मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
महेश भट्टचा हा आहे सर्वोत्तम चित्रपट
महेश भट्ट दिग्दर्शित तुझे आवडते चित्रपट कोणते, असा कोणी प्रश्न करताच मी ‘अर्थ’ (१९८२), ‘सारांश’ (८४), ‘जख्म’ (९८), ‘सडक’ (९१) आणि ‘हम है राही प्यार के’ (९३) या क्रमाने सांगतो.
मला आठवतय, एकदा आम्हा काही सिनेपत्रकारांना मेहबूब स्टुडिओत शूटिंग रिपोर्टींगसाठीचा निरोप होता, महेश भट्टच्या चित्रपटाचे शूटिंग आहे. त्या दिवसात महेश भट्ट म्हणजे जणू ‘चित्रपट दिग्दर्शनाची फॅक्टरी’ होता. तोपर्यंत मोबाईल आला असला तरी महागडा होता, अन्यथा महेश भट्टने आपल्या एका चित्रपटाच्या सेटवर बसून आपल्या अन्य चित्रपटांच्या सेटवरचंही व्हिडिओ काॅलने दिग्दर्शन केले असते. त्यातही कौशल्य आहेच हो. गंमतीचा भाग सोडून द्या, पण प्रचंड क्षमता, तेवढेच व्हीजन, थीममध्ये विविधता (तो विचार करुनच मी त्याचे मला आवडलेले चित्रपट निवडलेत) आणि अतिशय फोकस्ड असणारा दिग्दर्शक म्हणून मी महेश भट्टना मानतो. त्या दिवशी एकाच वेळेस मेहबूब स्टुडिओत एका बाजूला ‘अंगारे’ तर दुसर्या बाजूला ‘ड्युप्लिकेट’चे शूटिंग होते आणि दोन्हीचे दिग्दर्शक अर्थातच महेश भट्ट.(Mahesh Bhatt)
अलिकडेच एका पंचतारांकित हॉटेलमधील एका छोट्या इव्हेन्टसमध्ये माझी महेश भट्टशी भेट होताच मी माझ्या मोबाईलमधील त्याचा पहिला चित्रपट ‘मंझिले और भी है’ ( १९७४) ची वृत्तपत्रीय जाहिरात दाखवताच तो प्रचंड सुखावला. या चित्रपटातील काही दृश्यांवर सेन्सॉरने हरकत घेतल्याने बराच वाद झाला होता. त्याची बोच आजही कायम होती हे जाणवले. असाच एक त्याचा बहुचर्चित चित्रपट ‘जख्म’ (रिलीज २५ डिसेंबर १९९८. पंचवीस वर्ष पूर्ण. गुगलवरची १५ डिसेंबर ही तारीख हा चित्रपट सेन्सॉर संमत झाल्याची आहे.)
महेश भट्टची (Mahesh Bhatt) आपली एक कामाची पद्धत, आपला चित्रपट पूर्ण होताच चित्रपटसृष्टी व मिडियातील काही मोजक्या जणांसाठी त्याची मिनी थिएटरमध्ये ट्रायल ठेवून जी काही असतील ती मते जाणून घे. अगदी नकारात्मक गोष्टही ऐकून घेणे. अन्यथा अनेक फिल्मवाल्यांना गोडधोडच ऐकायला आवडते हा माझा अनुभव. ‘जख्म ‘ची कथा महेश भट्टची तर पटकथा महेश भट्ट व तनुजा चंद्राची. संवाद गिरीश धमिया यांचे. छायाचित्रणकार निर्मल जानी. चित्रपटाची निर्मिती पूजा भट्ट प्राॅडक्सन्सची.
