“क्रांतीवीर”ची तीस वर्ष !
ये मुसलमान का खून, ये हिंदू का खून….बता इसमें मुसलमान का कौनसा, हिंदू का कौनसा… बता…,
आ गये मेरे मौत का तमाशा देखने…..
उपरवाला भी उपर से देखता होगा तो उसे शर्म आती होगी… सोचता होगा मै ने सबसे खुबसूरत चीज बनाई थी इन्सान…. नीचे देखा तो सब कीडे बन गये है…कीडे
हम भले ही उपरवाले को अलग अलग नाम से पुकारते है…लेकिन हमारा धरम एक है, मजहब एक है…. इन्सानियत!
कुत्ते…कुत्ते की तरह जीने की आदत पड गयी है सबको…
तुमसे तो वो वेश्या अच्छी होती है, जो बेचती जरुर है, मगर अपना जिस्म बेचती है….अपने देश की आत्मा को, अपने ईमान को नहीं बेचती
“क्रांतीवीर” (Krantiveer) नाना पाटेकर अतिशय रोखठोक थेट संवाद बोलतोय तोच चित्रपटगृहातील अंधारातील हाऊसफुल्ल गर्दीतून हमखास तुफान टाळ्या, शिट्ट्यांचा प्रतिसाद मिळणे हे तर प्रत्येक थेटरात प्रत्येक खेळात हमखास घडे…. मेहुल कुमार निर्मित व दिग्दर्शित “क्रांतीवीर” मुंबईत रिलीज २२ जुलै १९९४. चक्क तीस वर्ष पूर्ण झाली देखिल, तरी या जोरदार शोरधार संवादाचा आवाज कानात घुमतोय. अधूनमधून सोशल मिडियात त्याचे भाग व्हायरल होताहेत.
“क्रांतीवीर” (Krantiveer) वेगळ्याच सामाजिक वातावरणात निर्माण झाला. ६ डिसेंबर १९९२ रोजीचे उत्तर प्रदेशातील अयोध्येतील बाबरी मशीदी प्रकरण, त्याची देशातील विविध भागात उमटलेली प्रतिक्रिया, हिंदू व मुसलमान यांच्यातील संघर्ष, जानेवारी १९९३ त मुंबईत झालेली जातीय दंगल, १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत झालेले बारा बाॅम्बस्फोट या सगळ्यातून सामाजिक, सांस्कृतिक, माध्यम वातावरणात तणाव निर्माण झाला होता आणि त्याची विविध माध्यमातून प्रतिक्रियाही उमटत होती. त्याचाच एक भाग म्हणून मणि रत्नम दिग्दर्शित “बाॅम्बे” इत्यादी चित्रपटांची निर्मिती झाली.
मेहुल कुमार दिग्दर्शित “क्रांतीवीर” (Krantiveer) ही त्याच पठडीतील. मला आठवतय, मेहुल कुमारने “तिरंगा” (१९९३) प्रदर्शित होताच “क्रांतिवीर”च्या निर्मितीची तयारी सुरु केली. “तिरंगा” देशभक्तीवरील चित्रपट आणि त्यातच मेहुल कुमारचे नाना पाटेकरशी सूर जुळलेले. नाना पाटेकरमध्येही एक आजूबाजूच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय गोष्टींवर जळजळीत भाष्य करणारा जागरुक माणूस. त्यासाठी त्याला व्यासपीठ मिळो वा चित्रपट, तो कोणताही कोणाचाही मुलाहिजा न ठेवता अगदी रोखठोक वैचारिक “प्रहार” करतो. “क्रांतिवीर”मधील प्रताप नारायण टिळक हा त्याला मोठाच प्लॅटफॉर्म मिळाला. “त्याने जणू अख्खा पिक्चर ताब्यात घेतला” आणि तो सुसाट वेगात बोलत सुटला…..
मेहुल कुमार चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी माध्यमात काम करीत. त्यामुळे ते आम्हा सिनेपत्रकारांना आपल्या प्रत्येक चित्रपटाच्या मुहूर्ताला आणि सेटवर शूटिंग रिपोर्टींगसाठी बोलवत. “क्रांतिवीर”च्या (Krantiveer) अंधेरीतील फिल्मालय स्टुडिओतील सेटवर त्यांनी बोलवले असता नाना पाटेकर, बिंदू, अपूर्व अग्निहोत्री आणि ममता कुलकर्णी यांच्यावर क्लब डान्स गाणे चित्रीत होत होते. नाना पाटेकरला नृत्य करताना पाहणे वा अनुभवणे हा दुर्मिळ योग.
