Raj Kapoor : वर्तमानपत्रातील एका छोट्या बातमीवरून बनवला हा भव्य

‘पडोसन’ चित्रपट हे टीमवर्क असून दिग्दर्शक त्याचा कर्णधार
विनोद ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. टायमिंग चुकलं, उच्चार बदलला तरी अर्थ बदलून अनर्थ ओढवू शकतो. हसं होऊ शकते.
पिक्चरच्या नावापासूनच खळाळून हसवायला तसा प्लाॅट हवा (कथाआशय), थीम हवी (कथा कल्पना) असा पिक्चर आठवला तरी हंसू येते.
कोणत्याच प्रकारचा चित्रपट ठरवून जमून येत नाही. वा चांगला बनत नाही. अनेकांच्या सहकार्यातून त्याची ‘भट्टी’ जमते. चित्रपट हे टीमवर्क असून दिग्दर्शक त्याचा कर्णधार आहे.
‘पडोसन’ (रिलीज २९ नोव्हेंबर १९६८. मुंबईत मेन थिएटर लिबर्टी) आठवला तरी त्याच्या पोस्टरपासून गाण्यांपर्यंत आणि त्यातील अनेक बडबड करणार्या विनोदी प्रसंगापासून अनेक व्यक्तीरेखांच्या लूकपर्यंत असा काही आठवतो की, आपण मनसोक्त मनमुराद मनापासून हसणारच. आपण कितीही वेळा (आणि अगदी कुठूनही) तो एन्जाॅय केला तरी आजही आपण तो पुन्हा पाहून फ्रेश होऊ. त्याच्या प्रदर्शनास तब्बल पंचावन्न वर्ष होऊन देखील तो धमाल अनुभव देतो यातच या पिक्चरचं भारी यश आहे.(Padosan)

विनोदी कलाकार व कोणत्याही माध्यमातील कलाकृती यांना फारसं कधीच कोणी गंभीर घेत नाहीत. पण अशाच पिक्चर अथवा इतर गोष्टींनी रसिकांना ताण तणाव, दु:ख, विवंचना विसरायला मदत केलीय. ‘पडोसन’ तर कुठूनही एन्जाॅय करावा. तीच धमाल, तोच आनंद. मी पहिल्यांदा पाहिला तो सत्तरच्या दशकाच्या मध्यास मुंबई दूरदर्शनवर एका रविवारी संध्याकाळी. तोपर्यंत विविध भारतीवर व लाऊडस्पीकरवर मेरे सामनेवाली खिडकी मे, एक चतुर नार करके सिंगार गाणी ऐकत होतो. त्या काळात जवळपासच्या कोणाच्या घरी टी. व्ही. आहे याचा शोध घेऊन मग पिक्चर पाहायला त्यांच्याकडे जावे लागे. मात्र पिक्चर एन्जाॅय करताना जणू आपण आपल्याच घरात आहोत असं हसणं खिदळणं होई.
‘पडोसन ‘ त्यानंतर गल्ली चित्रपटात, मग मॅटीनी शो, त्यानंतर भाड्याने व्हिडिओ कॅसेट आणून असा सतत पाहून पाहून आजही एन्जाॅय करतोय. आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीनेही आवर्जून पहावा. विनोदी चित्रपट असावा तर असा खट्याळ, टवाळखोर आणि दिलखुलास.
