एका संस्कृतीचा अंत: “विविध भारती” बंद होणार…!
काळाच्या ओघात अनेक गोष्टी मागे पडत जाणे हे कितीही स्वाभाविक असले, तरी काही काही गोष्टी ऐकल्या की त्या निदान काही प्रमाणात तरी जपता आल्या असत्या, तर बरे झाले असते असे भावनिकदृष्ट्या का होईना पण वाटते. अशीच बातमी, “विविध भारती बंद” (Vividh Bharati) ची…! एप्रिलपासून त्याची राज्यातील आठही केंद्रे बंद होणार आहेत. आता कोणी म्हणेल, यु ट्यूब चॅनल, गुगल ऑनलाईन ऍप्स, कॅप्युटर यांच्या युगात रेडिओची गरज ती काय??? नवीन माध्यमे हातोहाती आली असताना जुन्या सुविधांची गरज ती काय असा थेट प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण विविध भारती हे केवळ “एक रेडिओ स्टेशन” (Radio station) म्हणून भारतीयांच्या आयुष्यात नव्हते.
१२ ऑक्टोबर १९५७ रोजी त्याची मुंबईत सुरुवात झाली. ती सुरुवात करण्यामागे “रेडिओ सिलोन”(Radio Ceylon) सोबत स्पर्धा करणे हाच प्रमुख हेतू होता. तो यशस्वी होताना काही वर्षातच विविध भारतीचे आपल्या देशातील कानाकोपरा व्यापून टाकणारे स्थान निर्माण झाले. अनेक राज्ये आणि शहरात स्थानिक पातळीवर विविध भारतीच्या काही कार्यक्रमांची निर्मिती होऊ लागली. तर काही प्रोग्रॅम काॅमन असत. आजच्या ग्लोबल युगातील रसिकांना कदाचित आश्चर्य वाटेल पण त्या काळात घरात लहान मोठा रेडिओ खरेदी करणे ही देखील खूप महत्वाची आणि कौटुंबिक आनंदाची गोष्ट होती. याचे कारण म्हणजे, समजा तुम्हाला सिनेमाचे गाणे ऐकायचे असेल तर, गाणी आवडलेल्या चित्रपटासाठी पुन्हा थिएटरमध्ये जाणे ही सवयीची गोष्ट झाली होती. म्हणून अनारकली, फागून, बसंत बहार, हम दोनो, मुगल ए आझम, श्री ४२०, अलबेला, दिल देके देखो, धूल का फूल असे अगणित म्युझिकल हिट चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः पुन्हा पुन्हा थिएटरमध्ये जाऊन पाहिले.
तेव्हा श्रीमंत कुटुंबात ग्रामोफोन असणे प्रतिष्ठेचे होते आणि रेकॉर्ड प्लेअर अर्थात तबकडी जपून वापरली जाई. त्या काळात शहरातील इराणी हॉटेलमधून ज्यूक बॉक्स असे. साठच्या दशकात त्यात दहा पैशाचे नाणे टाकून आपल्याला हवे ते गाणे ऐकायला मिळे. अनेकदा आपले गाणे येईपर्यंत आणखीन आठ दहा गाणी ऐकून व्हायची. (सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात मी कॉलेजमध्ये असताना गावदेवीच्या इराणी हाॅटेलमध्ये आठ आण्याचे नाणे टाकून ते अनेकदा अनुभवले.) अनेक सण, सोहळे आणि लग्नात, तसेच जत्रांमध्ये लाऊडस्पीकरवर गाणी ऐकायला मिळायची. अशा एकूणच सामाजिक परिस्थितीत रेडिओचे स्थान किती महत्वाचे होते हे काही आता वेगळं सांगायला नको. अनेक गावात तर मोजक्या एक दोन घरात रेडिओ असे आणि आवडते रेडिओ प्रोग्रॅम ऐकण्यासाठी त्या घरात अनेकजण जमत. गाणी ऐकत ऐकत गप्पा करत (ते जास्त महत्वाचे असे.)
