“शोले” प्रदर्शित झाल्याचा दिवस….
शुक्रवार १५ ऑगस्ट १९७५. असं म्हणता क्षणीच चित्रपट रसिकांच्या किमान तीन पिढ्यांच्या डोळ्यासमोर हमखास येते, जी. पी. सिप्पी निर्मित व रमेश सिप्पी दिग्दर्शित “शोले” (Sholay) प्रदर्शित झाल्याचा दिवस….
तो दिवस म्हणजे माझे शालेय वय. तेव्हाच्या अभ्यासक्रमात १०+२+३ अशा नवीन शिक्षण पध्दतीनुसार मी दहावीची शालांत परीक्षा उत्तीर्ण होऊन आता गिरगावातील हिंद विद्यालय हायस्कूलमध्ये अकरावीत होतो. याच वर्षी २४ जानेवारी १९७५ रोजी गुलशन राॅय निर्मित व यश चोप्रा दिग्दर्शित “दीवार” प्रदर्शित होवून वातावरणात बदल होत होता, मुंबईत मेन थिएटर मिनर्व्हावर कधीही पहावे तर हाऊसफुल्ल गर्दी. आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला कदाचित आश्चर्य वाटेल, त्या काळातील आम्हा चित्रपट रसिकांच्या (फिल्म दीवाने) विशेष सवयी होत्या.
नवीन चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच दिवशी मेन थिएटरवर कुतूहल वा उत्सुकता म्हणून चक्कर मारुन थिएटर डेकोरेशन पाहणे, आगाऊ तिकीट विक्रीच्या चार्टवर आवर्जून नजर टाकणे, काळाबाजारातील (ब्लॅक मार्केटमधील) तिकीटांचा चढता दर ऐकणे (अर्थात कानोसा घेणे), पण आम्हा मध्यमवर्गीयांना याच ब्लॅक मार्केटमध्ये “पिक्चरचं तिकीट” घेणे तात्विकदृष्ट्या पटत नसे. त्यातच असे तिकीट घेताना कोणी पाहिले तर याचा सामाजिक दबाव. ते दिवसच वेगळे होते.
सत्तरच्या दशकाच्या पूर्वार्धातील हे दिवस होते. गिरगावात लहानाचा मोठा होत होत जाताना दक्षिण मुंबईतील कुलाब्यातील स्ट्रॅन्ड थिएटरपासून ताडदेवच्या डायना थिएटरपर्यंत पिक्चर पाहणे होत होते (त्याच लाईव्ह अनुभवावर कालांतराने मी “टाॅकीजची गोष्ट” हे पुस्तक लिहिले.)
अशातच ३० मे १९७५ रोजी प्रदर्शित झालेल्या सतराम रोहरा निर्मित “जय संतोषी माँ“ची लोकप्रियता प्रत्येक दिवसासह वाढत होती. खेतवाडी नाक्यावरच्या अलंकार चित्रपटगृहात मॅटीनी शोला कायमच हाऊसफुल्ल गर्दी. अशातच मुंबईतील विद्युत खांब, बेस्ट बसची मागची बाजू, रेल्वेस्थानक येथे “शोले” (Sholay)ची पोस्टर दिसू लागली. मोक्याच्या ठिकाणी भव्य होर्डींग्स लागली. हे पाहण्यातही त्या काळातील माझ्यासारखे असंख्य “फिल्म दीवाने” विशेष रस घेत. रेडिओ विविध भारतीवर रविवारी पंधरा मिनिटाचा “शोले”चा रेडिओ कार्यक्रम लागे.
एव्हाना गाण्याची तबकडी बाजारात आली होती आणि या सगळ्यात कुतूहल होते ते, “शोले”चे सत्तर एम.एम असणे आणि स्टीरिओफोनिक साऊंड सिस्टीम असणे. त्या काळात चित्रपटविषयक माहिती पुरवणे, जिज्ञासा पूर्ण करणे यासाठी मराठीत “रसरंग” साप्ताहिक असे. त्यातून समजले की अभिनेता ओम प्रकाश याचा भाऊ पांछी याने दिग्दर्शित केलेला “अराऊंड द वर्ल्ड” ( दुनिया की सैर. १९६७) हा हिंदीतील पहिला सत्तर एम.एम चित्रपट. घरी असलेल्या लोकसत्तात ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात जाहिरात आली, १५ ऑगस्टपासून “शोले”(Sholay). त्याखाली मिनर्व्हा व न्यू एक्सलसियर थिएटरमध्ये सत्तर एम.एममध्ये तर गीता (वरळी) इत्यादी चित्रपटगृहात पस्तीस एम.एम. हे कुतूहल वाढवणारे होते.
