सुपरस्टार राजेश खन्ना फॅन होता ‘या’अभिनेत्याचा
ऋषिकेश मुखर्जी यांचा १२ मार्च १९७१ रोजी प्रदर्शित झालेला ‘आनंद’ हा चित्रपट भारतीय चित्रपटातील भावस्पर्शी चित्रपटांचा मेरुमणी शोभावा इतका स्वॅग सुंदर होता. अभिनेता राजेश खन्नाने यात कॅन्सरग्रस्त रुग्णाची भूमिका अतिशय सुंदर पद्धतीने केली होती. त्याला माहित असतं आपलं आयुष्य पुढचे केवळ सहा महिनेच आहे, परंतु ते सहा महिनेच तो अतिशय आनंदाने आणि भरभरून जगतो इतरांना आनंद देतो! त्याची ही भूमिका त्याच्या एकूण भूमिकां मधील सर्वोत्कृष्ट भूमिकांपैकी एक ठरली. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी डॉ भास्कर बॅनर्जी यांची भूमिका केली होती. चित्रपटात राजेश खन्ना (Rajesh Khanna) अमिताभ बच्चनला कायम बाबू मोशाय म्हणून पुकारत असतो. या दोघांमधील भावोत्कट नातेबंध दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांनी अतिशय तरलतेने दाखवला होता.
या चित्रपटात रमेश देव आणि सीमा देव यांच्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. रमेश देव यांनी डॉ प्रकाश कुलकर्णी यांची भूमिका केली होती. जे डॉ भास्कर बॅनर्जी यांचे मित्र असतात आणि त्यांच्याकडेच आनंद म्हणजे कॅन्सर ग्रस्त रुग्ण राजेश खन्ना येणार असतो. या चित्रपटाच्या बाबत आजवर इतकं काही लिहिलं गेलं आहे आणि तरीही या चित्रपटात बाबतची उत्सुकता रसिकांमध्ये कायम आहे. या सिनेमातील गाणी, संगीत हा देखील चित्रपट रसिकांसाठी खूप जवळचा असा विषय आहे. या सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचा एक किस्सा अलीकडेच वाचण्यात आला आणि एक मराठी रसिक म्हणून अभिमान वाटला. या चित्रपटाच्या वेळी अभिनेता राजेश खन्ना (Rajesh Khanna) सुपरस्टार बनले होते. कारण त्याच्या मागच्या काही वर्षातील त्यांचे तब्बल नऊ सिनेमे सुपर बंपर हे ठरले होते त्यामुळे राजेश खन्नाचा हिंदी सिनेमातील भाव वाढला होता.( यात आराधना, द ट्रेन, सच्चा झूठा, आन मिलो सजना, सफर, कटी पतंग यांचा समावेश होता.)
त्याचा मोठा दबदबा इंडस्ट्रीत निर्माण झाला होता. त्यामुळे अभिनेता रमेश देव देखील राजेश खन्ना सोबत काम करताना थोडे नर्व्हस झाले होते. कारण एका सुपरस्टार सोबत काम करण्याचा त्यांचा हा पहिलाच चित्रपट होता. पहिल्याच सीन मध्ये ज्यावेळी हे दोघे एकत्र भेटतात तो प्रसंग चित्रित होणार होता. रमेश देव आपल्या केबिनमध्ये बसलेले असतात समोर अमिताभ बच्चन असतात आणि धाडकन दरवाजा लोटून राजेश खन्नाची (Rajesh Khanna) एन्ट्री होते याप्रसंगी रमेश देव प्रचंड नर्वस झाले होते कारण सुपरस्टार सोबतचा त्यांचा पहिलाच प्रसंग चित्रित होणार आहे. पण गंमतच झाली. या शॉटपूर्वी ज्यावेळेला ऋषीकेश मुखर्जी कलावंतांना हा प्रसंग समजावून सांगत होते; तो झाल्यानंतर राजेश खन्नाने रमेश देव यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना म्हणाले,” माझं भाग्य थोर आहे की, मला आपल्या सोबत काम करायला मिळते आहे. कारण मी जेव्हा स्ट्रगल करत होतो; त्यावेळेला गिरगावात इराण्याच्या हॉटेलपासून तुमची गाडी रोज शूटिंगला जात असायची. त्यावेळी मी तुम्हाला तिथून पाहत असायचो. तुमच्या गाडीच्या वेळेला मी मुद्दाम इराण्याच्या हॉटेल समोर थांबत असे. जेणे करून तुमचे ओझरते दर्शन व्हावे. कारण मला मराठी समजते आणि मराठीतील तुम्ही सुपरस्टार आहात हे मला माहिती होते. एका सुपरस्टारचे दर्शन घडावे आणि आपण देखील एकदा त्या पदावर पोहोचावे असे मनोमन माझी इच्छा होती. ती इच्छा आता माझी पूर्ण झाली आणि तुमच्यासोबत काम करण्याची इच्छा देखील आज पूर्ण होत आहे!”
=======
हे देखील वाचा : युसुफ खानचा दिलीपकुमार कसा झाला?
=======
राजेश खन्नाच्या (Rajesh Khanna) त्या निवेदनाने रमेश देव एकदम रिलॅक्स झाले. त्यांच्या मनातील ताण-तणाव आणि नर्वसनेस कुठच्या कुठे पळून गेला. खरोखरच राजेश खन्ना स्ट्रगलच्या काळामध्ये गिरगावात राहत होता आणि रमेश देव यांच्या गाडीकडे तो कौतुकाने पाहत होता, पाहत असायचा. वातावरणातील तणाव निवळल्यामुळे पुढे चित्रपटाची चित्रीकरण मोठ्या खेळीमेळ्याच्या वातावरणात झाले. या चित्रपटात सीमा देव यांची देखील महत्वपूर्ण भूमिका होती. ती राजेश खन्नाला (Rajesh Khanna) या चित्रपटात भैया म्हणून बोलवत असेल आणि हे नाते त्यांचे कायम राहिले पुढे कित्येक वर्ष राजेश खन्ना सीमा देव यांच्याकडे राखी बांधून घेण्यासाठी जात असे.