मुखवटाधारी शोषितांचं जगणं मांडणारे तीन चेहरे…
कोणत्याही कलेला दबावाचा वा विशिष्ट सामाजिक, राजकीय बंधनांचा विळगा पडला की हळूहळू त्या कलेचा मृत्यू होण्यास सुरुवात होते.पण कलाकाराची कलेप्रती असणारी ओढ ,जबाबदारी तशाही परिस्थितीत कलेच्या अस्तित्वाला पूरक ठरते. लेखाचं निमित्त म्हणजे आपल्या भोवतालचं प्रचंड बदललेलं वातावरण आणि त्यापेक्षाही तीव्र प्रतिगामीत्वाच्या परिणामांची नोंद घेणारा आणि त्यासंबंधीचे तपशीलवार संदर्भ मांडणारा जाफर पनाहींचा थ्री फेसेस (से रोख) हा २०१८ मध्ये कान्सला पाम डी’ओर मिळवणारा पर्शियन व अजेरी भाषेत बनलेला व फ्रेंच प्रॉडक्शन कंपनीने डिस्ट्रीब्यूट केलेला इरानियन सिनेमा !
‘द सर्कल’ सारखाच हाही निओरिअॅलिझमला मांडणारा आणि घटनांचं काव्यमय चित्रण करणारा सिनेमा.पण उत्तर इराणचं भकास डोंगरी – वाळवंटी वातावरण आणि तत्कालीन क्रांतीच्या उत्तरोत्तर अधिकच सामाजिक – राजकीय चौकटींनी बंदिस्त झालेल्या एकजिनसी समाजाचं ठळक चित्रण अमीन जाफरीच्या छायाचित्रणातून होतं.पनीहींचे सिनेमे इराणच्या वास्तविक परिस्थितीचं चित्रण करत नाहीत , त्यात मांडलेल्या स्त्रियांच्या वेदना फक्त मर्यादित वर्गातील स्त्रियांच्या समूहाच्याच वास्तवात आहेत अशी काही स्थानिक समीक्षक त्यावर टीका करत असतात.
पनाही स्वतः त्यांच्या शैलीबद्दल एका मुलाखतीत सांगतात की ,” माझ्या चित्रपटांना काव्यात्मक आणि कलात्मक पद्धतीने दर्शवलेल्या मानवी घटना म्हणता येईल.याचा प्रत्ययही त्यांच्या अनेक चित्रपटातून येतो.’द व्हाईट बलून’मध्ये एक डॉलरपेक्षाही कमी किमतीत मासे विकत घेण्याचा प्रयत्न करणारी लहान मुलगी दिसते.तर ‘क्रिमसन गोल्ड’मध्ये हमीद देबाशींच्या म्हणण्यानुसार , ती फक्त फसलेल्या दरोड्याची कथा उरत नाही तर तो तत्कालीन अपयशी ठरलेल्या इस्लामिक क्रांतीचा व इराण – इराक युद्धाचा इतिहास ठरतो.
एका मालिकेची शूटिंग करत असताना अभिनेत्री बेहनाज जाफरीला मरजिये या तरूणीचा आत्महत्या करताना मदतीची आर्जव करणारा व्हिडीओ मोबाइलवर पाठवण्यात येतो आणि ती दिग्दर्शक मित्र जाफर पनाहींसोबत त्या मुलीचा शोध घेण्यासाठी निघते.त्यानंतर जे प्रसंग एकानंतर एक निर्माण होतात तीच चित्रपटाची कथा आहे.जाफर पनाही आणि नादेर सेईवार यांच्या पटकथेतून हे प्रसंग खुलत जातात.( सर्व पात्रांची नावे खरीखुरी आहेत त्यामुळे इथे देत नाहीत.) इराण – इराक युद्ध घडल्यानंतर तरी मागासलेल्या ग्रामीण समाजाची मानसिकता का बदलली नाही हा ज्वलंत प्रश्न येथे उभा राहतो.या प्रश्नांमुळे निर्माण झालेली संकटे जशी कथेतल्या पात्रांना झेलावी लागताहेत तीच जाफरींनाही झेलावी लागलेली आहेत.यातल्या तीन चेहऱ्यांपैकी एक चेहरा त्यांचाही आहे असं म्हणता येईल.
