शाहीर उमप यांनी गायलेले ‘हे’ भारुड साठ वर्षाचे झाले
भारतीय समाज जीवनामध्ये लोकसंगीताचे स्थान खूप महत्त्वाचे आहे कारण हे संगीत इथल्या मातीचे संगीत आहे. पूर्वी मौखिक परंपरेतून चालत आलेला हा सांस्कृतिक ठेवा अनेक पिढ्यांनी जपत जपत पुढे वाढवला. या लोक संगीताचे अनेक प्रकार आहेत. आज मराठी लोक संगीतातील ‘भारुड’ या प्रकारातील एका भारुडाच्या रेकॉर्डिंगचा आणि त्या गाण्याचा किस्सा तुम्हाला सांगायचं आहे. हे भारुड लिहिलं होतं संत तुकाराम महाराजांनी. तब्बल तीनशे वर्षांपूर्वीचे हे भारुड जेव्हा या कलावंताने पुन्हा एकदा गायलं तेव्हा त्या भारुडाला आणि त्या गायकाला रसिकांनी डोक्यावर घेतले. कोण होता हा कलावंत? आणि कोणते होते हे भारुड? हे भारुड गायलं होतं ख्यातनाम कलावंत शाहीर विठ्ठल उमप यांनी!(Shahir Umap)
विठ्ठल उमप (Shahir Umap) हे सच्चे कलावंत होते. लोक संगीतातील प्रत्येक प्रकारावर त्यांचं विलक्षण प्रभुत्व होतं. खड्या स्वरात त्यांनी गायलेली गाणी आजही रसिकांच्या मनात ताजी आहेत. ज्या भारुडाचा मी वर उल्लेख केला ते भारुड १९६३ साली ध्वनिमुद्रित झालं होतं. या वर्षी भारुडाला तब्बल साठ वर्षे झाली आहे. तरी आज अनेक रियालिटी शो मध्ये या भारुडाची हमखास वर्णी लागते. अनेक तरुण गायक गायिका हे भारुड गातात. संत तुकाराम महाराज यांचे चपखल शब्द जितके महत्त्वाचे आहेत तितकेच विठ्ठल उमप यांचे स्वर देखील परिणामकारक आहेत.
या भारुडाच्या रेकॉर्डिंगचा किस्सा खूप मजेदार आहे. हे भारुड संगीतकार मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलं होतं. याचं रेकॉर्डिंग व्हायच्या आदल्या दिवशी विठ्ठल उमप यांचा ठाणे जिल्ह्यामध्ये एक जलशाचा कार्यक्रम होता. विठ्ठल उमप हे जनसामान्यांचे आवडते कलाकार असल्यामुळे हा कार्यक्रम पहाटे उशिरापर्यंत चालला. आणि रात्रभर विठ्ठल उमप एकटे गात होते. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता एचएमव्ही स्टुडिओमध्ये या भारुडाच्या रेकॉर्डिंग होणार होते. पहाटे कार्यक्रम संपल्यानंतर मुंबईला जाण्यासाठी एकही बस उपलब्ध नव्हती. शेवटी विठ्ठल उमप यांनी एका वाळूच्या ट्रकला हात करून त्याला परिस्थिती सांगितली आणि त्या ट्रक ड्रायव्हरने विठ्ठल उमप यांना ठाण्यापर्यंत सोडले. ठाण्याला आल्यानंतर तिथे स्टेशनवरच त्यांनी तोंड वगैरे धुतले आणि नास्ता न करता तसेच मुंबईच्या दिशेने त्यांनी कुच केले. धावतपळत सकाळी पावणेअकरा वाजता त्यांनी स्टुडिओ गाठला. नेहमी रेकॉर्डिंगला वेळेत उपस्थित राहणारे विठ्ठल उमप आज नेमके उशिरा कसे आले याच्या आश्चर्य सर्वांनाच वाटले.(Shahir Umap)