त्या काळातील जणू पध्दतीनुसार १५ ऑगस्ट रोजी आम्ही खोताची वाडीतील फिल्म दीवाने दुपारी दोनच्या सुमारास मिनर्व्हावर गेलो. मिनर्व्हावरचे एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंतचे “शोले”चे (Sholay) भव्य दिमाखदार डेकोरेशन पाहून खरोखरच डोळे दिपले. आजही ते तसेच डोळ्यासमोर आहे. बरोब्बर मध्यभागी ठाकूर बलदेवसिंगच्या (संजीवकुमार) कैचीतील गब्बरसिंग (अमजद खान) हे विशेष लक्षवेधक. आगाऊ तिकीट विक्रीच्या चार्टवर संपूर्ण आठवड्याची तिकीटे संपल्याचे दिसले. तिकीट दर पाहून मात्र आश्चर्य वाटले. अप्पर स्टाॅल चार रुपये चाळीस पैसे आणि बाल्कनी पाच रुपये पन्नास पैसे. आमच्या गिरगावातील सेन्ट्रल थिएटरला अथवा राॅक्सी, इंपिरियल, सुपर तेव्हा स्टाॅल एक रुपया पासष्ट पैसे अशा दरात पिक्चर पाह्यची सवय ( खिशात तेवढेच असत. पाच दहा पैशांची नाणी खुळखुळत). तुलनेत “शोले”चे तिकीट दर फारच जास्त वाटले….
त्या काळातील मुद्रित माध्यमातील चित्रपट समीक्षकेबद्दल विश्वासार्हता असे. त्याचा हुकमी वाचकवर्ग होता. सगळ्यांनीच “शोले”ला चक्क झोडपले. अती हिंसाचारी चित्रपट, लांबी जास्त आहे, सूडकथेत नाविन्य नाही असाच सूर होता…. पहिल्या आठवडय़ात “शोले” पडला पडला अशीच हवा होती. त्यानंतर तो असा काही उठला की माझ्या मते आजही तो सुरुच आहे. आज मिनर्व्हाची इमारत केव्हाच पाडलीय पण आजही तेथून जाताना गब्बरसिंगची डरकाळी ऐकू येते, कितने आदमी थे….
न्यू एक्सलसियर थिएटरमधून दोन आठवडय़ात “शोले”ची सत्तर एम.एमची प्रिन्ट अन्य शहरात गेली. मुंबईत फक्त आणि फक्त मिनर्व्हात “शोले” सत्तर एम.एम होता आणि त्याची भव्यता व स्टीरिओफोनिक साऊंड सिस्टीम अनुभवणे एक थरार अनुभव असे. त्या काळात गावाकडचे कुटुंबिय, परिचित सुट्टीत मुंबईत आपल्या नातेवाईकांकडे येत तेव्हा त्यांना गेट वे ऑफ इंडिया, मलबार हिल, राणीचा बाग, गिरगाव चौपाटी अशी अनेक स्थळे दाखवतानाच मिनर्व्हात “शोले” दाखवायची सामाजिक सांस्कृतिक परंपराच होती. एक चित्रपट समाज असा व्यापून टाकतो.
“शोले” आपल्या देशातील एक लोककथा झाला. “शोले”(Sholay) न पाहणारा माणूस मिळणे मुश्कील होते. “शोले” न आवडणारे अनेक भेटत. वादही घालत. पण मी “शोले”तील छोटे छोटे संदर्भ देत देत बाजी मारणार हे ठरलेलेच. चित्रपट अभ्यासक्रमात “शोले” महत्वाचा. त्याच्या जोरदार संवादाची ध्वनिमुद्रिका व ध्वनिफीत प्रकाशित झाली आणि मला आठवतय रस्तोरस्ती ती ऐकण्यातही गर्दी होई.”शोले” बद्दल अनेक गोष्टी, कथा, किस्से, दंतकथा प्रसिद्ध होत राहिल्यात. जगात असे याच एकमेव चित्रपटाबाबत असे घडले आहे. म्हणूनच “आपला चित्रपट” आपल्याला प्रिय.
….मी मिडियात आल्यावर नव्वदच्या दशकात “जमाना दीवाना” ( १९९५) च्या निमित्ताने दिग्दर्शक रमेश सिप्पीच्या मुलाखतीचा मला योग आला. खार पश्चिमेला सिप्पी फिल्मचे ऑफिस होते. लोकसत्ताच्या रंगतरंग पुरवणीसाठी ही मुलाखत घेताना पहिलाच प्रश्न “शोले” वरच केला आणि मग बरीचशी मुलाखत “शोले” भोवतीच रंगली…
=========
हे देखील वाचा : अमिताभ व नाना पाटेकर एकत्र आले त्याला २५ वर्ष झाली देखिल
=========
आज “शोले” (Sholay) पन्नासाव्या वर्षांत पदार्पण करीत असतानाही त्याबाबतची उत्सुकता अजिबात कमी झालेली नाही हे तर केवढे मोठे यश. “शोले”च्या स्पर्धेत त्याच शुक्रवारी म्हणजे १५ ऑगस्ट १९७५ रोजी “गरीबी हटावो” नावाचा छोटा चित्रपट प्रदर्शित झाला. शालिमारला मॅटीनी शोला होता तो. तो चित्रपट कोणाला का बरे आठवेल आणि “शोले”चा विसर पडणेही शक्य नाही… माझ्या पिढीतील हा सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट आहे.