दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
रिमेक येतेय तोच मूळ पिक्चरही डब? काय चाललंय काय?
पिक्चरच्या जगात कधी काय नि काय घडेल हे सांगता येत नाही. हीच तर या क्षेत्राची गंमत आहे… आपण तो एन्जाॅय करायचा.
तुम्हालाही माहीत आहे, अक्षय कुमारचा “सरफिरा” (Sarfira) येतोय. मल्टीप्लेक्समध्ये कोणताही चित्रपट पाह्यला जावे, सोशल मिडियात डोकवावे तर “सरफिरा”चा ट्रेलर पाह्यला मिळतोय. जनसामान्यांना परवडेल अशा दरात विमान प्रवास असे वेगळे नि अवघड स्वप्न पाहून ते पूर्ण करण्याची प्रचंड धडपड करणाऱ्या युवकाची ही गोष्ट आहे हे ट्रेलरमधून लक्षात येतेय.
आज आपल्याकडे अनेक गोष्टींवर चित्रपट निर्माण होताहेत, बरेच भिन्न कन्टेन (काॅन्सेप्ट) वर चित्रपट बनताहेत. थीममध्ये बरीच विविधता आहे. (काही चित्रपट मांडणीत फसतातही. हेही सांगायलाच हवे.) डब आणि रिमेक यांचेही सातत्य कमालीचे आहे. आजच्या पॅन इंडिया चित्रपट निर्मिती युगात एका भाषेतील चित्रपट अन्य काही भाषेत डब करीत जगभरातील अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचताहेत. व्यवसायवृध्दी झालीय. “सरफिरा” (Sarfira) हा “सुरराई पोत्तरु” (२०२०) या तमिळ भाषेतील चित्रपटाचा रिमेक. या चित्रपटात सूर्या, अपर्णा बालमुरली, परेश रावल, मोहन बाबू, उर्वशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती सूर्या, ज्योतिका व गुनीम मोगरा यांची आहे. दिग्दर्शन सुधा कोंगरा यांचे आहे.
चित्रपटाची थीम चांगली आहे. रसिकांनाही आवडली. चित्रपट सुपरहिट झाला. तो हिंदीत रिमेक करण्याचे पाऊल टाकले गेले. अबंडंटिया एन्टरटेन्मेन्ट, टू डी एन्टरटेन्मेन्ट आणि केप ऑफ गुड फिल्म यांनी “सरफिरा”ची (Sarfira) निर्मिती केली. त्यात महत्वाची गोष्ट, मूळ चित्रपटाच्याच दिग्दर्शकांकडेच अर्थात सुधा कोंगराकडेच या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि चित्रपटात अक्षयकुमार, राधिका मदन, परेश रावल, सीमा विश्वास व आर. सरथकुमार यांच्या प्रमुख भूमिका. दोन्ही चित्रपटात परेश रावल ही काॅमन गोष्ट. असंही होत असते.
“सरफिरा”ची (Sarfira) पूर्वप्रसिध्दी अतिशय फोकस्ड सुरु असतानाच “उडान” या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मिडियात पाह्यला मिळाला. पाहतो तर काय? “सेम टू सेम” सरफिराच. तीच गोष्ट, तेच विमान, नायकाचे तेच स्वप्न, तोच त्याचा संघर्ष. अर्थात, “सुरराई पोत्तरु” या तमिळ चित्रपटाची ही डब आवृत्ती.
व्यावसायिकदृष्ट्या हे धक्कादायक. ज्या चित्रपटाची रिमेक प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज असतानाच तोच मूळ तमिळ चित्रपट हिंदीत डब होवून येतोय. रसिक प्रेक्षकांनी कोणता चित्रपट एन्जाॅय करायचा? रिमेक की डब? एकाच थीमवरचे दोन चित्रपट एकाच वेळेस प्रदर्शित होणे नवीन नाही. शहीद भगतसिंग यांच्यावरील तीन चरित्रपट एकाच शुक्रवारी रिलीज झाले. त्यात अजय देवगनची भूमिका असलेल्या “द लीजण्ड ऑफ भगतसिंग” या चित्रपटाने बाजी मारली. आपण कोणता चित्रपट पहावा हे रसिकांना नक्कीच समजते. तो निर्णय त्यांचा.
पूर्वीही अशा घडलेल्या गोष्टी मला आठवताहेत, आपण “धूम धडाका“( १९८५) हा चित्रपट श्रीधर दिग्दर्शित “प्यार किये जा“(१९६६) या मनोरंजक चित्रपटाची रिमेक बनवलाय हे निर्माता, दिग्दर्शक व अभिनेता महेश कोठारे याने कधीच लपवले नाही. पुणे शहरात “धूम धडाका” रिलीज होण्याच्या दिवशीच पुणे शहरातच त्या चित्रपटाच्या वितरकाने “प्यार किये जा” रिपीट रनला प्रदर्शित करताच महेश कोठारेंनी श्रीधर यांना हे कळवले. असे एकाच वेळेस एकाच पध्दतीचे दोन चित्रपट जवळपासच्या चित्रपटगृहात असल्याचा “धूम धडाका”ला विनाकारण फटका बसण्याची शक्यता होती. श्रीधर यांनी तसे काहीच होणार नाही, “धूम धडाका” खूपच मजेशीर चित्रपट आहे असे सांगत महेश कोठारेला दिलासा दिला. “धुम धडाका” जबरदस्त ज्युबिली हिट ठरला.
=======
हे देखील वाचा : एक वर्ष झाले तरी ‘बाईपण भारी देवा’ची सक्सेस स्टोरी सुरुच….
=======
विनय लाड दिग्दर्शित “पटली रे पटली“( १९९०) हा धमाल चित्रपट ज्योती स्वरुप दिग्दर्शित “पडोसन“( १९६८) या सर्वकालीन मजेशीर चित्रपटाची रिमेक असल्याची वारेमाप चर्चा रंगली. त्याचा उलटा परिणाम झाला. “पटली रे पटली” आणि “पडोसन” चक्क एकाच शुक्रवारी रिलीज झाले. अर्थात, “पडोसन” रिपीट रनला होता पण तरी तो मुंबईत अनेक चित्रपटगृहात प्रदर्शित करताना वृत्तपत्रात जाहिरातही दिली गेली. “पटली रे पटली”मध्ये लक्ष्मीकांत बेर्डेने धमाल उडविल्याने रंजकता आली.
चित्रपट क्षेत्रातील व्यावसायिक स्पर्धेत कधीही काहीही घडू शकते. रिमेक व डब हे दोन प्रकार तर असे आहेत की “गेम कधी नि कसा पलटेल” हे सांगताच येत नाही. कधी चित्रपट रसिकही आपला एक निर्णय घेतात, “रामगोपाल वर्मा की आग” ( २००७) हा चित्रपट पाहण्यापेक्षा पुन्हा ओरिजनल असा रमेश सिप्पी दिग्दर्शित “शोले“( १९७५) पाहतात. कितीही वेळा “शोले” पहावा तोच थरार नि तसेच नाट्य…