Aishwarya Rai Bachchan च्या बॉडीगार्डचा पगार माहितेय का? आकडा ऐकून

गाडीच्या टपावर पडणाऱ्या पावसाच्या थेंबाच्या आवाजातून सुचले हे गाणे!
कधीकधी एखाद्या गाण्यातील एखादा शब्द जादू करून जातो आणि २५ ते ३० वर्षे झाली तरी हे गाणं त्या शब्दामुळे लक्षात राहतं. चित्रपट विसरला जातो पण गाणं मात्र लक्षात राहतं. असाच काहीसा प्रकार सैफ अली खान आणि काजोल यांच्या एका गाण्याबाबत झाला होता. कोणतं होतं हे गाणं आणि कोणता होता तो शब्द ?

१९९४ साली यशराज फिल्म्सचा ‘ये दिल्लगी’ हा चित्रपट आला होता. हा सिनेमा नरेश मल्होत्रा यांनी दिग्दर्शित केला होता. यात सैफ अली खान, काजोल आणि अक्षय कुमार यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाची गाणी समीर अंजान यांनी लिहिली होती. संगीत दिलीप सेन समीर सेन (Dilip-Sameer Sen) यांचे होते. या चित्रपटातील चार गाणी तयार झाली होती. पण एका सिच्युएशन साठी गाणे हवे होते. त्यासाठी संगीतकार दिलीप सेन समीर सेन यश चोप्रांच्या ऑफिस मध्ये गेले होते. त्यांना गाण्याची सिच्युएशन सांगितली गेली.
घरी परत जात असताना वाटेत जोरात पाऊस सुरू झाला. मुंबईचा पाऊस. त्यामुळे त्या धुवाधार पावसात या गाण्याचा एक शब्द त्यांना सुचला. याचे कारण देखील अजब होते. त्याकाळी दिलीप-समीर (Dilip-Sameer Sen) यांच्याकडे एक सेकंड हॅन्ड मारुती व्हॅन होती. ही व्हॅन खूप जुनी झाली होती. पण तरीही हीच व्हॅन वापरत होते. या पावसामध्ये वरून पावसाचे थेंब पडताना जणू गारा पडत आहेत असा मोठा आवाज येत होता.

गारांना हिंदीत ‘ओले’ म्हणतात. त्यावर समीर आपल्या काकांना म्हणाले, “ इसपर एक अच्छासा गाना बन सकता है और उसमे हम एक शब्द भी डाल सकते है!” त्यावर दिलीप सेन (Dilip-Sameer Sen) यांनी विचारले,” कौनसा शब्द?” तेव्हा समीर म्हणाले, “ ओले ओले .” हा शब्द दोघांना ही खूप आवडला. त्यांनी गाण्याची धून तयार केली. गीतकार समीर यांना बोलावले आणि सांगितले, ”तुम्ही या धून वर गाणे लिहा पण त्यामध्ये ‘ओले ओले’ हा शब्द आला पाहिजे! हा शब्द या गाण्याचा प्रॉमिनंट हूक वर्ड आहे.”
समीरने एका बैठकीत गाणे लिहून काढले. पण नंतर त्यांना प्रश्न पडला यश चोप्रांच्या सिनेमातली गाणी किती सुंदर असतात… कभी कभी मेरे दिल में खयाल आता है, देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, तेरे मेरे होटोपे मीठे मीठे गीत मितवा आणि अशा निर्मात्याच्या चित्रपटात आपण ‘ओले ओले’ सारखे असंबध्द शब्द टाकावेत? हे त्यांना आवडेल का ? त्यांना प्रश्न पडला. त्यामुळे ते यश चोप्रांकडे जायला घाबरत होते. त्यांनी या गाण्याच्या दोन-तीन प्रकारे चाली तयार केल्या होत्या. चोप्रांकडे गेल्यानंतर त्यांनी त्या चाली ऐकवायला सुरुवात केली. (Dilip-Sameer Sen)

दिग्दर्शक नरेश मल्होत्रा म्हणाले, ”आता ती चाल ऐकवा ना!” त्यावर दिलीप समीर (Dilip-Sameer Sen) म्हणाले. ”नको..नको. यश चोप्रा यांना ती आवडणार नाही.” यश चोप्रांची देखील आता उत्सुकता वाढली. ते म्हणाले, ”कोणती चाल?” समीर म्हणाले, ”नको नको तुमच्या बॅनरला ते शब्द आणि गाणे शोभणार नाही.” त्यावर यश चोप्रा म्हणाले, ”गाणे गाणे असते. तुम्ही ऐकवा.” शेवटी दिलीप समीर यांनी ते गाणे ऐकवले. यश चोप्रा उडालेच. त्यांनाही ते गाणे प्रचंड आवडले. ते म्हणाले,” लिहून घ्या. हे गाणे शंभर टक्के हिट होणार!” आता दिलीप समीर (Dilip-Sameer Sen) उत्साहित झाले आणि त्यांनी लगेच गायक अभिजीतला बोलून हे गाणे रेकॉर्ड केले. सरोज खान यांनी या गाण्याची कोरिओग्राफी केली होती. सैफ अली खान यांचा हा सुरुवातीच्या काळातला चित्रपट होता. त्यांना खरी आयडेंटिटी या गाण्यामुळे मिळाली!
============
हे देखील वाचा : महेंद्र कपूरचे पहिले फिल्मफेअर आणि मुकेशने केले अभिनंदन!
============
आज हा चित्रपट प्रदर्शित होऊन तीस वर्षे झाली आहेत. चित्रपट कुणाच्या लक्षात राहिला नाही पण ‘जब भी कोई लडकी देखे मेरा दिल दिवाना बोले ओले ओले..’ आज देखील लक्षात आहे. गंमत म्हणजे या चित्रपटाच्या चार वर्षे आधी ‘त्रिदेव’ हा चित्रपट आला होता. त्यातील ‘ओये ओये’ हा शब्द देखील असाच लोकप्रिय झाला होता!