महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
अशी मिळाली सायराला दिलीपजींसोबत काम करण्याची संधी
ते दिवस राजेश खन्नाच्या विलक्षण क्रेझचे होते. त्याचा पिक्चर पडद्यावर यायचा तो सुपर हिट होण्यासाठीच. चित्रपटगृहांची जणू ती एक सवय नि आवड होती. अशातच १९७० साली मिडिया, चित्रपटसृष्टी आणि चित्रपट रसिकांत एका चर्चेने भारी रंग भरला. विजय आनंद दिग्दर्शित व देव आनंद अभिनित ‘जाॅनी मेरा नाम’ (मुंबईत रिलीज २० नोव्हेंबर १९७०), ए. भीमसिंग दिग्दर्शित व दिलीपकुमार अभिनित ‘गोपी’ ( मुंबईत रिलीज २७ नोव्हेंबर १९७०) आणि राज कपूर दिग्दर्शित व अभिनित ‘मेरा नाम जोकर’ ( मुंबईत रिलीज डिसेंबर १९७०) हे चित्रपट कधी बरे प्रदर्शित होताहेत, सरस कोणता असेल वगैरै वगैरेची स्टुडिओतील कॅन्टीनपासून ते इराणी हाॅटेलमधील गप्पांच्या फडात याच पिक्चर्सवर उलटसुलट चर्चा. (Dilip Kumar)
नाका, कट्टा, गॅलरी, लांबचा प्रवास यातून त्या काळात पिक्चर आणि क्रिकेटवर (अगदी राजकारणावरही) फार फार बोललं जाई. वृत्तपत्र, साप्ताहिके, मासिकातून या तीनही चित्रपटांवर जवळपास वर्षभर केवढे तरी लिहिले. मला आठवतय, माझं ते शालेय वय होते आणि लायब्ररीतून घरी आणल्या जात असलेल्या रसरंग साप्ताहिकात या तीनही चित्रपटांवर वसंत साठे, वसंत भालेकर, इसाक मुजावर केवढं तरी लिहित. वसंत साठेसाहेब हे राज कपूरच्या चित्रपटांचे लेखक (‘बाॅबी’ त्यांनीच लिहिलाय) आणि पब्लिसिस्ट ( अर्थात साठेसाहेब व एम. बी. सामंत यांची बाॅम्बे पब्लिसिटी सर्विस) त्यामुळे त्यांना ‘जोकर’ निर्मितीवस्थेत असतानाच आतल्या गोष्टी खूपच माहित. ( कालांतराने मी मिडियात आल्यावर साठेसाहेबांशी अतिशय उत्तम संबंध निर्माण झाल्यावर अनेक गोष्टी समजल्या.)
साधारण मे, जून महिन्यापासून या तीनही चित्रपटांच्या गाण्यांची तबकडी (इपी व एलपी) रिदम हाऊस वगैरे ठिकाणी विक्रीला आली आणि तीनहीची गाणी ऐकता ऐकता लोकप्रिय झाली, लाऊडस्पीकरवर आली, वाद्यवृंदात आली. ‘गोपी’ला २८ ऑगस्टला सेन्सॉरने सर्वांसाठी असे प्रमाणपत्र दिले आणि आता प्रदर्शनाची तयारी सुरु. त्या काळात अनेक चित्रपट सर्वप्रथम दिल्ली व उत्तर भारतात विविध शहरात प्रदर्शित होऊन मग मुंबईत येत. ( गोपीचे तेच झाले.) तर काही सर्वप्रथम मुंबईत रिलीज होत. (जाॅनी व जोकरचे ते झाले.) ‘गोपी’ची गीते व संवाद राजेन्द्र कृष्ण यांचे तर संगीत कल्याणजी आनंदजीचे. (Dilip Kumar)