चित्रपटात जागोजागी लक्ष वेधणारा विरोधाभासही दिसून येतो.एकीकडे मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुंतेनंतरची धार्मिक रूढीपरंपरा नीट व्हावी यासाठी तळमळणारा बाप दिसतो तर दुसरीकडे मुलगी परत घरी आल्यावर स्वतःच्या आक्रस्ताळलेल्या पुरूषवर्चस्ववादी वृत्तीच्या मुलाला घराबाहेर हाकलून लावणारा बाप दिसतो.कथेच्या पूर्वार्धात व्हिडीओ खोटा नसल्याचं सांगत काळजी करणारे पनाही दिसतात तर त्याचवेळी त्यातल्या तांत्रिक बाबीतले दोष दर्शवणारी चिंतित बेहनाज दिसते.अशाप्रकारे विचारातले ,अनुभवातले,संवादातले बारकावे आणि विरोधाभास दिसत जातात.हे फक्त सिनेमातील प्रसंगापुरतेच न उरता एका अस्थिर समाजाचं व्यापक दृष्टिकोणातून चित्रण करतात.कलेच्या आड येणारा धर्म आणि धर्मामागून सुमडीत चाललेलं राजकारण हे थोड्याबहुत फरकाने साम्य साधणाऱ्या प्रत्येक देशाचीच अवस्था असणारं चित्र यातून दिसतं.
संस्कृतीच्या नावावर कलाकारांवर रूढीवाद्यांनी घातलेली बंधने हा जागतिक दर्जावरचा प्रश्न झाला असून इस्लामिक राष्ट्रांमध्ये तर तो तीव्रतेने जाणवतो.अशावेळी परिस्थितीकडे डोळस बनून बघण्याचा प्रयत्न खरा कलाकार करतो.स्वतःच्या जीवावर उदार होऊन इतरांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न प्रत्येक काळात सुधारणाप्रिय मत असणाऱ्या कलाकारापासून होत आलाय.कला ही जीवनदृष्टी अधिकाधिक विकसित होण्याचं साधन अशावेळी बनते.त्यासाठी त्या मातीत स्वातंत्र्याची जाणीव असणारे कलाकार होणं गरजेचं आहे.
जेव्हा कथेतील मुख्य पात्रे एका स्थानिक हॉटेलमध्ये बसतात तेव्हा एक गावकरी म्हणतो ,”गावात डॉक्टरांपेक्षा जास्त केबलची संख्या आहे. गरज पडल्यावर ते कामी येणार का ?’असा प्रश्न उपस्थित करून तो नंतर गावातील भौगोलिक संरचनेविषयी चर्चा सुरू करतो.रस्त्याच्या मधोमध अस्वस्थ अवस्थेत पडलेल्या बैलासंबंधीची चर्चा ,हॉर्नसंबंधीची चर्चा असे अनावश्यक वाटणारे प्रसंग चित्रपटात असले तरी जाफर पनाहींच्या चित्रपटात ते असल्याने त्याचं एक वेगळं अस्तित्व इथे जाणवतं. तोच दुसऱ्या बाजूला 50च्या दशकात इराणीयन चित्रपटात आपली छाप उमटवणाऱ्या बेहरूज वोसोगिया या सुप्रसिद्ध अभिनेत्याचं आणि कारकिर्दीच्या संपण्यानंतर बहिष्कृताचं जगणं नशिबी आलेल्या शहरजाद या पर्शियन डान्सर,अभिनेत्री ,दिग्दर्शिका ,सांस्कृतिक टिकाकार, कवयित्रीची शोकांतिका दिसते.अगदी कॅमेऱ्यातही न मावणाऱ्या एका गावकुसाबाहेर असणाऱ्या खोलीत ती पेंटिंग करत आणि कविता करत आपलं आयुष्य कंठत असते.तिच्या एका नुकत्याच रिकॉर्ड केलेल्या कवितेच्या काही सुंदर ओळीही चित्रपटात दिसतात आणि डोळ्यांच्या कडा नकळतच पाणावतात. तिला असं समूहाबाहेर राहण्याचं कोणतंही दुःख नाही पण अनेक दिग्दर्शकांकडून होणारा अत्याचार सहन केल्यामुळे निर्माण झालेला द्वेष नक्कीच आहे. तिची कथा बघून आपण जाफरींच्या वर्तमानाची किंवा भविष्यात मरजियेच्या बाबतीत तसं होऊ नये याची कल्पना करतो.
