‘या’मुळे अभिनेत्याचे नाव पडले जॉनी वॉकर
आपण गुगलवर जॉनी वॉकर (Johnny Walker) हा शब्द टाईप केला तर लगेच आपल्याला एका व्हिस्कीची माहिती समोर येते कारण जगभर हा ब्रँड खूप लोकप्रिय आहे पण याच नावाचा भारताच्या हिंदी सिनेमाच्या सुवर्णकाळात एक विनोदी अभिनेता देखील होता जॉनी वॉकर! हे नाव त्याला कसं मिळालं याचा एक खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे. जॉनी वॉकरचे (Johnny Walker) खरं नाव होतं बद्रुद्दीन जमालूद्दीन काझी. त्याचे वडील इंदोर मध्ये एका मील मध्ये काम करत होते. पण नंतर मील बंद पडली आणि हे कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले. अगदी लहान वयात बद्रुद्दीनला आपलं कुटुंब चालवण्यासाठी काय काय करावे लागले? आपल्या उदरनिर्वार्थ हे कुटुंब मुंबईत आलं मुंबईत आल्यानंतर बद्रुद्दीन आईस फ्रुट विकल्या. बाटल्या विकल्या. रद्दी पेपर गोळा केले. पोटाची खळगी भरण्यासाठी लहानपणा पासूनच तो काम करू लागला. अतिशय कष्टामध्ये त्याचे बालपण गेले. पण जिद्द हरला नाही.
नंतर त्याला मुंबईच्या बेस्टमध्ये वाहकाची नोकरी मिळाली. तिथे देखील त्याच्यातील ह्युमर कायम जागा असायचा. येणाऱ्या बस स्टॉपचे वर्णन तो गाऊन करून दाखवायचा. संपूर्ण प्रवासामध्ये तो प्रवाशांचे भरपूर मनोरंजन करत असे. मुंबईची माहिती देत असे. आलेल्या स्टॉपबद्दल माहिती देत असे. येणाऱ्या स्टॉपची कल्पना तो गाण्यातून देत असे. त्याच्या या मनोरंजनामुळे त्याच्या बसमध्ये बसण्यासाठी लोकांची चढाओढ असायची. एकदा त्याच्या बसमध्ये बलराज सहानी प्रवास करत होते. तो काळ १९४९ सालचा होता. त्यांना हा बडबड्या बद्रुद्दीन खूपच आवडला. बलराज सहानी त्यावेळी एका सिनेमाची कथा पटकथा लिहित होते. हा सिनेमा निर्माण करत होते देव आनंद आणि या सिनेमाचे दिग्दर्शक होते गुरुदत्त!
चित्रपट होता बाजी. या बेस्टच्या प्रवासातील कंडक्टरला म्हणजेच बद्रुद्दिनला बलराज सहानी यांनी “सिनेमात काम करशील का?” असे विचारले. तो लगेच तयार झाला. बलराज सहानी यांनी त्याला स्टुडिओमध्ये बोलावले. बद्रुद्दीन घाबरत घाबरतच स्टुडिओमध्ये गेला. बलराज सहानी यांनी त्याला सांगितले,”आज तुला इथे एका दारुड्याची नक्कल करून दाखवायची आहे.” तेव्हा बद्रुद्दीन म्हणाला,” अहो, मी तर आयुष्यात दारूला स्पर्श केलेला नाही!” त्यावर बलराज म्हणाले,” म्हणून काय झालं” तुला अभिनय करता आलाच पाहिजे. बस मध्ये एवढ्या नकला करतोस. तुला काय अवघड आहे? नक्की जमेल तुला !” बद्रुद्दीनला कामाची गरज होतीच आणि त्याच्यामध्ये एक अभिनेता देखील दडलेला होता त्याने ते आव्हान स्वीकारले. (Johnny Walker)
