Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

थिएटर्सचे भन्नाट कल्चर…
गिरगावात लहानपणापासून दक्षिण मुंबईतील अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्सच्या अनुभवात पीला हाऊस (अर्थात रेड लाईट एरिया, सुखलाजी स्ट्रीट, गोलपीठा विभाग असाही हा मध्य मुंबईतील परिसर वर्षानुवर्ष ओळखला जातो.) परिसरातील ‘थिएटर्स संस्कृती’ देखील महत्त्वाची. चित्रपट हे सर्वच समाज घटकांचे मनोरंजन आहे आणि त्या बहुस्तरीय वाटचालीवर ‘फोकस ‘ टाकायला हवाच. मी चित्रपटाचा प्रेक्षक (की फिल्म दीवाना?) म्हणून असा सर्वदूर पोहचलो. थिएटर्सचे(Theaters) लाईव्ह अनुभव घेत घेत वाटचाल करतोय. प्रेक्षकांपर्यंत चित्रपट कसा पोहचतोय हा भन्नाट घटक आहे.
अगदी लहानपणापासून वृत्तपत्रातील मनोरंजन विषयक जाहिराती वाचण्याच्या सवयीनुसार विश्वजीत व रेखा यांची भूमिका असलेल्या जाहिरातीत उदघाटनाचे आकर्षण न्यू गुलशन असे वाचले, १९७३ सालची गोष्ट असावी आणि या थिएटरबाबत (Theaters) उत्सुकता निर्माण झाली. पिक्चरइतकेच त्याचे मेन थिएटर कोणते आहे याबाबतही कुतूहल असण्याचा तो काळ होता. ‘मेहमान’ मध्ये विश्वजीत व रेखा यांच्या प्रमुख भूमिका असल्याने (आणि या जोडीचे खमंग गाॅसिप्स मराठी साप्ताहिकात ‘जपून रंगवून ‘ लिहिले जात असल्याचे वाचताना जाणवल्याने.) हा पिक्चर डोक्यात फिट्ट बसला. आणि त्यासह गुलशन थिएटरही. म्हणजेच जुने गुलशन पाडून नवीन आले होते.

दहावीपर्यंत जाताना गुलशन आणि त्याभोवतीची थिएटर संस्कृती माहिती पडत गेली. दक्षिण मध्य मुंबईतील कुंभार वाड्याजवळचा परिसर ते कामाठीपुरा ( सुखलाजी स्ट्रीट भाग) या भागातील ही थिएटर्स. यातील एक भाग पिला हाऊस अथवा गोलपिठा वा रेड लाईट एरिया म्हणून ओळखला जातो. हे प्रचलित शब्द आहेत. आजच्या ग्लोबल युगातील चित्रपट रसिकांना सांगायचे तर, संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘गंगूबाई काठीयावाडी ‘ हा चित्रपट या परिसरात घडतो. त्यात ही पूर्वीच्या काळातील थिएटर्स दिसतात बघा. या चित्रपटात पन्नास व साठच्या दशकातील गोष्ट असल्याने अतिशय मेहनतीने सेट लावून तेव्हाचा रेड लाईट एरिया उभा करण्यात आला आहे. आणि तो सेटही खराखुरा वाटला. आणि तेव्हाची ही थिएटर्स या चित्रपटातील जणू एक व्यक्तिरेखा आहेत. चित्रपट पाहताना तुमच्याही लक्षात आले असेलच.. गंगूबाई (आलिया भट्ट) अशाच एका थिएटरमध्ये(Theaters) काही महिलांसह पिक्चर पाहायला जाते.
