‘व्हीक्टरी स्टोरी’…. चला क्रिकेटच्या मैदानावर
(सिनेमाला कोणताही विषय वर्ज्य नाही हे लक्षात ठेवूनच वाचा तर वाचाल).
आता सिनेमाच्या पडद्यावरचे क्रिकेट असं म्हटलं रे म्हटलं की आशुतोष गोवारीकर (Ashutosh Gowariker) दिग्दर्शित ‘लगान’ (२००१) (Lagaan) ची अर्थात भुवनच्या (आमिर खान) ग्रामीण संघाची आठवण यायलाच हवी. एकिकडे तो पिरिऑडिकल सिनेमा असतानाच दुसरीकडे त्यात देशभक्तीची भावनाही चेतवली आहे आणि दोन्हीला क्रिकेटने छान जोडलयं. रुपेरी पडद्यावरचे फिल्मी क्रिकेटपासून (देव आनंदने आपल्या दिग्दर्शनातील ‘अव्वल नंबर’ या चित्रपटात क्रिकेटच साकारलय आणि त्यात आमिर खानही (Aamir Khan) होता. अर्थात, हीरो देव आनंदच), क्रिकेटपटूवरचा चरित्रपट (धोनी द अनटोल्ड स्टोरी अप्रतिम प्रभावी हाताळणीने खिळवून ठेवतो. महत्वाचे म्हणजे, रांचीसारख्या छोट्या शहरातून येऊनही मेहनत आणि निष्ठेने यशस्वी क्रिकेटर तसेच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार होता येते अशी जबरदस्त प्रेरणादायी अशी रियल स्टोरी यात आहे) अशी बरीच उदाहरणे देता येतील.
कदाचित तुम्हाला ‘व्हीक्टरी स्टोरी’ (The Victory Story) नावाचा क्रिकेटवरचा चित्रपट माहित नसावा. आपण नुकताच ऑस्ट्रेलियावर त्यांच्या देशात जाऊन २-१ असा विजय मिळवला तेव्हा त्याच चित्रपटाची आठवण येते. त्या चित्रपटातही आपल्या क्रिकेट संघाने २-१ नेच विजय मिळवला होता आणि ती फिल्मी पटकथा नव्हती तर तो खराखुरा विजय होता आणि तोदेखिल इंग्लंड संघाविरुध्दचा!
ती १९७२/७३ सालची मालिका होती. टोनी लुईसच्या नेतृत्वाखाली इंग्लिश क्रिकेट संघ आपल्याकडे पाच कसोटी सामने खेळण्यासाठी आला होता (तोपर्यंत मर्यादित षटकांचे सामने हा प्रकार नव्हता, २०२० तर दुरची बात) विशेष म्हणजे, तोपर्यंत टोनी लुईस एकही कसोटी सामना खेळला नव्हता. पण इंग्लंडमधील कौंटी क्रिकेट सामन्यातील त्याच्या कल्पक नेतृत्वामुळे त्याच्याकडे देशाचे नेतृत्व सोपवले होते. हा संघ आपल्याकडे येण्यापूर्वी आपल्या देशात अक्षरशः प्रचंड क्रिकेट फिव्हर होता.
हे देखील वाचा: “इरॉस थिएटर” प्रदर्शित चित्रपटांचे माहेरघर…
आपणच जिंकणार असेच एकूण सामाजिक वातावरण होते. याचे कारण म्हणजे १९७१ साली आपण अजित वाडेकर यांच्या नवीन नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजमध्ये जाऊन गारफिल्ड सोबर्सच्या नेतृत्वाखालील विंडिज संघाला १-० असे तर लगेचच काही महिन्यांनी अजित वाडेकर यांच्याच नेतृत्वाखाली रे इलिंगवर्थच्या खडूस इंग्लड संघाला इंग्लंडमध्ये जाऊन १-० असे पराभूत केले होते. श्रीगणेचतुदर्शीच्या दिवशी ओव्हलवर आपण इंग्लंड संघाला एकेक धक्के देत पराभूत केले होते. गुगली गोलंदाज भागवत चंद्रशेखरने इंग्लिश फलंदाजांना हैराण केले होते आणि एकनाथ सोलकरने फाॅरवर्ड शाॅटलेगला उभे राहून सूर मारत झेल पकडले होते.
