महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
सेटवरचा लंच ब्रेक वेगळ्या चवीचा…
सीमाताई देव यांच्या सविस्तर मुलाखतीचे अनेकदा योग आले. एकदा त्यांनी मला एक विशेष गोष्ट सांगितली. कोल्हापुरात जयप्रभा स्टुडिओ आणि शांतकिरण स्टुडिओ येथे पूर्वी अनेक मराठी चित्रपटांचे शूटिंग होत असे आणि दुपारच्या जेवणाच्या (Lunch break) पंगतीत कलाकार, निर्माता, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि सेटवरचे कामगार सगळे खाली बसून एकत्रपणे जेवत असू. कधी या स्टुडिओत एकाच वेळेस दोन मराठी चित्रपटांचे शूटिंग असताना दुपारच्या जेवणानंतर दोन्ही चित्रपटाचे कलाकार एकत्र येऊन गप्पा मारत, एकमेकांची ख्याली खुशाली विचारत. एकमेकांच्या कुटुंबाचा, सुख दुःखाचा गप्पांत विषय निघे. याचा सकारात्मक परिणाम असा होई की, या आपुलकीतून जे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नाते निर्माण होई, त्यामुळे चित्रपटातील कौटुंबिक दृश्यातही आपलेपण येई. प्रत्यक्षातील सहजता कॅमेर्यासमोर येई.
सीमाताई देव यांच्या सांगण्याचा प्रत्यय मला ऐंशीच्या दशकात कोल्हापूरला मराठी चित्रपटाच्या शूटिंग रिपोर्टींगसाठी गेल्यावर येई. मला आठवतय, अरविंद सामंत निर्मित व राजदत्त दिग्दर्शित ‘माझं घर माझा संसार’ ( १९८४) च्या शूटिंग रिपोर्टींगसाठी गेलो असता शांतकिरण स्टुडिओत सगळ्यांच्या एकत्र जेवणासाठी खास मंडप उभारण्यात आला होता. आणि अतिशय आपुलकीचे आणि खेळकर वातावरण होते. ते दिवसच वेगळे होते.
शूटिंगच्या शिफ्टच्या वेळेनुसार नाश्ता आणि जेवण (Lunch break) ही गोष्ट चित्रपट (आणि मालिका, रिॲलिटी शो, गेम शो, वेबसिरिज, जाहिरात असं सगळचं) निर्मितीत खूप महत्वाची गोष्ट आहे. (या ग्लॅमरस क्षेत्रात उंची खाना पिना हुकमी असतो अशी असलेली प्रतिमा गृहीत धरावी लागते.) काळासोबत त्यातही काही बदलही झाला आहे. एकत्र जेवणाची (Lunch break) गंमत काही वेगळीच. तीच आपली संस्कृती, परंपरा. हा चवदार विषय अनेक एक प्रकारे अनेक वाट्या असणाराही आहे. युनिटसाठीचे जेवण,( कधी ते किती जणांचे एकूण युनिट आहे, यावरही अवलंबून असते आणि कधी दोन पाहुणे अचानक वाढल्याने चार पाच पोळ्या अथवा चपात्या कमी पडल्याने कधी आरडाओरडही होते. राजश्री प्राॅडक्सन्सचे विशेष म्हणजे त्यांच्या चित्रपटाच्या सेटवर प्रामुख्याने शाकाहारी जेवण. तेही भरपूर. आणि ‘हम साथ साथ है’ अशी संस्कृती जपतच जणू सगळे एकत्र जेवत.) बड्या स्टार्ससाठी जेवण (काही स्टार्रच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी जपाव्या लागतात. उगाच खाण्यावरुन एकाद्याचा मूड खराब होऊ नये.