शहरी मध्यमवर्गीय कुटुंबातही असाच एक प्रकारचा ‘गाणे एकणे आणि सगळ्यांनी’ गप्पा करणे हे नित्याचेच होते. त्यातही आणखीन एक विशेष म्हणजे, अगदी साठच्या दशकाच्या अखेरपर्यंत चाळीत कोणाच्या घरी रेडिओ आणला की आजूबाजूला सर्वानाच साखर वाटली जाई हे मी स्वतः अनुभवलंय. आमच्या गिरगावातील खोताची वाडीतील अवघ्या दहा बाय दहाच्या घरी रेडिओ आणला तेव्हा गल्लीतली सगळी पोरं तो पाहायला धावली आणि आईने सगळ्यांना साखर वाटली. ही गोष्ट खूप छोटी वाटते, पण त्या काळात तो एक आनंदाचा क्षण असे. मुंबईत १९७२ साली दूरदर्शनचे आगमन झाले तरी ते देशाच्या विविध भागात आणि अगदी खेड्यापाड्यात पोहचायला एक दशक लागले. त्याच्या प्रगतीचा वेग तोपर्यंत कमी होता आणि रेडिओचे महत्व व अस्तित्व कायम होते. याचे कारण म्हणजे, ट्रान्झिस्टर बॅटरीवरही चालत असे आणि दूरचित्रवाणी संचासाठी वीज महत्वाची होती. ती गावागावात पोहचायला बराच अवधी लागत होता. याउलट ट्रान्झिस्टर आपल्या सोबत भटकंती करायचा आणि विविध भारती ऐकवायचा.
ऐशीच्या दशकात लहान मोठ्या टेप रेकॉर्डरचे युग संचारले. ध्वनिफीतीमध्ये आपल्या आवडती गाणी भरुन घेणे आणि चित्रपटापासून भक्तीगीतापर्यंत रेडीमेड ध्वनिफितीने अक्षरशः धुमाकूळ घातला. इतका की ओरिजिनल गाण्यांइतकीच रिमिक्स गाण्यांना महत्व आले. आता रिक्षा, ट्रक, बार यामध्ये गीत संगीताचा सुकाळ झाला तरीही विविध भारती आपल्या स्थानी कायम होते. याचे कारण म्हणजे, त्यांच्याकडचा जुन्या चित्रपटाच्या गीत संगीताचा अफाट खजिना, नवीन चित्रपटातील चांगले त्याला स्थान आणि कार्यक्रमांची विविधता हे होते. त्याचा स्तर आणि सातत्य टिकवून ठेवण्याचे आव्हान त्यांनी पेलले.
राज्यानुसार काही प्रादेशिक भाषेतील कार्यक्रम सुरु केले. असे बदलणेही आवश्यक होते. कालांतराने रेडिओच्या खाजगी वाहिन्या आल्या, चटपटीत शैलीने लोकप्रिय झाल्या, उपग्रह वाहिन्यांचे युग संचारले आणि जगण्याची शैली बदलली. ‘आजकाल रेडिओ कोण ऐकतो’??? असेही म्हणण्याची फॅशन रुळली तरी एव्हाना गाडीमध्ये (चार चाकी) रेडिओ एस्टॅब्लिज झाला होता आणि प्रवासात त्यावरील गीत संगीताची साथ सवयीची व हवीशी झाली रादर अजूनही आहे. या सगळ्या स्थित्यंतरात विविध भारती थोडी मागे पडत जाणे स्वाभाविक होतेच. रेडिओ म्हणजे विविध भारती हे एकेकाळचे घट्ट नातेही एव्हाना पुसट झाले.
अशी विविध भारती म्हणजे “देश की सुरीली धडकन” थांबणार ही कल्पना तरी आपण करु शकतो का??? पण वास्तव कल्पनेपेक्षा जास्त बोचरे असते आणि त्याचा स्वीकार करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेश अशा आठ राज्यातील विविध भारतीचे प्रसारण बंद होत असले, तरी उत्तर भारतातील हिंदी भाषिक राज्यात मात्र ते सुरु राहणार आहे. विविध भारती म्हणजे, भूले बिसरे गीत (जितकी म्हणून जुन्या चित्रपटातील गाणी ऐकण्याची सुवर्ण संधी. विशेष म्हणजे, प्रत्येक काळातील नवीन पिढी या अतिशय जुन्या चित्रपटाच्या गाण्यात रस घेऊ लागली), जयमाला (देशभरातील चित्रपट गीत शौकिन एका पोस्ट कार्डावर आपल्या आवडते गाणे लिहून पाठवत आणि त्याचे नाव, ठिकाण सांगून ते ऐकवले जात असे.