या विजयी संघाची तेव्हा मुंबईत विमानतळ ते ब्रेबाॅर्न स्टेडियम (Brabourne Stadium) अशी उघड्या जीपमधून फेरी मारली होती. अशा एकेक सकारात्मक गोष्टीनी देशभरात क्रिकेटप्रेमाची प्रचंड उसळलेली लाट नेमकी कधी फुटली माहित्येय? टोनी लुईसच्या संघाने नवी दिल्लीतील पहिला कसोटी सामना जिंकला आणि सगळेच हादरले. सगळीकडे आपल्या संघाविरुध्द वातावरण निर्माण झाले. हा पराभव अनपेक्षित होता पण इंग्लंडचा संघ व्यावसायिक होता. पूर्ण आत्मविश्वासाने ते वावरु लागले. पण पुढील दोन सामने मात्र (कोलकत्ता आणि चेन्नईतील, तेव्हाचे कलकत्ता आणि मद्रास) आपल्या संघाने जिंकले आणि पुन्हा सगळीकडे क्रिकेट क्रेझ निर्माण झाली.
हे देखील वाचा: चित्रपट क्षेत्रातील फोटोंचा विकसित होणारा एक अनोखा प्रवास
त्या काळात पाच पैशाला मिळत असलेल्या एका चाॅकलेटमध्ये या दोन संघातील खेळाडूंची छोट्या आकाराची छायाचित्रे मिळत. तर एका सिगारेट कंपनीने दोन रिकामी पाकिटे पाठवा आणि आवडत्या क्रिकेटपटूंचे फोटो पोस्टाने मिळवा अशी काढलेली टूम यशस्वी ठरली. २-१ अशा स्थितीतील या रंगतदार मालिकेत आता उर्वरित दोन सामन्यात काय होतेय याकडे सगळ्यांचे लक्ष होते. कानपूरचा चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला आणि मग मुंबईतील पाचवा कसोटी सामनाही अनिर्णित राहिला तरी तो दोन गोष्टींसाठी कायमचा लक्षात राहिला.
एक म्हणजे, ब्रेबाॅर्न स्टेडियमवर तेव्हा मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त होता. तेव्हा मुंबई पोलिसांचा निळा ड्रेस असे. मैदानात सीमारेषेबाहेरही खूप पोलीस होते. अशातच इंग्लंडचा क्रिकेटर पॅट पोकाॅकने एका पोलिसाची टोपी घालून हाती दंडूका घेतला याचा फोटो वृत्तपत्रात पहिल्या पानावर आला. आणि गाजला. दुसरी आठवण म्हणजे, २ ऑक्टोबर १९७२ रोजी मुंबईत दूरदर्शन हे नवीन माध्यम सुरु झाले आणि लगेचच १९७३ च्या जानेवारीत मुंबईत असलेल्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. आपण घरबसल्या दूरचित्रवाणीवर पाहिलेला हा पहिला कसोटी क्रिकेट सामना आहे. ते रेडिओ आणि ट्रान्झिस्टरवर कान देऊन मॅच ऐकण्याचे दिवस होते. घरी, गॅलरीत, चाळीत, नाक्यावर असे करता करता अगदी पानवाला आणि सलूनमध्येही मॅच ऐकण्याचे दिवस होते.
आता यात ‘व्हीक्टरी स्टोरी‘ (The VICTORY STORY) नावाचा चित्रपट तो कुठे आणि कसा आला असा तुमचा गुगली प्रश्न असेलच. त्या काळात फिल्म डिव्हिजनच्या वतीने प्रत्येक कसोटी क्रिकेट सामन्याच्या काही भागांचे चित्रीकरण होई (आणि भारतीय समाचार चित्रमध्ये ते पाह्यला मिळे) तर तोपर्यंत दिल्ली शहरात दूरदर्शनने जम बसवला होताच. तर फिल्म डिव्हिजनच्या शूटिंगमधील या पाचही कसोटी सामन्यांची क्षणचित्रं एकत्र करून चक्क अडिच तासांचा ‘व्हीक्टरी स्टोरी’ नावाचा चित्रपट पडद्यावर आलादेखिल (पोस्टर बघा). फिल्म डिव्हिजनचीच ही निर्मिती होती. क्रिकेट समालोचक राजू भारतन यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली. (नुसतेच हा आऊट झाला, मग त्याने चौकार मारला अशाने रंगत कशी येईल?).