मूळात ही बंगाली लेखक अरुण चौधरीची लघुकथा. त्यावर ‘पाशेर बरी’ (१९५२) हा बंगाली चित्रपट निर्माण झाल्यावर दिग्दर्शक बिमल राॅय यांनी त्यावर हिंदी चित्रपट निर्माण करण्याचे हक्क घेतले. मेहमूदला हे समजल्यावर त्यानेच हिंदीत चित्रपट निर्माण करण्याचे ठरवले. एन. सी. सिप्पी यांना या निर्मितीत जोडीला घेतले. ( एन. सी. सिप्पी कालांतराने मोठे निर्माते म्हणून ओळखले गेले.) आणि आपला मित्र ज्योती स्वरुप यांजकडे दिग्दर्शन सोपवले. ( तोही मग ‘परवाना ‘ वगैरे चित्रपटांचा दिग्दर्शक म्हणून ओळखला गेला.) (Padosan)
टीमवर्कने हे मजेशीर पिक्चर आकाराला येत गेले. राजेन्द्र कृष्ण यांनी पटकथा, संवाद व गीतलेखन केले. राहुल देव बर्मन संगीतकार. त्यानेच भोला साकारावा ही मेहमूदची कल्पना. मेहमूदच्याच एस. ए. अकबर दिग्दर्शित ‘छोटे नवाब ‘मध्ये ( १९६१) आर. डी.ने एक भूमिका साकारली म्हणून मेहमूद वाटलं त्याला ‘पडोसन ‘मध्ये घेऊया. तो नाही म्हटल्यावर सुनील दत्तची निवड झाली. चित्रपटाची नायिका म्हणून अनिल विश्वासची मुलगी शिखाची निवड करायची होती. आर. डी.च नाही म्हटल्यावर तिच्या जागी सायरा बानू आली. विद्यापती किशोरकुमारनेच साकारावा अशी मेहमूदची कितीही इच्छा असली तरी त्याचं म्हणणं होतं, मी फक्त पार्श्वगायन करेन. कसंही करुन मेहमूदला किशोरकुमारच हवा होता. बरेच दिवस वाट पाहून मेहमूदने काय करावे ? (Padosan)

असा एक किस्सा प्रसिद्ध आहे की, मेहमूदने किशोरकुमारच्या जुहू येथील गौरी कुंज या बंगल्याबाहेर एक तंबू ठोकून एक रात्र काढली तेव्हा कुठे किशोरकुमार हो म्हणाला. पण एका अटीवर. श्रीधर दिग्दर्शित ‘प्यार किये जा ‘ ( १९६६) या धमाल चित्रपटात मेहमूदने आपल्यापेक्षा जास्त पैसे घेतले होते. आता तसे ते आपल्याला हवेत. मेहमूद करतो काय? हो म्हणाला. आता एकेक करत सगळे कलाकार ठरत गेले. ओम प्रकाश, केश्तो मुखर्जी, राज किशोर, दुलारी, मुकरी, आगा वगैरे वगैरे. छायाचित्रण के. एच. कपाडिया यांचे तर संकलन डी. एन. पै यांचे.
एकेक गाणे ध्वनिमुद्रित होत गेले. त्यात पण गंमती जंमती. मनोरंजनाचा मसाला भरायचा म्हणजे तेवढं आपणही रंगायला हवे. पिक्चर दिल से बनती है, पैसो से नही असं मानणारा तो काळ होता. ते दिवसच वेगळे होते.एक चतुर नार करके सिंगार हे गाणे ‘झुला ‘ ( १९५१) चित्रपटात अशोककुमारने गायलेल्या एक चतुर नार कर कर के सिंगार या धीम्या गतीतील गाण्यावरुन घेतले. मूळ गाणे प्रदीप यांनी लिहिले होते व सरस्वती देवी संगीतकार. ‘भाई बत्तूर ‘ या गाण्याचा जन्मही असाच भन्नाट. मेहमूदचे वडील मुमताज अली यांच्या ‘छोटे नवाब ‘ या नाटकात तसा डायलॉग होता. बत्तूर म्हणजे खास मित्र. तोच संवाद त्याच नाटकावरील ‘छोटे नवाब ‘ या चित्रपटातही होता. राजा नवाथे दिग्दर्शित रहस्यरंजक ‘गुमनाम ‘मध्ये जेवण वाढण्याच्या प्रसंगात मेहमूद तसं म्हणतच काही गोष्टी बोलतो. (Padosan)
हाच ‘भाई बत्तूर ‘ हा मुखडा घेऊन रचण्यात आलेले गाणे हिट ठरले. लता मंगेशकर यांनी ते गायले. मेरे सामनेवाली खिडकी मे ( किशोरकुमार), कहना है कहना है आज तुमसे पहली बार ( किशोरकुमार), मै चली मै चली देखो प्यार की गली ( लता मंगेशकर व आशा भोसले) हीदेखील गाणी हिट. एक चतुर नार करके सिंगार गाण्यासाठी आपण किशोरकुमारसोबत गाणार नाही असं मन्ना डे म्हटल्याचा किस्सा प्रसिद्ध आहे. आपण शास्त्रीय संगीतातील गायक असून हे गाणे आपले नाही असं त्यांच मत. या गाण्यात किशोरकुमार स्वतःच्या व्यक्तिरेखेसाठीही गातो आणि सुनील दत्तला प्लेबॅकही देतो. चित्रपटातील महत्वाचे गाणे. मेहमूद व राहुल देव बर्मननी ते मन्ना डे यांना समजल्यावर ते हो म्हणाले. गाण्यात मेहमूदही गायलाय.पिक्चरच्या शूटिंगचे किस्सेही असेच भारी.
