राजेश खन्नाच्या भूमिकेने ‘हा’ सिनेमा झाला सुपरहिट!
हिंदी सिनेमाच्या इतिहासात गेस्ट अपिरेन्स तथा पाहुणे कलाकार हा कन्सेप्ट पहिल्यांदा कुठल्या चित्रपटात वापरला गेला माहिती नाही पण पाहुणे कलाकाराची भूमिका आणि चित्रपटातील यश याबाबत जर परफेक्ट उत्तर सांगायचे झाले तर एकच उत्तर देता येईल ते म्हणजे १९७१ साली प्रदर्शित झालेला ‘अंदाज’. या सिनेमांमध्ये राजेश खन्नाने (rajesh khanna) अक्षरशः पंधरा ते वीस मिनिटांची एक छोटीशी भूमिका केली आणि ही छोटी भूमिकाच तो चित्रपट सुपरहिट करण्याला कारणीभूत ठरली! मुळात ही भूमिका या चित्रपटात तेवढी महत्त्वाची नव्हतीच पण पटकथाकार सलीम जावेद यांनी या भूमिकेत रंग भरला आणि राजेश खन्नाच्या या कॅमिओ ऍपिरेन्समुळे सिनेमाला चार-चांद लागले. आज आपण जेव्हा राजेश खन्नाच्या सुवर्णमय कालखंडाचा विचार करतो; तेव्हा आपल्याला त्याने सलग १७ सिनेमा गोल्डन जुबली हिट दिल्याचे आपल्याला दिसते. या १७ सिनेमांमध्ये ‘अंदाज’ चा देखील समावेश होतो.सुपरस्टार राजेश खन्ना ला हि भूमिका कशी मिळाली?
जी पी सिप्पी यांच्या १९६९ साली आलेल्या ‘बंधन’ या चित्रपटात राजेश खन्ना (rajesh khanna) आणि मुमताज यांनी भूमिका केल्या होत्या. सिप्पी साहेबांनी पुढचा एक सिनेमा काढायचे ठरवले. त्यावेळी त्याचे दिग्दर्शन आपला मुलगा रमेश सिप्पी यांच्याकडे दिले. रमेश सिप्पी त्यावेळेला अवघे २३ वर्षाचे होते. दिग्दर्शनातील हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता. रमेश सिप्पी यांनी आपल्या वडिलांना हा सिनेमा मला माझ्या स्टाईलने बनवायचा आहे असे सांगितले .वडिलांनी देखील त्याला पूर्ण पाठिंबा दिला. चित्रपटाचे कथानक घेऊन रमेश सिप्पी शम्मी कपूर यांच्याकडे गेले. चित्रपटाचा विषय हा एका विधुर आणि विधवा यांच्या प्रेम कहाणीचा होता. खरंतर हा विषय त्या काळाच्या मानाने खूप पुढचा होता. हा सब्जेक्ट इथल्या प्रेक्षकांना आवडेल की नाही याची प्रचंड मोठी शंका सर्वांना होती. पण रमेश सिप्पी मात्र आपल्या कथानकावर ठाम होते. शम्मी कपूर यांनी जेव्हा कथानक ऐकले तेव्हा ते म्हणाले ,” तुला माझी स्टाईल माहिती आहे. लोक मला डान्सिंग स्टार म्हणून ओळखतात. अशा गंभीर विषयात लोक मला स्वीकारणार नाहीत.” त्यावर रमेश सिप्पी म्हणाले,” मी तुमचे सर्व चित्रपट पाहिलेले आहेत. मला तुमची स्टाईल देखील चांगली माहिती आहे. पण तुम्ही आता वयाच्या या अशा टप्प्यावर आहात की जिथे तुम्ही वेगळ्या प्रकारची भूमिका केली पाहिजे. तुम्हाला असे वाटत नाही का की तुम्ही तुमच्या नेहमीच्या स्टाईल मधून बाहेर पडून वेगळी भूमिका करावी?” त्यावर शम्मी कपूर म्हणाले,” मला नक्कीच तसं वाटतं. पण पहिल्याच सिनेमा तू अशी रिस्क घेऊन तुझ्या करिअरमध्ये का बाधा आणतोस?” त्यावर रमेश सिप्पी म्हणाले,” मला पूर्ण विश्वास आहे की हा विषय आजवर ज्या पद्धतीने समाजात आणि सिनेमात मांडला गेला त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने मला हा विषय मांडायचा आहे. मला हा फक्त सिनेमा बनवायचा नाही तर यातून मला वेगळा मेसेज समाजाला द्यायचा आहे.”