विजय राघव राव यांचे याला संगीत आहे आणि विष्णु एंटरप्रायझेसच्या वतीने हा चित्रपट रिलीज झाला, तोदेखिल चक्क नाझ थिएटरमध्ये आणि त्याला क्रिकेटवेड्या चित्रपट रसिकांचा उत्तम प्रतिसादही मिळाला. एकदा मिळालेला विजय सगळीकडे विजयच असतो. विशेष म्हणजे, ज्या चित्रपटात नेमके काय घडणार आहे हे माहित असूनही हा चित्रपट रसिकांना आवडला. हीच तर खरी चित्रपटावरची भक्ती आहे. आपल्याकडच्या प्रेक्षकांना कोणते चित्रपट पहा, कसे पहा हे सांगायची गरज नसते. ते आपले निर्णय घेण्यात सक्षम आहेत आणि या क्रिकेटमय चित्रपटाची समिक्षा न येताही तो रसिकांना आवडला.
यावर्षी आपल्या क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियातही पहिल्या कसोटीत चांगलाच मार खाल्ला. अवघ्या ३६ धावांत आपल्या संघाचा दुसरा डाव कोसळला त्याची जखम अजून ताजी आहे. त्यानंतर आपल्या संघाने दुसरा आणि चौथा सामना जिंकला आणि तिसरा सामना अनिर्णित राहिला ही ‘व्हीक्टरी स्टोरी ‘ पुन्हा सांगायला नकोच. आता ऑस्ट्रेलिया जखमी आहे. आता तर जबरदस्त तांत्रिक प्रगती झाली असून ऑनलाईन संकलन करीत यू ट्यूब चॅनलसाठी या चार सामन्यांची ‘व्हीक्टरी स्टोरी ‘ क्रियेट करता येईल. दारुण पराभवानंतरही आणि नवीन खेळाडूंना विश्वासात घेत बाजी पलटावता येते असा एक जबरदस्त सकारात्मक दृष्टिकोन या मालिकेने दिला आहे. क्रिकेटदेखिल आपल्या आयुष्यातील अनेक लहान मोठ्या गोष्टीना काही सपोर्ट सिस्टीमचे ऑक्सिजन देत असते, त्या दृष्टीने पाह्यची गरज आहे.
‘व्हीक्टरी स्टोरी ‘नंतर त्या पठडीतील चित्रपट निर्माण झाला नाही का असा तुमचा ऑफ स्टंपवरचा प्रश्न असेलच. तो होता ‘स्पीन वर्सेस स्पेस’ (१९७५). आपल्या देशात क्लाईव्ह लाॅईडच्या नेतृत्वाखाली १९७४/७५ या काळात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ आला असता मन्सूर अली खान पतौडीच्या नेतृत्वाखाली आपण ती मालिका २-३ अशी चक्क हरलो. पण या मालिकेत टर्न ॲण्ड ट्वीस्ट भारी होते. पहिल्या दोन सामन्यात आपला पराभव झाला आणि मग आपण यशस्वी कमबॅक करीत पुढचे दोन सामने जिंकले.
आता वानखेडे स्टेडियमवर (तेथील हा पहिला कसोटी क्रिकेट सामना) सहा दिवसांची कसोटी होती. आपला त्यात पराभव झाला तरी क्रिकेटमय जल्लोषाचा ‘स्पीन वर्सेस स्पेस’ या चित्रपटाला गर्दी होण्यास फायदा झाला. (दरम्यान, १९७४च्या मध्यास आपल्या क्रिकेट संघाला अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली माईक डेनिसच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाकडून इंग्लंडमध्ये ३-० असा पराभव पत्करावा लागला त्यात एकदा आपला सगळा संघ ४२ धावांत बाद झाला हे आताच आठवायची गरज नाही. पण ऑस्ट्रेलियात ३६ धावांत आपला संघ गारद झाला तेव्हा हेच ४२ आठवले. बरं का?)