महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
ती पहिली भेट… आणि शेवटी नर्गिस बनली बायको
मेहबूब खान दिग्दर्शित ‘मदर इंडिया’ मधील बिरजू आठवत असेलच. लाला कडून आपल्या आईचे दागिने सोडवून आणायला गुन्हेगारीची वाट धरणारा रागीट स्वभावाचा बिरजू पडद्यावर जिवंत करणारे किंवा एक चतुर नार गाण्यातील जुगलबंदी मध्ये मेहमूदला कॉमेडीमध्ये टक्कर देणारे अभिनेते म्हणजे सुनील दत्त ! एवढ्या मोठ्या एक्टिंग रेंजची देणगी लाभलेल्या सुनील दत्त यांनी बिरजूच्या कितीतरी मानवी छटा त्यांनी खूपच प्रभावीपणे पडद्यावर साकारल्या होत्या. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण त्याआधी ते फक्त रेडिओ वरती काम करणारे एक पार्ट टाइम जॉकी होते. आपल्या उंचपुऱ्या व्यक्तिमत्वाचा आणि खर्जातील आवाजाचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घेतला.(Actress Nargis)
सुनील दत्त यांचे मूळ नाव बलराज दत्त होते. त्यांचा जन्म आताच्या पाकिस्तान मध्ये असलेल्या झेलम प्रातांत झाला. त्यांचे कुटुंब जमीनदार होते. ते ८-९ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. पुढे ते १८ वर्षांचे असताना पार्टीशनमध्ये ते भारतात आले. पार्टीशनच्या वेळी जो दंगा झाला त्यात त्यांच्या कुटुंबाला याकूब नावाच्या मित्राने वाचवले होते. घरची परिस्थिती त्यावेळी बेताची होती पण आईने त्यांना शिक्षण घेण्यास नेहमी प्रोत्साहित केले. त्यांना कॉलेजच्या शिक्षणासाठी मुंबईला पाठवले. कॉलेजचा आणि राहण्याचा खर्च निघावा म्हणून ते बसमध्ये कंडक्टरची नोकरी करू लागले. या दरम्यान त्यांना रेडिओ सिलोन मध्ये पार्ट टाइम जॉकीची नोकरी कशीबशी मिळाली.
रेडिओ सिलोन वरती वेगवेगळे स्टार्स प्रमोशनसाठी येत असत. तिकडे त्यांचे ˈइन्टव्ह्यू होत असत. एके दिवशी नेहमीचे जॉकी नव्हते आणि त्या दिवशी त्या काळची प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस येणार होती. आता तिची मुलाखत घेण्याची जबाबदारी नवख्या सुनील वरती आली. ज्यावेळी नर्गिस स्टुडिओमध्ये आल्या, त्यांना याची देही याची डोळा पाहून दत्त साहेब पुरते गांगरले आणि त्यांना दरदरून घाम फुटला. ते खूप नर्व्हस झाले आणि मुलाखत सोडून जाण्याच्या तयारीत होते पण शेवटी नोकरीचा प्रश्न होता. या सर्व प्रकाराने झाले असे की, त्यांना एकही प्रश्न नीट विचारता आला नाही. कशीबशी मुलाखत पार पडली. (Actress Nargis)
या मुलाखतीत ते नक्कीच नर्व्हस झाले होते पण नर्गिस यांच्या व्यक्तिमत्वाने ते घायाळ झाले होते. पुढे अजून एक प्रोग्रॅम त्यांना होस्ट करण्यासाठी मिळाला. त्याचे नाव होते ‘लिप्टन मैफिल’ या कार्यक्रमात त्यांनी दिलीप कुमार यांची मुलाखत खूप छान घेतली होती. दिलीप कुमार खूपच प्रभावित झाले होते आणि त्यांची भेट रमेश सेहगल यांच्याशी घालून दिली. हा सुनील दत्त यांच्या आयुष्यातील एक मोठा टर्निंग पॉईंट होता. रमेश सेहगल सुनील दत्त यांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाले होते आणि त्यांनी त्यांना ऑडिशनला बोलावले आणि त्यांची स्क्रीन टेस्ट केली त्यात दत्त साहेब उत्तीर्ण झाले मग सेहगल यांनी त्यांना एक फिल्म ऑफर केली. (Actress Nargis)
