बाप्पा घडवण्याचा आनंद
जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा, मितवा, कॉफी आणि बरंच काही, मिस्टर अँड मिसेस सदाचारी अशा अनेक मराठी चित्रपटातून यशस्वी झालेली अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे. प्रार्थना मूळची बडोद्याची. आपल्या गणपतीविषयी आठवणी सांगताना ती म्हणते, “बडोद्याला माझ्या माहेरी दीड दिवसाचा गणपती असतो. मी हरितालिकेचा उपास पण करायचे. घरी गणपतीला खूप उत्साहाचे वातावरण असायचे. सजावट करण्यात सुद्धा खूप मजा यायची. बडोद्याला आमच्या सोसायटीत दहा दिवसांचा गणपती असायचा आणि तिथे गणपती विसर्जनाच्या दिवशी मराठी गाणी लावली जायची आणि सर्व जण त्या गाण्यांच्या तालावर नाचायचे.
यंदाच्या वर्षी फक्त कोरोनाचे सावट असल्याने आम्ही माहेरी गणपती आणला नाही. कारण मी मुंबईत आणि माझी बहीण परदेशात असते. सासरी ऑफिसमध्ये गणपती असावा, अशी माझी, माझ्या नवऱ्याची अभिषेकची इच्छा होती. आम्ही यावर्षी पहिल्यांदा आमच्या ऑफिसमध्ये गणपती आणला. आम्ही दोन मूर्ती आणल्या. एक मूर्ती मी स्वतः घडवली आणि एका मूर्तीची ऑर्डर दिली. लॉक डाऊनमुळे घरी असताना नवीन शिकायला वेळ मिळाला.
मी मूर्ती घडवण्याचे अनेक व्हिडीओज पाहिले. अभिनेता भूषण प्रधान याच्या आईबरोबर सुद्धा त्या संदर्भात बोलले. मला चित्रकलेची आवडत होतीच. यावर्षी स्वतः मूर्तीघडवल्याचा आनंद खूप होता. आम्ही दोन्ही गणपती मूर्ती ऑफिसमध्ये स्थापन केल्या, पूजा केली. आमच्या घरून सगळा नैवेद्य, स्वयंपाक मी, सासूबाई आम्ही सर्वांनी मिळून केला. आणि ऑफिसमध्ये नेला. खूप प्रसन्न वाटलं. आम्ही दीड दिवसासाठी गणपती आणला होता.
लहानपणापासून बघत आलेला हा गणपतीचा सण मनाला खूप आनंद देतो.”