सत्तरच्या दशकात पंधरा पैशाच्या पोस्ट कार्डावर अनेक शौकिन आवर्जून आपले आवडते गाणे लिहून पाठवत. त्यातील झुमरीतल्लय्या हे गाव कायमच कौतुक आणि कुतूहलाचा विषय राहिला. मी देखील पोस्ट कार्डवर गाईड, आराधना, दो रास्ते या चित्रपटातील गाणे ऐकावे अशी फर्माईश करायचो आणि रेडिओवर आपले नाव ऐकून थ्रील व्हायचो), छायागीत (दूरदर्शनवर याच नावाच्या चित्रपट गाण्याच्या कार्यक्रमाने अक्षरशः अफाट लोकप्रियता संपादली म्हणून त्याच नावाचा कार्यक्रम विविध भारतीवर सुरु झाला), ‘हवा महल’ (हा देखील हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम) याबरोबरच जुन्या आणि नवीन पिढीच्या चित्रपट कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार, गायक इत्यादींच्या मुलाखती, आठवणी असे अनेक प्रकारचे कार्यक्रम विविध भारतीवर वर्षानुवर्षे सुरु राहिले. शनिवार आणि रविवार या वारी आगामी आणि प्रदर्शित चित्रपटाचे प्रत्येकी पंधरा मिनिटाचे रेडिओ प्रोग्रॅम हे एक विशेष आकर्षण असे. याचा खूपच मोठा श्रोता वर्ग होता. त्यात त्या चित्रपटाच्या गाण्याचे मुखडे/तुकडे ऐकवले जात, काही संवाद लावले जात आणि निवेदक त्या चित्रपटाचे अतिशय शैलीदारपणे प्रमोशन करे.
मला आजही आठवतेय, रविवारी दुपारी पावणेतीन वाजता रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले ‘चा रेडिओ प्रोग्रॅम असे. तीन महिने तरी तो ऐकायला मिळाला. प्रत्येक चित्रपटाचे किमान दोन महिने अशा पध्दतीने प्रमोशन होई आणि तेव्हा विविध भारती अगदी टॉपवर असल्याने हे प्रोग्रॅम हिट होत. अमिन सयानी (Ameen Sayani) हे “रेडिओ सिलोन” च्या बिनाका गीतमालामुळे लोकप्रिय होते असे नव्हे तर विविध भारतीवरही त्यांचे निवेदन लोकप्रिय होते. त्यांच्यासह इतरही अनेक आवाज विविध भारतीने ओळखीचे केले. रविवारच्या ‘कोहिनूर गीत गुंजार’ चा क्लास काही वेगळाच होता. तर क्रिकेटप्रेमींसाठी ‘क्रिकेट विथ विजय मर्चंट’ मोठीच पर्वणी होती. खरोखरच ‘विविध भारती’ हे नाव सार्थ व्हायचे. भारतीय समाज मनाशी विविध भारती इतकी आणि अशी एकरुप झाली की, एखादी व्यक्ती एकाच वेळेस विविध विषयांवर गप्पा मारायची सवय असलेल्याला ‘विविध भारती’ असे कौतुकाने म्हटले जाऊ लागले.
आजच्या चाळीशी पन्नाशीपार पिढीसाठी हा सगळा एक फ्लॅशबॅक आहे. त्यातील अनेक जण लहान मोठा रेडिओ/ट्रान्झिस्टर याच्या संगत आणि सवयीने ऐकत लहानाचे मोठे झाले आहेत. अनेकांसाठी तर विविध भारतीने घडाळ्याचे काम केले आहे, फौजी भाईयोंकी पसंत म्हणजे संध्याकाळचे सात वाजले ही नाती अनेकांच्या मनात अगदी घट्ट होते. तो काळ माध्यामांशी भावनिकदृष्ट्या एकरुप होण्याचा, जोडले जाण्याचा होता. आपल्या आवडते हिंदी चित्रपट गीत आज अथवा आता विविध भारतीवर ऐकायला मिळू देत याची विलक्षण ओढ असे आणि एकदा ते एक अथवा अनेक आवडती गाणी ऐकायला मिळाली की तो दिवस खूपच चांगला आहे असे मानले जाई.
गेले ते दिन गेले, आज आवडते (आणि नावडतेही) गाणे मोबाईलवर कधीही पाहता येत आहे, पण त्यात खरंच ती आत्मियता राहिली आहे का??? हा प्रश्नच आहे.