‘जख्म’ मी पाली हिलवरील सुनील दत्तच्या बंगल्यातील अंडरग्राऊंड अजंठा आर्ट्स मिनी थिएटरमध्ये पाहताना शहारलो. कोणत्याही प्रकारची भाषणबाजी, उपदेश न करता हिंदू व मुस्लिम यांच्यातील नातेसंबंध आणि संघर्ष यांच्या पाश्र्वभूमीवरील आई व मुलगा यांच्यातील भावनिक गोष्ट साकारली होती. महेश भट्टने स्वतःच्याच आयुष्यावर आधारित काहीसा हा चित्रपट साकारलाय. शिरीन मोहम्मद अली ( पूजा भट्ट) आणि चित्रपट दिग्दर्शक रमण देसाई ( नागार्जून) यांच्या प्रेमाची गोष्ट अनेक वळणे घेत घेत आकार घेते. तो हिंदू तर ती मुस्लिम. तिच्यावर दगडफेकही होते. तो लग्नासाठी मुस्लिम धर्म स्वीकारण्यास तयार नाही. मुलांच्या जन्मानंतर दुर्दैवाने रमण देसाईचा मृत्यू होता. त्यांचा मुलगा अजय ( शालेय वयात कुणाल खेमू. वयात आल्यावर अजय देवगन) हा आईला आपल्या वडिलांविषयी सतत विचारणा करतो. ते हिंदू आणि तू मुस्लिम कशी? चित्रपटाची सुरुवात अजय व त्याची पत्नी सोनिया ( सोनाली बेन्द्रे) यांच्यातील सोनियाचं म्हणणं असतं बाळंतपणासाठी इंग्लंडला जायचं यावरील वादाने होते. पण शहरातील धार्मिक दंगलीतून जाणे अवघड आहे असे अजयचे मत आणि फ्लॅशबॅकने चित्रपट सुरु होतो. अनेक नाट्यमय प्रसंगातून चित्रपट आकार घेतो. अगदी राजकीय नेता सुबोध मळगांवकर ( आशुतोष राणा) हिंदू मुस्लीम दंगलीचा प्रयत्न करतो वगैरे गोष्टी अवतीभवती आहेत. (Mahesh Bhatt)
सर्वात विशेष उल्लेखनीय गोष्ट, अजय देवगनला या भूमिकेच्या कसदार अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आणि त्याची ‘फूल और कांटे’ ( १९९१) पासून त्याला घट्ट चिकटलेली ‘गुंडा हीरो’ची इमेज कायमची निकालात निघाली. या चित्रपटाचे त्याला केवढे मोठे देणे. अजय देवगन चांगला अभिनय करु शकतो यावर शिक्कामोर्तब झाले आणि संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘हम दिल दे चुके सनम ‘ ( १९९९) मुळे तर तो अधिकच मॅच्युअर्ड अभिनेता म्हणून ओळखला जाऊ लागला. समिक्षक त्याला गंभीरपणे घेऊ लागले. १९९८ मधील अजय देवगनचे ‘मेजरसाब ‘, ‘प्यार तो होना ही था’ आणि ‘जख्म ‘ हे तीनही चित्रपट त्याच्या प्रगती पुस्तकात महत्वाचे. (Mahesh Bhatt)
पूजा भट्टसाठी ‘जख्म’ फारच महत्वाचा. तिने आपल्या खऱ्या आजीचीच जणू व्यक्तिरेखा साकारलीय. तिची साडी आणि मंगळसूत्रही वापरले. चित्रपटातील घर त्यांच्या खरोखरच्या घरासारखे. हे सगळेच अवघड काम आहे असे मानतच तिने या चित्रपटासाठी नकारच द्यायचा ठरवले होते. पण महेश भट्टने म्हटले, तू ही भूमिका करशील का असे मी तुला विचारले नाही. तू ही भूमिका कर असं म्हणालोय. यात त्याच्यातील पिता नव्हे तर दिग्दर्शक दिसतो. पूजा भट्टच्या बोल्ड फोटोसेशनपेक्षा ही भूमिका आव्हानात्मक. आणि तिने जबाबदारीने साकारली. आनंद बक्षी यांच्या गीतांना एम. एम. कीरवानी यांचे संगीत. अलका याज्ञिकने गायलेले ‘गली मे आज चांद निकला ‘ हे गाणे चित्रपटात जणू एक व्यक्तिरेखा साकारते.
============
हे देखील वाचा : ‘हिंदी पिक्चरमधील मराठी बाणा’ कायमच सुपरहिट
============
‘जख्म’ला नर्गिस दत्त राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार चित्रपट म्हणून गौरविण्यात आले. पण महेश भट्टने ‘आपला चित्रपट दिग्दर्शक म्हणून प्रवास’ थांबवण्याचा निर्णय घेऊन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्काच दिला. चित्रपट लेखन व निर्मिती इत्यादी गोष्टींतून त्यांनी कार्यरत राहण्यास प्राधान्य दिले. आपण दिग्दर्शक म्हणून नेमके कुठे थांबायला हवे याचा जणू उत्तम आदर्श त्यांनी घालून दिला. कालांतराने २०२० ला ‘सडक २’व्दारे दिग्दर्शनात पुनरागमन केले. पण तोपर्यंत मूळ दिग्दर्शनीय टच सुटला होता. सेटवरचे महेश भट्ट एक वेगळेच रसायन. त्यांच्या डोक्यात आणि डोळ्यात आपल्या प्रत्येक दृश्याची फ्रेम जणू फिट्ट केलेली. त्यानुसार ते कलाकार व कॅमेरामनना भराभर सुचना करीत. एकाच वेळेस अनेक चित्रपटांच्या दिग्दर्शनात लक्ष केंद्रित करणे हे त्यांनाच जमले हो. १९९८ या एकाच वर्षात उगाच नाही त्यांचे ‘अंगारे’, ‘ड्युप्लीकेट ‘ आणि ‘जख्म ‘ असे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. आणि सेटवर ते कितीही कामात असले तरी आम्हा सिनेपत्रकारांशी आवर्जून संवाद साधत पूजा भट्ट एका मुलाखतीत म्हणाली होती, ‘जख्म ‘ची रिमेक करणार. तसं झालं नाही ते बरेच झाले. या चित्रपटावर खास महेश भट्ट ठसा उमटलाय, तो पुन्हा शक्य नाही.