रात्रभर खड्या स्वरात गाणे झाल्यामुळे विठ्ठल उमप यांचा आवाज बसला होता. प्रवासाच्या दरम्यान आपल्याला आज कसे गाता येईल याची त्यांना काळजी होती. परंतु दिलेला शब्द कसा टाळता येईल? आपल्यासाठी मधुकर पाठक यांनी रेकॉर्डिंग स्टुडिओ बुक केला आहे. त्यांचे पैसे त्यामध्ये अडकले आहेत. कुणाचे नुकसान करणे हे त्यांना पटणारे नव्हते. त्यामुळे त्यांनी गायचा निर्णय घेतला आणि काय आश्चर्य! विठ्ठल उमप यांनी गायला सुरुवात केली आणि जणू काही त्यांचा आवाज पुन्हा एकदा पहिल्यासारखा येऊ लागला! त्याचे त्यांनाच आश्चर्य वाटले आणि थोडी रिहर्सल केल्यानंतर रेकॉर्डिंग सुरू झाले. भारुडाचे बोल होते ‘फू बाई फू फुगडी फू दमलास काय माझ्या गोविंदा तू ….’ विठ्ठल उमप (Shahir Umap) हे जसे गायक होते तसेच चांगले अभिनेते देखील होते. त्यामुळे गाताना ते मस्तपैकी अभिनय देखील करत. हे भारुड देखील त्यांनी मस्तीत गायले होते त्यामुळे मजा आली. गाण्यांमध्ये एक जिवंतपणा आला. मधुकर पाठक देखील खुश झाले. गाण्याचे रेकॉर्डिंग झाल्यानंतर विठ्ठल उमप यांनी मधुकर पाठक यांना सांगितले की ,”काल रात्रभर मी गात होतो आणि माझा आवाज बसला होता!” परंतु मधुकर पाठक म्हणाले,” मला तर तुझ्या आवाजात काहीच फरक वाटला नाही.”
====
हे देखील वाचा : प्रसिद्ध गीतकार- कवी यांच्या पहिल्या भेटीचा रंजक किस्सा!
====
हा एक चमत्कार होता. विठ्ठल उमप (Shahir Umap) खरोखरच महान चमत्कार होते त्यांच्या जांभूळ आख्यानाने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले. वयाच्या पंचाहत्तरीत देखील ते द्रौपदीच्या लाजण्याचा जो अविर्भाव प्रेक्षकांना दाखवीत तो लाजवाब असा होता. लोकसंगीतातील कोणताही प्रहार त्यांना वर्ज्य नव्हता. लोककलेच्या सर्वच कलाप्रकारांत लीलया संचार केला होता. त्यात पोवाडा, बहुरूपी, भारूड, भजन, गण-गवळण, लावणी, कवने, तुंबडी, बोबडी, धनगरी गीते, नंदीबैल, वासुदेव, डोंबारी, पोतराज, गोंधळी असे अस्सल मऱ्हाटमोळी कलाप्रकार होतेच; पण कव्वाली आणि गझल गायनांतही ते आघाडीवर होते. नी लोककलेतील सर्व प्रकारांत आपला अमीट ठसा उमटवला होता. “दार उघड बया दार उघड’, “खंडोबाचं लगीन’, “विठ्ठल रखुमाई’ असे त्यांचे कितीतरी कार्यक्रम रसिकांच्या लक्षात आहेत. त्यांनी काही चित्रपटात भूमिका देखील केल्या होत्या ‘टिंग्या’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना पारितोषिक देखील मिळाले होते. या महान कलाकाराचा मृत्यू देखील फार चटका लावून जाणारा होता. नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये २७ नोव्हेंबर २०१० या दिवशी ‘जय भीम’, ‘जय बुद्ध’ असे म्हणत असताना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि तिथेच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. आयुष्यभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांवर चालणाऱ्या त्यांच्या सच्चा पाईकाला मृत्यू देखील या महान विभूतींच्या चरणी यावा हा मोठा भावस्पर्शी प्रसंग होता!