डॉ. रामाणींचा ताठ कणा
प्लीफ सर्जरीमुळे जगविख्यात झालेल्या डॉ. पी.एस. रामाणी यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर ताठ कणा हा चित्रपट येत आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले.
डॉ. रामाणी हे पाठीच्या कण्यावरील दुखण्यासाठी देवदूत म्हणून ओळखले जातात. त्यांनी शोधून काढलेल्या उपायानी हजारो रूग्ण वेदनामुक्त झाले आहेत. १६ ऑक्टोबर या ‘वर्ल्ड स्पाइन डे’चा मुहूर्त साधून डॉ. रामाणी यांच्या संशोधनावर आणि जीवनावर आधारित ‘ताठ कणा’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले. यावेळी स्वतः डॉ.प्रेमानंद रामाणी, निर्माते विजय मुडशिंगीकर, करण रावत, दिग्दर्शक गिरीश मोहिते, लेखक श्रीकांत बोजेवार तसेच डॉ. रामाणी यांची भूमिका साकारणारा अभिनेता उमेश कामत उपस्थित होते.
डॉ. रामाणी यांच्या ताठ कणा या आत्मचरित्रात्मक पुस्तकाच्या १७ आवृत्त्या प्रकशित झाल्या आहेत. ग्रंथाली प्रकाशानाने २००५ मध्ये हे पुस्तक प्रसिद्ध केले. या पुस्तकावर तसेच अन्य महत्त्वाच्या घटनांवर आधारलेला ‘ताठ कणा’ प्रदर्शनासाठी सज्ज असल्याचे दिग्दर्शन गिरीश मोहिते यांनी सांगितले. तसेच ‘ताठ कणा’ हा एक वेगळा चित्रपट दिग्दर्शित करण्याची संधी ही आपल्यासाठी एका अजोड व्यक्तिमत्वाला जाणून घ्यायचा प्रवास असल्याचेही दिग्दर्शक मोहिते यांनी सांगितले. डॉ.रामाणी यांच्यासारख्या ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाची भूमिका मला करायला मिळाली ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे, उमेश कामत यांनी यावेळी सांगितले. तर, चित्रपटरूपाने दाखविण्यात येणारा प्रवास माझ्यासाठी निश्चितच आनंददायी आहे, असे डॉ. प्रेमानंद रामाणी यांनी सांगितले.
‘ताठ कणा’ चित्रपटाचे लेखन ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार यांनी केले आहे. छायांकन कृष्णकुमार सोरेन आणि संकलन निलेश गावंड यांचे आहे. कलादिग्दर्शनाची जबाबदारी महेश कुडाळकर यांनी सांभाळली आहे. संगीत अविनाश-विश्वजीत यांचे आहे. प्रशांत पवार कार्यकारी निर्माते आहेत. ‘प्रज्ञा क्रिएशन्स’चे विजय मुडशिंगीकर, ‘स्प्रिंग समर फिल्मचे करण रावत यांनी ‘ताठ कणा’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
गोव्यातील फोंडा येथील वाडी नावाच्या छोट्याशा खेड्यात डॉ. रामाणी यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९३८ रोजी झाला. घरी सहा भावंड. वडील वन खात्यात कामाला. त्यांच्या आईनं, आहिल्याबाई यांनी या सर्व भावंडाच्या शिक्षणाची जबाबदारी पार पाडली. आर्थिक तंगी असली असली तरी शिक्षणाची साथ सोडली नाही. 1958 मध्ये मॅट्रीक परीक्षा उत्तीर्ण झालेले डॉ. रामाणी आपल्या मामाकडे, गिरगावला शिक्षणासाठी आले. मामा दत्तात्रय वालावलकर यांच्याकडे राहून त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले. वैद्यकीय शिक्षणादरम्यान बहुतेक सर्व नामांकित शिष्यवृत्ती मिळवणार्या रामाणी यांनी मुंबईतील टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेजमधून 1964 मध्ये एमबीबीएसची पदवी मिळवली. 1968 मध्ये डॉक्टर जनरल सर्जरी या विषयात एमएस झाले. नंतर ते उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले.
1974 नंतर डॉ. रामाणी भारतात परतले. समाजसेवेचा पिंड असलेल्या डॉ. रामाणी यांनी सायन हॉस्पिटलमध्ये न्यूरोसर्जरी विभागाची स्थापना केली. मणक्यावरील शस्त्रक्रियेवर अधिक अभ्यास केला. ‘पोस्टिअर लुंबर इंटरबॉडी फ्यूजन’ (पीएलआयएफ) ही नवीन उपचार पद्धती डॉ. रामाणी यांनी शोधून काढली. नुसतीच उपचार पद्धती त्यांनी शोधली नाही तर त्या शस्त्रक्रीयेसाठी नावीन्यपूर्ण आयुधे तयार केली. त्याचप्रमाणे इतक्या प्रदीर्घ अनुभवातून या शस्त्रक्रियेव्यतिरिक्त इतरही शस्त्रक्रियांसाठी उपयुक्त आणि वापरण्यास सोपी अशी आयुधे डॉ. रामाणी यांनी विकसित केली. आता त्या आयुधांचा वापर आता जगभरातील अनेक शल्यविशारद करत आहेत. त्यांनीच सायन हॉस्पिटलमध्ये पहिली बोन बॅंक सुरू केली. आपल्या या नवीन उपचार पद्धतीचा प्रचारही त्यांनी केला. त्यासाठी डीव्हीडी काढल्या. पुस्तकं लिहीली. याशिवाय आपल्या जन्मगावीही डॉ. रामाणी यांनी अनेक सामाजिक उपक्रम रावबले आहेत.
हेही वाचा : शहीद भगतसिंह यांच्या जीवनावर आधारित ‘हे’ चित्रपट पाहिले का?
डॉ. रामाणींच्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्याच्या सन्मानार्थ हंगेरी या देशाने पोस्टाचे एक तिकीट 2011 मध्ये प्रकाशित केले आहे. तर इंडोनेशिया येथील मित्रा फ्लुमबन या रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाला डॉ. रामाणी यांचे नाव देण्यात आले आहे. अमेरिकेतील शिकागो विद्यापीठातर्फे डॉ. रामाणी यांना प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ. पॉलब्युसी यांच्या स्मरणार्थ पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्काराने सन्मानित होणारे डॉ. रामाणी हे पहिले आशियाई आहेत. डॉ. रमाणी यांचे विद्यार्थी जपान, तुर्की, फिलिपाइन्स, मेक्सिको, इंग्लंड, अमेरिका, दक्षिण कोरिया, आफ्रिका, इजिप्त, नेपाळ, इंडोनेशिया या देशातही आहेत.
त्यामुळेच डॉ. रामाणी यांच्यावरील या ताठ कणा या चित्रपटाची उत्सुकता त्यांच्या लाखो रुग्णांना आणि शिष्यांना आहे.