तिला मोठी आवड होती. मात्र, गावात तसं वातावरण नव्हतं. शाळेत दहावीपर्यंत दोनदाच गॅदरिंग झालं होतं. दहावीनंतर गावापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या आजरा महाविद्यालयात तिनं प्रवेश घेतला. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर युथ फेस्टिव्हलमधून कलेला वाट मिळू लागली. (Success Story of Raavi Kishor)
‘इंटर-युनिव्हर्सिटी’ लेव्हलवर तिनं अभिनयाचं पहिलं पारितोषिक पटकावलं. ते तिचं अन् आजरा महाविद्यालयाचंही एकूण पहिलंच पारितोषिक होतं. असं असलं तरी ती अभिनयाच्या बाबतीत अजून चाचपडत होती. याच क्षेत्रात करिअर करायचं, असं ठरवलं. मात्र, या क्षेत्राविषयीची फारशी माहिती नव्हती. पुण्याच्या ललित कला केंद्रासाठीही मुलाखत दिली. मात्र, मुंबई विद्यापीठाच्या ‘थिएटर अॅकेडमी’मध्ये निवड झाली. हाच तिच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला.
पुढं ‘गोवा कला अकादमी’मध्ये दोन वर्षांत कोंकणी आणि मराठी भाषेतील सहा पूर्ण लांबीची नाटकेही केली. पण, जेव्हा ती ‘थिएटर अॅकेडमी’मध्ये दाखल झाली तेव्हा अभिनयाजगताची जवळून ओळख झाली. एचओडी डॉ. मंगेश बनसोड तसेच मिलिंद इनामदार, शिवदास घोडके, अमोल देशमुख, संध्या रायते यांनी मोठं पाठबळ आणि उमेद, आत्मविश्वास दिला. कारण ग्रामीण भागातून आल्यामुळे रावीच्या मनात थोडा न्यूनगंड सतत होता. मात्र, तिच्या या सगळ्या शिक्षकांनी त्यावर मात करायला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या शिकवलं.
एम.ए. फर्स्ट इयरला असताना तिनं ‘जिहाद यात्रा’ हे हिंदी-उर्दू भाषेतील नाटक केलं. फ्रान्सचे लेखक-दिग्दर्शक असिल रईस यांनी ते दिग्दर्शित केलं होतं. या नाटकातील ‘बेल्ला’ हे मुख्य पात्र रावीनं साकारलं होतं. “या नाटकातील भूमिकेमुळे खूप शिकता आलं. मुख्य म्हणजे मला माझी इमेज आणि एकूणच ‘कम्फर्ट झोन’ सोडण्यासाठी प्रचंड मदत झाली. माझ्यासारख्या मुलीसाठी ते अत्यंत महत्त्वाचं होतं. योग्यवेळीच मी कम्फर्ट झोनच्या बाहेर आल्यामुळे आज मराठी आणि कोंकणीसह मल्याळम, तेलुगू, हिंदी, इंग्रजी आणि तमिळ या भाषांमध्ये काम करू शकले”, असं रावी सांगते. मल्याळम तर ती बोलण्यासह लिहू आणि वाचूसुद्धा लागली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ती आता केरळमध्येच स्थायिक झाल्यासारखी आहे. (Success Story of Raavi Kishor)
इंटरनॅशनल मोहोर…
२०१९ आणि २०२१ या दोन्ही वर्षी गोव्यातील इफ्फीमध्ये (इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया) रावीच्या प्रमुख भूमिका असलेले वेगवेगळ्या भाषांतील सिनेमे निवडले गेले. त्यातच २०१९ साली इफ्फी आणि ईएसजीच्य (एन्टरटेंन्मेंट सोसायटी ऑफ गोवा, गोवा सरकार) वतीने आयोजित ‘मिनी मूव्ही मॅनिया’ या ७२ तासांच्या सिनेनिर्मिती महोत्सवामध्ये तिला नॅशनल कॅटेगरीमध्ये ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चा पुरस्कार प्राप्त झाला. त्याचवर्षी केरळमधील कालिकत येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवामध्ये ‘ज्युरी स्पेशल मेन्शन’ पुरस्कार मिळाला.
