कधीकाळी स्टेज डेअरिंग नसलेली शुक्लिमा आज करतेय ‘शाइन’
शुक्लिमा आणि देवराज विचार करत बसले होते. दोघांच्याही डोळ्यांत सारखीच स्वप्नं. स्वत:ला सिद्ध करायचं, तर स्वत:च काहीतरी अफाट करावं लागेल. दुसऱ्यांना काम मागण्यापेक्षा स्वत:चं विश्व निर्माण करावं लागेल, असा विचार शुक्लिमानं मांडला. यावर दोघांचं एकमत झालं अन् ‘शाइन क्रिएशन थिएटर ग्रुप’ स्थापन झाला. कलावंत, तंत्रज्ञ जुळत गेले. आजपर्यंत या ग्रुपनं पाच नाटकं, एकांकिका बसविल्यात. त्यांचे यशस्वी प्रयोगही सुरू आहेत. (Success story of Shuklima Pote)
डॉ. शुक्लिमा पोटे! स्वप्नांना जिद्दीची जोड दिली तर काय होऊ शकतं, याचं आदर्शवत उदाहरण. कलावंत बनायचं तर बालपणापासून तयारी हवीच, असं नाही. मनात काहीतरी करून दाखविण्याची ठिणगी पेटली तर असाध्य गोष्टीही साध्य होतात, हे तिनं सिद्ध करून दाखविलं. नाट्यक्षेत्रात आज तिच्या कामाची दखल घेतली जातेय. तापसी पन्नूसोबत ‘दोबारा’मध्ये झळकण्याची संधी तिला मिळाली. काही मालिका, नावाजलेल्या शॉर्टफिल्म्समध्ये तिच्या भूमिका आहेत. संवेदनशील डॉक्टर असण्यासोबत ती लेखक, दिग्दर्शक, अभिनेत्री आहे. अर्थात, यामागे तिची कठोर मेहनत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी हे शुक्लिमाचं मूळ गाव. वडील शिवाजी पोटे सेवानिवृत्त प्राचार्य, तर आई कांचन गृहिणी. दहावीला असताना शुक्लिमा शाळेच्या स्नेहसंमेलनात भारतमाता म्हणून उभी राहिली, एवढाच काय तो तिचा स्टेजशी संबंध. स्टेज डेअरिंग नव्हतं. मात्र, कलामन जागृत होतं. घरी कलेचं अजिबात वातावरण नव्हतं.
शाळा, कॉलेजमध्ये ती टॉप असायची. त्याकाळी मेडिकल, इंजिनीअरिंगकडे जाणं म्हणजे सोशल स्टेटस मानलं जायचं. आपण वैद्यकीय शाखेत जायचं, ही शुक्लिमाची महत्त्वाकांक्षा नव्हतीच. मात्र, इतर जाताहेत म्हणून तिनंही कोल्हापूरच्या ‘व्हीवायसी होमिओपॅथिक कॉलेज’मध्ये बीएचएमएसला प्रवेश घेतला. तिथंही ती चांगल्या ‘रँक’मधून उत्तीर्ण झाली. (Success story of Shuklima Pote)
इचलकरंजीच्या निरामय हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये नोकरी सुरू झाली. मात्र, मन रमत नव्हतं. आत्मविश्वास कुठंतरी हरवत चालला होता. काहीतरी वेगळं करावं, स्वत:ला विकसित करावं, असं तिला वाटत होतं. स्वत:ला अपडेट करावं, या विचारानं ती पुण्यात आली. तिथं भाऊ देवराज मॉडेलिंग, अभिनयक्षेत्रात सक्रिय होता. तो वेबसाइट डिझायनरही आहे. त्यानं शुक्लिमाला पुण्याच्या मिरॅकल्स ॲकेडमीमध्ये जाण्याचा सल्ला दिला. व्यक्तिमत्त्व विकासासाठी ते पूरक ठरणारं होतं. तिथं गेल्यावर तिथलं वातावरण पाहून शुक्लिमामध्ये न्यूनगंड तयार झाला. पुण्याच्या या वातावरणात आपला टिकाव लागेल का, असं वाटू लागलं. तिनं क्लास जॉइन केला. कम्युनिकेशन स्किल, स्किट बसवणं, चार लोकांशी बोलणं, व्यक्त होणं या बाबी फायद्याच्या ठरू लागल्या. कित्येक वर्षांपासून मनात दबलेल्या इच्छांना वाट मिळू लागली होती.
