महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
‘दाग’ या सिनेमाच्या मुहूर्तावेळी ‘हा’ अभिनेता होता ‘क्लॅपर बॉय’!
मोठे बंधू बी आर चोप्रा यांच्यासोबत तब्बल वीस वर्ष काम केल्यानंतर १९७३ साली यश चोप्रा यांनी पहिल्यांदा स्वतःचे यशराज फिल्म्स हे बॅनर निर्माण करून पहिला चित्रपट ‘दाग’ निर्माण केला. हा चित्रपट राजेश खन्ना यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा सिनेमा होता. सिनेमा सुपर डुपर हिट ठरला. यश चोप्रांच्या पहिल्याच चित्रपटाला घवघवीत यश मिळाले. आज देखील पन्नास वर्षानंतर यशराज ही चित्र संस्था दिमाखात उभे आहे आणि एकाहून एक सुपरहिट सिनेमे प्रेक्षकांसाठी बनवत आहे. १९७३ सालच्या ‘दाग’ या चित्रपटाच्या मुहूर्ताच्या वेळी क्लॅप देण्याचे काम एका सुप्रसिद्ध अभिनेत्याने केले होते. यश चोप्रा नेहमी असे म्हणायचे की, त्या अभिनेत्याच्या शुभ शकुना मुळेच मी एवढी मोठी कारकीर्द निर्माण करू शकलो. कोण होते ते अभिनेते? कुणाच्या शुभ हस्ते मुहूर्ताचा शॉट घेतला गेला? हे क्लॅपर बॉय (Clapper Boy) होते प्रख्यात अभिनेते दिलीप कुमार!
दिलीप कुमार यांनी आपल्या चोप्रा सोबत असलेल्या प्रदीर्घ मित्र संबंधाला लक्षात ठेवून त्याच्या पहिल्याच चित्रपटाच्या मुहूर्त प्रसंगी हजेरी लावलीच पण क्लॅपर बॉय (Clapper Boy) म्हणून काम देखील केलं! हा मोठा शुभशकुन होता आणि यश चोप्रा हे कायम याचा उल्लेख आपल्या अनेक मुलाखतीत करत होते. यश चोप्रा आणि दिलीप कुमार यांची मैत्री १९५७ सालच्या ‘नया दौर’ या चित्रपटापासून होती. त्यावेळी यश चोप्रा आपले मोठे बंधू बी आर चोप्रा यांचे सहाय्यक होते. चोप्रांच्या चित्रपटात पहिल्यांदाच दिलीप कुमार काम करत होते. त्या वेळी ते सुपरस्टार होते. ‘नया दौर’ या चित्रपटातील काही चित्रीकरण (‘आना है तो राह में कुछ दर नही है भगवान के घर दर है अंधेर नही है’ हे गाणे) पुण्याजवळच्या जेजुरी येथे होणार होते. बी आर चोप्रा यांनी यश चोप्रांना दिलीप कुमार यांच्याकडे पाठवून शूटिंगची शेड्यूल सांगितले.
यश चोप्रा यांनी दिलीप कुमारला सांगितले,” उद्या तुमच्यासाठी मर्सिडीज बेंज ही गाडी तुमच्यासाठी सकाळी येईल या गाडीने तुम्ही पुण्याला जायचे आहे. तुमच्या पाठीमागे मी एका छोट्या दुसऱ्या कार मधून येईल. तुम्हाला रस्त्यात काही अडचण असली तर मी तुमच्या पाठीमागेच आहे.” त्यावर दिलीप कुमार म्हणाले,” एवढ्या मोठ्या आलिशान गाडीत मी एकटा जाऊन काय करायचे? तू सुद्धा माझ्यासोबत चल.मस्त गप्पा मारत जाऊ.” यश चोप्रा यांना खूप संकोच वाटला. पण दिलीप कुमार यांनी आदरपूर्वक विनंती केल्यामुळे ते त्यांच्यासोबत गेले. आणि तिथूनच या दोघांची मैत्री सुरू झाली. (Clapper Boy)
दिलीप कुमार यांनी त्यांच्या The substance and shadows या आत्मचरित्रामध्ये या मैत्रीचा उल्लेख केला आहे. याच चित्रपटाचे काही चित्रीकरण मध्य प्रदेशात इटारसी येथे होणार होते. तिथे देखील या दोघांच्या मैत्रीला बहर आला. दोघेही अंडा ऑम्लेट चे प्रचंड शौकीन होते. इतके शौकीन की ते एका वेळी दहा दहा अंड्याचे ऑम्लेट फस्त करत असायचे! त्यामुळे त्यांच्या कुकला बऱ्याचदा प्रॉब्लेम यायचा.अंडी कमी पडायची. तेव्हा या दोघांनी एक आयडिया केली. ते गावात जाऊन स्वतःच अंडी विकत आणायचे आणि दिवसभर अंडा ऑम्लेट, अंडा भुर्जी करून खायचे. या दोघांच्या अंडा प्रेमाची संपूर्ण युनिटमध्ये भरपूर चर्चा होत असे.(Clapper Boy)
=========
हे देखील वाचा : प्रेम नाम है मेरा, प्रेम चोपडा..!
========
याच मैत्रीचा हवाला देत यश चोप्रानी त्यांच्या बॅनरच्या पहिल्या चित्रपटाच्या मुहूर्ताच्या शॉट साठी दिलीपकुमार यांना विनंती केली. दिलीप पवार यांनी देखील आनंदाने येऊन क्लॅपर बॉय (Clapper Boy) म्हणून पहिली फटमार केली. यश चोप्रा यांच्या दिग्दर्शनात दिलीप कुमार यांनी फक्त एकच चित्रपट केला हा चित्रपट १९८४ साली प्रदर्शित झाला होता वसंत कानेटकर यांच्या ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाच्या कथानकावर आधारित हा चित्रपट होता ‘मशाल’!