महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
लढवय्या कलावंत शैलेश दुपारेचा संघर्ष सातासमुद्रा‘पल्याड’
छोटा शैलेश बाबांच्या त्या रूममध्ये गेला. तिथं पाहतो तो काय… एक प्रोजेक्टर, रिळं, पडदा, टेपरेकॉर्डर असं साहित्य येऊन पडलेलं. आजपर्यंत सिनेमे थिएटरमध्ये बसून पाहिले. त्याच्यामागं एवढा तामझाम असतो, हे त्याला आता कळलं होतं. मोठी मजा वाटली त्याला. इथून सिनेमाविषयीची आत्मीयता अधिक वाढत गेली. (Success story of Shailesh Dupare)
शैलेश दुपारे! अपार संघर्षानंतर आपली स्वप्न पूर्ण करणारा, एवढंच नव्हे तर जागतिक पातळीवर स्वत:ची दखल घ्यायला भाग पाडणारा लढाऊ कलावंत. अतिशय वेगळ्या धाटणीचा ‘पल्याड’ हा त्याचा चित्रपट येत्या ४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होतोय. विशेष म्हणजे ‘फोर्ब्स’ या आंतरराष्ट्रीय मासिकाने त्याच्या या चित्रपटाची दखल घेतली आहे. तमाम मराठी कलावंतांसाठी ही अभिमानाची बाब आहे. एफटीआयआयमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर सहलेखक, सहदिग्दर्शक म्हणून सुरू झालेली त्याची वाटचाल आता स्वप्नपूर्तीच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे.
शैलेश मूळचा चंद्रपूरचा. वडील भीमराव दुपारे शासकीय रुग्णालयात कार्यरत होते. १९८०-८५चा तो काळ. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ‘हम दो हमारे दो’, ‘छोटा परिवार सुखी परिवार’चा नारा दिला होता. याबाबतची जनजागृती करण्यासाठी काही फिल्म्स तयार करण्यात आल्या होत्या. त्या शासकीय रुग्णालयांमार्फत गावोगावी दाखविण्याचं ठरलं होतं. जिल्हा शल्यचिकित्सकांनी (सिव्हिल सर्जन) त्याची जबाबदारी भीमराव दुपारे यांच्याकडे सोपविली. हे अतिरिक्त काम होतं. त्यासाठी भीमराव यांना प्रोजेक्टर, रिळं लावणं, फिल्म दाखवणं या बाबी शिकायच्या होत्या.
चंद्रपुरातील अभय, राजकला आदी टॉकीजमध्ये जाऊन त्यांनी ते शिकून घेतलं. काही दिवसांनंतर शासनाकडून हे सर्व साहित्य चंद्रपूरच्या शासकीय रुग्णालयात येऊन दाखल झालं. ते ठेवण्यासाठी व भीमराव यांची खास व्यवस्था म्हणून एक रूम देण्यात आली. गावोगावी या फिल्म दाखवण्यासाठी शैलेशही बाबांसोबत दौऱ्यावर जायचा. प्रोजेक्टरमध्ये रिळं लावणं, बीममध्ये लाइट लावणं, पडदा उभारणं ही कामं तो शिकत गेला. (Success story of Shailesh Dupare)
त्याकाळी गणेशोत्सव, नवरात्रौत्सवात पडद्यावरचे चित्रपट दाखविले जायचे. प्रोजेक्टर, रिळं, पडदा यांच्याशी संबंध दृढ झालाच होता. त्यामुळे गणपतीतील या चित्रपटांविषयीची आस्था वाढत गेली. कोणत्या मंडळात कुठला सिनेमा दाखवला जाणार, याची तो आधीच माहिती मिळवायचा अन् बसायला पोते घेऊन तिकडे मार्गस्थ व्हायचा.
‘विधाता’, ‘एक दुजे के लिये’, ‘लावारिस’, ‘खुद्दार’ असे कितीतरी सिनेमे त्याने पाहिले. सिनेमानं त्याला झपाटलं होतं. सिनेमाविषयक मासिकं त्याच्याकडे जमा होऊ लागली. प्रसंगी शाळा बुडवून सिनेमा पाहायला जाणं सुरू झालं. त्यासाठी शाळेत शिक्षाही मिळाली. तो मोठा होत गेला, तशी सिनेमातली रुची अधिकच वाढत गेली. मात्र, सिनेमा हे काही करिअरचे साधन असू शकत नाही, असा ठाम विश्वास त्याकाळी होता.