रमेश सिप्पी यांच्या डोळ्यातील चमक पाहून शम्मी कपूर यांनी चित्रपटाला होकार दिला. हा चित्रपट बनवताना सिप्पी यांनी कुठेही तो टिपिकल मेलो ड्रामा होऊ दिला नाही. कुमारी माता, तिचे प्रश्न, तिचे दुःख, विधुराच्या समस्या, एकेरी पालकत्व हे सर्व विषय मांडताना सिनेमा एक विशेष संदेश घेऊन पुढे जातो आणि प्रेक्षकांना देखील तो विषय डायजेस्ट होतो हे खरं रमेश सिप्पी यांचे यश होते. या चित्रपटात राजेश खन्ना ची व्यक्तिरेखा आधी नव्हतीच. पण जेव्हा सलीम जावेद यांनी कथेला थोडासा ट्विस्ट द्यायचा प्रयत्न केला आणि त्यात राजेश खन्नाचे कॅरेक्टर ॲड केले. ती भूमिका त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने पडद्यावर मांडली आणि राजेश खन्ना ने देखील आपल्या पंधरा मिनिटांच्या अभिनयाने सिनेमा खिशात टाकला. अक्षरशः ही पंधरा मिनिटे चित्रपटातील इतर सर्व व्यक्तिरेखांना फिकी करून गेली. हे यश जितके राजेश खन्नाचे (rajesh khanna) होते. तितकेच सलीम जावेद यांचे देखील होते. गंमत म्हणजे सलीम जावेद त्यावेळी सिप्पी फिल्मस मध्ये ७०० रुपये प्रति महिना या पगारावर काम करत होते. ‘अंदाज’ या चित्रपटाची कथा आणि स्क्रीन प्ले खरंतर सचिन भौमिक लिहिला होता. परंतु सलीम जावेद यांनी त्यांना सहाय्य करताना कथानका मध्ये भरीव अशी कामगिरी बजावली.
=========
हे देखील वाचा : राजेश खन्नाचा ‘हा’ शेवटचा प्रदर्शित झालेला सिनेमा
=========
हा चित्रपट तसा अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण होता कारण जय किशन यांच्या मृत्यूपूर्वी रिलीज झालेला हा शंकर जयकिशन यांचा शेवटचा चित्रपट होता. या सिनेमात हेमामालिनीच्या भूमिकेमध्ये नूतन हिचा विचार झाला होता. परंतु रमेश सिप्पी यांना त्यांच्या काही मित्रांनी नूतनने अशा प्रकारच्या भूमिका यापूर्वी देखील केल्या आहेत त्यामुळे पुन्हा एकदा टाईप्ड भूमिका होऊ शकते असे म्हणून त्यांनी नूतन च्या जागी हेमामालिनीची निवड केली. हि भूमिका त्या आधी मुमताजला ऑफर करण्यात आली होती. परंतु मुमताज आणि शम्मी कपूर यांच्यातील त्या काळातील संबंध लक्षात घेता मुमताजने नकार दिला आणि हेमा तिथे आली. चित्रपटातील गाणी हसरत जयपुरी यांनी लिहिली होती. ‘जिंदगी एक सफर है सुहाना यहा कल क्या हो किसने जाना….’ हे किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी स्वतंत्र गायलेले गाणे प्रचंड गाजले. त्यावर्षीच्या बिनाकाचे ते सर्वोत्कृष्ट गाणे ठरले. मुंबईच्या नरिमन पॉईंटवर मोटरसायकलवर हेमामालिनीला घेऊन फिरणारा राजेश खन्ना त्या काळातील तरुणांचा होता आयडॉल होता. हेमा मालिनी देखील या सिनेमात प्रचंड सुंदर दिसली होती. सिनेमातील इतर गाणी जसे ‘दिल उसे दो जो जान दे दे’,’ है ना बोलो बोलो’, ‘सुनलो सुनाता हू तुमको कहानी’ देखील मस्त जमून आली होती.
राजेश खन्नाने (rajesh khanna) नंतर अनेक चित्रपटातून कॅमिओ ऍपिरेन्समुळे केला. पटकन आठवायचं म्हटलं तर शक्ती सामंत यांच्या ‘अनुराग’ या चित्रपटातील त्यांच्यावरील एकाच गाण्याने (राम करे बबुआ) सिनेमाला चांगले यश मिळाले. तसेच ऐंशीच्या दशकात ‘डिस्को डान्सर’ या चित्रपटात राजेश खन्ना (rajesh khanna) वर एक गाणे चित्रित झाली होती ते गाणे होते ‘गोरो की न कालो की दुनिया है दिलवाली की….’