बलराज कोपऱ्यात जाऊन सर्व प्रकार पाहू लागले. इकडे बद्रुद्दीनने दारू पिलेल्या दारुड्याची नक्कल करायला सुरुवात केली. त्याने जोर जोरात आरडाओरडा सुरू केला. झिंगायला सुरुवात केली. असंबध्द बडबड करू लागला. आतल्या रूममध्ये गुरुदत्त आणि देव आनंद एका शॉट वर डिस्कशन करत होते. काय गडबड गोंधळ चालू आहे म्हणून ते बाहेर आले. तर त्यांना एक दारुडा तिथे आलेला दिसला तो दारुडा सेट वरील लोकांशी भांडत होता. खाली पडत होता. लडखडत होता. पुन्हा पुन्हा तेच तेच बोलत होता. हे दोघे त्याकडे पाहू लागले आणि गुरुदत्त ने जाऊन त्याची कॉलर पकडली तेव्हा बद्रुद्दीनने आपले खरे रूप प्रकट केले आणि सॅल्यूट केला! आणि “मी हा अभिनय करत आहे!” असे सांगितले. गुरुदत्त आणि देव आनंदला हा अभिनय खूपच आवडला. गुरुदत्त त्याच्यावर जाम खुश झाला. त्याला विचारले,” तू दारू पितोस नं?” तो म्हणाला “मी आयुष्यात कधीही दारू प्यायलो नाही आणि पिणार पण नाही!” गुरुदत्तला कमाल वाटली. दारु न पिता तो दारुड्याची नक्कल इतकी बेमालूमपणे करतोय हे त्याला प्रचंड आवडले. गुरुदत्त म्हणाले,” तुझे नाव मी आजपासून जॉनी वॉकर (Johnny Walker) करत आहे. कारण हा माझ्या अत्यंत आवडीचा ब्रँड आहे!”
=======
हे देखील वाचा : यामुळे श्रीदेवी आणि आमिर खान एकत्र काम करू शकले नाहीत!
=======
अशा पद्धतीने सिनेमासाठी बद्रुद्दीन काझीचा जॉनी वॉकर (Johnny Walker) झाला. त्याचे हे नवे बारसे गुरुदत्तने केले. गुरुदत्त सोबत त्याची विशेष मैत्री झाली. तिथून पुढे गुरुदत्तच्या प्रत्येक चित्रपटात जॉनी वॉकरची भूमिका हमखास असायची.(अपवाद फक्त साहिब बीवी और गुलाम!) गुरुदत्तच्या सिनेमांमध्ये जॉनी साठी विशेष भूमिका लिहिली जायची. गुरुदत्त कशाला त्या काळातील प्रत्येक निर्माता दिग्दर्शक जॉनी वॉकरला (Johnny Walker) आपल्या सिनेमात घेण्यासाठी धडपडत असायचे. कारण जॉनी वॉकर म्हणजे यश असं जणू समीकरण च झाले होते. जॉनी वॉकर वर प्रत्येक चित्रपटामध्ये हमखास एक गाणं देखील चित्रीत केलं जायचं. त्याची या काळात लोकप्रियता एवढी प्रचंड होती की १९५७ साली ‘जॉनी वॉकर’ या नावाचा एक चित्रपट आला होता. ज्यामध्ये जॉनी वॉकरनेच (Johnny Walker) प्रमुख भूमिका केली होती! स्वतःच्या नावावर चित्रपट येण्याचं भाग्य फार कमी लोकांना लाभतं. १९५८ साली आलेला ‘मधुमती’ या बिमल रॉय यांच्या चित्रपटातील त्याने रंगवलेला दारुडा चरणदास जबरदस्त होता की, त्याला त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट सहनायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. पन्नास आणि साठचे दशक जॉनी वॉकर आपल्या निरोगी अभिनयाने खूप गाजवलं. सत्तरच्या दशकामध्ये मात्र कॉमेडीची टेस्ट बदलून गेली. डबल मिनिंग कॉमेडीचा जमाना आला आणि जॉनी वॉकर (Johnny Walker) हळूहळू रुपेरी पडद्यापासून लांब गेला. १९९७ साली आलेल्या कमल हसन यांच्या ‘चाची 420’ या चित्रपटात जॉनी वॉकर शेवटचा दिसला.
आयुष्यभर दारूचा थेंबाला स्पर्श न करता त्याने दारुड्याच्या अफलातून भूमिका पडद्यावर रंगवल्या. गंमत पहा ज्यांना आयुष्यभर दारूला टच केला नाही त्या अभिनेत्याचे नाव मात्र एका फेमस व्हिस्की ब्रँडचे झाले जॉनी वॉकर!