‘तेरा मेरा साथ रहे…’ गाण्याच्या रेकॉर्डिंगचा भावस्पर्शी किस्सा !
आज २८ सप्टेंबर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा जन्मदिन ! याच निमित्ताने त्यांच्या एका गाण्याचा हा किस्सा. राजश्री प्रॉडक्शनच्या स्मॉल बजेट चित्रपटांना संगीत देत देत संगीतकार रवींद्र जैन (Ravindra jain) यांनी ऐंशीच्या दशकामध्ये आर.के.फिल्मच्या चित्रपटांना संगीत दिले ही त्यांच्या कर्तृत्वाची मोठी झेप होती. खरं तर रवींद्र जैन (Ravindra jain) हे आपल्या शारीरिक न्यूनतेवर मात करत प्रचंड मोठे यश मिळवत होते. राज कपूरच्या चित्रपटांना संगीत देणे हे सर्व संगीतकारांचे स्वप्न असते ते संगीतकार रवींद्र जैन (Ravindra jain) यांनी साध्य केले. १९८५ साली प्रदर्शित झालेल्या ‘राम तेरी गंगा मैली’ आणि १९९१ साली प्रदर्शित झालेल्या ‘हिना’ या चित्रपटाला रवींद्र जैन यांचे संगीत होते.
सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला रवींद्र जैन (Ravindra jain) मुंबईमध्ये आले. रवींद्र जैन हे अंध होते. असे असतानाही त्यांनी आपले सांगीतिक शिक्षण पूर्ण केले आणि चित्रपटाला संगीत देण्यासाठी ते मायानगरीत आले. आपल्या चित्रपटात लता मंगेशकर यांचा स्वर असावा हे त्यांचे फार वर्षापासूनचे स्वप्न होते. सुरुवातीच्या काळातच त्यांना राधेश्याम यांचा ‘लोरी’ हा चित्रपट संगीतबद्ध करायला मिळाला. या चित्रपटात लताचे गाणे असावे असे त्यांना खूप वाटले म्हणून त्यांनी निर्माते राधेश्याम यांना त्या पद्धतीने प्रयत्न करायला सांगितले. (Ravindra jain)
राधेश्याम यांनी लता मंगेशकर यांना संपर्क करून सांगितले “एक नवीन संगीतकार माझ्या चित्रपटाला संगीत देत आहे जो तुमच्या स्वरांचा मोठा चाहता आहे. त्याची इच्छा आहे की त्याच्या पहिल्या चित्रपटात तुमच्या स्वरातले एखादे गाणे असावे.” लताने त्यांची इच्छा पूर्ण केली. ‘लोरी’ या चित्रपटात एक गीत गायले. पण दुर्दैवाने हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. यानंतर राधेश्याम यांच्याच दुसऱ्या एका चित्रपटाला रवींद्र जैन (Ravindra jain) संगीत देत होते. यातदेखील लताचा स्वर होता यातील स्वररचना ऐकून लता मंगेशकर एवढ्या खूष झाल्या की त्यांनी आपल्या मानधनातील काही पैसे आशीर्वादपर रवींद्र जैन यांना देऊन टाकले! पण दुर्दैवाने हा चित्रपट देखील डब्यात गेला. (Ravindra jain)
यानंतर रवींद्र जैन (Ravindra jain) यांना राजश्री प्रॉडक्शनचा ‘सौदागर’ हा चित्रपट मिळाला. या चित्रपटात अमिताभ बच्चन, नूतन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. तोवर अमिताभ स्टार झाला नव्हता. आधीचे दोन अनुभव बघता रवींद्र जैन (Ravindra jain) या चित्रपटाबाबत आश्वस्त होते कारण राजश्री हे मोठे बॅनर होते. त्यामुळे हा सिनेमा नक्की पडद्यावर येणार याची त्यांना खात्री होती. या चित्रपटात लता मंगेशकर यांच्या स्वरातील ‘तेरा मेरा साथ रहे धूप हो छाया हो दिन हो के रात रहे…’ हे गीत होते.
हे गाणे लताकडून त्यांना गाऊन घ्यायचे होते. तो स्वर लक्षात घेवूनच त्यांनी ट्यून बनवली होती. गीत त्यांनी स्वत:च लिहिले होते. ‘गारा’ या रागात चाल बांधली होती. लता मंगेशकर यांना परदेशात जायचं असल्यामुळे त्यांनी गाण्याचे रेकॉर्डिंग करायला तारीख रवींद्र जैन (Ravindra jain) यांना कळवली. गाण्याच्या रिहर्सल झाल्या. रवींद्र जैन (Ravindra jain) खूप आनंदी झाले. पण दुर्दैवाने गाण्याच्या रेकॉर्डिंगचा आदल्या दिवशीच त्यांना अलिगढ होऊन एक टेलिग्राम आला. त्यात त्यांच्या वडिलांच्या निधनाची दुःखद वार्ता होती.
रवींद्र जैन यांना खूप दुःख झाले. वडिलांचे छत्र हरवले होते. पण त्याचवेळी कर्तव्य देखील समोर होते. लता मंगेशकर यांनी त्यांच्या मोठ्या बिझी शेड्युलमधून उद्याची तारीख दिली होती. काय करावे? एकीकडे भावना तर दुसरीकडे कर्तव्य. रवींद्र जैन (Ravindra jain) यांनी असा विचार केला किती जरी घाई केली तरी मी वडिलांच्या अंत्यसंस्काराला काही पोहोचू शकत नाही. जाणारा तर गेला त्याचे दु:ख आहेच पण उद्याचा एक आशेचा किरण देखील दिसत होता. द्विधा मनस्थितीत त्यांनी निर्णय घेतला “उद्या गाण्याचे रेकॉर्डिंग केल्यानंतर संध्याकाळी अलिगढला जाऊ”
सकाळी लता मंगेशकर रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये आल्या. रवींद्र जैन (Ravindra jain) यांनी त्यांना काहीही सांगितलं नाही. वादकांना देखील काहीही सांगितलं नाही आणि मनावर दगड ठेवून त्यांनी या गाण्याचे रेकॉर्डिंग सुरू केले. लता खूप भावोत्कट स्वरात गाऊ लागली ‘तेरा मेरा साथ रहे धूप हो साया हो दिन हो के रात रहे…’ रवींद्र जैन (Ravindra jain) यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. लता मंगेशकरला काचेतून दिसत होतं पण कळत नव्हतं काय झालं ?
===============
हे देखील वाचा : अभिनेत्री रेखाने नववीत असतानाच का शाळा सोडली?
===============
गाणं संपल्यानंतर लताने रवींद्र जैन (Ravindra jain) यांना विचारले. तेव्हा मात्र रवींद्र जैन यांचा बांध फुटला. त्यांनी सर्व प्रकार लताला सांगितला. लता मंगेशकर देखील खूपच भारावल्या. त्या म्हणाल्या,”दादा तुम्ही ग्रेट आहात. बाबूजी आता जिथे असतील तिथून ते तुमच्याकडे पाहत आहेत आणि ते नक्कीच आनंदी असतील!” रवींद्र जैन (Ravindra jain) यांनी हा किस्सा रेडिओच्या एका मुलाखतीत सांगितला होता. ते म्हणाले “ ज्या ज्या वेळेला मी ‘सौदागर’ या चित्रपटातील हे गाणे ऐकतो त्यावेळी या रेकोर्डिंगची मला ती संपूर्ण सिच्युएशन आठवते.”