Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

लता दीदी आणि दिलीप यांची ‘ही’ भेट ठरली शेवटची
भारतीय सिनेमाचे सर्वात मोठी उपलब्धी काय ? असा प्रश्न एका ब्रिटिश पत्रकाराला एका चित्रपट महोत्सवात विचारला गेला होता. तेव्हा त्याने उत्तर दिले ‘लता मंगेशकर, दिलीप कुमार आणि सत्यजित रे !’ खरोखरच या तिघांनी भारतीय सिनेमाला फार मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले. लता मंगेशकर आणि दिलीप कुमार या दोघांनी तर हिंदी चित्रपट सृष्टीतील रसिकांसाठी एक समृद्ध असा सांस्कृतिक खजिना निर्माण केला. या दोघांची पहिली आणि शेवटची भेट कधी झाली ? हा खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे. (Lata Mangeshkar)
दरम्यानच्या काळात मधली तब्बल दहा-बारा वर्षे या दोघांमध्ये अबोला होता. हे तुम्हाला ठावूक आहे काय ? हा एकूणच खूप मनोरंजक असा किस्सा आहे. दिलीप कुमार आणि लता मंगेशकर यांची पहिली भेट मुंबईच्या लोकलमध्ये झाली! खरं तर आज खूप अशक्यप्राय वाटणारी ही घटना आहे पण त्या काळात अनेक मोठे कलाकार लोकल मधून प्रवास करत असे. त्या दिवशी लता मंगेशकर अनिल विश्वास यांच्यासोबत बॉम्बे टॉकीज ला जाण्यासाठी लोकलने प्रवास करत होत्या. त्यांना जायचे होते मालाड ला. वाटेत बांद्रा या स्टेशनवर अभिनेता दिलीप कुमार त्याच लोकलच्या डब्यात शिरला. अनिल विश्वास आणि दिलीप कुमार यांची ओळख होती. त्यांनी गप्पा मारायला सुरुवात केली.

दिलीप कुमार यांनी अनिल विश्वास यांना विचारले,” ही मुलगी कोण आहे?” त्यावर त्यांनी सांगितले, ” ही लता मंगेशकर आहे आणि हिने हिंदी सिनेमात नुकतेच गायला सुरुवात केली आहे.” त्यावर दिलीप कुमार म्हणाले,” लता मंगेशकर म्हणजे मराठी भाषिक. ये मराठी लडकी कैसे गाना गायेगी ? इनकी आवाज मे तो दाल चावल की बू आती है” त्याला असे म्हणायचे होते की, हिंदी सिनेमांमध्ये गाणाऱ्या व्यक्तीचे हिंदी आणि उर्दू शब्दाचे उच्चार हे अधिक स्पष्ट असायला हवेत. मराठी भाषिक कलाकारांना ते कसे शक्य होणार होते ? लता मंगेशकर त्यावेळी गप्प बसली कारण ती त्यावेळी खरोखर नवीन होती. (Lata Mangeshkar)
पण तिने दिलीप कुमारचे ते शब्द लक्षात ठेवले. आपल्याला हिंदी सिनेमात जर टिकायचे असेल तर आपले उर्दू आणि हिंदी उच्चार निर्दोष आणि स्पष्ट असायला पाहिजेत यासाठी तिने संध्याकाळीच संगीतकार मोहम्मद शफी यांना आपल्या घरी बोलवून घेतले. आपल्यासाठी उर्दू टीचरची नेमणूक करायला सांगितली. त्या पद्धतीने त्यांनी एका उर्दू शिक्षकाला लता मंगेशकर यांच्या घरी रोज पाठवायला सुरुवात केली. लता मंगेशकर यांनी त्यांच्याकडून आपल्या उर्दू भाषा उच्चार स्पष्ट शिकून घेतले. नंतर काही दिवसातच लता सफाईदारपणे हिंदी आणि उर्दू शब्द व्यवस्थितरित्या गाऊ लागली.