दिलीपकुमार कायमच घरी जेवून मग दोन वाजताच्या शूटिंग शिफ्टला पसंती द्यायचा हे त्याच्यासोबत काम केलेल्या सुलोचनादीदींनी मला एकदा सांगितले. काही कलाकार घरुन आपला डबा आणतात ते जेवण (सेटवरच्या जेवणात तेल जास्त असते असे ते स्टार म्हणतात) कधी एकाद्या स्टारला आवडत्या हाॅटेलमधून अथवा फूड पाॅईंटवरुन हवेसे झालेले जेवण (याचेही किस्से, दंतकथा आहेत), कधी एकाद्या स्टारने आपल्या सहकाऱ्यांसाठी घरुन मागवलेले भरपूर जेवण असे अनेक ‘पोट’प्रकार आहेत. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या चित्रपटाच्या सेटवर खाण्यापिण्याची भारीच चंगळमंगळ असते म्हणे.. एकादा कलाकार त्याच्या आवडत्या स्पाॅटवरुन आवडता खाद्यपदार्थ मागवू शकतो म्हणे. या आनंदासाठी फिरोज खानच्या पिक्चरमध्ये काम करायला आवडेल असे काही कलाकार सांगत. हेही बरोबरच हो, ‘रिकाम्या पोटी’ चेहर्यावर हवे ते एक्प्रेशन कसे आणणार?
दिलखुलास लक्ष्मीकांत बेर्डेची आपल्या चित्रपटाच्या सेटवरची ‘मांसाहारी जेवणा’ची संस्कृती आवर्जून सांगायलाच हवी. लक्ष्या वर्सोव्यातील यारी रोडवर राहायला होता आणि जुहू, ओशिवरा परिसरात शूटिंग असताना बुधवार,शुक्रवार,रविवारी त्याच्या घरुन पापलेट, सुरमई, बोंबिल, हलवा, मांदेली यांचे भरपूर जेवण (Lunch break) येई आणि अनेक जण मस्त ताव मारत भला मोठा डबा रिकामा करत. प्रिया अरुणलाही याचे श्रेय द्यायला हवे. अशा मनसोक्त मनमुराद जेवणाने शूटिंगमध्ये अधिकाधिक रंगत यायलाच हवा. उत्तम कामाचा एक मार्ग असा पोटातूनही जातो आणि मी देखील दोनदा लक्ष्मीकांत बेर्डेच्या या जेवणाचा आस्वाद घेतलाय.
राजेश खन्नाच्याही घरुन अर्थात आशीर्वाद बंगल्यावरुन शाकाहारी, मांसाहारी जेवणाचा भला मोठा डबा (Lunch break) सेटवर येई. मला आजही आठवतेय, गोरेगावच्या फिल्मी स्थान स्टुडिओत बी. आर. चोप्रा दिग्दर्शित ‘आवाम’च्या शूटिंग रिपोर्टींगसाठी आम्हा सिनेपत्रकारांना सेटवर बोलावले असता राजेश खन्ना, स्मिता पाटील व इतरांवर कोर्ट रुम दृश्याचे शूटिंग होते. लंच ब्रेकमध्ये लगोलग एका बाजूला भल्या मोठ्या टेबलावर राजेश खन्ना व शफी इनामदार जेवत होते, तर जवळच आम्हा मिडियासाठी जेवणाची सोय करण्यात आली होती. आणि अशातच अगदी अनपेक्षितपणे शेजारच्याच मुकुल आनंद दिग्दर्शित ‘इन्साफ ‘च्या सेटवरुन डिंपल कापडिया येताच माहौल एकदमच बदलला.