२०२१ साली तिची प्रमुख असलेले तीन वेगळ्या भाषांतील तीन सिनेमे इफ्फीतील तीन वेगवेगळ्या विभागांत एकाचवेळी निवडले गेले होते. रावीसारख्या नवख्या कलाकारासाठी ही खूप मोठी गोष्ट होती. ‘घरटं’साठी ‘इफ्फी’मध्ये बेस्ट ॲक्टरचा (फीमेल) नॅशनल अवॉर्ड, ‘ऑन द रॅग’साठी कालिकतच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्पेशल ज्युरी अवॉर्ड असे मानाचे पुरस्कार तिच्या खात्यात आहेत. (Success Story of Raavi Kishor)
असा झाला साउथमध्ये प्रवेश
गोव्यात असताना तिनं एका कोंकणी सिनेमासाठी ऑडिशन दिलं होतं. एम.ए.च्या द्वितीय वर्षाला असताना हैदराबादच्या एका कास्टिंग डायरेक्टरचा ऑडिशनसाठी कॉल आला. ती हैदराबादला गेली. होस्टेलमध्ये राहू लागली. ऑडिशन यशस्वीरीत्या झालं. त्यासाठी ती लवकरच तेलुगू शिकली. मल्याळम सिनेमासाठीही तिनं प्रोफाइल पाठविलं. त्यासाठीही तिची निवड झाली. दक्षिणेत काम वाढू लागलं. म्हणूनच मग केरळमध्येच स्थायिक होण्याचं तिनं ठरवलं. दक्षिणेकडील बऱ्याच ब्रँड्सच्या जाहिरातींसाठी ती कामं करतेय.
========
हे देखील वाचा : ‘हा’ अभिनेता व्हिलनगिरी सोडून कॉमेडीकडे वळला..
========
कोंकणी-हिंदी भाषेतील ‘बडे अब्बू’, ‘मोडस ऑपरेंडी’, ‘रशिया’, ‘पाडा’ या चित्रपटांतील तिच्या भूमिकेचं कौतुक झालंय. डिझ्ने-हॉटस्टारवरील एका तेलुगू वेबसीरिजमध्ये तिची महत्त्वाची भूमिका आहे. ‘जूनमोनेटा’ हा तेलुगू चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. यांसह कित्येक शॉर्टफिल्म्स आहेत. जवळपास बारा नाटकांतूनही तिनं कामं केली आहेत. (Success Story of Raavi Kishor)
थांबू नका, पुढं चाला…
“या क्षेत्रात चांगली माणसं भेटली. अनुभवही चांगलेच आलेत. असं असलं तरी काही वाईट अनुभवांचा सामनाही करावाच लागतो. काही ठिकाणी रावीला नकार स्वीकारावे लागले. मात्र, त्यामुळे हताश न होता आपण आणखी काय बेस्ट करू शकतो, याचा विचार करून तयारी असावी, न थांबता पुढं चालायचं असतं”, असा मोलाचा संदेश रावी देते. सर्वच भाषांतील चित्रपटांत काम करण्याची तिची महत्त्वाकांक्षा आहे.
आपल्या कारकिर्दीत एवढं सारं काम करूनही आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटवूनही, “मी अजून शिकते आहे”, असंच रावी सांगते. यातूनच तिच्यातील नम्रतेचा परिचय येतो. हीच नम्रता, सतत नवं काहीतरी शिकण्याची वृत्ती अन् कठोर मेहनतीच्या भरवशावर ती कलेचं हे क्षेत्र काबीज करायला निघालेली आहे. ‘रावी’ हे नदीचं नाव. तीही नदीसारखीच प्रवाही, खळाळती आहे. आपलं अस्तित्व प्रभावीरीत्या टिकवून आहे.