कहाणी कैफी आझमीच्या शौकत वरील प्रेमाची आणि निकाहची !
गीतकार कैफी आझमी (Kaifi Azmi) साठ आणि सत्तरच्या दशकातील आघाडीचे गीतकार. आज रसिक त्यांना अभिनेत्री शबाना आझमीचे वडील म्हणून ओळखतात. समाजवादी विचारसरणीच्या कैफी यांनी कागज के फूल, हकीकत, अनुपमा, पाकिजा या सिनेमातील गाणी अप्रतिम होती. कैफी यांच्या शब्दांची जादू अफाट होती. ‘वक्त ने किया क्या हंसी सितम‘, ‘कर चले हम फिदा जानो तन साथियो’, ‘ धीरे धीरे मचल ऐ दिल ए बेकरार’ , ‘आज सोचा तो आंसू भर आये’ हि गाणी आजही रसिकांच्या स्मरणात आहेत.
कैफी आझमी (Kaifi Azmi) आणि शौकत आझमी यांची प्रेम कहाणी खूपच हटके आहे. जेव्हा या दोघांचा प्रेम जमलं त्यावेळी कैफी अक्षरशः कफल्लक होते. एक फुटी कवडी त्यांच्याकडे नव्हती. पण अशाही अवस्थेत सधन घरातील शौकत यांनी त्यांच्यावर मनापासून प्रेम केलं. खरं तर कैफी आजमगड उत्तर प्रदेश मधील. देशभर मुशायरामध्ये ते सहभागी होत असत. शौकत त्यांच्या शायरीचे पहिल्या पासून चाहती होती. १९४२ साली हैदराबाद येथे एक मुशायरा होता. तिथे कैफी (Kaifi Azmi) गेले होते. शौकत या हैदराबादच्या सधन घरातील. उर्दू साहित्याची मोठी अभ्यासक. कैफी हैदराबादला आल्यानंतर ती त्यांना भेटायला गेली.
पहिल्याच भेटीत दोघांच्या मनाची तार जुळली. शौकत कैफीच्या साहित्याने मोहित झाली होती. कैफीला (Kaifi Azmi) शौकतचे सात्विक सौंदर्य आवडले होते. हैदराबादच्या त्या भेटीत दोघांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. मुंबईत गेल्यावर कैफी रोज शौकतला पत्र पाठवायचा. काही पत्रे तर रक्ताने लिहिलेली असायची. दोघांचे परस्परांवर सच्चे प्रेम होते. दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता पण हा निर्णय सोपा नव्हता. कारण दोघांच्या परिस्थितीमध्ये जमीन अस्मानचा फरक होता. कैफी (Kaifi Azmi) अक्षरशः कंगाल होता. ‘मुफलीसी जिंदगी’ जगत होता. मुंबईत राहायला घर नव्हते. त्यात पुन्हा शौकतची एंगेजमेंट तिच्या सख्ख्या चुलत भावाशी झाली होती. त्यामुळे कैफी सोबत निकाह करायचा तर घरच्यांशी संघर्ष अटळ होता.
शौकतने पहिल्यांदा चुलत भावासोबत झालेली एंगेजमेंट मोडून टाकली आणि आपण कैफी (Kaifi Azmi) सोबत लग्न करणार आहोत असे जाहीर केले. या प्रेम प्रकरणाची सुरुवात १९४२ साली झाली होती तेव्हा घरच्यांच्या दृष्टीने हा फार मोठा डिसिजन होता. शौकत आपल्या निर्णयावर कायम होती. तिच्या घरच्यांनी तिला हर प्रकारे समजावून सांगितले कैफी (Kaifi Azmi) हा कफल्लक शायर असून त्याच्याकडे फुटी कवडी देखील नाही राहायला घर नाही. तो मुंबईला झोपडपट्टीत आश्रित म्हणून राहतो. तू एक श्रीमंत घरातील मुलगी आहेस. तुला हे जगणं परवडेल का? त्यावर काही शौकत म्हणाली,” मी खूप विचार करून हा निर्णय घेतला आहे. आणि मी माझ्या निर्णयावर ठाम आहे.
शेवटी शौकतचे वडील तिला घेऊन मुंबईला घेवून गेले. हेतू हा होता की तिला सच्चाई कळेल. कैफी (Kaifi Azmi) कुठल्या परिस्थितीत राहतो. काय संघर्ष आपल्या वाट्याला येणार हे समजल्यानंतर ती आपोआप आपल्या निर्णयापासून परावृत्त होईल. पण झाले उलटेच. शौकत म्हणाली,” मी आनंदाने कैफी सोबत गरीबी मध्ये राहायला तयार आहे. आमच्या दोघांचा प्रेम आम्हाला संघर्ष करायला बळ देईल. पण आयुष्यात आता मी कैफी शिवाय दुसरा कुठलाच विचार करू शकत नाही.”
==============
हे देखील वाचा : देव आनंद खरोखरच झीनत अमानच्या प्रेमात पडला होता?
==============
शौकतचे हे बोल ऐकून तिचे वडिलांनी मोठ्या मनाने दोघांच्या मी निकाहला परवानगी दिली. कैफी (Kaifi Azmi) स्वाभिमानी होते त्यांनी शौकतच्या वडलांकडून एक पैसा हि घेतला नाही. निकाहच्या वेळी शादी काय जोडा घ्यायला देखील पैसे नव्हते. त्याच्या मित्रांनीच वर्गणी करून त्यांच्या निकाहचा खर्च केला.