हा आश्चर्याचा सुखद मोठाच धक्का होता. त्यांचे एकमेकांशी अजिबात पटत नाही म्हणून ते वेगळे राहत आहेत. असे गाॅसिप्स मॅगझिनमधून बरंच काही (कधी कधी अक्षरश: काहीही) प्रसिद्ध होत होते आणि अशातच डिंपल राजेश खन्नाला भेटायला आली. म्हणताच शफी इनामदार उष्ट्या हाताने जागेवरुन उठला, आमच्यातल्या फोटोग्राफर्सनाही अशाच उष्ट्या हाताना सांभाळत फोटो काढावे लागले. हा एक वेगळाच लाईव्ह अनुभव होता आणि त्या दिवसांत यावेळच्या राजेश खन्ना व डिंपल यांच्या भेटीचा एक्स्युझिव्हज फोटो अतिशय चांगल्या किंमतीत विकला गेला. आम्हा मिडियावाल्यांचे या एक्स्युझिव्हज क्षणाच्या लाईव्ह अनुभवाने भारीच पोट भरले. चित्रपटाच्या सेटवरचा ‘खाना’ कधी असा वेगळ्या चवीचाही असू शकतो. पूर्वी लंच ब्रेकमध्ये मेकअपरुममध्ये जाण्यापेक्षा सेटवरच जेवणे मोठे स्टारही पसंत करत. राजेश खन्नाही कधी प्रेम चोप्रासोबत तर कधी असरानीसोबत सेटवरच जेवत असे. एकदा मुंबईतील आम्हा मिडियाला वांद्रे बॅन्ड स्टॅण्डवरील एका बंगल्यात मेहुलकुमार दिग्दर्शित ‘तिरंगा ‘तील पी ले पी ले या गाण्याच्या शूटिंग रिपोर्टींगसाठी बोलावले असता, लंच ब्रेकमध्ये (Lunch break) नाना पाटेकर आमच्यासोबतच जेवायला बसला, पण राजकुमार एका रुममध्ये गेल्यावर बरोबर एक तासाने बाहेर आला. आपला लंच टाईम असा एक तासाचा असतो असा त्याचा जणू नियम होता हे तत्क्षणी समजले. फिल्डवर्कवर अशी माहिती मिळत असते. विजू खोटे अनेकदा तरी आपल्या गावदेवीतील इराणी हाॅटेलमधून मोठ्या आकाराची खारी बिस्किट सेटवर आणे याच्या गोष्टी त्याच्यासोबत काम करणारे कलाकार सांगत.
आम्ही सिनेपत्रकार अंधेरीतील नटराज स्टुडिओतील नवीन चित्रपटाच्या मुहूर्ताच्या वेळेस विशेष खुश असू. कारण नटराज स्टुडिओतील कॅन्टीनमधून जुहू परिसरातील बंगल्यातील शूटिंगसाठीचे जेवण जात असे आणि त्याच्या तपशीलानुसार आम्ही जात असू. अशी माहिती मिळवून त्या सेटवर धावणे ही आमची भूक होती आणि ती छानच पूर्ण होई.
======
हे देखील वाचा : ‘स्टुडिओतील चाळींशी’आजचा प्रेक्षक रिलेट होईल का?
=====
व्हॅनिटीचे युग आले आणि वाढत वाढत जाताना लंच ब्रेकमधील गोष्टीचे स्वरुप बदलत बदलत गेले. दिग्दर्शक लंच (Lunch break) असे म्हणताच अनेक कलाकार व्हॅनिटीत जातात. गायबच होतात. कोणी युनिटचा तर कोणी घरका खाना खात असते पण आजच्या युगात बाहेरचे खाणे वेळेत पोहचण्याच्या संस्कृतीनुसार ते थेट अनेक व्हॅनिटीत जाते. ऑनलाईन बुकिंगमुळे शूटिंगच्या आसपासचे उत्तमोत्तम खाण्याचे स्पाॅट माहित होतात आणि पदार्थ गरम असतानाच डिलिव्हरी व्हॅनिटीत पोहचते. त्यात पूर्वीसारखा एकत्र येऊन जेवणाचा आनंद नसला तरी अशा गोष्टी जणू ब्लॅक अँड व्हाईट काळात जमा झाल्यात. दिलीपकुमार, राज कपूर, शंकर जयकिशन, रामानंद सागर वगैरे एकत्र जेवण्याचा आनंद घेत असल्याचा फोटो म्हणूनच जास्त बोलतो. बरं आज फिटनेस, आपलं वजन याला जास्तच महत्व आल्याने खाण्यापिण्यावर आपणच घातलेली बंधने, पत्थ या गोष्टी अधिकच महत्वाच्या झाल्यात. जुन्या गोष्टींची चव काही वेगळीच असते. त्याचीच आठवण काढत पोट भरायला हवे आणि हो फिल्मवाल्यांची ओली पार्टी, चिअर्स कल्चर ही संस्कृतीच वेगळी, बहुस्तरीय आणि कलरफुल. त्याच्या गोष्टीच वेगळ्या. त्या पुन्हा कधी तरी…