त्या फिल्मचे नाव होते ‘रेल्वे प्लॅटफॉर्म’ आणि दत्त यांना त्याकाळी ३०० रुपये सायनींग अमाऊंट मिळणार होती. पण सुनील दत्त यांना त्यांच्या आईला दिलेले वचन आठवले. दत्त साहेबांना लहानपणापासून फिल्मची आवड होती आणि त्यांना ऍक्टर बाण्याची इच्छा होती ही इच्छा त्यांनी आईजवळ बोलवून दाखवली होती. आईचे म्हणणे असे होते की, आयुष्यात काहीही कर पण पहिल्यांदा कॉलेजचे शिक्षण पूर्ण कर. त्यांनी सेहगल यांना या वचनाबद्दल सांगितले आणि २ वर्षे थांबण्याची विनंती केली. सेहगल या आई भक्त मुलावर खूपच इम्प्रेस झाले. ते चक्क २ वर्षे थांबले. सुनील दत्त यांनी शिक्षण पूर्ण केले आणि मग फिल्मचे शूट सुरु केले. फिल्म रिलीज झाली पण एवढी यशस्वी झाली नाही पण याचा एक फायदा असा झाला की, मेहबूब खान यांची नजर त्यांच्यावर पडली. मेहबूब खान आपल्या मदर इंडिया या फिल्मसाठी नव्या चेहऱ्याच्या शोधात होते.
सुनील दत्त यांच्यासाठी हा खूप महत्वाचा सिनेमा होता. या फिल्मच्या यशाने त्यांना बॉलिवूडमध्ये एका हिट हिरोची ओळख मिळाली. दुसरे म्हणजे या फिल्मच्या शूटमध्ये त्यांची भेट नर्गिस यांच्याशी झाली. नर्गिस त्यावेळी राज कपूर यांच्या सोबत रिलेशनशिप मध्ये होत्या पण राज कपूर विवाहित होते आणि नर्गिसला १० वर्षांच्या त्यांच्या नात्यात आता काहीच उरले नाहीये असे कळून चुकले होते. या १० वर्षांच्या काळात राज कपूर आणि कृष्णा कपूर यांना ४ मुले झाली होती. एकीकडे कृष्णा कपूर यांच्यासोबत संसार आणि नर्गिस सोबत अफेअर असे राज कपूर दोन्ही दगडावर पाय ठेऊन होते आणि हे कृष्णा कपूर आणि नर्गिस यांना अपमानकारक होते. त्याकाळी स्त्री सबलीकरण एवढे खास नव्हते म्हणून दोघी मूग गप्प होत्या. (Actress Nargis)
===========
हे देखील वाचा : ‘हे’ भारतीय गाणे चीनच्या पंतप्रधानासमोर का गातात ?
==========
इकडे मदर इंडियाच्या सेट वर एक दिवशी खूप मोठी आग भडकली आणि त्यात नर्गिस सापडल्या होत्या, जीवाची पर्वा न करता सुनील दत्त आगीत उतरले आणि त्यांनी नर्गिस यांना वाचवले. नर्गिस यांना वाचवता वाचवता सुनील दत्त गंभीर भाजले. तिथून नर्गिस यांना आपल्या १० वर्षे जुन्या, अपमानकारक रिलेशन मधून बाहेर पडण्याचे मोटिव्हेशन मिळाले. त्यांना सुनील दत्त यांच्या रूपाने एक इमोशनल सपोर्ट मिळाला होता.
पुढे दोघांच्यात प्रेम फुलत गेले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. असे बोलले जाते की, नर्गिस यांचे घराणे वेश्या व्यवसायात होते तसेच त्यांचा धर्म वेगळा होता यामुळे सुनील दत्त यांच्या कुटुंबाकडून या लग्नाला विरोध होता. दत्त साहेबांनी सर्वांना राजी केले आणि शेवटी दोघांचे लग्न झाले. राज कपूर या लग्नाच्या बातमीने पुरते हादरले होते. त्यांना या गोष्टीचा खूप राग येई आणि रागात स्वतःला सिगारेटचे चटके देत असतं. पण शेवटी म्हणतात ना, प्रेम शेवटी जिंकते.