मरजिये ही विवाहिता तरूणी आहे. अभ्यासात ओढ ,आवड असतानाही कुटुंबियांकडून तिचं लग्न लावून दिलं जातं.नवरा महिनो न् महिने कामासाठी बाहेर असल्याने तिला सासरवास सहन करावा लागतो.अशातच आपली आवड जोपासत स्वतःच्या पायावर उभं राहू इच्छिणाऱ्या या तरूणीला प्रचंड विरोधाचा सामना करावा लागतो आणि अभिनेत्री बेहनाजकडून मदत मिळेल या अपेक्षेने ती हा व्हिडीओ बनवते , परंतु वास्तवात ती आत्महत्या करत नाही.बेहनाजही शेवटी तिची मदत करण्यासाठी तयार होते.परंतु आपल्याला खोटं बोलण्यात आलं याचा राग ती भेटल्यावर काढतेच.तसेच एक स्त्री असल्याने तिची सहवेदना ती जाणू शकते.कारण त्याच समाजात ,त्याच क्षेत्रात तीही वावरत आहे.साहजिकच तीही अनेक प्रसंगातून गेलेली असणार !
२०१० मध्ये पनाहींना अटक केल्यानंतर इराण सरकारने त्यांना सहा वर्षाच्या तुरूंगवासाची आणि वीस वर्षाच्या सिनेमासंबंधी कसल्याही कार्यात सहभागी न होण्याची शिक्षा दिली होती परंतु रॉबर्ट डी निरो ,मार्टिन स्कॉर्सिझी ,रिचर्ड लिंकलेटर अशा दिग्गज कलाप्रेमी मंडळींच्या सहकार्यामुळे ते लवकरच तुरूंगातून सुटले.त्यानंतरही ते एसयूव्ही कारमध्ये कॅमेरा लावून रोड मूव्हीज बनवत राहिले.त्यांनी नंतर आठ वर्षात चार चित्रपट दिग्दर्शित केले आणि हा त्यातला चौथा चित्रपट होय.सामाजिक, धार्मिक प्रथेचं उल्लंघन केल्याची सबब पुढे करत पनाहींना अनेकदा शिक्षा झाली आहे.अशा मुस्कटदाबी करणाऱ्या वातावरणात कोणत्याही कलाकाराला कलाकृती निर्माण करणं किंवा त्यासंबंधीची आवड टिकवून ठेवणं अवघडच असतं पण पनाहींच्या विद्रोहापुढे ही आव्हाने दुय्यम ठरली आहेत.व्यावसायिक अभिनेते नसणाऱ्या सामान्य मंडळींना पात्र म्हणून दर्शवतानाही त्यांच्या चित्रपटातला अभिनय वास्तव असतो.कथेला पुढे नेण्यासाठीची गरज तो पूर्ण करतो आणि थ्री फेसेसच्या पावणे दोन तासांच्या कथानकातली रहस्यमयता ,रंजकता कायम राहते.याठिकाणी तीन चेहरे फक्त तीन चेहरे नसून ते संपूर्ण पीडित ,वंचित समाजाचं प्रतिनिधित्व इथं करतात.
एकूणच ,समाजातील पूर्वापार चालत झालेल्या परंपरा, रूढी आणि यामुळे कलाकारांचे आयुष्य असह्य होण्याची प्रक्रिया संबंधित चित्रपटातून दर्शविली जाते.आपला विषय ,आपलं म्हणणं मांडण्यासाठी भोवतालाच्या कोणत्याही घटकावर दबाव न टाकणं आणि घटितांमागची पार्श्वभूमी दाखवताना कसलेही संदर्भ वगळले जाणार नाहीत याची काळजी घेणं हे पनाहींचं वैशिष्ट्य इथे बघायला मिळतं.काळानुरूप जर समस्यांमध्ये बदल होत नसेल तर तेही घातकच पण पनाहींसारखा दिग्दर्शक सिनेमा हा समाजाचं दुःख,वेदना दाखवण्याचं साधनही मानत असल्याने प्रत्येक देशात कलाकाराचा आवाज दडपू पाहणाऱ्या व्यवस्थेला जाब फ एक विद्रोहाचा संयत आवाज बनलेला पनाही निर्माण होणं गरजेचंच असतं !
- ऋषिकेश तेलंगे