त्यानंतर १९५६ साली ऋषिकेश मुखर्जी यांच्या ‘मुसाफिर’ या चित्रपटात संगीतकार सलील चौधरी यांनी लता मंगेशकर आणि दिलीप कुमार यांच्या स्वरात एक युगलगीत जाऊन घेतले. या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी दिलीप कुमार प्रचंड घाबरला होता. कारण लता मंगेशकर आता दहा वर्षांपूर्वीची लता मंगेशकर राहिली नव्हती. ती आता एक लिजंड बनली होती. आणि तिच्यासोबत गाणे ही साधी गोष्ट नव्हती. दिलीप कुमारने एका मुलाखतीत सांगितले की,” त्यावेळी मी इतका घाबरलो होतो की रेकॉर्डिंग ला जाताना मी चक्क स्कॉच चे दोन पेग घेऊनच गेलो होतो… भीती घालवण्यासाठी!” लताने देखील दहा वर्षांपूर्वी दिलीप कुमार ने केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मोठ्या टेचातच गाणे गायले. गाण्याचे बोल होते ‘लागी नाही छुटे राम चाहे जिया जाये..’ दिलीप कुमारने आपण आणखी एक टेक घेऊ असे सलील चौधरींना सांगितले पण सलील त्यांनी सांगितले ‘हा टेक ओके आहे’. (Lata Mangeshkar)
दिलीप कुमार या नंतर मात्र लता मंगेशकर वर खूप नाराज झाला कारण लताने त्याला पराभूत करण्यासाठीच हे गाणे गायले असे त्यांना वाटले. त्या दोघांमधील संवाद थांबला. थोडे थोडके दिवस नाही तर तब्बल तेरा वर्ष. १९६९ साली मुंबईतील एका प्रमुख वृत्तपत्राने राखी पौर्णिमेच्या दिवशी एका फोटोसेशनसाठी या दोघांना एकत्र बोलावले आणि या दोघांमधील संवाद पुन्हा एकदा सुरू झाला. त्या वृत्तपत्रात ‘लता मंगेशकर दिलीप कुमार यांना राखी बांधते आहे’ असा फोटो प्रकाशित झाला होता. हिंदू मुस्लिम ऐक्य हा एक सोशल मेसेज यामधून द्यायचा होता. यानंतर या दोघांच्या संबंधात खूपच सुधारणा झाली. १९७३ साली लंडनच्या अल्बर्ट हॉलमध्ये झालेल्या लता मंगेशकर यांच्या कार्यक्रमात लताची ओळख दिलीप कुमार यांनी करून दिली. या कार्यक्रमात दिलीप कुमारने ‘मेरी छोटी बहना…’ म्हणून तिचा उल्लेख केला.
============
हे देखील वाचा : ‘या’ कपूरने आर के फिल्म्स मध्ये काम करायला दिला नकार
============
या दोघांची शेवटची भेट १४ डिसेंबर २०१४ या दिवशी झाली. या दिवशी दिलीप कुमार यांचा वाढदिवस होता. लता मंगेशकर, खास त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या पाली हील येथील निवासस्थानी गेल्या होत्या. तेव्हा दिलीप कुमारला बऱ्यापैकी अल्झायमरचा त्रास सुरू झाला होता. ते लोकांना नीट ओळखत नव्हते. परंतु लता मंगेशकर गेल्यावर चमत्कार झाला. तिने दिलीप कुमारच्या सोबत जाऊन त्यांना विचारले ‘लागी नाही छुटे राम …’ त्यावर दिलीपकुमार हसत उत्तर दिले ‘चाहे जिया जाये…’ सर्वांना खूपच आनंद झाला. (Lata Mangeshkar)
खूप वर्षानंतर दिलीप कुमार यांनी कोणाला तरी परफेक्ट ओळखले होते. लताच्या सादाला प्रतिसाद दिला होता. तो क्षण खूप आनंदाचा क्षण होता. लता मंगेशकर यांनी स्वतःच्या हाताने दिलीप कुमार यांना केक भरवला. दिलीप कुमार त्यावेळी फारसे बोलू शकत नव्हते पण त्यांच्या डोळ्यातून सतत पाणी येत होते. खूपच हृद्य असा हा सोहळा होता. यानंतर लता मंगेशकर आणि दिलीप कुमार दोघांची प्रकृती हळूहळू बिघडत गेली. ७ जुलै २०२१ ला दिलीप कुमार आणि ६ फेब्रुवारी २०२२ या दिवशी लता मंगेशकर यांचे निधन झाले. दोन महान कलावंतांच्या राग आणि अनुरागाची ही दिलचस्प दास्तान !