‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘या’ चित्रपटातून सुपर स्टार राजेश खन्नाचा पत्ता कट
सत्तरच्या दशकामध्ये राजकपूर आपल्या आर के पिक्चर्सच्या द्वारे ‘सत्यम शिवम सुंदरम’ या सिनेमातून एक बोल्ड लव्ह स्टोरी घेऊन प्रेक्षकांच्या समोर आले होते. या सिनेमात झीनत अमान आणि शशी कपूर ही लीड पेयर होती. झीनत अमानने या चित्रपटांमध्ये भरपूर अंग प्रदर्शन केल्यामुळे ती त्या काळात चांगलीच चर्चेत आली होती. विषय चांगला होता परंतु त्यातील बोल्ड दृश्यामुळे सिनेमावर प्रचंड टीका झाली आणि सिनेमाला म्हणावे, तितके व्यावसायिक यश लाभले नाही. या सिनेमाच्या मेकिंगची गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे. या चित्रपटात राजकपूर खरंतर नायक म्हणून राजेश खन्नाला (Rajesh Khanna) घेणार होते. राज कपूर एक मोठी ‘ब्रेकिंग न्यूज’ देऊन ‘धमाका’ करणार होते. कारण राज कपूरचा १९७३ साली प्रदर्शित झालेला ‘बॉबी’ बंपर हिट सिनेमा ठरला होता. या सिनेमाच्या नंतर राज कपूर यांना असाच मोठा धमाका करायचा होता. त्यासाठी त्यांनी राजेश खन्ना (Rajesh Khanna) आणि डिंपल कपाडिया यांना घेऊन ‘सत्यम शिवम सुंदरम’ या चित्रपटाची जुळवा जुळवा सुरू केली होती.
राजेश खन्नाला राज कपूरच्या चित्रपटात काम करण्याची खूप इच्छा होती परंतु त्याने स्पष्ट केले,”मी तुमच्या सिनेमात काम करेल पण डिंपल कपाडिया मात्र करणार नाही कारण लग्नानंतर तिने सिनेमात काम न करण्याचा निर्णय घेतला आहे!” राजकपूर यांना जो अपेक्षित धमाका करायचा होता त्याला खिळ बसली. कारण राजेश खन्ना (Rajesh Khanna) आणि डिंपल कपाडिया ही विवाहित जोडी त्या काळात मीडियामध्ये प्रचंड गाजत होती आणि ही दोघे पहिल्यांदाच पडद्यावर आणण्याचे राज कपूरची योजना होती. परत त्यांच्या या संकल्पनेला अचानकपणे ब्रेक लागला. परंतु राजेश खन्नाने राजकपूरला असेही सांगितले,”या चित्रपटात डिंपल जरी काम करणार नसली तरी नायक म्हणून मी या चित्रपटात काम करायला तयार आहे.” राजेश खन्ना (Rajesh Khanna) सारखा सुपरस्टार आपल्या चित्रपटात काम करणार हे राजकपूरला हवे होतेच. त्याने तयारी सुरु केली.
परंतु त्याचवेळी राज कपूरच्या टीमकडून आणि त्याच्या कुटुंबीयांकडून राजेश खन्नाच्या नावाला विरोध होऊ लागला. विशेषतः ऋषी कपूरने राजेश खन्नाच्या नावाला प्रचंड विरोध केला. त्या विरोधाचे कारण ‘बॉबी’ चित्रपटाच्या वेळी राजेश खन्नाने (Rajesh Khanna) आर के टीमला दिलेला त्रास हे होते. ‘बॉबी’ चित्रपटाचे चित्रीकरण चालू असतानाच मार्च १९७३ मध्ये राजेश खन्ना आणि डिंपल कपाडियाचे लग्न झाले. त्यानंतर डिंपलला सिनेमाच्या शूटिंगला पाठवण्यासाठी राजेश खन्नाची (Rajesh Khanna) परवानगी घ्यावी लागली आणि तिथेच त्याने त्रास द्यायला सुरुवात केली. लग्न झाल्यानंतर राजेश आणि डिंपल हे दोघेही हनिमूनला काश्मीरला निघून गेले. त्यावेळी ‘बॉबी’च्या पोस्ट प्रोडक्शनचे काम चालू होते. काही पॅचअपचे वर्क देखील राहिले होते. डिंपल काश्मीरमध्ये आहे म्हणून तिथले पॅचवर्क कम्प्लीट करण्यासाठी राज कपूर आणि आर के ची संपूर्ण टीम पुन्हा काश्मीरात जाऊन पोहोचली. राज कपूरने मुद्दाम त्याच हॉटेलमध्ये आपला मुक्काम ठेवला जिथे राजेश आणि डिंपल उतरले होते. तिथे गेल्यानंतर राज कपूरने राजेश खन्नाला (Rajesh Khanna) डिंपलला काही दिवसांसाठी शूटिंगचे पॅचवर्क करण्यासाठी पाठवा अशी विनंती केली. परंतु राजेश खन्नाने (Rajesh Khanna) त्याकडे कानाडोळा केला, नंतर राजेश खन्ना राज कपूरला न भेटताच मुंबईला निघून गेला. अर्थात डिंपलला त्याने काश्मीरमध्येच ठेवले होते.