रामचंद्र कहे गया ( पार्श्वगायक महेंद्र कपूर), जटंलमन जटंलमन मै हू बाबू जटंलमन ( लता मंगेशकर व महेंद्र कपूर), सुख के सभी साथी (मोहम्मद रफी), एक पडोसन पीछे पड गयी ( लता मंगेशकर व महेंद्र कपूर), अकेले ही अकेले चला है कहां ( लता मंगेशकर) ही सर्वच गाणी हिट. सुख के सब साथी गाणे सोप्या भाषेत जीवनातील तत्वज्ञान सांगते. गाण्यातून ही ग्रामीण भागातील गोष्ट आहे हे लक्षात येतेच. चित्रपटाचे निर्माते टी. एस. मुत्थ्यूस्वामी व एस. एस. पालनीपपन ( मद्रास. आताचे चेन्नई). हा चित्रपट १९६४ च्या ‘chinnada gombe’ ( कन्नड) व त्यावर आधारित ‘Muradan Muthu ‘ ( तमिळ) या चित्रपटांची रिमेक. दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटांची हिंदीत रिमेक ही अशी खूपच जुनी परंपरा. आणि त्यात वावगं काहीच नाही. महत्वाचे ठरले ते सायरा बानूचा आनंद.(Dilip Kumar)
लग्न केल्यावर सायरा बानूला दिलीपकुमारसोबत (Dilip Kumar) चित्रपटात भूमिका साकारण्याचा पहिला हा योग आला होता. तोपर्यंत ही संधी मिळाली नव्हती. संसार व करियर दोन्हीत हा चित्रपट महत्वाचा. कालांतराने सोशल मिडियाच्या काळात सायरा बानूने याच आनंदावर एक पोस्ट शेअर केली. ‘गोपी’च्या निमित्ताने साहेबांसोबतच्या पहिल्या दृश्याच्या शूटिंगचा आनंद यावर फोकस होता. त्यात अतिशय मनमोकळेपणाने म्हटलं होतं, माझे एक स्वप्न पूर्ण झाले. अभिनय शहेनशाहसोबत काम करण्याचा योग आला. एक चतुरस्र अभिनयातील आदर्श व्यक्तिमत्वासोबत काम करत होते म्हणून थोडी नर्व्हसही होते, सायरा बानूने आपल्या भावना मोकळ्या केल्या. सोबत दोघांचा एक फोटोही पोस्ट केला. अनेक फॅन्सनी या पोस्टला सकारात्मक प्रतिसाद दिला. खरं तर एव्हाना ‘गोपी ‘ खूपच मागील पिढीतील चित्रपट झाला होता, पण असे अनेक चित्रपट कधीच जुने होत नसतात. पुढील पिढीतील चित्रपट रसिकांनाही ज्ञात असतात.
============
हे देखील वाचा : अमिताभ यांनी मुलाच्या नाही तर चक्क मुलीच्या नावावर केली वास्तू
============
गोपी’मध्ये जाॅनी वाॅकर, सुदेशकुमार, मुकरी, ओम प्रकाश, निरुपा राॅय, फरिदा जलाल, ललिता पवार, दुर्गा खोटे आणि प्राण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नाती गोती, समज गैरसमज आणि त्यात ‘गोपी’ने काढलेला मार्ग अशीच साधारण गोष्ट. मांडणीत रंगत हवी, गीत संगीत व नृत्य भारी हवे आणि अभिनय प्रभावी हवा इतकीच त्या काळातील सर्वसाधारण चित्रपट रसिकांची अपेक्षा असे. चित्रपटाचा गोड शेवट तर फारच आवडे.
त्या काळात विविध भारतीवर नवीन चित्रपटांच्या प्रमोशनचे पंधरा मिनिटांचे प्रोग्राम असत. ते मोठ्याच प्रमाणावर ऐकले जात. ‘गोपी’च्या प्रोग्राममधील दोन डायलॉग फारच प्रसिद्ध झाले. ‘गोपी’ म्हणतो, मै हनुमान का भक्त, मेरे बारे में कैसे कैसे विचार करते हो, ऐसी बाते सोचो तो पाप लग जाएगा.. सीमाचाही ( अर्थात सायरा बानू) एक डायलॉग हिट होता, बीच मे गोपी राजा चारों तरफ गोपीया…
मुंबईत मेन थिएटर अप्सरामध्ये ‘गोपी’ने रौप्यमहोत्सवी यश संपादले आणि सायरा बानूची लग्नानंतरचीही नायिका म्हणून यशस्वी वाटचाल पहिल्यासारखीच सुरु राहिली. तीदेखील धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, विनोद खन्ना अशा नायकांसोबत. पिक्चरचं यश बरेच काही देत असतेच असते.