किस्सा ‘कयामत से कयामत तक’च्या गाण्याच्या मेकिंगचा!
आमिर खान आणि जूही चावला यांचा १९८८ सालचा ‘कयामत से कयामत तक’ हा चित्रपट म्युझिकल हिट तर होताच पण या चित्रपटापासून पुन्हा एकदा संगीतमय चित्रपटांची सुरुवात झाली होती. या सिनेमाचे दिग्दर्शन मन्सूर खान यांनी केले होते. आमिर खान यांचे काका नासिर हुसेन यांची ही चित्र निर्मिती होती. हा चित्रपट खऱ्या अर्थाने तरुणाईचा होता. कारण आमिर खान – जूही चावला यांचा हा पहिला हिट चित्रपट होता. संगीतकार आनंद मिलिंद (Anand-Milind) यांनी या सिनेमापूर्वी चार-पाच सिनेमांना संगीत दिलं होतं पण त्यांना खरी ओळख या चित्रपटापासूनच मिळाली.
गायक उदित नारायण आणि गायिका अलका याज्ञिक यांच्यासाठी देखील हा चित्रपट महत्त्वाचा होता. या सिनेमाचे गीतकार मात्र एकदम सिनियर होते ‘मजरूह सुलतानपुरी’. या सिनेमातील दोन गाण्यांबाबत संगीतकार आनंद-मिलिंद (Anand-Milind) यांनी एका मुलाखतीत खूप इंटरेस्टिंग अशा माहिती सांगितली आहे. ते सांगतात, ”यातील दोन गाण्यांना संगीत देताना आमचा कस लागला होता.” कोणती होती ती दोन गाणी आणि काय होता तो नेमका किस्सा? खरं तर मन्सूर खान यांना चित्रपटात जास्त गाणी नको होती पण जी काही गाणी असणार होती ती खूप मेलडीयस असावी असं त्यांना वाटत होतं.
सर्वजण वयाने तरुण असल्यामुळे मस्त गृप जमला होता. समवयस्क असल्याने अगदी गप्पा मारत मारत गाणी बसली जायची. मन्सूर खान यांच्याकडे त्या वेळी एक लाल रंगाची मारुती व्हॅन होती. या सिनेमातील बऱ्याचश्या गाण्याच्या सीटिंग्स या मारुती व्हॅनमध्ये झाल्या होत्या! ही मारुती व्हॅन ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटात देखील बऱ्याचदा दाखवली होती. एकदा असंच गप्पांमध्ये आनंद मिलिंद यांनी ट्यून तयार केली आणि त्यावर गाणं व्हायला हवं असं सर्वांना वाटलं. या सिनेमाचे गाणी गीतकार मजरूह सुलतानपूर लिहिणार होते. मजरूह सुलतानपूरी आणि नासीर हुसेन यांचे संबंध १९५७ सालच्या ‘तुमसा नही देखा’ पासून होते.
मजरूह भारतीय सिनेमातील ज्येष्ठ गीतकार. त्यांनी कुंदनलाल सहगल यांच्यासाठी देखील एक गाणं लिहिलं होतं! त्यामुळे आपण तयार केलेल्या उडत्या चालीच्या ट्यूनवर मजरूह यांना गाणे लिहायला सांगणे त्यांना प्रशस्त वाटत नव्हतं. ते भीत भीतच मजरूह सुलतानपूर यांच्याकडे गेले आणि आपली धून त्यांना वाजवून दाखवली. मजरूह यांना ती धुन खूप आवडली आणि ते म्हणाले, ”अरे वा, बहुत बढीया. बिलकुल नया है. अलग अंदाज है. कुछ अलग लिखने को मिलेगा!” आनंद-मिलिंद यांच्या मनावरचे ओझे उतरले. नंतर त्यांनी या ट्यूनवर शब्द लिहिले. ते गाणं होतं ‘गजब का है ये दिल सोचो जरा ये दिवानापन सोचो जरा हम भी अकेले तुम भी अकेले मजा आ रहा है कसम से…’
याच सिनेमातील दुसऱ्या एका गाण्याबद्दल बोलताना आनंद मिलिंद यांनी आणखी एक भन्नाट किस्सा सांगितला. एकदा सकाळी चित्रपटाचे निर्माते नासिर हुसेन यांचा आनंद मिलिंद (Anand-Milind) यांना फोन आला आणि ते म्हणाले, ”काही नवीन ट्यून तयार केली आहे का?” आता निर्मात्याचाच फोन त्यामुळे त्यांना नाही म्हणणं शक्यच नव्हतं. ते खोटं खोटंच म्हणाले,”हो तयार केली आहे!” त्यावर नासिर हुसेन म्हणाले, ”अरे वा. मग मी आत्ता स्टुडिओ जाताना तुमच्या घरी येतो मला ती ट्यून ऐकवा!” आता आली का पंचाईत. कारण आनंद – मिलिंद यांनी अशी कुठलीही ट्यून तयार केली नव्हती आणि त्यांना असे वाटले नव्हते की निर्माते लगेच येतील पण आता तर शब्द देऊन बसलो काय करायचे ?
==========
हे देखील वाचा : …आणि तलतच्या स्वरात रेकॉर्ड झालेली गाणी सिनेमातून काढून टाकण्यात आली!
==========
आनंदने लगेच गिटार काढली आणि त्यावर एक पीस वाजून दाखवला. मिलिंद यांनी त्यात थोड्या सुधारणा सांगितल्या. जेव्हा कसोटीचा क्षण असतो तेव्हा मेंदू पण झरझर काम करू लागतो. नवीन नवीन ट्यून त्यांच्या डोक्यात तयार होत होत्या आणि एक ट्यून त्यांनी फायनल केली लगेच त्यांनी कॅसेट काढली. त्या कॅसेटवर ती रेकॉर्ड केली आणि दाराची बेल वाजली! दारात नासिर हुसेन साहेब आले होते. त्यांनी विचारले, ”ट्यून तयार आहे?” हे म्हणाले, ”हो तयार आहे!” नासिर हुसेन यांना ती ट्यून ऐकवली त्यांना प्रचंड आवडली.
त्यावर लगेच मजरूह गाणं तयार झालं ‘ऐ मेरे हमसफर इक जरा इंतजार …’ हे गाणं देखील खूप मेलडीयस बनलं होतं. ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातील सर्वच गाणी सुंदर झाली होती. ‘पापा कहते है बडा नाम करेगा…’ या गाण्याने आमिर खानला हिरो बनवून टाकले. या गाण्याच्या चित्रीकरणापूर्वी आमिर खानने गिटार वाजवण्याच्या काही ट्रिक्स शिकून घेतल्या होत्या!