ऋषी कपूर हे सर्व पाहत होता. आपल्या वडिलांना होणारा अपमान, त्रास त्याला असह्य होत होता पण नाईलाज होता. त्यामुळे त्याच्या मनात राजेश खन्ना बद्दल अढी निर्माण झाली. पुढे यथावकाश बॉबी पूर्ण झाला. २८ सप्टेंबर १९७३ रोजी प्रदर्शित झाला आणि बंपर हे ठरला. डिंपलची लोकप्रियता कॅश करण्यासाठीच राज कपूरला राजेश डिंपल या जोडीला घेऊन चित्रपट करायचा होता परंतु राजेशने डिंपल ला चित्रपटापासून लांब ठेवले. हा राग डोक्यात घेऊनच ऋषी कपूर ने राज कपूर ला सांगितले ,”राजेश खन्ना आपल्या आर के चित्रपटात दिसता कामा नये. त्याने ‘बॉबी’ च्या वेळेला तुम्हाला खूप त्रास दिला आहे!” त्याने आपल्या या निर्णयात आपला भाऊ रणधीर कपूर आणि राजीव कपूर यांना देखील सामील करून घेतले. त्या तिघांनीही आपल्या घरीच शशी कपूर सारखा देखणा अभिनेता असताना राजेश खन्नाची आपल्याला गरजच काय आहे? असे देखील राज कपूरला सांगितले. राजकपूरचा नाईलाज झाला आणि अशा प्रकारे राजेश खन्नाचा (Rajesh Khanna) पत्ता ‘सत्यम शिवम सुंदरम’ मधून कट झाला. आणि तिथे शशी कपूरची वर्णी लागली.
=======
हे देखील वाचा : कुठे गायब झाला ऐश्वर्या रॉयचा हा हँडसम हिरो?
=======
राजेश खन्ना (Rajesh Khanna) अर्थातच या सगळ्या प्रकारामुळे चिडला. मीडियाला त्याने ‘मुलांच्या दबावामुळे राज कपूर ने आपल्याला सिनेमातून काढून टाकले’ असे सांगायला सुरुवात केली. ऋषी कपूर आणि राजेश खन्ना यांच्यातील तणाव वाढत होता. पुढे खूप वर्षानंतर त्यांनी ‘जमाना’ (दि. रमेश तलवार) आणि ‘विजय’ (दि. यश चोप्रा) या चित्रपटात एकत्र काम केले. राजकपूर गेल्यानंतर मात्र या दोघांमधील कटुता संपली. नियतीचा खेळ पहा ज्या ऋषी कपूर ने आर के च्या सिनेमातून राजेश खन्ना ला काढून टाकले होते त्याच ऋषी कपूर ने १९९९ साली ‘आ अब लोट चले’ या आर के च्या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असताना या चित्रपटात त्याने राजेश खन्नाला देखील घेतले होते. त्यावेळी राजेश खन्नाने आपल्या एका मित्राला सांगितले होते की “नीली आंखो वाला ऊपर से अगर ये देख रहा होगा तो कितना खुश हुआ होगा!”