क्लास संपला. आता स्वत:ला ‘क्रिएट’ करायचं ठरवलं. त्यासाठीचं माध्यम काय, तर नाटक. तिथं आपण ‘लाइव्ह’ व्यक्त होऊ शकतो, स्वत:तील नकारात्मक-सकारात्मक बाबी पुढं आणू शकतो. म्हणून शुक्लिमानं त्यावर लक्ष केंद्रित केलं. इतर ठिकाणी उंबरठे झिजवण्यापेक्षा स्वत:चं काहीतरी निर्माण करण्याचं शुक्लिमा आणि देवराजनं ठरवलं.
कुठल्याही मोठ्या प्रवासाची सुरुवात कठीण असते. मात्र, एकदा सुरुवात केली अन् त्यात स्वत:ला प्रामाणिकपणे झोकून दिलं, तर मार्ग मोकळे होत जातात. शुक्लिमा अन् देवराजनं तेच केलं. जसे प्रोत्साहन देणारे भेटले, तसेच नाउमेद करणारेही भेटले. मात्र, आता मागं हटायचं नव्हतं. यातूनच पुण्यात ‘शाइन क्रिएशन थिएटर ग्रुप’ची स्थापना झाली. कलाकार, तंत्रज्ञ जुळत गेले. त्यांची रिहर्सल घेणं, त्यांना प्रोत्साहित करणं, हेही मोठं मेहनतीचं काम. सर्व उत्तम साथ देतात. प्रत्येक प्रयोग संपल्यानंतर मिळणारी दाद वेगळीच ऊर्जा देऊन जाते, कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतं. आता आम्ही कलावंतांना मानधन देतो, असं शुक्लिमा अभिमानानं सांगते. (Success story of Shuklima Pote)
‘दोबारा’नं दिली शिस्त
‘शाइन’ने आत्तापर्यंत ‘भरड’, वि. वा. शिरवाडकर लिखित ‘नाटक बसते आहे’, विनोद भट लिखित ‘मी श्रीकृष्ण पेंडसे’ ही नाटकं, ‘रिक्षा’, ‘कसा झाला अजूचा द अल्केमिस्ट’ या एकांकिका रंगमंचावर आणल्या. प्रत्येक प्रयोग चालला. त्यातील ‘भरड’ हे नाटक शुक्लिमानं स्वत: लिहिलं, दिग्दर्शित केलं. इतर नाटकांचं दिग्दर्शनही तीच करते. हे या ग्रुपचं सध्याचं सर्वात मोठं दोनअंकी नाटक आहे.
प्रेक्षकांच्या मध्ये जाऊन कलावंत परफॉर्म करतात, हे याचं वेगळेपण. नाटकं करताना कॅमेऱ्याच्या तांत्रिक बाजू शिकणंही गरजेचं होतं. स्वत:ला एक्स्प्लोर करायचं तर कम्फर्ट झोन सोडला पाहिजे. त्यासाठी इतरांकडे जाऊन शिकायचं होतं. देवराजला सिनेमॅटोग्राफीची आवड होतीच. याच ग्रुपनं ‘अन्या’, ‘लोणचं’ या शॉर्टफिल्म्स केल्या. त्या गाजल्याही.
एका हिंदी चित्रपटाची ऑडिशन सुरू असल्याची माहिती शुक्लिमाला मिळाली. ती तिथं गेली. तिथं गेल्यावर कळलं, ती अनुराग कश्यपची फिल्म आहे, त्यात तापसी पन्नूची मध्यवर्ती भूमिका आहे. शुक्लिमा त्या ऑडिशनमध्ये सीलेक्ट झाली. भूमिका छोटी होती. मात्र, सुरुवात चांगली होती. (Success story of Shuklima Pote)
“अनुराग कश्यप यांनी खूप सहकार्य केलं. मी वैद्यकीय क्षेत्रातली असल्यानं सेटवर माझी तशी मदतही घेतली. तापसीला पाहून ऊर्जा मिळाली. विशेष म्हणजे, यानिमित्तानं स्वत:ला ग्रूम कसं करायचं, हेही मनावर घेतलं. वजन घटविलं, व्यायाम-आहाराकडे लक्ष दिलं. सेटवरील त्या वातावरणामुळं एक शिस्त लागली”, असं शुक्लिमा सांगते.