एकाद्या विशिष्ट विभागाची ओळख अशी चित्रपटातूनही होते. चित्रपट असे बरेच काही देत असतोच. या परिसरातील थिएटर्समध्ये पूर्वी अनेक चित्रपट एन्जाॅय केले असल्याने अलिकडेच मी भेट दिली असता असा फ्लॅशबॅकमध्ये गेलो. हा जुन्या मुंबईतील दाटीवाटीने जनजीवन असलेला, अनेक प्रकारचे असंख्य अगणित आणि अनेक प्रकारचे लघुउद्योग असलेला, अतिशय गजबजलेला परिसर. या विभागातील थिएटर्स अशी, मोती, गुलशन, राॅयल, नॅशनल, सिल्व्हर, दौलत, न्यू रोशन, ताज ( हे मूळचे व्हीक्टोरिया) , निशात, सुपर, अलेक्झांड्रा. एकाच परिसरात इतकी थिएटर्स याचे एक कारण म्हणजे, जस जसा मूूकपटापासून बोलपटाकडे आपल्या देशातील चित्रपटांचा प्रवास सुरु झाला त्यात शंभर वर्षांपूर्वीच्या जुन्या मुंबईत अनेक थिएटर्स उभी राहिली. सुरुवातीस काही थिएटर्समध्ये नाटकाचे प्रयोग, वाद्यवृंद, तमाशा वगैरे होत तेथेही काही वर्षातच ( उदाहरणार्थ ऑपेरा हाऊस, एडवर्ड) ‘पिक्चरचा पडदा ‘ लागला. याच वाटचालीत १४ फेब्रुवारीला १९२१ ला अलेक्झांड्रा थिएटर(Theaters) सुरु झाले. त्याच आसपास ग्रॅन्ट रोड थिएटर सुरु झाले. त्यात छोटी नाटके, तमाशाचा फड रंगत असे. त्याचे नाव नंतर बालीबाला थिएटर झाले. मग त्यातही बदल करुन दौलत थिएटर सुरु झाले. १९४४ साली मूळचे व्हीक्टोरिया पाडून ताज सुरु झाले. तेव्हा या थिएटरच्या जाहिरातीत म्हटले होते, वेस्टर्न इलेक्ट्रीक मायक्रोकोनिक साऊंड सिस्टीम.

याच काळात ही सगळीच थिएटर्स सुरु झाली. आणि हा सगळा थिएटर्सचा(Theaters) गुच्छ म्हणून त्याला ‘प्ले हाऊस’ असे नाव पडले. सुपर थिएटरबाहेरचा बसस्टॉप याच नावाने आहे हे तुम्ही या परिसरात गेल्यास लक्षात येईल. प्ले हाऊसचा शब्दभ्रम होऊन त्याचा उल्लेख ‘पिला हाऊस’ असा होऊ लागला तो कायमचा. फरक इतकाच की, या थिएटर्सना मुख्य प्रवाहात गणले गेले नाही. काही प्रमाणात सुपर अनेक वर्षे मेन थिएटर म्हणून ओळखले गेले. पण या एकूणच थिएटर्सची चित्रपट संस्कृती वेगळी. अलेक्झांड्राला कायमच विदेशातील ढिश्यूम ढिश्यूम मारधाडपट अथवा प्रणय, अर्धनग्नता असलेले असे बी व सी ग्रेड पिक्चर्स त्याचे नाव ‘भलत्या सलत्या’ हिंदीत करीत प्रदर्शित होत ( तो आणखीन एक वेगळा विषय) आणि हेच त्याचे वैशिष्ट्य ठरले. मा. भगवानदादा, दारासिंग, रंधवा, फिअरलेस नादिया, शेख मुख्तार यांचे पारंपरिक मसालेदार मनोरंजक पिक्चर्स प्रामुख्याने याच पिला हाऊस थिएटर्समध्ये प्रदर्शित होत. हिटही होत. अनेकदा गाणे सुरु होताच पडद्यावर ‘दौलतजादा’ होई. मनसोक्तपणे पैसे उडवले जात. या थिएटर्सवरुनही अनेक किस्से, कथा, गोष्टी, दंतकथा, गोष्टी जन्माला आल्या. कधी तर अतिशय श्रम करुन दमलेला चक्क तिकीट काढून छान झोप काढायला या थिएटरमध्ये येतो असेही म्हटले गेले.