चेन्नईतील ( तेव्हाचे मद्रास) कृष्ण राज सागर हाॅटेलमध्ये बरेच दिवस शूटिंग झाले. सायरा बानू गाडीतून उतरताच किशोरकुमार आदराने उभा राह्यचा. सायरा बानूसाठी या चित्रपटाचे शूटिंग म्हणजे जणू धमाल पिकनिक होती. एक लाईव्ह अनुभव. विद्यापतीच्या गेटअपवर बरीच चर्चा रंगल्यावर किशोरकुमारने ठरवलं मी हा प्रश्न सोडवतो. त्याने आपले काका धनंजय बॅनर्जी यांचं रुपडं घेतलं आणि ते साॅलीड रंगवले. चित्रपटाचे शूटिंग जवळपास संपल्यावर किशोरकुमारला पिक्चरमध्ये गाण्यासाठी एक सिच्युएशन सापडली. भोला उदास होऊन बसलाय. त्याला खुलवायचं. तेथे गाणे आले, मेरी प्यारी बिंदू… हे सगळे होईपर्यंत चित्रपटाच्या गाण्याची तबकडी विक्रीला आल्याने त्यात हे गाणे नव्हते. इतकेच नव्हे तर, नृत्य दिग्दर्शकही उपलब्ध नव्हता. म्हणून किशोरकुमारने तेही केले. (Padosan)
===========
हे देखील वाचा : अशी मिळाली सायराला दिलीपजींसोबत काम करण्याची संधी
===========
म्हटलं ना, एका चांगल्या कलाकृतीत अनेकांचा हातभार असतो. त्या काळात तर अनेक कलाकार, तंत्रज्ञ व कामगार ‘हा आपला चित्रपट आहे. तो आपणही चांगला करायला हवा ‘ या भावनेने, वृत्तीने काम करत म्हणून असे झक्कास चित्रपट पडद्यावर येत आणि रसिकांच्या अनेक पिढ्या ओलांडूनही ते चित्रपट ‘जुन्यात ‘ जमा होत नाहीत. हा पिक्चर तुम्ही अनेकदा एन्जाॅय केल्यामुळे त्याची ” स्टोरी” सांगत नाही..
‘पडोसन ‘ आठवला तरी चेहर्यावर हंसू येते तर आणखीन काय हवं.
डेव्हिड धवन दिग्दर्शित ‘साजन चले ससुराल’ (१९९६) मधील मुरानचंद स्वामी साकारताना सतिश कौशिकने ‘पडोसन ‘मधील मेहमूदला आदर्श ठेवला असे त्यानेच नटराज स्टुडिओत या चित्रपटाच्या सेटवर त्याची मुलाखत घेत असताना सांगितले. या भूमिकेसाठी त्याला फिल्म फेअर पुरस्कार प्राप्त झाला.या चित्रपटाची तेलगू ( १९८१), मराठी ( १९९०) व कन्नड ( २००३) या भाषेत रिमेक झाली. तरी मूळ चित्रपटच भारी. मराठीत दिग्दर्शक विनय लाड याने ‘पटली रे पटली’ आणला. ‘पडोसन ‘ची हिंदीत कोणी रिमेक केली नाही..मूळ चित्रपटच कितीदाही एन्जाॅय करता येतोय तर रिमेक कशाला करा असाच बहुतेक विचार होत असावा. चला पुन्हा एकदा ‘पडोसन ‘ एन्जाॅय करुयात….एक छान म्युझिकल काॅमेडी पिक्चर.