पंतप्रधान यांच्या एका सुचनेवरून बनला हा माइल स्टोन सिनेमा !
मनोज कुमारने पहिल्यांदा चित्रपटाचे दिग्दर्शन केले १९६७ साली ‘उपकार’ या सिनेमाचे. या सिनेमाची निर्मिती होण्यास तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची देखील मोठी भूमिका आहे. मनोज कुमार यांचा शहीद हा चित्रपट १९६५ साली प्रदर्शित झाला आणि चांगला चालला. या सिनेमाचे स्पेशल स्क्रीनिंग पंतप्रधानांसाठी त्यांनी दिल्लीमध्ये ठेवले होते. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री मुद्दाम हा सिनेमा बघण्यासाठी आले आणि त्यांनी तोंड भरून या सिनेमाचे कौतुक केले. (Milestone Cinema)
यावेळी बोलताना पंतप्रधान शास्त्री म्हणाले “आपला देश आता चांगली प्रगती करत आहे. देशाचे सैनिक आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी सक्षम आहेत. त्याचप्रमाणे देशातील शेतकरी देखील देशवासीयांचे पोट भरण्यासाठी कायम राबत असतात. या सैनिक आणि शेतकरी यांना देखील आपल्या रुपेरी पडद्यावर स्थान मिळाले पाहिजे. तुम्ही याबाबतीत काय करता येईल ते पहा.” मनोज कुमार यांना पंतप्रधानांचे ते बोलणे चांगलेच लक्षात राहिले दिल्लीहून मुंबईला परत येत असताना त्यांनी ट्रेनमध्येच आपल्या पुढील सिनेमाचा आराखडा तयार केला. ज्या मध्ये पंतप्रधानाने सांगितल्याप्रमाणे सैनिक आणि शेतकरी यांचा महत्त्वाचा भूमिका होत्या. ‘जय जवान जय किसान’ हा पंतप्रधानांचा नारा त्या काळात खूप लोकप्रिय झाला होता. मनोज कुमार यांना सुरुवातीला हेच नाव चित्रपटाचे ठेवायचे ठरले होते परंतु हे नाव प्रचारकी सिनेमाचे नाव ठरेल असे त्याच्या काही मित्रांचे म्हणणे होते म्हणून त्यांनी सिनेमाचे नाव ठेवले ‘उपकार’.(Milestone Cinema)
हा चित्रपट आणखी एका कारणासाठी कायम लक्षात राहतो. ते म्हणजे तोवर खलनायक म्हणून प्रसिद्ध असल्या प्राण या अभिनेत्याने या चित्रपटात पहिल्यांदाच एका चांगल्या व्यक्तीची भूमिका केली. हा एक प्रकारे मोठा जुगार होता. कारण प्रेक्षक प्राणला या भूमिकेमध्ये स्वीकारतील की नाही याची शंका स्वतः प्राण आणि मनोज कुमार यांना देखील होती. पण मनोज कुमारने तो जुगार खेळला आणि त्यात यशस्वी झाले.प्राण यांनी या चित्रपटात रंगवलेला अपंग मलंग चाचा अतिशय भावस्पर्शी झाला होता. अपंग कुबड्या घेऊन चालणारा मलंग चाचा या चित्रपटात एका गाण्यात गाताना देखील दिसतो. ते गीत गुलशन बावरा यांनी लिहिले होते. आणि गाण्याचे बोल होते ‘कस्मे वादे प्यार वफा सब बाते है बातो का क्या…’ मन्नाडे यांनी अतिशय बहुत भावोत्कट स्वरात पद्धतीने हे गाणं गायलं होतं. या गाण्याला त्या वर्षीचा पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटातील प्राण यांचा एक डायलॉग आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. ‘प्रभू रामचंद्र तो हर युग मे जनम लेते है लेकिन लक्ष्मण सिर्फ एक युग में ही जनम लेता है’.(Milestone Cinema)
उपकार हा चित्रपट 1967 सालचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला मनोज कुमारचा दिग्दर्शनातील पहिलाच प्रयत्न प्रचंड यशस्वी ठरतो या चित्रपटातला संगीत कल्याणजी यांनी दिले होते तर या सिनेमाची गाणी चार विभिन्न गीतकारांनी लिहिली होती. सिनेमातील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले आणि आज देखील भारतात आणि विदेशात प्रत्येक स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताक दिनी जे गाणे हमखास वाजवले जाते ते महेंद्र कपूर यांनी गायलेलं ‘मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती’ हे गाणं गुलशन बावरा यांनी लिहिलं होतं. त्यांनीच या चित्रपटातील ‘हर खुशी हो जहा तू जहा पे रहे..’ हे लता मंगेशकर यांनी गायलेले गाणे लिहिलं होतं. (Milestone Cinema)
गीतकार इंदीवर यांनी ‘कस्मे वादे प्यार वफा सब बाते है बातों का क्या…’ हे अप्रतिम गाणे लिहिले होते. त्यांनी या चित्रपटातील आणखी दोन गाणे देखील लिहिली होती जी आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायली होती. गीतकार प्रेम धवन यांनी ‘आई झुमके बसंत’ हे खास उत्तर भारतातील लोकसंगीताशी नाते सांगणारे गाणे लिहिले होते. तर जुने जाणते गीतकार कमर जलालाबादी यांनी ‘दिवानो से ये मत पूछो दिवानो पे क्या गुजरी है’ हे मुकेश ने गायलेले अप्रतिम गाणे लिहिले होते. उपकार या चित्रपटाला त्यावर्षीच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये तब्बल नऊ नामांकने मिळाली होती त्यापैकी सहा पुरस्कार त्यांनी पटकावले. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक(मनोजकुमार), सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता (प्राण), सर्वोत्कृष्ट गीतकार (गुलशन बावरा-मेरे देश की धरती), सर्वोत्कृष्ट कथा (मनोज कुमार) सर्वोत्कृष्ट संवाद (मनोजकुमार), सर्वोत्कृष्ट संकलन (बी एस ग्लाड) राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात देखील मनोज कुमार आणि महेंद्र कपूर यांना पारितोषिक मिळाले. (Milestone Cinema)
===========
हे देखील वाचा : अमिताभ बच्चन यांचा बंगाली सिनेमा ‘अनुसंधान’ पाहिलात का ?
===========
‘उपकार’ हा चित्रपट मनोज कुमारच्या आयुष्यातील ट्रेडमार्क चित्रपट ठरला. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी केलेल्या एका सुचनेवरून हा चित्रपट बनला! आणि इथून पुढे आयुष्यभर मनोज कुमार यांनी याच ‘देशभक्ती’ या जॉनरचे चित्रपट निर्माण केले!