तर अशीच एक गोष्ट, एका फिल्मी पार्टीत राज कपूरने भगवानदादांना सांगितले, मुख्य प्रवाहातील चित्रपटगृहात तू आपला चित्रपट प्रदर्शित केल्यास तुला नवीन ओळख प्राप्त होईल. भगवानदादांनी हा सल्ला ऐकला आणि आपला ‘अलबेला’ हा चित्रपट इंपिरियल थिएटरमध्ये (Theaters) प्रदर्शित केला आणि यश प्राप्त करतानाच ते अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचले. मुमताजबद्दल नेहमीच कौतुकाने म्हटले जाते, दारासिंगचे स्टंटपट ते देव आनंद, राजेश खन्ना यांची नायिका असा चढत्या भाजणीत प्रवास करताना तिने ‘ताज ते नाझ’ असा प्रवास केला. त्या काळात अनेक तरी दे…. मार तसेच फॅण्टसी पिक्चर याच पिला हाऊस थिएटर्सचे हुकमी मनोरंजन असे म्हटले जाई. ही चित्रपट संस्कृतीच वेगळी. पण दुर्लक्षित करता न येणारी.

मुख्य प्रवाहातील थिएटर्समधील अनेक पिक्चर्सनी आपल्या यशाचा पुढचा प्रवास या पिला हाऊसमधून केला. आठवणीतील दोन उदाहरणे देतो, गंगा थिएटरमध्ये पंधरा आठवड्यांचा प्रवास केल्यावर कुंदनकुमार दिग्दर्शित ‘अनोखी अदा’ (जितेंद्र, रेखा, विनोद खन्ना) न्यू रोशनला शिफ्ट केला आणि त्याने रौप्य महोत्सवी आठवडा गाठला. मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘सच्चा झूठा ‘ने शालिमार थिएटरमध्ये (Theaters) रौप्य महोत्सवी आठवडा पूर्ण होताच मोती थिएटरमध्ये शिफ्ट केल्यावर त्याने पन्नासाव्या अर्थात सुवर्ण महोत्सवी आठवड्यापर्यंत प्रवास केला. अनेक पिक्चर्सना ही थिएटर्स ‘अशी उपयुक्त’ ठरली. अनेक जुने चित्रपट पाह्यची हुकमी आणि अतिशय स्वस्तातील तिकीटातील संधी म्हणजे ही थिएटर्स हे माझ्यासारख्याला पर्वणीच.
आता ही थिएटर्स (Theaters) अगदीच जुन्या पठडीतील पण त्या काळाला सुसंगत. त्या काळात पडद्यावरचे पिक्चर महत्वाचे होते.’थिएटर कसेही असो, आम्हाला पिक्चर पाहायचाय’ अशीच फिल्म दीवान्यांची मानसिकता असल्याचा तो काळ. अगदी सुरुवातीला या थिएटर्समध्ये पडद्यासमोरच्या पुढील भागात खाली बसायला ताडपत्री असत. त्यावरुन ‘पिटातला पब्लिक ‘ हा शब्द आला आणि रुळला. कालांतराने त्याजागी बाकडी आली. मग खुर्च्या आल्या असे माझ्या मागची पिढी सांगे. या थिएटर्सचा फ्लॅशबॅक हा जास्त रंजक आहे. साठच्या दशकात येथे थर्ड क्लास (पहिल्या चार रांगा) चार आणे तिकीट, सेकंड क्लास पाच आणे, फर्स्ट क्लास दहा आणे आणि बाल्कनी एक रुपया असे दर असत. सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात आम्ही काॅलेजचे मित्र येथे आता बाल्कनीचे दोन रुपये वीस पैसे असे तिकीट काढून पिक्चर एन्जाॅय करीत असू. मध्यंतरला गुलाब अथवा जिंजर नावाचे थंड पेय पित असू अथवा पिक्चर संपल्यावर गुलशन टाॅकीजच्या खालच्या दिल्ली दरबारमध्ये मटन खिमा पाव ठरलेला असे. आजही जिभेवर चव आहे हो.
