‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
डायनिंग टेबलवर बनले आर डी बर्मन यांचे हे सुपरहिट गाणे!
संगीतकार राहुल देव बर्मन (R. D. Burman) यांच्यासोबत अनेक गीतकारांनी गाणी लिहिली. यात गुलजार, मजरूह सुलतानपुरी, आनंद बक्षी यांच्यापासून थेट गुलशन बावरा,जावेद अख्तर यांचा समावेश होतो. प्रत्येक गीतकार सोबत आर डी बर्मन यांची मस्त जोडी जमत होती. एक विशिष्टच गीतकार पाहिजे असा त्यांचा कधीच आग्रह नसायचा. गीतकार गुलशन बावरा यांच्यासोबत सत्तर आणि ऐंशी च्या दशकामध्ये आर डी बर्मन यांची मस्त जोडी जमली होती. खेल खेल मे, कसमे वादे, झूठा कही का, सत्ते पे सत्ता हे आणि असे अनेक चित्रपट या काळात त्यांनी एकत्र केले. त्या दोघांमध्ये मस्त ट्युनिंग त्या काळात जमले होते. या दोघांची जोडी जमण्याचे दुसरे कारण म्हणजे हे दोघेही जबरदस्त फूडी होते. वेगवेगळ्या डिश बनवून खायचा दोघांनाही छंद होता. गुलशन बावरा मस्त पंजाबी तडक्यामध्ये बनवलेले बटर चिकन आर डी बर्मन यांच्याकडे पाठवत असे तर आर डी बर्मन (R. D. Burman) यांच्याकडे बनलेले बंगाली स्टाईल चे फिश गुलशन बावरा यांच्या घरी जात असे. दोघे बऱ्याचदा काही वेगळी डिश बनवली की एकमेकांना खाण्यासाठी आणि खिलवण्यासाठी बोलवत असे. या खमंग टेस्टी डिश खातानाच अनेक सुंदर गाण्यांचा जन्म होत असे.
असाच एक मजेदार किस्सा गीतकार गुलशन बावरा यांनी आर डी गेल्या नंतर विविध भारतीवर एका मुलाखतीत सांगितला होता. आर डी बर्मन मत्स्यप्रेमी होते. बंगाली पद्धतीने बनवलेली फिश करी त्यांना खूप आवडायची. गुलशन बावरा यांना देखील ही फिश करी खूप आवडायची. ते नेहमी आर डी बर्मन (R. D. Burman) यांच्या कडे फर्माईश करायचे ,” जेव्हा कधी फिश करी बनवाल तेव्हा मला नक्की सांगा आणि मला खायला बोलवा!” आर डी देखील त्यांची ही फर्माईश नेहमी पूर्ण करायचे. एकदा मात्र त्यांच्या या अंगत पंगत सोहळ्यात खूप गॅप पडला. गुलशन बावरा नेहमी त्यांना त्या डिश ची आठवण करून देत. मात्र लवकरच एकदा आर डी बर्मन कडे (R. D. Burman) फिश करी बनवली गेली आर डी ने फोन करून सांगितले . गुलशन बावराला ते म्हणाले,” मी आज तुझ्यासाठी मस्त फिश करी घेऊन येतो आहे. मस्त तब्येतीने एकत्र जेवण करू, गप्पा मारू. आजचे बाकी सर्व प्रोग्राम कॅन्सल!” गुलशन बावरा एकदम खुश झाले. खूप दिवसांची प्रतीक्षा आज संपणार होती. दुपारी आर डी भरपूर फिश करी घेऊन त्याच्याकडे गेले. दोघांच्या गप्पा झाल्यानंतर जेवणाचा आस्वाद घ्यायला त्यांनी सुरुवात केली!
===========
हे देखील वाचा : यामुळे लता मंगेशकर आणि रफी एकमेकांसोबत गात नव्हते…
===========
परंतु या वेळ ची फिश करी गुलशन बावरा यांना काही आवडली नाही. कारण ती बंगाली पद्धतीने न बनवता कोकणी पद्धतीने बनवली होती! गुलशन बावरा यांचा भ्रमनिरास झाला. आर डी बर्मन (R. D. Burman) त्याला सॉरी म्हणत म्हणाले,” यार मेरा बंगाली कुक जरा गाव गया है इसलिए आज कोकण स्टाईल फिश करी बनाया. सॉरी यार पर बहुत जल्दी मेरा वो कुक वापस आयेगा फिर तेरी पसंद पुरी करुंगा!” त्यावर गुलशन बावरा म्हणाले ,” अरे यार इसमे सॉरी क्या? आप हम पर कितना भी सितम करलो पर हमारी दोस्ती, हमारा प्यार कभी नही बदलेगा!” या वाक्यानंतर आर डी बर्मन म्हणाले,” अरे यार कितनी प्यारी बात आपने बताई है. इस पर तो गाना बन सकता है.” जेवण झाल्यानंतर लगेच गुलशन बावरा यांनी कागद काढले आणि आर डीला आवडलेल्या ओळीवर गाणे लिहायला सुरुवात केली. आर डी ने तिथेच डायनिंग टेबल वर ड ड ड डा s s असा ठेका धरला. गुलशन बावरा ने त्या मीटर वर शब्द लिहायला सुरुवात केली. ‘ कितने भी तू करले सितम हस हस के सहेंगे हम ये प्यार ना होगा कम सनम तेरी कसम…..” आर डी ने लगेच डायनिंग टेबलवरच ठेका धरत गाण्याची चाल तयार झाली. खरंच ते दृश्य किती मनोरम असेल!
पुढे १९८२ साली नरेंद्र बेदी यांच्या ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटाच्या वेळी हा मुखडा दोघांना आठवला आणि त्यावर कडवी लिहून टाकली किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी स्वतंत्ररित्या आणि युगल गीत स्वरूपात देखील हे गाणं तयार झालं आणि प्रचंड लोकप्रिय ठरला. दिग्दर्शक नरेंद्र बेदी यांना तर हे गाणे इतके आवडले की त्यांनी या गाण्यातील शब्दावरूनच चित्रपटाचे नाव फायनल केले ‘सनम तेरी कसम’. या चित्रपटात रीना रॉय आणि कमल हसन यांच्या प्रमुख भूमिका होत्या.१४ मे १९८२ रोजी प्रदर्शित झालेला हा सुपरहिट म्युझिकल सिनेमा ठरला. या सिनेमा करिता आर डी बर्मन (R. D. Burman) यांना पहिले फिल्मफेअरचे अवॉर्ड मिळाले.
डायनिंग टेबलवर सुचलेल्या काही ओळींनी एका सुपरहिट गाण्याला जन्म दिला आणि एका सुपर हिट सिनेमाला जन्म दिला.