मी मिडियात असल्यानेच तो आला आणि कायमच लक्षात राहिला. काही दिवसांनी साकी नाकाजवळच्या चांदिवली स्टुडिओतील सेटवर शूटिंग रिपोर्टींगसाठी पुन्हा गेलो असता नाना पाटेकर व परेश रावल यांच्यावर दृश्य चित्रीत होत होते. मेहुल कुमारशी गप्पा करताना मला जाणवले, हा मनोज कुमारच्या देशभक्तीवरील चित्रपटांच्या पठडीतील चित्रपट बनतोय….
नाना पाटेकरने मेहुल कुमारना भरपूर सहकार्य करीत चित्रपट पूर्ण तर केला पण या चित्रपटाला वितरकच मिळेनात. नाना पाटेकर त्यांना “नायक” म्हणून सेलबेल वाटेना. सहनायक वा नकारात्मक व्यक्तीरेखेत तो स्वीकारला जात होता. पण नायक? तोही डिंपल खन्नाचा? (श्रीदेवीला साईन करणे न जमल्याने डिंपल. तिने नाना पाटेकरच्या दिग्दर्शनात “प्रहार”मध्ये काम केले होते.)
मेहुल कुमारने फिल्मालय स्टुडिओतील मिनी थिएटरमध्ये वितरकांसाठी “क्रांतिवीर”ची ट्रायल आयोजित केली आणि नाना पाटेकरची “आक्रमक” ( वा फायरी) भूमिका पाहताच ते थक्क होऊन गेले. मेहुल कुमारचे टेन्शन गेले. लगेचच पोस्टर्स छापली जावून रस्तोरस्ती लागली देखिल. विविध भारतीवरील रेडिओ प्रोग्रॅमने पिक्चरमध्ये डायलॉग काॅमन मॅनपर्यंत नेले. डॅनी डेन्झोपाचा एक डायलॉग आहे, हम तुम्हे ऐसे जलाऐंगे की तेरे चाहनेवालो को गंगा मे नहाने के लिए तेरी राख भी नसीब नही होगी… याच रेडिओ कार्यक्रमाने नाना पाटेकरचे पत्रकार मेघना दीक्षित (अर्थात डिंपल) हिला “कलमवाली बाई” बोलणे लोकप्रिय केले.
चित्रपटासाठी उत्तम सकारात्मक वातावरण निर्माण होत गेले आणि मुंबईत मेन थिएटर ड्रीमलॅन्ड आणि इतरत्र चित्रपट प्रदर्शित झाला तोच नाना पाटेकरच्या प्रत्येक डायलॉगला “थिएटर फाड” रिस्पॉन्सने ! पिक्चरचा क्लायमॅक्स तर हायपाॅईंट ठरला. पिक्चर सुपर हिट व्हायला आणखीन काय हवे?
चित्रपटात डॅनी डेन्झोपा (चतुरसिंग चिता), फरिदा जलाल (प्रतापची आई), टीनू आनंद (योगिराज), परेश रावल (लक्ष्मीदास दयाल), जनार्दन परब (ईस्माईल) यांच्यासह मुश्ताक खान, इशरत अली, विकास आनंद, महेश आनंद, शफी इनामदार, सुजीतकुमार, विजू खोटे, बिंदू यांच्याही भूमिका. छायाचित्रण रुसी बिलीमोरिया यांचे तर संकलन युसूफ शेख यांचे. जबरदस्त संवाद होते, के. के. सिंग यांचे.
=========
हे देखील वाचा : बुध्दीमान माणूस, स्पष्टवक्ता कलाकार
=========
पिक्चर हिट म्हटल्यावर त्याची अन्य भाषेत रिमेक व्हायलाच हवी. चित्रपटाच्या जगात यश हेच चलनी नाणे त्यामुळे हे होणारच. तेलगू (१९९५), कन्नड (१९९७) भाषेत तर झालेच पण मेहुल कुमारने २०१० साली “क्रांतीवीर- द रिझोल्युशन” (Krantiveer) या नावाने रिमेक केली. पण त्यात हुकमी एक्का नाना पाटेकर नव्हता. मग ती आग वा धाक कसा असणार?
“क्रांतीवीर”च्या (Krantiveer) खणखणीत यशाने नाना पाटेकर स्टार म्हणून इंग्लिश भाषेतील मासिकाच्या मुखपृष्ठावर आला. खरं तर त्याची या चित्रपटातील मोठी मिळकत म्हणजे अभिनयासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वधर्मसमभाव हा दिलेला विचार…. भाषा, जात, प्रांत, धर्म यावरुन आपसात भांडू नका, वैर नको, दंगल नको त्यात सामान्य माणूस भरडला जातो हे या चित्रपटात मसालेदार मनोरंजक पध्दतीने सांगितलेय आणि तेच जनसामान्यांना आवडले… पिक्चर उगाच सुपर हिट होत नसतात. पब्लिकला आवडेल असे काही त्यात असायला हवे. “क्रांतीवीर”ची तीस वर्ष विशेष उल्लेखनीय.