डायलॉग रिपीट होत आहेत हिट…
तुमच्यासाठी कायपण असं बोलणारा प्रियकर एखाद्या प्रेयसीला भेटला आणि चालतयं की असं आपल्या बायकोच्या वाक्यावर म्हणणारा नवरा भेटला तर वावगं वाटायला नको कारण हे सुपरहिट डायलॉग आपल्या मालिकांमधील नायकांच्या तोंडून वारंवार आपण ऐकलेले आहेत. असे अजून काही डायलॉग वारंवार मालिकेत वापरले जातात कि ते डायलॉगच त्या पात्राची ओळख होते. कधी हे डायलॉग मालिकेचा युएसपी होतात. अशाच काही सध्याच्या रिपीट होणाऱ्या सुपरहिट डायलॉग वर एक नजर टाकूया.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील शालिनी सतत आपलं म्हणणं बरोबर आहे हे समोरच्याकडून वदवून घेण्यासाठी ‘व्हय म्हणा की’ असं म्हणते. ‘गे बाय माझे’ असं ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील विमल सतत म्हणताना दिसते. ‘समद्याची खरकटी उचलायला मी एकटी’ असं फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेतील जीजी आक्का रागात सगळ्यांना म्हणताना दिसतात.
‘ब्युटीफूल’ असं ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील सौंदर्या रागाच्या किंवा आनंदाच्या सगळयाच प्रसंगात एका विशिष्ट लयीत म्हणते. ‘बोललो तर बोललो’ असं ‘कारभारी लयभारी’ मधील वीरू आपलं बोलण म्हणजे वचनच अशा अर्थाने बोलताना दिसतो. याच मालिकेतील काकीचं ‘डोक्यात फिट करून ठेवा’ हे वाक्यही खूप फेमस आहे. ‘मी ऑफिसच्या वेळात ऑफीसचीच काम करते’ असं ‘पाहिले न मी तुला’ मधील मनू समरला म्हणताना दिसते. ‘जावा तिकडं’ अस ‘राजा राणीची गं जोडी’ मधील संजू प्रेमाने आपल्या नवरयाला नेहमी म्हणते. ‘सहकुटुंब सहपरिवार’ मधील अंजीची आई ‘ढवळून टाकीन’ हे वाक्य हाताची एक विशिष्ट हालचाल करून स्टाईलने सतत म्हणते.
‘देवमाणूस’ सिरीअल बघताना जरा धडकी भरली तरी त्यातील वाक्य एकदम भारी आहेत. उदाहरणं द्यायची झाली तर ‘एक गोळी कायमचा आराम’ हे डॉक्टर अजितचं वाक्य ऐकलं की एकदम भीतीच वाटते. ‘डिंपलला सिंपल राहायला आवडत नाही’ हे वाक्य तर तरूणाई मध्ये खूप हिट आहे. ‘सरू आजीच्या म्हणी’ हे सरू आजीचं वाक्य ऐकायला छान वाटतं. ‘माझा होशील ना’मधील समशेर सिंग आणि लाज्जोचे परत परत येणारे डायलॉग ऐकायला तितकीच मज्जा येते. ‘इसरलंय’ हा ‘रात्रीस खेळ चाले’ मधील पांडूचा डायलॉग तर डोक्यात इतका फिट होतोय की काही विचारूच नका.
एखादे शब्द किंवा वाक्य मालिकेत सुरूवातीला एखादं पात्र उभं करण्यासाठी वापरतात पण कालांतराने ते वाक्य कथानकात इतकं फेमस होतं की मालिका त्या डायलॉगमुळे ओळखली जाते. मग मालिकेत ते पात्र बोलण्याआधीच प्रेक्षक पाहताना तो डायलॉग आधीच किंवा बरोबरीने म्हणतात किंवा रोजच्या संवादात आपसूक एखाद्या प्रसंगी हा मालिकेतील डायलॉग ओठांवर येतो. अशाप्रकारे आता मालिकेतील कॅरॅक्टरचे डायलॉग लोकांच्या पसंतीस उतरवण्यास कलाकार आणि लेखक यशस्वी ठरत आहेत असं म्हणायला हरकत नाही.
- सिध्दी सुभाष कदम.