‘थिएटर्सचा हा गुच्छ’ कालांतराने एकेक करत निखळत गेला. नॅशनल थिएटर केव्हाच बंद झाले. इतरही एकेक करत बंद झाली. आल्फ्रेड सुरु आहे, नुकतीच या थिएटरला आवर्जून भेट दिली. बुकिंग क्लर्क सांगत होता, टिपिकल जुनी परंपरा जपून हे थिएटर सुरु असले तरी बाल्कनी बंद केली आहे, कारण आता पहिल्यासारखा हाऊसफुल्ल पब्लिक नाही. याच ऑल्फ्रेड थिएटरमध्ये ‘स्लमडॉग मिलिनियर’चे शूटिंग झालेय. ‘तलाश’च्या शूटिंगच्या वेळेस आमिर खान आला होता. येथे थीमनुसार चित्रपटाचे शूटिंग करता येते. येथे ‘भिरकीट’ या मराठी चित्रपटाचे पोस्टर दिसले यावर तो म्हणाला, नियमानुसार प्रत्येक चित्रपटगृहात वर्षभरात ४४ दिवस मराठी चित्रपट प्रदर्शित करणे आवश्यक असून त्यानुसार आता ‘ भिरकीट ‘ ऑल्फ्रेडला लागेल. तेथूनच समोर असलेले निशात थिएटर आता वातानुकूलित केलेय, सीटस नवीन आहेत. पूर्वीच्या तुलनेत सीटसची संख्या कमी केली आहे.
=======
हे देखील वाचा : टॉम क्रूझच्या स्टंटची हवा….
======
नवीन लूकमुळे अधिकाधिक प्रेक्षक येतील अशी अपेक्षा आहे. थिएटर बाहेरुनही छान आकर्षक केल्याचे दिसले. येथे कालांतराने मुख्य प्रवाहातील थिएटर्स आणि आता मल्टीप्लेक्ससोबतच नवीन चित्रपट प्रदर्शित होऊ लागलेत. ‘दृश्यम २’ने ते पुन्हा सुरु झाले आहे. सुपर थिएटरला पूर्वी ‘द ट्रेन’, ‘हाथ की सफाई’, ‘जख्मी’ अशा अनेक चित्रपटांनी रौप्य महोत्सवी यश संपादले. आता रोज सकाळी माॅर्निंग शोला हिंदी चित्रपट असतो. तर दिवसा तीन खेळ भोजपुरी चित्रपट असतो. उर्वरित थिएटर्सपैकी काहींच्या जागी नवीन इमारत आलीय. मूळच्या खाणाखुणा हरवल्यात. ( उदाहरणार्थ ताज) तर काहींचे (उदा. गुलशन, न्यू रोशन, अलेक्झांड्रा वगैरे) शो केव्हाच बंद झाल्याने या थिएटरबाहेर (Theaters) शुकशुकाट जाणवला. बाहेरच्या वातावरणातील गोंधळ मात्र ऐकू येत होता. तेही एक वास्तव.
‘पिला हाऊसची थिएटर्स संस्कृती’ अगदी वेगळीच होती. भन्नाट होती. पिक्चर एन्जाॅय करण्यात उत्स्फूर्तता होती. चित्रपटसृष्टीच्या चौफेर इतिहासात त्यांचा महत्वाचा वाटा होताच. आज त्याच्या आठवणी राहिल्यात. प्रत्यक्ष फेरफटका करताना ते जास्तच जाणवले. आणि एक वेगळीच अशी ‘टाॅकीजची गोष्ट ‘ लोप पावत असल्याचे जाणवले. ज्यांनी हे या थिएटर्सचे कल्चर अनुभवलयं ते एव्हाना आपल्याच ‘फ्लॅशबॅक ‘मध्ये गेले असतील. आपल्या देशात चित्रपट रुजवण्यात अशा अनेक जुन्या सिंगल स्क्रीन थिएटर्सनी महत्वाची भूमिका साकारलीय. त्यात या थिएटर्सचा वाटा नक्कीच मोठा.
दिलीप ठाकूर