गुरुदत्तच्या या सिनेमाच्या प्रीमियरला उपराष्ट्रपतींची उपस्थिती
हिंदी चित्रपट सृष्टीत उणीपुरी बारा तेरा वर्ष काम करून आपल्या कार्य कर्तृत्वाचा आगळावेगळा ठसा उमटवणारे दिग्दर्शक म्हणजे गुरुदत्त. गुरुदत्त यांचे चित्रपट अभिजात कलाकृती म्हणून ओळखले जातात. आज त्यांचे चित्रपट जगभरात अनेक चित्रपट महोत्सवात आवर्जून दाखवले जातात शिवाय अनेक विद्यापीठात त्यांच्या चित्रपटांवर अभ्यास देखील केला जातो. काळाच्या पुढचा दिग्दर्शक म्हणून त्यांना ओळखले जाते. (Gurudatta)
गुरुदत्त यांच्या ‘प्यासा’ (१९५७) या चित्रपटाने त्यांच्या कर्तृत्वाने कळसाध्याय गाठला. क्लासेस आणि मासेस या दोन्ही गटांमध्ये या चित्रपटाला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आज देखील भारतातील टॉप टेन चित्रपटांची यादी केली जाते त्यात ‘प्यासा’ या चित्रपटाचा आवर्जून समावेश केला जातो. हा चित्रपट बनत असतानाच गुरुदत्त यांच्या डोक्यात त्यांच्या पुढच्या चित्रपटाचे विचार चालू झाले होते. हा चित्रपट त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा होता. महत्त्वकांक्षी होता. चित्रपट होता ‘कागज के फूल’. हा चित्रपट अतिशय तरल पातळीवर जाऊन त्यांनी बनवला होता.
यातील प्रत्येक फ्रेमची आज देखील चर्चा होते. गुरुदत्त यांचे छायाचित्रकार व्ही के मूर्ती यांनी या सिनेमासाठी केलेले चित्रीकरण आज देखील अभ्यासले जाते. यातील लाईट अँड शेड चा वापर आज देखील अचंबित करणार आहे. चित्रपटाची गाणी कैफी आजमी यांची होती तर संगीत सचिन देव बर्मन यांचे होते. ‘वक्त ने किया क्या हसी सितम’ हे गीता दत्त यांनी गायलेले आणि ‘बिछडे सभी बारी बारी’ हे मोहम्मद रफी यांनी गायलेले गाणे अप्रतिम बनले होते. चित्रपट अतिशय मन लावून बनवला होता. गुरुने आपल्या सर्वस्व त्यात टाकले होते. भारतातील हा पहिला सिनेमा स्कोप चित्रपट होता. (Gurudatta)
गुरुदत्त वहिदा रहमान यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात होत्या. अतिशय आत्मीयतेने आणि आत्मविश्वासाने बनवलेल्या या चित्रपटातील गुरुदत्त यांना खूप अपेक्षा असणे साहजिकच होते. पण झाले होते उलटेच. चित्रपट सुपरफ्लॉप झाला. गुरुदत्त च्या सर्व स्वप्नांवर पाणी पडले गेले. यानंतर पुन्हा कधीही गुरुदत्त ने आयुष्यात चित्रपटाचे दिग्दर्शन केले नाही. यानंतर चे गुरुदत्त फिल्म चा ‘चौदहवी का चांद’ हा चित्रपट एम सादिक यांनी तर ‘साहिब बीबी और गुलाम’ हा चित्रपट अब्रार अल्वी यांनी दिग्दर्शित केला.
‘कागज के फूल’ या चित्रपटाचा प्रीमियर दोन ठिकाणी झाला होता. मुंबईला मराठा मंदिर येथे तर दिल्लीला ‘रीगल’ या थिएटर मध्ये! दिल्लीच्या प्रीमियरला गुरुदत्तने प्रशासनातील तसेच राजकारणातील आपल्या मित्रमंडळीला आमंत्रित केले होते. या दिल्लीच्या प्रीमियरला त्यांनी तत्कालीन भारताचे उपराष्ट्रपती(आणि नंतर राष्ट्रपती बनलेल्या) डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना देखील बोलावले होते. उपराष्ट्रपती अतिशय अभ्यासू आणि कलाक्षेत्राची आवड असलेले होते. (Gurudatta)
२५ सप्टेंबर १९५९ रोजी झालेल्या दिल्लीच्या रीगल थिएटरमध्ये झालेल्या प्रीमियरला उपराष्ट्रपती महोदय उपस्थित होते. त्यांनी संपूर्ण चित्रपट अत्यंत आवडीने बघितला आणि या चित्रपटात बद्दल समाधान देखील व्यक्त केले. खरंतर उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आपल्या व्यस्त कार्यबाहुल्या मुळे चित्रपटापासून खूप दूर असायचे कदाचित त्यांच्या आयुष्यातील एकमेव प्रीमियर असावा ज्याला ते उपस्थित राहिले. त्यांच्या या प्रीमियर उपस्थितीचा फोटो काही दिवसांपूर्वी शिक्षक दिनाच्या दिवशी खूप व्हायरल झाला होता. (Gurudatta)
========
हे देखील वाचा : भारतातील पहिला एक कोटी रुपये बजेट असलेला सिनेमा
========
जाता जाता थोडंसं कागज के फूल या चित्रपटाबद्दल. चित्रपट रसिकांकडून आणि समीक्षकांकडून त्या काळात अजिबात पसंतीची पावती मिळाली नाही असा चित्रपट म्हणजे कागज के फूल. याचाच अर्थ क्लासेस आणि मासेस या दोन्ही ठिकाणी हा चित्रपट त्या काळात चालला नाही. परंतु नंतरच्या काळात मात्र विशेषत: त्या सत्तरच्या दशकानंतर गुरुदत्तच्या चित्रपटाचा जगभर अभ्यास सुरु झाला. ‘कागज के फूल’ हा चित्रपट तर आता क्लासिक बनला होता. आज अनेक विद्यापीठातील चित्रपट विषयक अभ्यासाचा एक सिल्याबस झाला आहे. गुरुदत्त मात्र या अपयशाने पुरता खचला. पुन्हा त्याने कधीही ऑफिशिअली कुठल्याही सिनेमाचे दिग्दर्शन केलं नाही. या चित्रपटाला फिल्मफेअरचे दोन पारितोषिक मिळाले होते. पहिले पारितोषिक सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार व्ही के मूर्ती आणि दुसरे पारितोषिक सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक एम आर आचरेकर यांना मिळाले.
गुरुदत्त ला मात्र जगभर आपल्या सिनेमाला पसंतीची पावती मिळाते आहे हे पाहता आलं नाही हेच खरं दुर्दैव.