शैलेशनं पदवी पूर्ण केली. भविष्यात नेमकं करायचं काय, याचा काहीच ठावठिकाणा नव्हता. नागपुरात बँकिंगचे क्लासेस लावले. मात्र, त्यात मन रमत नव्हतं. सिव्हिल सर्व्हिसचा अभ्यास सुरू केला. नंतर हैद्राबादला नामांकित ‘टाइम’ इन्स्टिट्युटला एमबीएसाठी प्रवेश मिळाला. आठवड्यातून दोन ते तीन दिवस क्लास असायचे. इतर वेळ रिकामा असायचा. अशावेळी भरपूर तेलुगू सिनेमे पाहिले. कलामन आता स्वस्थ बसू देत नव्हतं. पुण्याचे मित्र पुण्याला बोलवू लागले. तिथं ‘टाइम’ची ब्रान्च होतीच. शैलेश पुण्यात आला, हॉस्टेलला राहू लागला. शिक्षणात रस नव्हताच. हॉटेल इंडस्ट्रीत नोकरी सुरू झाली.
असं बदललं जीवन
पुण्यात एकदा शैलेश ऑटोरिक्षातून जात होता. बाहेर त्याच्या नजरेसमोरून एक मोठा बोर्ड गेला, तो होता ‘फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’ अर्थात ‘एफटीआयआय’चा. तो मान वळवून बघतच राहिला. ‘हे काय आहे’, असं त्यानं त्या ऑटोरिक्षावाल्याला विचारलं. त्यानं सांगितलं, ‘ये फिल्म इन्स्टिट्युट हैं. यहाँ फिल्म बनाना सिखाते हैं.’ सिनेमा वगैरे शिकवणारी अशी कुठली संस्था असते, हे आजपर्यंत त्याच्या गावीही नव्हतं.
दुसऱ्याच दिवशी त्यानं एफटीआयआय गाठलं, तिथल्या ट्युटोरियल सेक्शनला भेट दिली. तेव्हा कळलं, तिथं एन्ट्रन्स असते, दहाच जागा असतात. त्यानं दिग्दर्शनाच्या अभ्यासक्रमाला जाण्याचं ठरविलं. लगेच हॉटेल इंडस्ट्रीतली नोकरी सोडली अन् गावी चंद्रपूरला आला. तिथं एका कॉलेजात मास कम्युनिकेशनला प्रवेश घेतला. ते करता करता एफटीआयआयच्या एन्ट्रन्सचा अभ्यास सुरू होता. मुलाखतीचीही तयारी सुरू होती. सिव्हिल सर्व्हिसचा अभ्यास करताना इंडियन कल्चर आर्ट सोसायटीबद्दल वाचलं होतंच. त्याचे नोट्स काढणं सुरू केलं. (Success story of Shailesh Dupare)
२००५चा तो काळ. व्हीसीआर, खांद्यावर घ्यायचा मोठा व्हिडीओ कॅमेरा, मोठाल्या व्हिडीओ कॅसेट्स असा हा जमाना. त्याकाळी शैलेशनं चंद्रपुरात महाकाली यात्रेचं शूट करून डॉक्युमेंट्री बनविली. सोबत काही कलात्मक फोटोही काढले. एफटीआयआयची लेखी परीक्षा तो उत्तीर्ण झाला. आता वेळ होती मुलाखतीची. डॉ. मोहन आगाशे, शबाना आझमी, विनोद खन्ना मुलाखत घ्यायला होते. त्यावेळी शैलेशच्या हाती त्यानं तयार केलेली डॉक्युमेंट्री होती. त्यानं मुलाखतही पार केली अन् एफटीआयआयमध्ये तो दाखल झाला. पॅशनला त्यानं व्यवसाय बनवण्याचं ठरवलं होतं.
जगभरातील तसेच भारतातील प्रांतिक कित्येक चित्रपट त्याला एफटीआयआयमध्ये पाहता आले. आपल्या सिनेमाचा बाज इमोशन्स व कमर्शियल असा असेल, हे त्यानं द्वितीय वर्षातच ठरवून टाकलं होतं. सिनेमाचं ग्रामर पक्कं होत होतं. यादरम्यान ‘स्पंदन’ ही डिप्लोमा शॉर्टफिल्म केली. तिला चांगले पुरस्कार मिळाले. नंतर कित्येक डॉक्युमेंट्रीज त्यानं केल्या. एफटीआयआयमधून बाहेर पडल्यानंतर ‘ताऱ्यांचे बेट’ या चित्रपटासाठी सौरभ भावे यांच्यासोबत सहलेखन केलं. काही प्रोजेक्ट्ससाठी सहायक दिग्दर्शनाचं काम केलं.
