राजश्रीचा तो सिनेमा ठरला ऑल टाईम हिट
साठच्या दशकात जेव्हा हिंदी सिनेमा सप्तरंगात न्हावून गेला होता तेव्हा रोमॅंटीक म्युझिकल चित्रपटांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता. नवनवीन सुंदर चेहर्यांच्या अभिनेत्रींनी रूपेरी पडदा सजला होता. १९६१ साली शांताराम बापूंनी त्यांच्याच २० वर्षापूर्वीच्या ‘शकुंतला’चा रीमेक ‘स्त्री’च्या रूपाने पडद्यावर आणला. यात दुष्य़ंताच्या भूमिकेत स्वत: बापू होते तर ‘शकुंतला’बनली होती संध्या. (Hit Cinema)
या सिनेमात बापूंची कन्या ‘राजश्री’ देखील एका नृत्यात होती. गोल गरगरीत चेहरा, लख्ख कोकणस्थी वर्ण, बोलके टपोरे डोळे, अटकर बांधा अशा सौंदर्याच्या अस्त्रांनी युक्त असलेली राजश्री या सिनेमाच्या वेळी अवघ्या सतरा वर्षाची होती. या सिनेमाला फारसे यश जरी मिळाले नसले तरी राजश्रीने रसिकांचे व निर्मात्यांचे लक्ष वेधले. खरं तर तिलाच ‘शकुंतला’ ची भूमिका द्यायला हवी होती असंही समीक्षकांच म्हणणं होतं. १९६३ साली दिग्दर्शक किशोर साहू यांच्या दोन सिनेमांची ती नायिका होती दोन्हीत मनोजकुमार तिचा नायक होता. एक होता ’गृहस्थी’ आणि दुसरा होता ’घर बसके देखो’.दोन्ही सिनेमे सुपर हिट झाले पण राजश्रीची स्वत:ची अशी आयडेंटीटी निर्माण झाली नाही.
१९६४ साली तिचा विश्वजित सोबत ’शहनाई’ हा सिनेमा आला जो तिला एक अभिनेत्री म्हणून प्रस्थापित करायला उपयोगी ठरला. यातील तिची करारी बाण्याची जिद्दी नायिका आवडून गेली. मग आला तिचा ब्लॉक बस्टर ’गीत गाया पत्थरोने’.घरचंच प्रॉडक्शन होतं आणि शांतारामबापूच दिग्दर्शक होते. यात तिला आपले टॅलेंट दाखविण्याचा भरपूर वाव होता. तिच्यातील अभिनेत्रीचा खरा कस लागला तो इथेच. यातील तिची नृत्ये जबरदस्त होती.बापूंच्या सिनेमात तसाही नायकाला फार काही वाव नसतोच. (Hit Cinema)
त्यामुळे राजश्रीचा तो ऑल टाईम हिट सिनेमा ठरला. किशोरी अमोणकरने गायलेले सिनेमाचे शीर्षक गीत सिनेमाचे आकर्षण होते. ’तेरे खयालोंमे हम तेरे ही ख्वाबोंमे हम’ हे आशाचे अप्रतिम गीत तिच्यावर चित्रीत होते. खरंतर राजकमलच्या ’बूंद जो बन गई मोती’ची नायिका तिच होती. काही रिळांचे शूट देखील झाले होते पण एकाच वेळी अनेक सिनेमात बीझी असल्याने तिला ती तारेवरची कसरत सांभाळता येईना. शूटींग रखडू लागले. बापू करड्या शिस्तीचे होते. त्यांना असला प्रकार अजिबात आवडत नव्हता ; त्यांनी काय करावे ? त्यांनी चक्क आपल्या मुलीला सिनेमातून डच्चू दिला आणि तिच्या जागी मुमताज आली ! राजश्रीचा त्यावर्षी हिट सिनेमा आला शम्मीकपूर सोबतचा ‘जानवर’ यातील लाल भडक पंजाबी ड्रेस मधील तिची मादक अदा पाहून शम्मी गातो ’लाल छडी मैदान खडी क्या खूब लडी क्या खूब लडी’हे गाणे तिच्यासाठी सिग्नेचर सॉंग ठरले. (Hit Cinema)
शशी कपूर सोबत ती ’दिल ने पुकारा’त होती.राज कपूर सोबत तिने ’अराऊंड द वर्ल्ड’ या सिनेमात भूमिका केली. ही जोडी आणि हा चित्रपट दोन्ही प्रेक्षकांनी नाकारले. यातील शारदाने गायलेली गाणी मात्र लोकप्रिय झाली. हा भारतातील पहिला ७० एम एम सिनेमा होता. हा सिनेमा फ्लॉप जरी झाला असला तरी तिचा वैयक्तिक फायदा असा झाला, की या सिनेमाचे चित्रीकरण अमेरीकेत चालू असताना ग्रेगरी चॅपमन नावाचा एका तरूणाच्या प्रेमात पडली व काही वर्षांनी त्याच्याशी विवाहबध्द झाली. आता तिचा सिनेमातील इंटरेस्ट संपला होता. हातातील सिनेमे संपवून ती अमेरीकेत स्थायिक झाली.
==============
हे देखील वाचा : धर्मेंद्रला खऱ्या अर्थाने स्टारडम मिळवून देणारा सिनेमा !
==============
राजश्रीची सिने कारकिर्द उण्यापुर्या साताठ वर्षाची आणि पंधरा वीस सिनेमाची होती.तिच्यावर चित्रीत ’मेरी मुहोब्बत जवां रहेगी’(जानवर),’क्या कहने माशा अल्ला’(जी चाहता है) तुमने हंसी ही हंसी मे (घर बसाके देखो) न झटको जुल्फसे पानी (शहनाई) चले जाना जरा ठहरो किसीका दम निकलता है (अराऊंड द वर्ल्ड)दिल के झरोखोमे तुझको बिठाकर(ब्रम्हचारी) राजश्रीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अवघी चार महिन्याची तान्हुली असताना ’डॉ कोटनीस की अमर कहानी’ या सिनेमात तिचे पहिले रूपेरी पदार्पण झाले होते.आज राजश्री सिनेमा सोडून चाळीस वर्षे होवून गेली पण तिने कधी पुनरागमनाचा विचार केला नाही. तिची आठवण मात्र रसिकांना जुनी गाणी पाहताना हमखास होते. आज राजश्री या अभिनेत्रीची आठवण काढायचे कारण म्हणजे आज २२ नोव्हेंबर २०२३ रोजी तिच्या अभिनयात नटलेला शांताराम बापूंचा ‘गीत गाया पत्थरों ने ‘ हा सिनेमा साठाव्या वर्षात पदार्पण करतोय.