समतोल साधतानाची कसरत
शुक्लिमा सध्या पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. “नोकरी आणि स्वत:चं क्षेत्र सांभाळताना समतोल साधावा लागतो. त्यात कसरतही होते. मात्र, त्यातही वेगळीच मजा आहे. ही काहीतरी वेगळं करतेय, याचा हॉस्पिटललाही अभिमान आहे. त्यामुळे त्यांच्याकडून बरंच सहकार्य मिळतं. तरी एक्स्ट्रा नाइट ड्युटी वगैरे करावीच लागते. कारण, जे काम जेव्हा करायचं, ते मनापासून आणि प्रामाणिकपणे”, असं शुक्लिमा नमूद करते. वैद्यकीय क्षेत्रात नोकरीचा तिला १३ वर्षांचा अनुभव आहे.
“मनोरंजनक्षेत्रात काम करण्याबाबत आई-बाबांची सुरुवातीला नाराजी होती. नोकरी नि लग्न यात मी सेटल असावं, अशी त्यांची स्वाभाविक इच्छा होती. मात्र, मी सर्व आघाड्यांवर आता यशस्वीपणे काम करतेय म्हटल्यावर तेही समाधानी आहेत”, असं शुक्लिमा सांगते.
स्वत:चं बेस्ट व्हर्जन बघायचं आहे…
कला हे स्वत:ला व्यक्त करण्यासाठीचं उत्तम माध्यम आहे. इथं तुमचा व्यक्तिमत्त्व विकास होतो, असं म्हणणाऱ्या शुक्लिमाला उत्तमोत्तम भूमिका साकारायच्या आहेत. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित व राणी मुखर्जी अभिनीत ‘ब्लॅक’ चित्रपट तिला विशेष भावतो. मध्यंतरी तिनं ‘नवे लक्ष्य’, ‘ज्ञानेश्वर माउली’, ‘क्राइम पेट्रोल’ या मालिकाही केल्या. मात्र, नाटक आणि सिनेमात खरा कस लागतो, असं तिला वाटतं. त्यामुळे या दोन्ही माध्यमांतच तिला काम करायचं आहे.
“उत्तम कलाकार व्हायचं तर स्वत:ला आधी तयार करावं लागतं. ऐकून घेणं, निरीक्षण, वाचन या बाबी खूप महत्त्वाच्या असतात. फिजिकल फिटनेसकडेही लक्ष दिलं पाहिजे. स्वत:ला काय करायचं, हे आधी ठरवायला हवं. जिथं काम करतोय, तिथं मन लावून केलं पाहिजे. अभिनयाचा जॉब खूप डिफिकल्ट आहे. कुणाचं लक्ष गेलं तर तो काम देईल, असं या क्षेत्रात नाही. गुणवत्ता वेळोवेळी निखारण्यावर भर द्यायला हवा”, असं शुक्लिमाचं म्हणणं आहे. मोठ्या पडद्याचा ‘ऑरा’ वेगळाच आहे. ‘लर्नर’ आणि ‘ऑडियन्स’ म्हणून तिथं वेगळा अनुभव असतो, असं तिला वाटतं. (Success story of Shuklima Pote)
========================
हे ही वाचा: डॉक्युमेंटरी… गरज आहे प्रेक्षकांच्या प्रतिसादाची!
‘ख्वाडा’ ते ‘वाय’… रसिका चव्हाणचा प्रेरणादायी प्रवास
======================
सध्या तिच्या काही शॉर्टफिल्म्स येत आहेत. एका तेलुगू फिल्ममध्ये ती ‘मगाधिरा’ फेम देव गिल याच्यासोबत दिसणार आहे. एस्सेल एंटरटेन्मेंटची एक वेबसीरिज ती करते आहे. नाटकांचे प्रयोगही लागलेले आहेत. ‘अडचणी तर येणारच. मग थांबायचं की चालत राहून उद्दिष्ट साध्य करायचं, हे आपणच ठरवायचं असतं’, असं ती सांगते. आपल्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणारी शुक्लिमा वास्तविक जीवनात कमालीची नम्र आहे. ‘मी प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकत असते, अजूनही शिकतेच आहे’, या वाक्यातून तिच्यातील इतरांप्रतीचा आदरभाव दिसतो. कठोर मेहनत अन् गुणवत्तेच्या भरवशावर ती या क्षेत्राच्या आसमंतात चमकण्यासाठी सिद्ध झाली आहे. शुक्लिमाचा अर्थ शुभ्रता. फिर क्या कहना!