असा घडला ‘पल्याड’…
मध्यंतरी शैलेशनं मुंबईत फिल्म स्कूल सुरू केलं. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. टीव्ही माध्यमातही कामं केली. मात्र, तो फॉर्मेट त्याला रुचला नाही. यादरम्यान त्यानं ‘नूर’ नावाची शॉर्टफिल्म केली. विसाव्या आंतरराष्ट्रीय चिल्ड्रन फेस्टिव्हलला ती सीलेक्ट झाली. त्याच्या सहा महिन्यांनंतर केलेली ‘नो स्मोकिंग प्लीज’ ही शॉर्टफिल्मही नावाजली गेली.
अहमदनगरच्या मास कम्युनिकेशन डिपार्टमेंटमध्ये अध्यापन करणाऱ्या अभिजित गजभिये यांनी शैलेशला व्हिजिटिंग लेक्चरसाठी बोलवलं. तिथं सुदर्शन खंडागळे हा विद्यार्थी होता. त्याच्याशी शैलेशची वेव्हलेंथ जुळत गेली. ‘तुझ्याकडे काही विषय आहे का, जेणेकरून शॉर्टफिल्म बनवू’, असं शैलेशनं त्याला विचारलं. त्यावेळी डिस्कव्हरी चॅनलवर ‘टॅबू’ नावाचा कार्यक्रम यायचा. त्यात जगभरातील अंधश्रद्धा, प्रथा, भूतबाधा वगैरेंवर आधारित भाष्य असायचं.
अशाच स्वरूपाची, कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील एक प्रथा सुदर्शननं बघितली होती. तिथं प्रेतयात्रा रात्री निघते. त्याला ते लोक ‘मुक्तिदिन’ म्हणतात. प्रेताला जमिनीवर ठेवतात. त्याची पूजा होते, प्रदक्षिणा घातली जाते. लाल शिदोरीतील भात पूजा करणाऱ्याला खाऊ घातला जातो. ‘याला मुक्त कर’, अशी प्रार्थना प्रेतासाठी केली जाते.
शैलेशला हा विषय वेगळा वाटला. यावर त्यानं शॉर्टफिल्म लिहायला सुरुवात केली. मात्र, लिहिता लिहिता १२७ सीन्स झाले. ती फिचर फिल्म झाली. त्यात विविध विषय समाविष्ट केले. कलाकार म्हणून शशांक शेंडे, देविका दफ्तरदार यांचे चेहरे डोळ्यासमोर आले. २०१८ला स्क्रिप्ट पूर्ण झाली. २०१९पासून निर्माता शोधायला सुरुवात केली. सर्वजण कथेची तारीफ करीत. मात्र, पैसे लावत नसत. अशावेळी शैलेशचा भाऊ मंगेश मदतीला आला. वीस-पंचेवीस लाख रुपयांची सोय झाली. शैलेशनं स्वत:चं लावण्यप्रिया प्रॉडक्शन स्थापन केलं. (Success story of Shailesh Dupare)
चंद्रपूरला चित्रीकरण केलं तर छोट्या बजेटमध्ये काम होईल, म्हणून तिथं लोकेशनचा शोध सुरू झाला. सिंदेवाहीला लोकेशन मिळालं. तिथं घर, मंदिर, चावडी उभारावी लागली. देवेंद्र दोडके, वीरा साथीदार, गजेंद्र यांनाही कास्ट करण्यात आलं. ज्या छोट्या मुलाची भूमिका केंद्रस्थानी आहे, त्यासाठी ऑडिशन घेतली. त्यातील आठ-दहा मुलांना निवडलं. त्यांच्यासाठी वर्कशॉप घेतलं. त्यातून रुचित निनावे या बालकलाकाराची निवड झाली. त्यावेळी २२ लाख रुपये होते, त्या भरवशावर १३ मार्च २०२०पासून चित्रीकरण सुरू झालं. नंतर एखादा निर्माता येईल, अशी आशा होती. मात्र, ते काही जमत नव्हतं. त्याचवेळी कोव्हिडचं वातावरण आलं. कधीही लॉकडाउन लागू शकणार होतं. अशावेळी चारच दिवसांत शैलेशनं शूट पूर्ण केलं अन् बाहेरच्या सर्व कलावंतांची तिकिटं काढून त्यांना त्यांच्या गावी पाठवून दिलं.
