‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
किस्सा शम्मी कपूरच्या पहिल्या वहिल्या कारचा!
प्रत्येकाला आपल्याला आपल्या पहिल्या गोष्टीचं खूप प्रेम असतं. मग ते पहिलं घर असेल,पहिली नोकरी असेल, पहिला मित्र/मैत्रीण असेल, पहिलं प्रेम असेल किंवा पहिली गाडी असेल… आयुष्यभर माणूस या पहिल्या गोष्टीला कधीच विसरत नाही. अभिनेता शम्मी कपूर देखील त्याच्या पहिल्या कारला कधीच विसरला नाही. ही कार त्याच्या इतक्या आवडीची होती की, तो नेहमी या कारमध्ये बसूनच फोटो काढून घ्यायचा. त्याचा त्याच्या गाडीसोबतचा एक फोटो १९५५ सालच्या ‘फिल्म फेअर’ कव्हर पेजवर झळकला होता. या गाडीच्या खरेदीचा किस्सा मोठा मनोरंजक आहे. (Shammi Kapoor)
शम्मी कपूरने (Shammi Kapoor) आपल्या पुस्तकात ही आठवण लिहिली आहे. शम्मीला कारचा शौक लहानपणापासूनच होता. त्याच्या वडिलांकडे (पृथ्वीराज कपूर) यांच्याकडे ओपल ऍस्ट्रो कार होती तर मोठा भाऊ राज कपूरकडे फोर्ड गाडी होती. या दोन्ही गाड्यातून त्याने भरपूर प्रवास केला होता. पण त्याला त्याची स्वतःची गाडी हवी होती. ती देखील स्वतःच्या पैशाने खरेदी केलेली. त्यामुळे त्याचं एक स्वप्न होतं की, आपल्याकडे पैसे आले की पहिल्यांदा एक कार घ्यायची. १९५२ साली शम्मी कपूरला पहिला चित्रपट मिळाला कारदार फिल्म्सचा ‘जीवन ज्योती’ हा चित्रपट १९५३ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक होते ए आर कारदार. या सिनेमासाठी शम्मी कपूरला सायनिंग अमाउंट म्हणून चक्क १११११/- रुपये मिळाले होते. ही रक्कम त्याकाळी खूप मोठी होती. आणि शम्मी कपूरसाठी तर खूपच मोठी होती.(Shammi Kapoor)
कारण तोपर्यंत शम्मी कपूर (Shammi Kapoor) आपल्या वडिलांच्या पृथ्वी थिएटर्स मध्ये काम करत होता तिथे त्याला महिन्याला तीनशे रुपये पगार मिळत होता. पण इथे त्याला मोठी रक्कम मिळाली होती. त्याने ठरवले आता या पैशातून आपले पहिले स्वप्न पूर्ण करायचे. कारदार यांनी जेव्हा सायनिंग अमाउंटचा चेक त्याच्या हाती दिल तेव्हा त्यांनी शम्मी कपूर विचारले,” या पैशाचे तू काय करणार?” तेव्हा त्याने सांगितले,” या पैशातून मी कार घेणार आहे!” तेव्हा कारदार यांनी सांगितले,” नक्की घे. पण कार घेताना नवीनच कार घे. जुनी सेकंड हॅन्ड कार अजिबात घेऊ नकोस!” या एवढ्या पैशांमध्ये नवीन कार घेणे शक्यच नव्हते. त्यामुळे त्याने कारदार यांचा सल्ला ऐकला नाही. शम्मी कपूर स्वाभिमानी होता कुणाकडे हात पसरणे त्याला आवडत नव्हते.
त्याच्या मनात एक कार होती. कारण नुकतीच त्यांनी त्याच्या घराजवळच्या एका सेकंड हॅन्ड कार डीलरकडे एक कार बघितली होती. ती कार त्याला खूप आवडली होती. ही कार होती buick convertible. लगेच तो त्या कार डीलरकडे गेला. परंतु पैशाचे गणित जमेना. तेव्हा त्याच्या मदतीला धाऊन आला त्याचा एक मित्र. हा मित्र होता निर्माता दिग्दर्शक अस्पी इराणी. अस्पी इराणी आणि कार डीलर चुनावाला हे चांगले मित्र होते. त्यामुळे कार डीलरने शम्मी कपूरला हफ्त्यावर गाडी द्यायचे ठरवले. परंतु त्यासाठी पाच हजार रुपये डाऊन पेमेंट द्यायचे ठरले आणि पुढील रक्कम दोन वर्षांमध्ये समान हफ्त्यामध्ये द्यायचे ठरले. हे डाऊन पेमेंट अस्पी इराणी यांनीच केले! अस्पी इराणीमुळे ही डील होऊ शकली. हे डाऊन पेमेंट अस्पी इराणी यांनी, शम्मी कपूर सोबत एक चित्रपट करताना सायनिंग अमाऊंट म्हणून वापरले हा चित्रपट १९५३ साली आलेला ‘गुल सनोबर’.
======
हे देखील वाचा : या मराठी संगीतकाराने दोन ‘भारतरत्न’ स्वरांना एकत्र आणले!
======
शम्मी कपूरला (Shammi Kapoor) आवडलेली ही गाडी के आसिफची बायको निगार सुलताना (जिने पुढे मुगल ए आजम मध्ये बहारची भूमिका केली होती!) हीची होती. अशा पद्धतीने १९५२ साली आपली पहिली गाडी विकत घेतली. ही गाडी त्याला इतकी आवडली की, पुढे तो या गाडीतूनच सगळीकडे फिरत असायचा आणि या गाडीत बसून फोटो देखील काढायचा. १९५५ साली जेव्हा फिल्म फेअर फोटो सेशन करायचे होते तेव्हा त्याने या कारमध्ये बसूनच फोटो काढला आणि तोच फोटो मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकला. पुढे शम्मी कपूरच्या आयुष्यामध्ये अनेक कार आल्या पण पहिल्या कारला तो अजिबात विसरला नाही. शंभर कपूरला ड्रायव्हिंगची खूपच आवड होती. त्यामुळे उतार वयात शेवटी त्याला जेव्हा डायलिसिसला जायचे असेल तेव्हा देखील तो स्वतः कार ड्राईव्ह करत हॉस्पिटलला जात असे. त्याने सांगितले की, बऱ्याचदा रविवारी तो लॉंग ड्राईव्हला एकटाच कार घेऊन लोणावळ्याला जायचा आणि फक्त कॉफी पिऊन परत यायचा. तर हा किस्सा होता शम्मी कपूरच्या पहिल्या कारचा आणि त्याच्या कारवरच्या प्रेमाचा!