आता पैसे संपले होते. शैलेशनं चार दिवसांच्या चित्रीकरणाचं शंतनू जैन याच्या मदतीनं चार मिनिटांचं प्रेझेंटेशन तयार केलं. आता पुढच्या कामासाठी निर्माता हवा होता. त्याला दाखविण्यासाठी हे प्रेझेंटेशन होतं. मेहनतीला नशिबाची साथ मिळाली. चंद्रपूरच्या एलिव्हेट कंपनीचे संचालक पवन सादमवार आणि सूरज सादमवार यांनी शैलेशवर विश्वास टाकला. त्यांना सिनेमाची गोष्ट भावली. त्यांनी निर्माता बनण्याची तयारी दर्शविली. (Success story of Shailesh Dupare)
‘पल्याड’ तयार झाला. काही फेस्टिव्हल्समध्ये गाजला. ‘फोर्ब्स’नं दखल घेतली. या चित्रपटाचं २७ सप्टेंबरला पहिलं गाणं रिलीज होतंय. ५ ऑक्टोबरला झी म्युझिक, राजश्री प्रॉडक्शनच्या पोर्टलवर ट्रेलर प्रदर्शित होईल. त्यानंतर थिएटर्समध्ये ट्रेलर दाखविण्यात येईल. ४ नोव्हेंबरला चित्रपट प्रदर्शित होईल.
आधी स्वत:ला सिद्ध करा…
बरेचदा या क्षेत्रात निराश झालेले लोक पाहायला मिळतात. मात्र, “आधी स्वत:ला सिद्ध करा, मगच स्वप्नपूर्तीच्या दिशेनं वाटचाल करा”, असा सल्ला शैलेश देतो. “तुमच्यात टॅलेंट असेल, तुम्ही क्रिएटिव्ह असाल तर लोकं तुमची दखल घेणारच. तुम्ही स्वत: क्रियाशील असाल, तर कुणीही तुम्हाला अडवू शकत नाही. मी रिकाम्या हातानं कधीच कुणाकडे गेलो नाही. माझं आधीचं काम, माझ्या शॉर्टफिल्म्स, डॉक्युमेंट्रीज सोबतीला होत्या”, असं तो सांगतो.
“मला दीपिका, निशा या दोन आई आहेत”, असं तो अभिमानानं सांगतो. भाऊ मंगेश, चंद्रपूर आकाशवाणीत कार्यरत भाऊ उमेश, बहीण शुभांगी मावळणकर, पत्नी प्रिया, मुलगी लावण्या असं त्याचं कुटुंब आहे. घरच्यांनी विश्वास दाखविला म्हणून एवढा पल्ला गाठू शकलो. यात पत्नी प्रियाची साथ मोलाची आहे, असं तो नमूद करतो.
==============
हे ही वाचा: यश चोप्रांचे चित्रपट म्हणजे अलवार प्रेमकहाणी, नयनरम्य लोकेशन्स; इथे स्वप्नं विकली जात असत…
ऑडिशनच्या दिवशी हातात मिळालेलं मराठी भाषेतलं स्क्रिप्ट बघून सोनाली म्हणाली…..
==============
सध्या त्याच्या ‘हॅपी व्हॅलेंटाइन’, ‘बायोस्कोप’ या हिंदी फिल्म लिहून तयार आहेत. पहिला भारतीय बोलपट ‘आलमआरा’चे दिग्दर्शक अर्देशीर इराणी, नृत्यांगना आम्रपाली, ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक दिवंगत व्ही. शांताराम यांच्यावर बायोपिक प्रोजेक्ट्सची त्याची तयारी सध्या सुरू आहे. दिग्दर्शक मणीरत्नम यांचा त्याच्यावर विशेष प्रभाव आहे. (Success story of Shailesh Dupare)
“आपल्याला नेमकं करायचं काय, हे आधी ठरवावं. मग त्यासाठी दिलो जान से प्रयत्न करावेत”, असा त्याचा फंडा आहे. जिद्द पक्की असली की काय साध्य होतं, त्याची मिसाल म्हणजे शैलेश आहे.